मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५८ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ५८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ५८ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर नान्यं पतिं वृणे वीर तमृते श्रीनिकेतनम् । तुष्यतां मे स भागवान्मुकुंदोऽनाथसंश्रयः ॥२१॥झणें हा म्हणेल मातेंचि वरीं । यालागिं पहिलेंचि निरुत्तर करी । जे मी वांछितें वर श्रीहरि । त्यावीण न वरीं त्रैलोक्यीं ॥३२॥म्हणसी हरि हें बहुतांसि नाम । तरी ज्याचे हृदयीं श्रीवत्सलक्ष्म । ममाभीष्ट तो पुरुषोत्तम । हा दृढ नेम मम हृदयीं ॥३३॥म्हणसी दुर्लभ त्याची प्राप्ति । केविं तूं वरिसी तयाप्रति । तरी अनाथसंश्रय तो श्रीपति । माझी आर्ति पुरवील ॥३४॥तूं तेथ करिसी अनुष्ठान । तो वैकुंठीं विराजमान । त्यापें जाऊनि सांगेल कोण । ऐकें वचन यदर्थीं ॥१३५॥षड्गुणैश्वर्यसंपन्न हरि । वसे सर्वांच्या अभ्यंतरीं । ज्याची व्याप्ति सचराचरीं । तो मजवरी संतोषो ॥३६॥स्वभक्ताचे निरसूनि कष्ट । कृपेनें पुरवी तदभीष्ट । यालागिं मुकुंद नाम हें स्पष्ट । पढती श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३७॥कोण तूं म्हणोनि तुवां पुशिलें । तरी तेंही कथितें परिसें वहिलें । चातुर्य देखोनि अर्जुनें केलें । आश्चर्य आपुले हृत्कमळीं ॥३८॥कालिंदीति समाख्याता वसामि यमुनाजले । निर्मिते भवने पिता यावदच्युतदर्शनम् ॥२२॥कालज्ञापक माझा पिता । कालिंदी मी त्याची दुहिता । कालिंदी या नामें ख्याता । जाण तत्त्वता मजलागीं ॥३९॥पित्यानें यमुनेचिया सलिलीं । मंदिररचना मदर्थ केली । तेथ वसोनि सर्वकाळीं । नियमें चाळीं तपश्चर्या ॥१४०॥ कोण काळवरी वससी येथें । ऐसें तूं जरी पुसरी मातें । तरी अच्युतदर्शन जालिया त्यातें । वरूनि सांगातें जाईन ॥४१॥ऐसीं कालिंदीचीं वचनें । ऐकोनि अर्जुन निवाला मनें । मग तो स्वमुखें हरिकारणें । कथिता जाला तें ऐका ॥४२॥तथाऽवद्द्गुडाकेशो वासुदेवाय सोऽपि ताम् । रथामारोप्य तद्विद्वान्धर्मराजमुपागमत् ॥२३॥जैसी लिखित पत्रिका पढतां । पर्याय पालटूं न शके वक्ता । तैसेंचि अर्जुनें श्रीभगवंता । कथिलें तत्त्वता तदुदित जें ॥४३॥तोही ऐकोनि अर्जुनवाणी । तद्वृत पूर्वींच चक्रपाणि । सर्व जाणता अंतःकरणीं । त्याची करणी अवधारा ॥४४॥रथ लोटूनि घडघडाट । जाऊनि यमुनासलिलानिकट । कालिंदीचें यथाभीष्ट । केली उपविष्ट रहंवरीं ॥१४५॥शंतम हस्तें करग्रहण । करूनि घेतली उचलून । रथावरौती आरोपून । निघे भगवान इंद्रप्रस्था ॥४६॥भगवंताच्या करस्पर्शें । हृदयीं कालिंदी संतोषे । तया सुखासि तुलना असे । विधिही ऐसें वदों न शके ॥४७॥ पहातां श्रीकृष्णाचें वक्त्र । कालिंदीचे निवाले नेत्र । त्रैलोकविभवा जाली पात्र । फावली स्वतंत्र विश्रांती ॥४८॥मग विलोकी चरणांकडे । रथीं मौनस्था न बोले तोंडें । हृत्कमळींच्या सुखसुखवाडें । प्रेम वोसंडे सर्वांगीं ॥४९॥कालिंदीचा हर्षोत्कर्ष । वर्णूं न शके विरिंचि शेष । असो यानंतर आदिपुरुष । इंद्रप्रस्थास चालिला ॥१५०॥भास्करभ्रमणें वय वोसरें । तैसाचि मार्ग क्रमूनि त्वरें । धर्मराजाप्रति स्नेहसुभरें । येता जाला श्रीभगवान् ॥५१॥सेवक धांवोनि कथिती पुढें । कृष्णलावण्यगुणपरिपाडें । कन्या जोडली कनकीं ठिकडे । जेविं जिडे पाचूचे ॥५२॥हें ऐकूनि धर्मराज । सभीम माद्रीचे आत्मज । परमाह्लादें नाचती भोज । जाणोनि भाज हरियोग्य ॥५३॥हर्षें सामोरे धांवती । स्थळोस्थळीं बळी सांडिती । विविध द्रव्यें कुरवंडिती । तेणें वारिती दृग्दोष ॥५४॥अनेक वाजंत्रांचिया ध्वनि । घाव घातला पैं निशाणीं । परमोत्साहें चक्रपाणि । राजसदनीं प्रवेशला ॥१५५॥शिबिकारूढ येऊनि कुंती । नेली कालिंदी आतौती । पाहोनि लावण्य अवयवकांति । सदैव म्हणती हरिरमणी ॥५६॥इचिया सुकृता नोहे सीमा । जिणें वरिलें पुरुषोत्तमा । उभयतांची लावण्यगरिमा । अयोग्य ब्रह्मा कथावया ॥५७॥मा इतरांचा पाड किती । नर सुर किन्नर मंदमति । मुनिवर तेही अल्पसुकृती । केंवि अवगमिती भगवंता ॥५८॥असो धर्माच्या अंतःपुरीं । द्रौपदीप्रमुख समस्त नारी । कालिंदीची सौभाग्यथोरी । सौंदर्यकुसरी प्रशंसिती ॥५९॥यावरी श्रीकृष्ण सभास्थानीं । धर्मराजाच्या सन्निधानीं । बैसले असतां पाण्डवीं वचनीं । विनंति केली ते ऐका ॥१६०॥यदैव कृष्णः संदिष्टः पार्थानां परमाद्भुतम् । कारयामास नगरं विचित्रं विश्वकर्मणा ॥२४॥जेव्हां पाण्डवीं संप्रार्थिला । अघटितघटनापटीचा दाद्ला । तेव्हांचि आज्ञापिता जाला । विश्वकर्म्याला संकेतें ॥६१॥पार्थ पाची पाण्डुकुमर । त्यांचें अद्भुत विचित्रतर । करविता जाला शाङ्गधर । जें अमरेंद्रपुर भूलोकीं ॥६२॥विश्वकर्मा जो देवशिल्पिक । तेणें कृष्णाज्ञेस्तव सम्यक । विचित्र नगर रचिलें देख । निर्जरलोकतुळणेचें ॥६३॥सर्व सौकर्यें जिये ठायीं । चिंता हृद्रोगव्यथा नाहीं । अमरेंद्रासम पाटव देहीं । प्रज्ञाविजयीं गीष्पतिवत् ॥६४॥पाण्डवांसहित पापान्तक । तेथ वसोनि मन्मथजनक । करिता जाला जें कौतुक । तें तूं नावेक अवधारीं ॥१६५॥भगवांस्तत्र निवसन्स्वानां प्रियचिकीर्षया । अग्नये खाण्डवं दातुमर्जुनस्याऽऽस सारथिः ॥२५॥स्वजनांचिये प्रीतीकरून । वसवीत होत्साता तें सदन । कांहीं एक महत्कारण । लक्षूनि भगवान स्थिरावला ॥६६॥श्वेतकिरायाचिये अध्वरीं । घृतावदानें पावका जठरीं । आमय जाला तत्परिहारीं । जाऊनि विचारी दुहिणातें ॥६७॥तेणें ऐकोनि तत्प्रार्थना । पावक प्रेरिला खाण्डववना । तें जाणवतां संक्रंदना । वर्षोनि घना तो विझवी ॥६८॥तेणें श्रमला हुताशन । पुढती प्रार्थिला चतुरानन । मग त्या देऊनि आश्वासन । गुह्य कारण प्रबोधिलें ॥६९॥नरनारायण महारथी । त्यांतें भेटोनियां एकांतीं । विप्रवेषें भेषज प्रार्थी । ते तव आर्ती परिहरिती ॥१७०॥तो येणार आपुले भेटी । भावी जाणोनि हे जगजेठी । खाण्डवप्रस्थीं अर्जुना निकटीं । सुखसंतुष्टी स्थिरावला ॥७१॥विप्रवेषें हुताशन । अर्जुना प्रार्थील पैं येऊन । आपण सारथि तैं होऊन । खाण्डव अर्पण त्या करणें ॥७२॥निरतिशय ऐश्वर्यवंत । म्हणाल अचिंत्यगुण भगवंत । स्वयें द्यावया तो असमर्थ । किमर्थ सारथ्य अवलंबी ॥७३॥तरी पार्थ आपुली अपरमूर्ति । वाढवावया तद्यश कीर्ति । खाण्डवा अर्पितां अग्निप्रति । स्वयें सारथि हरि होय ॥७४॥खाण्डव भक्षूनि हुताशन । नीरुज होऊनि सुप्रसन्न । गाण्डीव धनुष्य दिव्य स्यंदन । अक्षय इषुधि अर्पील ॥१७५॥तेथ रक्षितां मयासुर । तो इच्छून प्रत्युपकार । निर्मूनि देईल सभागार । सुधर्मा अपर भूलोकीं ॥७६॥एवं सखयाच्या लाभासाठीं । सारथ्य करी धरूनि काठी । तथापि ऐश्वर्या नोहे तुटी । त्रैलोक्यमुकुटीं मिरवतसे ॥७७॥असो ऐसी संभावना । इंद्रप्रस्थीं कृष्णार्जुना । क्रीडत असतां हुताशना । येतां समय जाणोनी ॥७८॥कृष्णें सज्ज केला रथ । आरूढोनियां पार्थासहित । मृगयाव्याजें निघाले त्वरित । खाण्डवप्रांत अधिष्ठिला ॥७९॥तंव अकस्मात हुताशन । भेटला विप्रवेशें येऊन । याचितां तयासि खाण्डववन । केलें अर्पण गदहरणा ॥१८०॥इंद्र निवारी वर्षोनि घना । पावक जाणवी कृष्णार्जुना । तिहीं देऊनि अभयदाना । शरसंधाना आदरिलें ॥८१॥द्वादश योजनें गगना आंत । अभेद्य मंडप शरनिर्मित । निर्मूनि पर्जन्य वारिला त्वरित । पावकें स्वस्थ वन ग्रासिलें ॥८२॥अस्त्रीं शस्त्रीं करूनि युद्ध । भंगूनि अमरेंद्र सुरासुर क्रुद्ध । अर्जुनरूपें धनुर्वेद । जातवेदा संतर्पी ॥८३॥तेथ जळतां मयदानव । तेणें स्तविले कृष्णपाण्डव । तेव्हां अवलंबूनियां कींव । रक्षिला जीव तयाचा ॥८४॥असो पावकरोगनिवृत्ति । जालिया येऊनि उभयांप्रति । प्रार्थूनि केली प्रत्युपकृति । ते तूं भूपति अवधारीं ॥१८५॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP