अध्याय ५९ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तस्यात्मजाः सप्त पितुर्वधातुराः प्रतिक्रियामर्षजुषः समुद्यताः ।
ताम्रोंऽतरिक्षः श्रवणो विभावसुर्वसुर्नभस्वानरुणश्च सप्तमः ॥११॥

पितृवधाचें दुःख पोटीं । धरूनि क्षोभले ते जगजेठी । सातही जण महा हठी । जनकासाठीं उठावले ॥२३०॥
घ्यावया निजजनकाचा सूड । क्रोधें समरां जाले दृढ । दृष्टी लक्षूनि गरुडारूढ । लोटले प्रचण्ड साटोपें ॥३१॥
ताम्र अन्तरिक्ष तिसरा श्रवण । वसु विभावसु नभस्वान् अरुण । जनकासमान आंगवण । सातही जण उग्रकर्में ॥३२॥
भौमें प्रेरिलें कृष्णावरी । पितृवधाचे प्रतिकारीं । निखंदोनियां विषमोत्तरीं । सेना आसुरी देऊनियां ॥३३॥

पीठ पुरस्कृत्य चमूपतिमृधे भौमप्रयुक्ता निरगन्धृतायुधाः ।
प्रायुंजताऽसाद्य शरानसीन्गदाः शक्त्यृर्ष्टिशूलान्यजिते रुषोल्बणाः ॥१२॥

भौमासुराचा सेनापति । पीठनामा दैत्य दुर्मति । भौमाज्ञेनें समराप्रति । जाला निगुती सन्नद्ध ॥३४॥
प्रचण्ड सेना चतुरंगिणी । सज्जूनि सवेग पातला रणीं । ताम्रप्रमुख सातही जणीं । समराङ्गणीं तो केला ॥२३५॥
रथीं बैसले महारथी । गजारोहणीं यूथपति । अश्वसादी समरक्षिती । प्रतापें दाविती हयशिक्षा ॥३६॥
पदाति बळिष्ठ मेहावीर । यन्त्रधारी धनुर्धर । शस्त्रसाधनविद्याचतुर । प्रतापी समरप्रवीण ॥३७॥
ऐसी चतुरंग सेना । गर्जत पातली समरांगणा । पाचारूनि जनार्दना । आयुधें नाना प्रेरिती ॥३८॥
सिंहनादआस्फोटनें । अश्वहेषितें गजगर्जनें । गमे वांकुडीं घातलीं धनें । तैसीं सन्धानें बाणांचीं ॥३९॥
शरीं झांकोळलें गगन । विद्युत्प्राय तीक्ष्ण बाण । विंधिती लक्षूनि जनार्दन । दाविती आंगवण समरंगीं ॥२४०॥
खङ्ग परजूनि तळपती एक । म्हणती छेदूं हरिमस्तक । गदा टाकिती एक सम्मुख । शस्त्रें अनेक पृथक्त्वें ॥४१॥
इन्द्रजिताचिया प्रतिकारीं । सौमित्रहनना रावणें समरीं । शक्ति प्रेरिली तैसियापरी । दैत्य हरिवरी टाकिती ॥४२॥
मन्त्रदेवता चेतवून । अभिचारविद्याप्रयोगपठन । कृष्णमारणीं प्रक्षोभून । शक्तिमोक्षण करिताती ॥४३॥
ऋष्टिनामकें शस्त्रें क्रूर । एक टाकिती महाअसुर । एक प्रतापी समरधीर । शूळीं खगेन्द्र भेदिती ॥४४॥
लीलेकरूनि त्रिजगज्जेता । ऐसिया अजिता श्रीभगवन्ता । सक्रोधदैत्यीं उल्बण घाता । करित असतां साटोपें ॥२४५॥
तया दैत्यांचीं शस्त्रजाळें । जैसीं अकाळघनमण्डळें । देखोनि कृष्णें काय केलें । तें परिसिलें पाहिजे ॥४६॥

तच्छस्त्रकूटं भगवन्स्वमार्गणैरमोघवीर्यस्तिलशश्चकर्तह ।
तान्पीठमुख्याननयद्यमालयं निकृत्तशीर्षोरुरुजांघ्रिवर्मणः ॥१३॥

शार्ङ्ग सज्जूनि शार्ङ्गपाणि । अमोघ मार्गण लावूनि गुणीं । दैत्य प्रेरिता शस्त्रास्त्रश्रेणी । तिलतुल्य छेदूनि पाडिल्या ॥४७॥
वीरश्रीयशःश्रीसंपन्न । पूर्णैश्वर्य श्रीभगवान । अमोघप्रतापलीलेकरून । दैत्यास्त्रघन विध्वंसी ॥४८॥
छेदूनि पाडिलीं शस्त्रें सकळ । जेंवि पवनें घनमंडळ । भंवता भासे उडुगणमेळ । तेंवि रिपुदल प्रकाशिलें ॥४९॥
मग वर्षोनि तीक्ष्णबाणीं । रणीं पाडिल्या सुभटश्रेणी । पीठनामा जो सेनानी । शिर छेदूनि पाडिला ॥२५०॥
कृष्णसायक कनकपुंख । शार्ङ्गनिर्मुक्त परम तीख । छेदती दैत्याचें मस्तक । लक्षें लक्ष चमत्कारें ॥५१॥
जानु जंघा मांडिया कटी । छेदूनि पाडिले लक्षकोटी । शिरें उसळती गगनपोटीं । पडती भूतटीं उडुगणवत् ॥५२॥
गजाश्वपाखरा कवचें टोप । छेदूनि भेदिले वीर अमूप । सुभटीं सांडिले समरदर्प । धेनुकळपसम पळती ॥५३॥
हाहाकार माजला रणीं । समरीं योद्धा न थरे कोण्ही । तैं ताम्रप्रमुख सातही जणीं । शार्ङ्गपाणि पडखळिला ॥५४॥
ताम्र अंतरिक्ष श्रवण । वसु विभावसु नभस्वान । अरुणासहित सातही जण । दिशा वेष्टूनि भीडती ॥२५५॥
ताम्र वर्षे बाणजाळें । श्रवण खगेन्द्रा हाणे मुसळें । विभावसु प्रबळबळें । भेदी त्रिशूळें घननीळा ॥५६॥
वसुनामकें कराळ खङ्ग । काढूनि ताडिला भामारंग । नभस्वतें करूनि लागवेग । करूनि परिघ प्रहारिला ॥५७॥
अरुणें होऊनि करुणारहित । कृष्णहनना खाऊनि दांत । हृदयीं ताडिला द्वारकानाथ । शक्ति अद्भुत प्रेरूनी ॥५८॥
ऐसें अनेक शस्त्रास्त्रवृष्टि । हरिवरी वर्षती दैत्य हठी । तें देखोनि कृष्ण जगजेठी । शार्ङ्ग मुष्टी स्फाळिलें ॥५९॥
बाणीं तोडूनि पाडिलीं शस्त्रें । सातही मस्तकें छेदिलीं चक्रें । रहंवर भेदिलें गदाप्रहारें । वनितापुत्रें बळ दमिलें ॥२६०॥
पक्षघाताची झडपणी । गगनीं उडविल्या वीरश्रेणी । चक्रवात मिरवे तृणीं । तेंवि भ्रमणीं चमू पडिली ॥६१॥
हें देखोनि नरकासुर । भौमनामक जो धराकुमर । क्षोभला जैसा प्रळयाङ्गार । निघे बाहीर तें ऐका ॥६२॥

स्वानीकपानच्युतचक्रसायकैस्तथा निरस्तान्नरको धरासुतः ।
निरीक्ष्य दुर्मर्षण आस्त्रवन्मदैर्गजैः पयोधिप्रभवैर्निराक्रमत् ॥१४॥

आपुला सेनापति पीठ । आणि मुरात्मज सप्त सुभट । सेनायूथप वांठवांठ । पडिले उद्भट समरंगीं ॥६३॥
श्रीकृष्णाच्या चक्रसायकीं । प्रळय केला दैत्यकटकीं । सेना भंगली देखोनि तवकीं । निघे सम्मुखीं युद्धार्थ ॥६४॥
क्षीरसमुद्रोद्भव कुंजर । सन्नद्ध बद्ध शत सहस्र । दानोदकाचे पाझर । द्रवती सर्वत्र ज्या आंगीं ॥२६५॥
मदोदकमंडित गंडयुगळ । मोदें उन्मत भ्रमरमेळ । गुंजारवतां घनमंडळ । भासे केवळ जननयनां ॥६६॥
मयनिर्मित कुंतदंती । लोहश्रृंखळा शुंडाप्रान्तीं । कवची अंबष्ठ श्रृणिनिघातीं । शिक्षितदंतिप्रेरक जे ॥६७॥
मयनिर्मित गजपाखरा । कठोर अभेद्य व्रजप्रहारा । पृष्ठीं गुढारें प्रासादशिखरा । सम उत्तुंग कलशाढ्यें ॥६८॥
स्तंबेरमारूढ वीर । शस्त्रास्त्रयोद्धे महाशूर । पार्ष्णिग्राह दैत्य क्रूर । शक्तिशूळी परश्वधी ॥६९॥
उच्च पताका फडकती गगनीं । गजदुंदुभि जळदस्वनीं । प्रचंड यंत्रांचिया श्रेणी । समराङ्गणीं विजयार्थ ॥२७०॥
ऐसे सन्नद्ध बद्ध करटी । शतसहस्रसेनाघरटी । मध्यें प्रचंडकुंजरपृष्ठीं । भौम जगजेठी वळघला ॥७१॥
ऐरावतारूढ वज्री । जैसा मिरवे निर्जरभारीं । तैसा पातला रणचत्वरीं । लक्षी श्रीहरि तें ऐका ॥७२॥

दृष्ट्वा सभार्यं गरुडोपरि स्थितं सूर्योपरिष्टात्स तडिद्घनं यथा ।
कृष्णं स तस्मै व्यसृजच्छतघ्नीं योधश्च सर्वे युगपत्स्म विव्यधुः ॥१५॥

जैसें सूर्यावरी घनमंडळ । सौदामनीसहित सजळ । तैसा गरुडावरी जलदनीळ । सत्यभामेसीं शोभला ॥७३॥
त्यातें देखोनि जगतीतनुज । भौमनामा प्रतापपुंज । विकटगर्जनीं लोटला गज । गरुडध्वज वधावया ॥७४॥
देखोनि ऐसिया कृष्णातें । शतघ्नी शक्ति सोडिली दैत्यें । प्रलयकाळीं रुद्र जियेतें । प्रेरूनि विश्व विध्वंसी ॥२७५॥
तये शक्तीचा कडकडाय़ । संतप्त झाला ब्रह्माण्डघट । आणिक दैत्ययोद्धे श्रेष्ठ । तेही उद्भट विंधिती ॥७६॥
प्रलयकाळाची जावळी । तैसीं आयुधें वर्षती बळी । सर्व दैत्यीं करुउनि फळी । भोंवता वनमाळी वेढिला ॥७७॥
हा हा म्हणोनि हाकिती शब्दें । घे घे म्हणोनि लोटती योद्धे । एक गर्जती सिंहनादें । अनेक आयुधें टाकिती ॥७८॥
शतघ्नी शक्ति उसळले नभा । ज्वाळा कोंदल्या ब्रह्माण्डगर्भा । प्रळयाग्नि रुद्र न सरे क्षोभा । ते पद्मनाभावरी पडतां ॥७९॥
शूळ त्रिशूळ तीक्ष्ण बाण । एक टाकिती वज्रपाषाण । भिंदिपाळाचे गुंडे गगन । भरूनि झणाण झुंझाती ॥२८०॥
कुंत पट्टिश तोमर । शक्ति कृपाण कुठार । प्रास परिघ गदा मुद्गर । विक्रमें वीर टाकिती ॥८१॥
वरुणपाश विविधें चक्रें । विविधा शक्ति विविधा मंत्रें । अभिमंत्रूनि विविध शस्त्रें । सोडिती वक्त्रें गर्जूनियां ॥८२॥
विविध वीरांची आरोळी । आणि ते प्रचंड शस्त्रावळी । पडतां न डंडळी वनमाळी । विरश्रीकेलिपटुतर जो ॥८३॥
देखोनि तीक्ष्ण शस्त्रधारा । वीरश्री उत्साह शार्ङ्गधरा । लघुलाघवें चमत्कारा । दाविता झाला तें ऐका ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP