अध्याय ८६ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भगवांस्तदभिप्रेत्य द्वयोः प्रियचिकीर्षया । उभयोराविशद्गेहमुभाभ्यां तदलक्षितः ॥२६॥

तंव तो षड्गुणैश्वर्यवंत । मायालाघवी श्रीभगवंत । जाणोनि दोघांचें हृद्गत । नटला त्वरित द्वयरूपें ॥१७५॥
अंतरंगीं स्वभक्तांची । प्रार्थना अंगीकारूनि साची । जाणोनि तयांच्या हृदयींची । प्रेमोत्कंठा सर्वज्ञें ॥७६॥
तयांचें प्रिय तें करावयाचे । इच्छेकरूनि द्वयरूपाचें । नाट्य नटला हें मायेचें । लाघव कोण्हा न लक्षतां ॥७७॥
उभयतांचे हृदयींचा भाव । जे आमुचे घरा देवाधिदेव । आधीं पातला हा उत्सव । गगनीं स्वयमेव न सांठवे ॥७८॥
मी ब्राह्मण अकिंचन । मजवरी तुष्टोनि जनार्दन । आधीं ठाकिलें माझें सदन । म्हणोनि प्रसन्न हृत्कमळीं ॥७९॥
माझिया गृहाहूनि अन्यत्र । नाहींच गेला कमळाप्रिय । यास्तव भगवत्कृपेचें पात्र । जालों स्वतंत्र मी एक ॥१८०॥
तैसाचि मानी मिथिलेश्वर । प्रेमळ तपस्वी ब्राह्मण थोर । त्याहूनि आधीं मम मंदिर । कृपेनें श्रीधर प्रवेशला ॥८१॥
अन्यत्र माझिया सदनाहून । नाहींच गेला जनार्दन । ऐसिया भावें नृपाचें मन । सुखसंपन्न सप्रेमें ॥८२॥
पूर्वींच उभयतां ही अधिकारी । साधनचतुष्टयसंपत्ति पुरी । सप्रेमभक्ति अव्यभिचारी । प्रत्ययकारी ज्या आंगीं ॥८३॥
यास्तव त्यांतें भगवन्महिमा । निश्चयें आला वयुनावगमा । तदुत्साहें मानिती गरिमा । जैं पातला स्वधामा श्रीकान्त ॥८४॥
येर्‍हवीं जात्यंधाच्या घरीं । प्रकट प्रकटलिया तमारी । प्रकाशप्रतीति तयाच्या नेत्रीं । कीं अंतरीं प्रकटेना ॥१८५॥
ज्यातें कळला स्पर्शमहिमा । तो आयसीं प्रकटी हेमा । पाषाणप्रतीति दुर्भगा अधमा । त्या तत्प्रेमा अनोळख ॥८६॥
तेंवि बहुलाश्व आणि श्रुतदेव । भगवत्प्रेमगौरव । म्हणोनि स्वधामा गगनोत्सव । मानिती अपूर्व सुखलाभ ॥८७॥
दुर्ल्लभ लाभ मानिती पोटीं । तेंचि प्रकटी शुक वाक्पुटीं । परीक्षितीच्या श्रवणपुटीं । श्रोतीं ते गोष्ठी परिसावी ॥८८॥

श्रोतुमप्यसतां दूराञ्जनकः स्वगृहागतान् । आनीतेष्वासनाग्र्येषु सुखासीनान्महामनाः ॥२७॥

असज्जनांसी महिमा ज्याचा । श्रवणाकारणें दूरतर साचा । मग कोठूनि स्पर्शेल वाचा । अधिकार कैंचा दर्शनीं त्यां ॥८९॥
ऐसे दुर्ल्लभतर ईश्वर । स्वगृहा आले हरिमुनिवर । त्यांतें जनक मिथिळेश्वर । जाला सादर अभिगमनें ॥१९०॥
दंडवत प्रणाम करूनि भावें । सप्रेम आलिंगूनि आघवे । सभास्थानीं आणूनि बरवे । दिव्यासनीं बैसतील ॥९१॥
स्वसुखें उपविष्ट आसनीं । ऐसियांतें देखूनि नयनीं । आनंदला जनक मनीं । महामानव यास्तव तो ॥९२॥

प्रवॄद्धभक्त्या उद्धर्षहृदयास्राविलेक्षणः । नत्वा तदङ्घ्रीन्प्रक्ष्याल्य तदपो लोकपावनीः ॥२८॥

अनेकजन्मांचे शेवटीं । दुर्ल्लभ लाभ मानूनि पोटीं । प्रेमोत्कर्ष ब्रह्माण्डघटीं । न सांठवत उचंबळला ॥९३॥
तया हर्षोत्कर्षें करून । मानस जालें प्रत्यक्प्रवण । साविकाष्टकें हरिलें स्मरण । प्रवृत्तिभान पारुषलें ॥९४॥
आनंदाश्रु लोचनीं स्रवती । उभारल्या रोमाञ्चपंक्ती । स्फुंदन कांपवी गात्रांप्रती । पुलकस्वेद स्वरभंगें ॥१९५॥
ऐसे सात्विकाष्टकाचें भरतें । आंगीं जिरवूनियां मागुतें । उदया येतां प्रवृत्तीतें । भगवंतातें विलोकिलें ॥९६॥
माथा ठेवूनि सर्वां चरणीं । प्रवर्तला पादार्चनीं । मग तें हरिपादप्रक्षाळवणी । धरिलें मूर्ध्नीं सकुटुंबें ॥९७॥
लोकत्रयासि पावनकर । हरिपदप्रक्षालनोद्भव नीर । मौळीं वाहे श्रीशंकर । दुर्ल्लभतर तें मानी ॥९८॥
ऐसें पदजल वंदूनि माथां । जाहला मुनींसह हरि अर्चिता । तें तूं परिसें कौरवनाथा । सप्रेम कथा भक्तांच्या ॥९९॥

सकुटुम्बो वहन्मूर्ध्ना पूजयाञ्चक्र ईश्वरान् गन्धमाल्याम्बराकल्पधूपदीपार्घगोवृषैः ॥२९॥

केवळ ईश्वर ते मुनिवर । तयांसहित कमलावर । पूजिता जाहला मिथिलेश्वर । दिव्योपचार अर्पूनियां ॥२००॥
करवी दिव्याम्बरें परिधान । दिव्यगंधविलेपन । दिव्यसुमन समर्पून । धूप दीप उजळियेले ॥१॥
अर्घपाद्यपूर्वक ऐसी । सपर्या धेनुवृषार्पनेंसीं । नैवैद्य समर्पूनि षड्रसीं । त्रयोदशगुणीं ताम्बूल ॥२॥
सफलदक्षिणा नीराजनें । मुकुटीं वाहूनि दिव्य सुमनें । प्रदक्षिणा अभिवंदनें । नमनें स्तवनें स्तुतिपाठ ॥३॥

वाचा मधुरया प्रीणन्निदमाहान्नतर्पितान् । पादावङ्कगतौ विष्णोः स्म्स्पृशञ्शनकैर्मुदा ॥३०॥

ऐसी सपर्या करूनि नृपति । अमृतप्राय अन्नें तृप्ति । पावविलें तयांप्रति । आसनीं निगुती बैसवूनी ॥४॥
अमृतातें ही परतें सर । म्हणे ऐसी वाचा मधुर । तियेंकरूनि वाक्यें रुचिर । मिथिलेश्वर स्वयें वदे ॥२०५॥
सप्रेमप्रीति उपजे पोटीं । ऐसिया सुरसा मधुर गोष्टी । प्रियकर रुचिरा वदोनि वोठीं । बोले वाक्पुटीं हें वचन ॥६॥
श्रीविष्णु जो रुक्मिणीकान्त । त्याचे चरण अंकीं धृत । हळु हळु संवाहन करित । आनंदभरित होत्साता ॥७॥
काय वचन बोलिला कैसें । तें ही कुरुवर्या परियेसें । भगवंताचीं ऐकतां यशें । पातक न वसे मग निकटीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP