अध्याय ६६ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


इति क्षिप्ता शितैर्बाणैर्विरथीकृत्य पौण्ड्रकम् । शिरोऽवृश्चद्रथांगेन वज्रेणेंद्रो यथा गिरेः ॥२१॥

अरे पौण्ड्रका अचागळी । बोलूनि दूत कुशस्थळीं । धाडिला त्याचें फळ ये काळीं । घ्यावया बळी हो समरीं ॥४३॥
इत्यादि त्याचि पूर्ववचनीं । पौण्ड्रकातें निखंदूनी । समरीं बोलोनि चक्रपाणी । भंगिला बाणीं रथ त्याचा ॥४४॥
बाणीं मारिले अश्व चार्‍ही । सारथि उडविला अंबरीं । ध्वज तोडिला वरिच्यावरी । फोडिली शरीं रथचक्रें ॥१४५॥
समरीं पौण्ड्रक विरथ केला । आंगींचा गर्व भंगोनि गेला । कृष्णें प्रेरूनि स्वचक्राला । मस्तक नेला छेदूनी ॥४६॥
जैसा इंद्र वज्रघातें । गिरिश्रृंग भंगी अवचितें । तेंवि पौण्ड्रकमस्तकातें । चक्रें अनंतें खंडियेलें ॥४७॥
पौण्ड्रकाचें छेदिलें शिर । समरीं उरला काशीश्वर । त्यावरी लोटूनि रहंवर । केलें विचित्र तें ऐका ॥४८॥

तथा काशिपतेः कायाच्छिर उत्कृत्य पत्रिभिः । न्यपातयत्काशिपुर्यांपद्मकोशमिवानिलः ॥२२॥

शार्ङ्ग सज्जूनि वामकरीं । बाण काढिला कंकपत्री । शिर छेदुनि वरिच्यावरी । काशीपुरीं पाठविलें ॥४९॥
जैसी सहस्रदळकमलकळा । उठे झगडतां प्रबळ अनिळा । अकस्मात अंतराळा । माजूनि भूतळावरी पदे ॥१५०॥
तेंवि काशीश्वराचें शिर । पावलें काशीपुरीचें द्वार । पडतां देखूनि चमत्कार । मानिती समग्र पुरवासी ॥५१॥
येरीकडे चक्रपाणि । पौण्ड्रक काशीपती दोन्ही । मत्सरी मारूनि द्वारकाभुवनीं । विजयी होवोनि प्रवेशला ॥५२॥

एवं मत्सरिणं हत्वा पौण्ड्रकं ससखं हरिः । द्वारकामाविशत्सिद्धैर्गींयमानकथामृतः ॥२३॥

विजयवीर श्रीचिया कथा । मधुरा पावनसम अमृता । सिद्ध वर्णिती त्या ऐकतां । जीव भवपथा निस्तरती ॥५३॥
ऐसिया प्रकारें गरुडध्वज । शत्रु मारुनि प्रतापपुंज । विजयवीरश्री वरूनि भाज । पातला सहज निज नगरा ॥५४॥
सभास्थानीं उग्रसेन । यादववृद्ध वरिष्ठ मान्य । नमिले अपर जे सामान्य । तिहीं भगवान वंदिला ॥१५५॥
दारुकें रहंवर स्यंदनशाळे । नेऊनि तुरंग मुक्त केले । मंदुर शाळेमाजी लाविले । मग फेडिलें कवचातें ॥५६॥
कोटीर कवच कटिबंधनें । विविधें आयुधें गोधात्राणें । विसर्जूंनियां जनार्दनें । केलीं नमनें जननियातें ॥५७॥
रामप्रमुख सभास्थानीं । बैसला ऐकूनि चक्रपाणि । भेटती पुरवासी येऊनि । विजय परिसोनि उल्लासें ॥५८॥
इतुकें परिसोनि भगवद्यश । शुकातें पुसे कुरुनरेश । कवण गति पौंड्रकास । स्वामी आम्हांस तें सांगा ॥५९॥
शुक म्हणे गा कुरुवरिष्ठा । भगवद्ध्यानीं ज्यांची निष्ठा । हो कां मत्सरी अथवा द्वेष्टा । परि त्या प्रतिष्ठा हरिरूपीं ॥१६०॥

स नित्यं भगवद्ध्यानप्रध्वस्ताखिलबंधनः । बिभ्राणश्च हरे राजन्स्वरूपं तन्मयोऽभवत् ॥२४॥

तो पौंड्रक जीवें जितां । वाहे कृष्णाची स्वरूपता । द्वेषें अजस्र घ्यान करितां । झाल तत्त्वता कृष्णमय ॥६१॥
ध्यानें अखिल बन्धनें तुटलीं । वृत्ती हरिरूपीं नेहटली । सहज स्वरूपता मुक्ति घटली । तेही आटली सायुज्यीं ॥६२॥
द्वेषें वैरें मित्रें भजनें । अंतर वेधितां श्रीकृष्णध्यानें । प्रध्वस्त होतील अखिल बन्धनें । संतीं ये खुणे जाणावे ॥६३॥
यालागीं गावे हरीचे गुण । हरिचरित्रें करावीं श्रवण । सदैव करावें हरीचें ध्यान । अनुसंधान न तुटावें ॥६४॥
मानस नेहटावें हरिभजनीं । काळ क्रमावा हरिचिन्तनीं । वसती करावी भगवज्जनीं । दिवसरजनीं हरिप्रेमें ॥१६५॥
सर्वभूतीं श्रीभगवान् । अभेद लक्षूनि चैतन्यघन । जनीं वनीं विजनीं जनार्दन । भजतां उन्मन मन होय ॥६६॥
वत्स धेनूचें करी ध्यान । बाळका मातेचें चिन्तन । ऐसिया प्रेमें जडतां मन । प्रवृत्तिभान मग विसरे ॥६७॥
अर्चन वंदन दास्य सख्य । सर्व भजनांसी प्रेमा मुख्य । प्रेमें सेवितां पुराणपुरुष । बंधनें अशेष मग तुटती ॥६८॥
परावर जो परमेश्वर । होतां तयाचा साक्षात्कार । हृदयग्रंथी जे दृढतर । लिंगशरीर जिये म्हणती ॥६९॥
तेव्हां तियेचा होय भेद । अनुभविलिया अपरोक्षबोध । सहज सर्व संशया छेद । कर्मा उच्छेद अनायासीं ॥१७०॥
चरमदशा जियेतें म्हणती । ते संपादे ऐसिये रीती । जितां मरतां सायुज्यमुक्ति । स्वरूपस्थिति ते ऐसी ॥७१॥
रांडा पोरें गुरें - वासुरें । धनधान्याच्या स्वार्थसुभरें । जागृतीं स्वप्नीं वृत्ति वावरे। वांचे मरे ते ध्यासें ॥७२॥
तो नर निरयाचा पाहुणा । वरपडा होय जन्ममरणा । तापत्रयाचा अंकणा । योनि नाना परिभ्रमे ॥७३॥
एके योनीपासोनि जन्मे । अनेक योनि चिंती कामें । त्यामाजी फावल्या तितुकिया रमे । इंद्रियप्रेमें सुख मानी ॥७४॥
आपण होऊनि देहमात्र । ममत्वें कवळी कलत्र पुत्र । केवळ भ्रमाचें होवोनि पात्र । वृत्ति क्षेत्र संपादी ॥७५॥
जेव्हां देह पंचत्व लाहे । तैं हें मृषा होवोनि राहे । परंतु त्याचा अभ्यास वाहे । जन्मविताहे पुढतीं तो ॥७६॥
जयासीं अन्तीं जैसी मति । तया तैसीच होय गति । ऐसें विवरिलें सांख्यमतीं । अन्यथा श्रुति ते नोहे ॥७७॥
यालागीं मुमुक्षु विरक्त होती । भगवद्भजनीं प्रेमा धरिती । त्यांची अजस्र सत्प्रवृत्ति । कैवल्यप्राप्तिप्रद होय ॥७८॥
यावज्जन्म सेविला हरि । अन्तीं प्रकटे तो अंतरीं । बुडों नेदी भवसागरीं । स्वजन तारी सप्रेमें ॥७९॥
असो पौण्ड्रका ऐसी गति । कृष्णद्वेषें झाली अंतीं । यावरी ऐकें परीक्षिति । काशीपतीकडील कथा ॥१८०॥

शिरः पतितमालोक्य राजद्वारे सकुड्णलम् । किमिदं कस्य वा वक्त्रमिति संशयिरे जनाः ॥२५॥

काशीपतीचें शिर अंबरीं । कृष्णें उडविलें तीक्ष्ण शरीं । काशीपुरींत महाद्वारीं । पडिलें ज्यापरी पद्मकोश ॥८१॥
महाद्वारीं पडिलें शिर । अवलोकूनियां नारीनर । भंवते मिळाले जन नागर । करिती विचार परस्परें ॥८२॥
अकस्मात गगनींहून । काय पडिलें हें कोठून । प्रथम झाले संशयापन्न । स्वस्थ होऊन मग पाहती ॥८३॥
निर्धारूनियां म्हणती वक्र । कुण्डलमंडित जें भासुर । कोणा वीराचें ऐसें समग्र । संशयपर जन झाले ॥८४॥
तंव पातला मंत्रिवर्ग । तिहीं लक्षूनि चिह्नें साङ्ग । काशीपतीचें उत्तमाङ्ग । कथिलें सवेग राणिवसां ॥१८५॥
यावरी स्त्रियांची विलपनी । पुरजनाची सशोक ध्वनि । ते तूं सावध ऐकें श्रवणीं । कुरुकुळनलिनीप्रबोधका ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP