मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६६ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ६६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय ६६ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर राज्ञः काशिपतेर्ज्ञात्वा महिष्यः पुत्रबान्धवाः । पौराश्च हा हता राजन्नाथ नाथेति प्रारुदन् ॥२६॥काशीपतिनृपाच्या जाया । बंधु पुत्र भ्रातृभार्या । इष्टमित्रां सोयरियां । विदित झाला वृत्तान्त ॥८७॥राजद्वारीं नृपाचें मौळ । गगनींहूनि पडिलें अमळ । ऐकता धांवूनि आले सकळ । रुदती प्रबळ मोहभरें ॥८८॥पुरजन म्हणती काशीराया । आम्हां प्रजांतें सांडूनियां । तूं गेलासी कवण्या ठायां । वीरश्रीजाया पर्णूनी ॥८९॥कान्ता म्हणती भो भो नाथ । तुझेनि अंतःपुर सनाथ । आम्हां करूनियां अनाथ । वैकुंठपथ प्रार्थिला ॥१९०॥परम कोमळ तुझें वदन । केवळ साम्राज्यसुखाचें सदन । समरीं शत्रूंसीं करूनि कदन । कां पां रुदनप्रद झालें ॥९१॥श्मश्रु थरकले ओष्ठांवरी । दंत दिसती मुखाबाहेरी । सक्रोध भयंकर पाहोनि नेत्रीं । कां पां आम्हांवरी रुसलासी ॥९२॥आजि न बोलसी कां वचन । कोठें रमोनि गेलें मन । तुजवीण आम्ही दिसतो दीन । विषाद कोण वद वदनीं ॥९३॥आम्ही अंगना प्रीतिपात्रें । टाकोनि गेलासी कोण्या यात्रे । कोठें ठेविलीं आपुलीं गात्रें । आम्हांसी वक्त्रें गुज सांगें ॥९४॥बाहु घालूनि ग्रीवेतळीं । आलंगिसी शयनकाळीं । ते भुज आजि न दिसती जवळी । कुच करतळीं न सिवसी कां ॥९५॥मस्तकावरील काढूनि पदरा । तेणें पुसिति नृपाच्या शिरा । अधर चुम्बूनि कपोल नेत्रां । लावूनि वक्त्रा विलोकिती ॥९६॥शंख चक्र गदा पद्म । मुकुट कुण्डलें कौस्तुभोत्तम । वासुदेव हें मिरवीं नांव । त्याचा संगम कां त्यजिला ॥९७॥कोठें त्यजिले हय गज रथ । कैसा धरिला गगनपथ । अवयव सेना यूथप आप्त । सांडूनि येथ शिर आलें ॥९८॥ऐशा विलपती सकळ जाया । मंत्री म्हणती भो भो राया । आम्हां दाखविली आपुली काया । तुझिया पायां अभिवंदूं ॥९९॥आम्ही तुझिया प्रकृति सप्त । आम्हां मानिसी जिवलग आप्त । आमुसीं विचार करिसी गुप्त । आजी अक्लृप्त कां करिशी ॥२००॥आमुचा उबग किमर्थ आला । कोण आमुचा अपराध झाला । उपेक्षूनियां स्वप्रजांला । धरिला अबोला कां सांगें ॥१॥ऐसे विलपती सर्व प्रधन । तंव सुदक्षिणनामा नृपनंदन । म्हणे राया कां धरिलें मौन । सिद्धी अभिमान नेईन मी ॥२॥मी जन्मलों तुझिये उदरीं । तरी हे प्रतिज्ञा माझी खरी । मारीन शत्रु निर्धारीं । सत्य वैखरी जाणावी ॥३॥ऐसीं अनेकें शोकोत्तरें । प्रजा प्रधान दारा कुमरें । विलाप करिती त्यानंतरें । कृत्य पुढारें तें ऐका ॥४॥सुदक्षिणस्तस्य सुतः कृत्वा संस्थाविधिं पितुः । निहत्य पितृहंतारं यास्याम्यपचितिं पितुः ॥२७॥सुदक्षिणनामा नृपाचा सुत । सारूनि अंत्येष्टि समस्त । पितृहंता कृष्णनाथ । त्या वधूनि कृतार्थ हो पाहे ॥५॥पितृर्हत्यातें मारीन जेव्हां । पुत्रधर्मा उत्तीर्ण तेव्हां । भरूनि ऐसिया दुर्धर हांवा । केला उठावा तो ऐका ॥६॥इत्यात्मनाऽभिसंधाय सोपाध्यायो महेश्वरम् । सुदक्षिणोऽर्चयामास परमेण समाधिना ॥२८॥सारूनि जनकाची उत्तरक्रिया । पुरोहित प्रधान पाचारूनियां । प्रबळ शत्रु जिणावया । कोणा उपाया प्रवर्तिजे ॥७॥तंव ते वदतीं सुदक्षिणभूपा । ऐकें कृष्णाचिया प्रतापा । जेणें यमलार्जुनां पादपां । रांगत असतां उन्मळिलें ॥८॥जातपात्र असतां तान्हा । तैं बळितनया पूतना । प्राशूनि विषाचा उल्बण पान्हा । सायुज्यसदना पाठविली ॥९॥तृणावर्ताचा चेंपिला गळा । शकट स्पर्शूनि चरणकमळा । वदनीं विश्व दाखविलें डोळां । धर्षितां हेळा जननीतें ॥२१०॥वत्सासुर कपित्थपृष्ठीं । बक चिरिला चांचुवटीं । अघासुराची फोडिली घांटीं । कालिय क्ष्वेडी पळविला ॥११॥धेनुक टाकिला तृणराजाग्रीं । प्रलंब मारिला मुष्टिप्रहारीं । वदनें वणवा प्राशन करी । तो केंवि समरीं तुज आकळे ॥१२॥अमरपतीचा रोधिला मख । तेणें प्रळयबलाहक । आज्ञापिता नंदघोष । महावर्षें पीडियला ॥१३॥जेव्हां सप्त वर्षांचा हरि । गोवर्धनाद्रि उचलूनि करीं । गोकुळ रक्षिलें सप्त रात्री । शक्रें स्वनेत्रीं विलोकिलें ॥१४॥अरिष्ट केशी महासुर । खेळतां मारिले न धरूनि शस्त्र । कुवलयापीड मत्त कुंजर । हस्तप्रहारें संहारिला ॥२१५॥चाणूर मुष्टिक शल तोशल । रंगीं क्रीडतां मर्दिले मल्ल । कालनेमी जो कंस खळ । वधिला वाळ कर्षूनी ॥१६॥तपाच्या कैपक्षा मागध । करावया कृष्णवध । अठरा वेळ केलें युद्ध । परी नाहीं साध्य जय झाला ॥१७॥काळयवन जाळिला कपटें । विदर्भाचें मौळ मुखवटें । बीभत्स वपन लज्जापटें । आच्छादूनि विसर्जिला ॥१८॥राजकन्या वरिल्या अष्ट । तये प्रसंगीं नृप यथेष्ट । झाले समरंगीं प्रविष्ट । अद्यापि कष्ट भोगिती ते ॥१९॥जाम्बवत जो ऋक्षेश्वर । प्रत्यक्ष ब्रह्मयाचा अवतार । रामदळींचा महावीर । कांपे थरथर रावण ज्या ॥२२०॥बिळीं रिघोनि त्या बाहुयुद्धीं । दमितां विसरविली शुद्धि । भौम मारिला निर्जरदंदी । त्याच्या समृद्धि अपहरिल्या ॥२१॥बाण शिवाचा वरदपुत्र । ज्यातें रक्षी भालनेत्र । त्याचा छेदूनि बाहुभार । शोणितपुर विध्वंसिलें ॥२२॥बाणासुराच्या धेनूलागीं । वरुण भंगिला समरंगीं । ऐसिया युद्धाचे प्रसंगीं । कोण त्रिजगीं जिणों शके ॥२३॥यालागीं कृष्णेसीं युद्ध न घडे । त्वां जे प्रतिज्ञा केली तोंडें । तियेतें सत्यत्व केंवि घडे । अवघड कोडें हेंचि असे ॥२४॥पुरोहितातें सुदक्षिण । म्हणे तुम्हीं प्रयोगप्रवीण । जिया प्रयोगें निवटे कृष्ण । तें अनुष्ठान मज सांगा ॥२२५॥बुद्धि निश्चय विवरूनि ऐसा । पुरोहितमतें श्रीमहेशा । आभिचारमार्गें ऋत्विजां सरिसा । शरण होवोनि आराधी ॥२६॥नियम चालूनि परम क्रूर । आकर्षुनि निज शरीर । प्रसन्न केला भूतेश्वर । कर्म अभिचार आचरोनी ॥२७॥परमसमाधिनिष्ठावंत । देखोनि तोषला गिरिजाकांत । वरद होतां नृपाचा सुत । याची अभिप्रेत तै ऐका ॥२८॥प्रीतोऽविमुक्ते भगवांस्तस्मै वरमदाद्भवः । पितृहंतृवधोपायं स वव्रे वरमीप्सितम् ॥२९॥सुदक्षिणाचा देखोनि भाव । मागें वरदान म्हणे भव । पितृहंत्याचा निर्दळे ठाव । तो उपाव वर याची ॥२९॥जेणें माझा मारिला पिता । त्याचा वधोपाय तत्वता । इतुका माझा वर आवडता । पार्वतीकान्ता दे वेगीं ॥२३०॥इतुकी ऐकोनि वरप्रार्थना । काय बोलिला कैलासराणा । तें तूं ऐकें इरारमणा । कुरुभूषणा परीक्षिति ॥३१॥दक्षिणाग्निं परिचर ब्राह्मणैः सममुत्विजम् । अभिचारविधानेन स चाग्निः प्रमथैर्वृतः ।साधयिष्यति संकल्पमब्रह्मण्ये प्रयोजितः ॥३०॥भूतेश म्हणे सुदक्षिणा । दक्षिणाग्निमाजी हवना । करीं अभिचारविंधिंविधाना । सहित ब्राह्मणा तन्मंत्रीं ॥३२॥यजमानाचिये आज्ञेवरून । ऋत्विज सारी यज्ञविधान । तैसा आज्ञाधारक कृशान । करील हनन शत्रूचें ॥३३॥साठी सहस्र वेष्टित प्रमथ । हवनांतूनि महाद्भुत । प्रकट होऊनि साधील कृत्य । तो वृत्तान्त अवधारीं ॥३४॥मद्वरें या प्रयोगाग्नीसी । अब्रह्मण्यावरी प्रयोजिसी । तरी तो साधील संकल्पासी । या वर्मासी जाणावें ॥२३५॥गूढ रहस्य भूतपति । यामाजी वदला इये रीती । तें तूं ऐकें परीक्षिति । म्हणे सुमति शुक योगी ॥३६॥ब्रह्मण्यदेव श्रीकृष्णनाथ । त्यावरी प्रेरितां प्रयोगाद्भुत । तोचि क्षोभोनियां विवरीत । भस्मीभूत करील ॥३७॥ऐसा गूढार्थ सूचिला शिवें । परि सुदक्षिणातें नोहे ठावें । कृष्ण मानूनि मनुष्यभावें । आचरें आघवें तें ऐका ॥३८॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP