मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५९ वा| श्लोक ४१ ते ४६ अध्याय ५९ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ५९ वा - श्लोक ४१ ते ४६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४६ Translation - भाषांतर ययाच आनम्य किरीटकोटिभिः पादौ स्पृशन्नच्युतमर्थसाधनम् ।सिद्धार्थ एतेन विगृह्यते महानहो सुराणां च तमो धिगाढ्यताम् ॥४१॥राया पहा पां कौरवनाथा । केवढी देवांची कृतघ्नता । धिग् धिग् त्यांची वरिष्ठता । द्रविणाढ्यता धिक् त्यांची ॥४१॥अहो इंद्रें द्वारकेप्रति । जाऊनि परमदीनवृत्ति । करुणा भाकूनियां श्रीपति । कथिली आर्ति बहुसाल ॥४२॥श्रीकृष्णाच्या चरणा निकटीं । नमस्कारितां मुकुटकोटि । वारंवार पादपीठीं । संघटती तें विसरला ॥४३॥दीनवदनें अनाथपणें । सांगे रडोनियां गार्हाणें । तोंड करूनि केविलवाणें । विनीतपणें विनवूनियां ॥४४॥स्वकार्य साधावयालागीं । याचिला कैपक्षी शार्ङ्गी । तें कार्य साधिल्या लागवेगीं । युद्धप्रसंगीं मिसळला ॥५४५॥अच्युतैश्वर्यसंपन्न । विशेष आपुला अर्थसाधन । ऐशातें जाणोनि संक्रंदन । सिद्धार्थ होऊन पालटला ॥४६॥आपुला साधल्यानंतर अर्थ । पार्यातकाचा धरूनि स्वार्थ । इंद्राणीचे भिडेनिमित्त । त्रैलोक्यनाथ विरोधिला ॥४७॥विचार तरी केला काय । भौमापुढें इंद्र गाय । तो भौम जेणें मशकप्राय । वधूनि सुरसाह्य साधिलें ॥४८॥तो कृष्ण आकळेल संग्रामीं । हें न जाणवे हृदयपद्मीं । महाक्रोधतमाची ऊर्मी । बळें संग्रामीं संघटले ॥४९॥ऐसें सुरांचें मूर्खपण । धिग् धिग् महत्त्व थोरपण । धिग् धिग् ऐश्वर्यताअभिमान । धिक्कार पूर्ण धनाढ्यत्वा ॥५५०॥ऐसे धिक्कारूनि सुरगण । रायासि करूनि सावधान । म्हणे व्यासाचा नंदन । कृष्णकीर्तन अवधारीं ॥५१॥कृष्णं सशत सोळा । भौमसंग्रहीता कन्यका सकळा । द्वारके नेऊनि पर्णिता झाला । विचित्र सोहळा तो ऐका ॥५२॥अहो मुहूर्त एकस्मिन्नानागारेषु ताः स्त्रियः । यथोपयेमे भगवांस्तावद्रूपधरोऽव्ययः ॥४२॥अहो म्हणिजे परमाश्चर्य । कुरुभूपाळा सांगिजे काय । एक्या मुहूर्तें वधूसमुदाय । कृष्णें पर्णिला पृथक्पृथक् ॥५३॥यथाविधानें यथाविभवें । सर्वांप्रति सम गौरवें । न्यून पूर्ण कोण्हा नव्हे । न होतां ठावें परस्परें ॥५४॥समस्तांचीं मातापितरें । त्यांचे आप्त स्वजन सोयरे । कृष्णें आणिले चमत्कारें । कीं तीं शरीरें स्वयें धरिलीं ॥५५५॥रत्नखचितें दिव्य भुवनें । तयां वोपिलीं वसतिस्थानें । पृथग्रूपें धरिलीं कृष्णें । त्यांसी सम्मानें भेटला ॥५६॥तिहीं नेऊनि एकान्तासी । गुह्य वदती भगवंतेंसी । जे ते म्हणतीं मम कन्येसी । ज्येष्ठत्व दीजे पर्णूनी ॥५७॥मी सर्वस्वें हीन दीन । भाग्यें लाधलों भगवच्चरण । आधीं माझेंचि कन्यारत्न । वरूनि मान्य मज कीजे ॥५८॥ऐकोनि हांसे चक्रापाणि । म्हणे एक मुहूर्त सर्वां लग्नीं । तथापि तुमची आज्ञा मूर्ध्निं । मी वंदूनि वर्तन ॥५९॥पुढती श्वशुर विनति करिती । राम वसुदेव सह भूपति । सर्व यादव सहित युवती । मंडपा निगुती आणावे ॥५६०॥रेवती रुक्मिणी जाम्बवती । भामा कालिंदी नाग्नजिती । मित्रविंदा भद्रा सती । लक्ष्मणे सहित आणाव्या ॥६१॥देवकी आदि वरमातरा । सुभद्राप्रमुखा करवल्या इतरा । गर्गप्रमुखां ऋषीश्वरां । आणूनि वरा मम कन्या ॥६२॥प्रद्युम्न आणिजे रतिसहित । उपचारसामग्रीसमवेत । नियोगीं स्थापूनि कथिजे कृत्य । मज सनाथ करूनियां ॥६३॥ऐसेंच सर्वांही विनविलें । कृष्णें सर्वही मान्य केलें । त्याहूनि विशेष संपादिलें । तेंही कथिलें जातसे ॥६४॥तिहीं कथिलीं तितुकीं रूपें । स्वयें नटोनि कंदर्पबापें । तितुकिये मंडपीं साक्षेपें । पाणिग्रहणीं सादर पैं ॥५६५॥मंडप बहुळी शिल्पनवाई । करावया सर्वां ठायीं । तितुके विश्वकर्मे पाहीं । कृष्णें लवलाहीं निर्मिले ॥६६॥रत्नखचितें सभास्थानें । विविध शाळा सह सोपानें । विचित्र रंगीं चित्रिलीं भुवनें । उडती जीवनें ऊर्ध्वगती ॥६७॥कनकपुटांचीं चित्रासनें । रत्नखचितें दिव्यवितानें । गाद्या मृदोळिया वोटंगणें । विचित्र वसनें जवनिका ॥६८॥विचित्र पाकशाळांच्या ठायीं । अन्नपूर्णा निर्मिल्या पाहीं । न्यून पूर्ण कोठें काहीं । शेषशायी पडों नेदी ॥६९॥वरुणें केली जलसमृद्धि । अन्नपूर्णेची पाकसिद्धि । उभयसुहृदीं यादवमांदी । सभास्थानीं विराजली ॥५७०॥रंभाप्रमुख नृत्याङ्गना । गंधर्व आलाप करिती नाना । नारद तुम्बुरु सामगाना । भावमूर्च्छना दाखविती ॥७१॥ध्वजा छत्रें आतपत्रें । शंख दुंदुभि मंगळतुरें । रत्नदंडी दिव्य चामरें । सभास्थानीं ढळताती ॥७२॥गणेशपूजनें मंगळमूर्ति । प्रकट झाला वरदस्थिती । मातृकागृहगणांची पंक्ति । प्रकट घेती सपर्या ॥७३॥पुण्याहवाचनीं महर्षि सकळ । स्वस्तिपुण्याह शुभमंगळ । आशीर्वाद ओपिती सफळ । नान्दीश्राद्ध सारूनी ॥७४॥देवकप्रतिष्ठा उभय भागीं । सर्वां मंडपीं झाली वेगीं । जो तो मानी श्रीशार्ङ्गी । आम्हीं ये प्रसंगीं जोडिला ॥५७५॥संपादूनि कुळधर्मासी । तेलहळदी दोहों पक्षीं । द्विजपूजनें भोजनासी । सारूनि घटिका प्रतिष्ठिली ॥७६॥भास्करभट्ट समयकथनीं । ब्रह्म घटिका प्रतिष्ठी जीवनीं । काळंभट्ट अवलोकनीं । सावधानीं बैसला ॥७७॥वधूसी समर्पिलें फळ । सवेंचि वरासी आलें मूळ । नगरीं मिरवूनि गोपाळ । नेला तत्काळ मंडपा ॥७८॥मुहूर्तमात्र लग्नावकाश । यालागीं मिरवणुकेचा विशेष । न वाढवूनियां हृषीकेश । मंदपास त्वरें आलें ॥७९॥वधूबापें वरपूजन । मधुपर्केसीं केलें जाण । तैसेंचि वसुदेवें आपण । केलें पूजन वधूचें ॥५८०॥तंव भास्करभट्टें सावधान । म्हणोनि सूचिलें घटिकामान । ब्रह्मदेवें विधिविधान । सारूनि जवनिक धरियेलें ॥८१॥नोवरा उभा पूर्वाभिमुख । नोवरी नोवरियासम्मुख । मध्यें भेदाचें जवनिक । धरूनि म्हणती सावधान ॥८२॥अष्टेक्षण स्पष्टगिरा । निगमचतुष्टय कृतोच्चारा । मंगळाष्टकीं वधूवरां । आशीर्वाद अभीष्ट दे ॥८३॥प्रत्यगात्मत्वें नोवरी पाहे । वरा पूर्णत्वें हृदयीं ध्याये । ओंपुण्यकाळाचा लक्षिती समय । शबळीं शुद्धत्व निवडूनी ॥८४॥संश्लिष्टतादि भूमिका चारी । करवल्या अक्षता टाकिती शिरीं । काळंभट्ट सावध करी । अतिसमय वर्तत ह्मणोनियां ॥५८५॥अतिसमयीं करावें काय । तरी लक्ष्मीनारायणचिंतनोपाय । अंतीं मति ते गति होय । यालागीं सोय हे धरावी ॥८६॥बहुविध शास्त्रांचा लौकिक । गलबला सांडूनि हा निष्टंक । कुळ संकेतें अन्वयात्मक । स्वामी व्यतिरेकें चिंतावा ॥८७॥अन्वयें जाणोनि आपुलें कुळ । कुळस्वामी जो कुळाचें मूळ । तो चिन्मात्र चिंतिजे अमळ । सावध निश्चळ निःशब्द ॥८८॥ओंपुण्यकाळाचिया गजरा । लक्षूनि सूचना वाजान्तरां । सुटतां साक्षित्व जवनिकपदरा । दशविध तुरा उत्साह ॥८९॥ऐसें करितां सावधान । सरलें समयाचें व्यवधान । ओंपुण्यकाळीं लागलें लग्न । प्रत्यक्प्रवण अभेदें ॥५९०॥त्वंतत्पदांची निरासता । असिपदीं आत्मैक्यता । लग्न लागतांचि तत्त्वता । विपरीतावस्था पारुषली ॥९१॥नोवरा बैसला पूर्वाभिमुख । नोवरी झाली प्रत्यग्मुख । कंकण बांधूनि पृथक् पृथक् । एकात्मसुख परस्परें ॥९२॥असो हे अध्यात्मपरिभाषा । सामान्य श्रोतयांच्या मानसा । बोध न होतां मानिती विरसा । यालागीं परिसा सरळार्थ ॥९३॥गर्गाचार्य याज्ञिक सारी । कुबेर ब्राह्मणां वांटी भूरी । चंद्रमा ताम्बूल अर्पी करीं । अश्विनीकुमारीं सौरभ्य ॥९४॥इंद्र अर्पी सुमनमाळा । सभानायकां लोकां सकळां । कृष्णविवाहसुखसोहळा । पाहोनि डोळां त्रिजग निवे ॥५९५॥निशाणें लागल्या दुंदुभि । सुरांचे जयजयकार नभीं । पुष्पवृष्टीचा सुसेव्य सुरभि । प्रसरे ककुभीं न समात ॥९६॥गौरीहरां पूजावया । आम्रवृक्ष सिंपावया । नोवरी कडिये घेवोनियां । यादवराया चला ह्मणती ॥९७॥वृद्धाचारा देऊनि मान । नोवरी घेऊनि जनार्दन । पूजावया गौरीरमण । आला वचन नुलंघितां ॥९८॥कृष्ण वंदूनि गौरीरमण । म्हणे माझे हृदयीं तुझें ध्यान । तुझे हृदयीं आमुचें स्थान । प्रेमपूजन परस्परें ॥९९॥वधूचीं जियें मातापितरें । प्रेमें निर्भर परस्परें । देखोनि संतुष्ट वधूवरें । म्हणती श्रीधरें सुख दिधलें ॥६००॥सोळा सहस्र वडीलपणा । कन्येसीं देऊनि यादवराणा । मान दिधला आमुच्या वचना । संतुष्ट मनामाजिवडी ॥१॥यानंतरें वधूचा तात । समस्त यादवां विनवी विदित । माझा मंदप शोभिवंत । चारी दिवस करावा ॥२॥माझिये मंडपीं तुमचें शेष । मजला देऊनि कीजे तोष । आज्ञा प्रमाण हृषीकेश । म्हणोनि वचनास मान्य करी ॥३॥पुढती म्हणे जी दातारा । आपुलिया सुहृदां आप्तां समग्रां । अक्षत देऊनि परमादरा । करूनि पाचारा पंक्तीसी ॥४॥ऐकोनि तोषला जनार्दन । उद्धव अक्रूर पाचारून । म्हणे मम श्वशुरासवें जाऊन । अक्षत देऊन येइजे ॥६०५॥मंगळतुरांचिया गजरीं । प्रथम सोळा सहस्रां घरीं । नूतन सुहृदां सांगोनि त्वरीं । द्वारकापुरीं मग सांगों ॥६॥म्हणोनि जातां मंदिरा एका । तंव द्वारीं बळरामा सात्त्विका । सहित देखिलें वधूजनका । एकमेकां निमंत्रिती ॥७॥तेणें नेतां मंदपान्तरीं । तेथेंही श्रीकृष्ण आणि नोवरी । ओहर देखूनि बोहर्यावरी । झाला अंतरीं विस्मित तो ॥८॥उग्रसेनेंसीं यादवसभा । इंद्रादि सुरवरसमूह उभा । सर्व सामग्री मंडपशोभा । स्वमंडपींची अगवमिले ॥९॥परंतु वधू आणि वधूचीं पितरें । तत्पक्षींचीं सुहृदें इतरें । पृथक् पृथक् इतुकेंचि मात्रें । येरें समग्र पूर्ववत् ॥६१०॥ऐसीच सोळा सहस्र सदनीं । अक्षत परस्परें सर्वां जनीं । नेतां वधूवरां देखोने । आश्चर्य मनीं न समाये ॥११॥म्हणती आमुचे मंडपीं हरि । आमुची तनया वरूनि गजरीं । ओहर उपविष्ट बोहल्यावरी । येथ मुरारि कैं आला ॥१२॥तंव तेथिंचा वधूबाप येवूनि पुढां । म्हणे क्षणैक बैसोनि घ्या जी विडा । आम्ही तुमचिया बिर्हाडा । अक्षत घेवोनि येतसों ॥१३॥उग्रसेनादि अभ्युत्थानें । देऊनि बैसविती सम्मानें । परिमळद्रव्यें माळा सुमनें । अहेर वसनें समर्पिती ॥१४॥उद्धव अक्रूर सवें होते । ते उपचार अर्पितां देखोनि तेथें । परमाश्चर्यें म्हणती त्यांतें । तेथें तेथें केंवि तुम्ही ॥६१५॥मंडगर्भी जंव पाहती । तंव यादवेंसीं आहुकनृपति । देवकीप्रमुखा सर्व युवति । सुरमुनिपंक्ति नटनाट्यें ॥१६॥देखोनि मानिती आपुले मनीं । कृष्ण आमुचे मंडपींहूनी । पर्णावया हे नृपनंदिनी । आला घेवोनि सर्वांतें ॥१७॥प्रथम पाळीलें आमुचें वचन । कन्या पर्णूनि केलें धन्य । आतां यांचे भीडे करून । सर्वां घेऊन हरि आला ॥१८॥यादवेंसीं आलिया हरि । मागें मंडपामाझारी । कोणी नसेल हो झडकरी । आज्ञा घेऊनि जाइजे ॥१९॥मग आज्ञा घेवोनि उठिले । सवेग निज मंडपा आले । तंव यथापूर्ण देखते झाले । सभा वोहरें सुरमुनिही ॥६२०॥तेणें झाले सविन्मय । म्हणती केवढें परमाश्चर्य । सर्वांठायीं देवकीतनय । सभासमुदायसमवेत ॥२१॥जेथवरी आपुली धांव पुरे । तितुकीं फिरोनि पाहती घरें । सर्व समृद्धि सभा ओहरें । देखोनि मुरे मन बुद्धि ॥२२॥अनेक दर्पणीं एकचि बिंब । एक जीवन अनेक थेंब । एक द्रुमबीज अनेक कोंभ । सवेग स्वयंभ हरि तैसा ॥२३॥मुळीं शुकाचा गूढार्थ । तो उपलविला अल्पसा येथ । सविस्तर कथावया असमर्थ । भारतीनाथ चहुं वदनीं ॥२४॥तावत् म्हणिजे तितुकीं रूपें । धरूनि यथाव विधीच्या बापें । अव्यय म्हणिजे सत्यसंकल्पें । वेंच न होतां कल्पिलीं ॥६२५॥चैतन्य समान सर्वां ठायीं । तेंवि न्यून पूर्ण कोठें नाहीं । भगवत्पदें हें सामर्थ्य पाहीं । ऐश्वर्यनवाई प्रकाशी ॥२६॥यथावत्पदें वॄद्धाचार । जरी वर्णावा सूत्रानुसार । तरी प्रभु एकनाथ तो विस्तार । अध्यात्मप्रचुर बोलिले ॥२७॥रुक्मिणीस्वयंवरामाझारी । वदली स्वामींची वैखरी । तेचि पुढती वदतां चतुरीं । काय म्हणीजेल तें विवरा ॥२८॥बेगड सोन्याहूनि पिंवळी । आंबिल अमृताहूनि आगळी । तैसी हे वक्तृत्वनव्हाळी । स्वामिकाव्यसम गमिजे ॥२९॥जवा आगळीक काशी ऐसें । सर्व तीर्था म्हणिजेत असें । परी जवा आगळें माहोर ऐसें । वाराणसीतें न म्हणती ॥६३०॥वेदा न म्हणिजे कवित्व । विवर्त नोहे मुख्य तत्त्व । कर्मबद्ध अपर जीव । वासुदेवासम न कीजे ॥३१॥तेंवि प्रभूचिया वाख्याना । सम न कराव्या कविता आना । विप्रवेशें द्वारकाराणा । वाहे जीवना ज्या सदनीं ॥३२॥तया पभूचिया कृपावरदें । वाखाणिलीं मुळींचीं पदें । एक मुहूर्तें विवाहसमुदें । केलीं मुकुन्दें तीं कथिलीं ॥३३॥एवं सर्वत्र समसमान । चारी दिवस लग्नविधान । एरेणीपूजन वंशपात्रदान । साडे वाहून गृहभरणी ॥३४॥सर्वां एकचि गृहप्रवेश । करोनि लक्ष्मीपूजनास । रुक्मिणीप्रमुख भाणवस । अष्ट वरिष्ठा निरोविती ॥६३५॥ऐसा षोडश दिन सोहळा । शतोत्तर षोडश सहस्र अबळा । पर्णूनियां घनसांवळा । गृहस्थ झाला कुरुवर्या ॥३६॥बहुत वनिता ये अवतारीं । किमर्थ पर्णी कैटभारि । राया ऐसी शंका न करीं । रहस्य अवधारीं यदर्थीं ॥३७॥आबह्मकल्पापासून कल्प । निष्कळ गाळीव कल्मषपंक । तयाचा निर्मिला कळिकाळपुरुष । जो निःशेष दोषात्मा ॥३८॥जन्मलिय बाळकासी । अवयव मात्र असती त्यासी । प्रकट होती प्रौढ वयसीं । हेही तैसी गोष्टी असे ॥३९॥ब्रह्मवयसा चढोचढी । चढती युगांच्या परवडी । तैसीं तैसीं दुष्कृतें गाढीं । कळिकाळप्रौढी पावतसें ॥६४०॥पन्नास वरुषें ब्रह्मयाचीं । पूर्वपरार्धीं संपलीं साचीं । तैसीच प्रौढता कळिकाळाची । वृद्धि दोषांची जुनावली ॥४१॥जंव जंव विषाचा वाढे तरु । तितुकी मारकता होय निबर । कीं दिवसेंदिवस अभ्यासपर । विद्या कुविद्या वाढतसे ॥४२॥तेंवि वर्तमान ब्रह्मयास । द्वितीय परार्ध पूर्व दिवस । युगचौकडिया अठ्ठावीस । कळिकाळास प्रौढत्व ॥४३॥ऐसा पौढ कळीमळाब्धि । प्राणि तरती कवणे विधी । स्वहितविषयीं नुदैजे बुद्धि । विषयोन्मादीं निमज्जती ॥४४॥नटापरी साधनाभास । श्रौतस्मार्तव्रतसंन्यास । वर्णाश्रमधर्म पडिले ओस । वेदशास्त्रांस कोण पुसे ॥६४५॥शिस्नोदरपरायण । संप्रदाय कौळाचरण । जारणमारण वशीकरण । बोधप्रवीण गुरुवर्य ॥४६॥धर्मपत्नीचा करूनि त्याग । दंड कमंडलु संन्यासमार्ग । अनलकांचा करिती संग । आश्रमसोंगविडंबना ॥४७॥धनधान्याच्या संग्रहार्थ । उपार्जिती धनिक गृहस्थ । जार चौर्य मद्यद्यूत । घातपातपरायण ॥४८॥वेदान्तवक्ते ब्रह्मनिष्ठ । विषयप्राप्ति मानिती उत्कृष्ट । ज्ञान बोधूनि भरिती पोट । म्हणती भ्रष्ट विरागिया ॥४९॥आधींच अज्ञानें अज्ञानें आंधळीं । वरी ज्ञात्यांची ऐसी चाली । कलिमलसमुद्रामाजी पडलीं । कोणा काढिलीं न वचती ॥६५०॥विषयावांचून न रुचे कांहीं । पश्वादिकां समान पाहीं । विषयाभिलाष सर्वां देहीं । बाह्य सर्वही श्रुतिमार्ग ॥५१॥वामी कामीं लावूनि ध्वजा । गुरुत्वें बोधिती कौलपूजा । यथा राजा तथा प्रजा । कोणा लज्जा कोणाची ॥५२॥पाखंडियांचे शिष्टाचार । साबरागमींचे चमत्कार । हेतुवादी वक्ते चतुर । जार चोर प्रतिष्ठित ॥५३॥ऐशिया पापाब्धिमाझारीं । नौका जर्जर झालिया चारी । त्यांचीं नांवें तूं अवधारीं । कुरुधरित्रीवल्लभा ॥५४॥कर्म उपासना ज्ञानयोग । हे तरणोपायनौका साङ्ग । कलियुगीं यांचा झाला भंग । तोही प्रसंग अवधारीं ॥६५५॥अनाचारें बुडालें कर्म । देश काळ पात्र विषम । मंत्र तंत्र द्रव्य अधम । कर्ता सकाम विषयार्थीं ॥५६॥भक्तीवांचूनि उपासना । देहलोभें भंगिली जाणा । गुरुवेदान्तशास्त्रवचना । विश्वासेना कोणीही ॥५७॥विरागेंवीण भंगलें ज्ञान । ज्ञात्यासी न सुटे विषयाचरण । म्हणती आत्मा निर्लेप पूर्ण । यथेष्टाचरण प्रबोधिती ॥५८॥निरुपद्रवी न मिळे स्थळ । योगारूढ गुरु प्राञ्जळ । प्रवृत्तिदमनीं नोहे बळ । मानस चंचळ अनावर ॥५९॥गोगण नोहे प्रत्यक्प्रवण । अन्नाविणें व्याकुळ प्राण । सहसा न सुटे विषयाचरण । केंवि पवन निरोधवे ॥६६०॥एवं नावा न चलती चारी । कळिकाळपापाब्धिमाझारी । प्राणी बुडतां कवण तारी । म्हणोनि श्रीहरि कळवळिला ॥६१॥एक तरनोपाय दृढ । नाममात्रें तरती मूढ । ज्ञानविहीन केवळ जड । जैसे दगड सेतुपथीं ॥६२॥परंतु नाम न घेती कोणी । यालागीं स्वयें चक्रपाणि । प्रवृत्ति दावी विषयाचरणीं । अवतरोनि यदुवंशीं ॥६३॥साधक बाधक संसाररीति । कर्मप्रवृत्तिनिवृत्ति । गुणानुरूप रोचक मति । दावी श्रीपति वर्तोनी ॥६४॥मुचुकुंदासी केला बोध । समरीं भंगिला जरासंध । रुक्मिणी वरिली भावनाशुद्ध । रुक्मि विरुद्ध विडंबिला ॥६६५॥असो ऐसी वर्तमानीं । गुणानुसार दाविली करणी । भावी कामुक विषयी प्राणी । ह्यांलागोनि तरावया ॥६६॥गीत संगीत कामशास्त्र । जें कां श्रृंगाररसप्रचुर । संपादूनि त्रिविध कलत्र । क्रीडला विचित्र यदुवर्य ॥६७॥त्रिविध कैशा म्हणाल दारा । त्याही सांगिजती अवधारा । एकी स्वकीया दुसरी परा । तिसरी वेश्या अभिसारिका ॥६८॥परकीयेची रसोत्पत्ति । कामशास्त्रीं विशेष वदती । यालागीं भोगोनि बल्लवयुवति । कामुकां प्रवृत्ति हरि दावी ॥६९॥अभिसारिकेची निर्भय रति । क्षणभंगुर प्रेमोत्पत्ति । कुब्जा भोगूनि ते प्रवृत्ति । दावी श्रीपति कामुकां ॥६७०॥स्वकीयांचा रतिविकास । ललना पर्णूनियां बहुवस । गृहमेधियांसम विन्यास । हृषीकेश स्वयें दावी ॥७१॥त्रिविधहरिक्रीडाचिंतनें । कामुकां लागती तीव्र ध्यानें । श्रवणें पठनें स्मरणें मननें । लीलाकथनें भव तरती ॥७२॥वस्तुसामर्थ्यमहिमा ऐसा । लोह पालटे स्पर्शतां स्पर्शा । तैसे हरिगुण क्षालिती दोषा । गातां सदोषा हरिलीला ॥७३॥परकीया आणि अभिसारिका । पूर्वार्धीं कथिल्या कुरुनायका । स्वकीया पर्णूनि गृहकौतुका । दावी कामुकां जगदात्मा ॥७४॥विषयी कामुक तारावया । पूर्णकामेंही कामचर्या । यथेष्टाचरणादि त्रिविध राया । केली स्वमायालाघवें ॥६७५॥तें कृष्णाचें गृहस्थपण । विषयविलास स्वधर्माचरण । येथूनि कथिजेल वक्ष्यमाण । तें कीजे श्रवण सत्पुरुषीं ॥७६॥गृहेषु तासामनपाय्यतर्क्यकृन्निरस्तसाम्यातिशयेष्ववस्थितः ।रेमे रमाभिर्निजकामसंप्लुतो यथेतरो गार्हकमेधिकांश्चरन् ॥४४॥शतोत्तर षोडश सहस्रां गृहीं । न्यूनाधिक कोठें नाहीं । सर्वां समान शेषशायी । अतर्क्य नवाई दाखवी ॥७७॥जें ऐश्वर्य नेणे विधि । विश्वकर्मा न सृजी कधीं । ऐशिया अनेक भोगसमृद्धि । स्वयें उपपादी अतर्क्य ॥७८॥जे ते मानी आपणावरी । परम प्रीति श्रीकृष्ण करी । मजवेगळा न वचे दुरी । कदा श्रीहरि आणकी पें ॥७९॥अष्टनायिकाकेलिविहारी । सप्रेम सोळा सहस्रां घरीं । एके रमेसींच क्रीडे हरि । निर्विकारी आत्मरत ॥६८०॥अनेक शुद्धोपाधिवशें । अनेक आत्मप्रतिभाभासें । तेथ रमिजे स्वात्मविलासें । जेंवि पुरुषें अद्वैतें ॥८१॥तेही आत्मभा रमादेवी । साष्ट शत षोडश सहस्रां नांवीं । एक रुक्मिणीच जाणावी । अंश भावी पृथक्त्वें ॥८२॥स्वनंदपरिपूर्ण जो कां हरि । अत्मप्रभेसीं क्रीडा करी । एकानेक पृथगाकारीं । भेदकुसरी रुचवूनी ॥८३॥मिथ्याविषयाभासीं रमती । त्यासीं अपाय काळवृत्ति । तैसी नव्हे पैं आत्मरति । स्वानंदपूर्ति अजस्र ॥८४॥एर्हवीं गृहमेधियां परी । गृहस्थधर्म आचरें हरि । युवायुवतिविलासकुसरी । स्मरविकारीं अनुकरणें ॥६८५॥तियें अनुकरणें यथाविधि । परीक्षितीतें शुक प्रबोधी । श्रोतीं परिसावीं कुशलबुद्धी । श्लोक प्रतिपादी व्याख्यानीं ॥८६॥इत्थं रमापतिमवाप्य पतिं स्त्रियस्ता ब्रह्मादयोऽपि न विदुः पदवीं यदीयाम् ।भेजुर्मुदाऽविरतमेधितयाऽनुरागहासावलोकनवसंगमजल्पलज्जाः ॥४५॥इत्थं पूर्वोक्त स्त्रिया समस्ती । रमारमण जो कमलापति । पावोनि सप्रेमें दंपती - । भावें वर्तती अनुरागें ॥८७॥ज्याची पदवी ब्रह्मादि हर । जाणों न शकती सविस्तर । ऐशियातें वनितानिकर । स्मरविकार अनुभविती ॥८८॥मुदा म्हणिजे हर्षोत्कर्षें । सानुरागलोकहासें । प्रथमनवसंगावेशें । सलज्ज भजती वाग्जल्पें ॥८९॥कटाक्षबाणें विंधिती कृष्णा । स्निग्ध सस्मित् मुरडिती वदना । नवसंगमीं वदती वचना । संकेतसूचना नर्मोक्ति ॥६९०॥वेणिकाकर्षण वाममुष्टी । अपरें धरूनियां हनुवटी । चुंबन देतां दशन ओष्ठिं । स्मरसंतुष्टी रोविती ॥९१॥मन्मथकदनें धरितां कुच । तन्वंगिया तनुसंकोच । करूनि वदती उच्चावच । जीं अवाच्यें स्मरगुह्यें ॥९२॥इत्यादिप्रकारीं समस्त वनिता । जिया रमेच्या अंशभूता । लाहोनि रमारमण भर्ता । झाल्या भजत्या भगवंतीं ॥९३॥ललितलाघवलालनीं ललना । स्मरसंगमीं ललितां यूनां । मग ते चढे गर्वाभिमाना । गुणलावण्या वर मानी ॥९४॥तेणें मदगर्वें अपाय । उभयप्रेमामाजी होय । तैसा नोहे वधूसमुदाय । जिहीं यदुराय वर वरिला ॥६९५॥स्मरविकारभरें रमण । झाला गमतांही स्वाधीन । तरी अगर्व दास्याचरण । ज्या संपूर्ण न संडिती ॥९६॥सर्व समृद्धि असतां घरीं । परंतु निजाङ्गें सेवाधिकारी । नियमें भजती सर्वोपचारीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥९७॥प्रत्युद्गमासनवरार्हणपादशौचतांबूलविश्रमणवीजनगंधमाल्यैः ।केशप्रसारशयनस्नपनोपहार्यैर्दासीशता अपि विभोर्विदधुः स्म दास्यम् ॥४६॥सदनीं शतानुशत दासी । कुशल चतुरा गुणैकराशि । असतां निजाङ्गें सेवेसी । करिती दिननिशीं हरिरमणी ॥९८॥स्वकान्त देखोनियां सम्मुख । उथोनि ठाती चरणोन्मुख । होऊनि तिरोहित सम्यक । दास्य अचुक आचरती ॥९९॥दिव्यासनरचनाविधि । वोळंगे सादर कुशल बुद्धि । वरिष्ठ साळंकारसमृद्धि । चित्रप्रभेदीं लेवविती ॥७००॥पादशौचाच्या आचरणीं । मंचकीं उपविष्ट चक्रपाणि । कनककलशीं उष्ण पाणी । कनकभाजनीं पादार्चा ॥१॥रत्नखचित प्रवाळवज्री । पदतळ क्षाळिती कंकणगजरीं । सविलास स्मेरापाङ्गें शौरि । निरखी साजिरी सर्व तनु ॥२॥चंचळ कचकुचश्रवणाभरणें । नितंबगुच्छ कंठभूषणें । क्कणितकिंकिणीकरकंकणें । पाहे नयनें नलिनाक्ष ॥३॥नर्मोत्तरीं मानस मोही । लीलेकरूनि स्पर्शे देहीं । तत्स्पर्शाची सुखनवाई । अमोघ सुकृतें अनुभविती ॥४॥अभ्यंगपरिचर्येच्या काजा । करूनि रत्नपीठीं गरुडध्वजा । बैसवूनियां बरवे ओजा । मुक्त मूर्धजां उकलिती ॥७०५॥कनकपात्रीं सुगंध तैला । दासी माखिती भगवत्कुरळां । वनिताहस्तें निषेध केला । म्हणोनि जवळी तिष्ठती त्या ॥६॥सुगंधद्रव्यीं उद्वर्तना । कृष्णशरीरीं उटिती ललना । प्रमुदितहृदयें पाहती वदना । सलज्जनयना स्मितवक्त्रीं ॥७॥त्वाष्ट्र सुघटित मांडूनि चौकी । कृष्ण बैसवोनि उष्णोदकीं । भोंवतीं ओळंगती सेवकी । वनिताहस्तकीं जळकलशी ॥८॥करकौशल्यें क्षाळिती केश । केशप्रसाधनपट्टिकेस । घेऊनि विंचरती विशेष । स्निग्धता अशेष क्षाळूने ॥९॥भुज पद पृष्ठ मर्दिती करीं । उद्वर्तनांश संलग्न जठरीं । तोही क्षाळूनि अभिषेक शिरीं । करिती सुंदरी उष्णजळें ॥७१०॥पंचप्रकारीं नीराजनें । जळ फळ सुमनें रत्नें अन्नें । तदुपरि अंगपरिमार्जनें । सूक्ष्मवसनें वधू करिती ॥११॥रत्नपाद्का अर्पिती चरणीं । देती पीताम्बर परिधानीं । आर्द्रवस्त्रा निष्पीडनीं । उत्तरीय देऊनि प्रवर्तती ॥१२॥दिव्यासनीं बैसवूनि । केशर कस्तूरी हरिचंदन । तिलकधारण विलेपन । करिती चर्चन सर्वाङ्गीं ॥१३॥संध्यावंदना शुद्धोदक । आचमनार्थ पृथक् पृथक् । कनककलशीं देती सम्यक । भूषणें अनेक लेवविती ॥१४॥रत्नखचितें कुंडलें श्रवणीं । मुक्तमाळिका कौस्तुभमणि । वैजयंती कंठाभरणीं । बाहुभूषणें मुद्रिका ॥७१५॥करकंकणें कटिमेखळा । पदभूषणें चरणयुगळा । सुमनहार पंकजमाळा । कुसुमें कुरळां ग्रथिताती ॥१६॥धूपदीपार्पणोत्तर । विविध नैवेद्य अमृतोपहार । मध्य पानीन सुतप्त नीर । आंचवणार्थ समर्पिती ॥१७॥गंडूषपात्र मांडूनि तळीं । धारा वोतिती हरिकरतळीं । वदन कर पद क्षाळूनि चैलीं । परिमार्जिती सुधौत ॥१८॥रुचिरें रोचक पाचक फळें । मधुरें सुपक्वें रसाळें । अर्पूनियां त्रयोदशमेळें । ताम्बूलविडियां समर्पिती ॥१९॥काया वाचा तनु मन धन । करूनि सर्वस्वें अर्पण । करीं घेवोनि नलदव्यजन । करिती विश्रमण मंदतर ॥७२०॥त्यानंतरें मंचकयानीं । राजोपचार समर्पूनी । सुगंधचूर्णाच्या उधळणीं । मुकुटीं खोविती अवतंस ॥२१॥दिव्य दर्पण देऊनि करीं । ललामदंडी द्वय चामरीं । क्कणितकंकणा ढाळिती नारी । अपरा सुचिरीं करतरळा ॥२२॥नाना कौतुकें रसिकानंद । काव्यकौशल्यें छंदप्रबंध । गीत नृत्य हास्य विनोद । स्तवनीं गोविंद रंजविती ॥२३॥मुरजप्रमुख वाद्यकुमरी । अक्षक्रीढा नानापरि । इतिहासादि कीर्तनगजरीं । वल्लभा चतुरी रंजविती ॥२४॥सदनीं शतानुशत दासी । सुंदरा चतुरा गुणैकराशि । असतां स्वामीचे सेवेसीं । निजाङ्गेंसीं अनुरक्ता ॥७२५॥साष्ट शतें सहस्रें सोळा । समान ओळंगती घननीळा । त्यांमाजी कोणीचा कळवळा । न्यून आगळा जरी पुससी ॥२६॥तरी ते एकचि कमळादेवी । अनेकरूपें रतिगौरवीं । नटोनि स्वनाथमनोरथभावीं । विविधा दावी रसचर्या ॥२७॥जैसा गान्धर्वनिगमवेत्ता । विपंची सज्जी आपुल्या चित्ता । जेंवि ते तैसीच स्वरसंमता । होय तद्गीता अनुसरती ॥२८॥तेंवि कृष्णाच्या अंतर्भावीं । अष्टनायिका रसगौरवीं । बहुधा नटोनि कमलादेवी । दावी आघवीं अनुकरणें ॥२९॥सूत्रधाराच्या करचाळणें । सायखाडियांच्या पुतळ्या चळणें । तेंवि नटती नायिका गुणें । हरीच्छेनें हरिरमणी ॥७३०॥असो ऐसे कळिकाळीन । विषयासागरीं नर निमग्न । तत्कार्ण्यें कळवळून । विषयाचरण हरि प्रकटी ॥३१॥तया कथांचिया श्रवणीं । बैसतां प्रेमा अंतःकरणीं । प्रकटे तैं तो भवनिस्तरणीं । सुदृढ तरणीमय होय ॥३२॥ऐसें जाणोनि साधकवर्गीं । भजिजे हरिगुणनौकामार्गीं । श्रवणें मननें निजान्तरंगीं । रमतां भंगी कलिमलता ॥३३॥कुरुनरपाळा इतुकी कथा । वैय्यासकि झाला कथिता । वक्ष्यमाणीं हरीच्या चित्ता । सम अनुकरता वाखाणी ॥३४॥सर्वां वरिष्ठ मुख्य राणी । मनोऽनुकूळा वरवर्णिनी । कृष्णप्रियतमा जे रुक्मिणी । स्तोभी प्रेरणीं हरीच्छा ॥७३५॥तिये व्याख्यानीं चिद्रसपाना । श्रोतीं सावध बैसिजे श्रवणा । दयार्णवाची विज्ञापना । इतुकी सज्जना सलगीची ॥३६॥इतुकें श्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं श्रीशुक कथी । तें परिसोनि परीक्षिति । श्रवणीं प्रीति वाड करी ॥३७॥विषयाचरण श्रीकृष्णाचें । परि हें रहस्य उपनिषदांचें । संहितारूप गुह्य साचें । परमहंसाचें शुक आशंसी ॥३८॥दशमींचा हा एकोनषष्टि । श्रवणें मननें विवेकदृष्टि । श्रोतयां कैवल्यरसाची वृष्टि । प्रेम संतुष्टीमाजि करी ॥३९॥श्रीएकनाथ कल्पतरु । चिदानंद सुमनभारु । स्वानंदाचा फलविस्तारु । गोविंदरसें सुरसाळ ॥७४०॥तद्रस रसाळ पूर्णानुभव । बोधें भरला दयार्णव । श्रवणें पर्वीं पुण्यवैभव । श्रोते सदैव लाहती ॥४१॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां भौमासुरवधपार्यातहरणसुरमदक्षालनसशतषोडशसहस्रनृपकन्यापाणिग्रहणं नामैकोनषष्टितमोऽध्यायः ॥५९॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४६॥ ओवी संख्या ॥७४१॥ एवं संख्या ॥७८७॥ ( एकोणसाठावा अध्याय मिळून ओवीसंख्या २८६३९ ) अध्याय एकोणसाठावा समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP