अध्याय ५८ वा - श्लोक १७ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तत्रोपस्पृश्य विशदं पीत्वा वारि महारथौ । कृष्णौ ददर्शतुः कन्यां चरंतीं चारुदर्शनाम् ॥१७॥

महारथी कृष्णार्जुन । करूनि करचरणक्षाळण । करिती निर्मळ जळप्राशन । छाया सेवून स्थिरावले ॥११॥
कृष्णा आणि धनुर्धरा । कृष्णनामचि दोघां वीरां । देखते जाले ते सुंदरा । कन्या नीरामाजिवडी ॥१२॥
दर्शनमात्रें समाधाना । पाववी यास्तव चारुदर्शना । यमुनाजीवनीं क्रीडतां नयनां । गोचर जाली उभयांच्या ॥१३॥
श्रीकृष्ण म्हणे पार्था सखया । कांहीं अपूर्व देखिलें राया । येरु म्हणे स्वामीचिया । वचनें जाणाया अर्हता ॥१४॥
ऐकोनि म्हणे श्रीभगवान । पैल यमुनेंत कन्यारत्न । क्रीडतां तीचें लावण्यकिरण । फाकतां प्रकाशिती ॥११५॥
तुवां जावोनि तियेप्रति । प्रश्न करावा विविधा रीती । कोण कोणाची दुहिता युवती । काय वांछिती हृत्कमळीं ॥१६॥
कोठूनि आली वसे कोठें । काय तयेतें अभीष्ट मोठें । जरी हें मद्वाक्य प्रियतम वाटे । तरी तूं वेठें तत्कार्या ॥१७॥
ऐकोनि प्रभूचें आज्ञावचन । जिवलग सखा प्रिय फाल्गुन । जाता जाला त्वरेंकरून । तें तूं श्रवण करीं राया ॥१८॥

तामासाद्य वरारोहां सुद्विजां रुचिराननाम् । पप्रच्छ प्रेषितः सख्या फाल्गुनः प्रमदोत्तमाम् ॥१८॥

सखया कृष्णानें प्रेरिला । फाल्गुन सवेग तियेप्रति गेला । जावोनि प्रश्न करिता जाला । कृष्णाज्ञेला लक्षूनी ॥१९॥
अर्जुनें देखिलें कन्यारत्न । सुरेख अवयव रूपलावन्य । विशेषणीं तें व्यासनंदन । करी निरूपण भूपातें ॥१२०॥
जयेचे आरोह वर उत्तम । सुंदर दशन हिरियांसम । सशंक मयंक वदनपद्म । देखोनि पावे क्षयरोगा ॥२१॥
मदिरा मादक आस्वादनें । श्रीमद ऊर्जित ऐश्वर्यगुणें । ललना लावण्य ललितेक्षणें । प्रमदा म्हणणें यालागीं ॥२२॥
त्यामाजि साध्वी सद्गुणखाणी । सुभगा सुशीला कल्याणी । प्रमदोत्तमा तये लागूनी । वदती मुनि शास्त्रज्ञ ॥२३॥
ऐशी लावण्यगुणसंपत्ति । अर्जुन देखोनि तियेप्रति । पुसता जाला सख्याच्या उक्ति । त्या तूं नृपति अवधारीं ॥२४॥

का त्वं कस्यासि सुश्रोणि कुतो वा किं चिकीर्षसि । मन्ये त्वां पतिमिच्छंतीं सर्व कथय शोभने ॥१९॥

कोण कोणाची तूं कन्या । सुंदर श्रोणी नितंबजघना । ललितापांगीं रुचिरानना । परम शोभन सौंदर्यें ॥१२५॥
अवो शोभने सुमध्यमे । कोठूनि आलीस कोण्या नामें । येथें वर्तसी कोण्या कामें । हें सप्रेमें मज सांगें ॥२६॥
मी मानितों तूंतें ऐसें । जें पति वांछिसी निजमानसें । यावरी तवाभिप्रेत जैसें । तें अनायासें मज सांगें ॥२७॥
ऐशा परिसोनि फाल्गुनोक्ति । जाली कालिंदी बोलती । तें तूं परिसें परीक्षिति । कौरवनृपति श्रुतिरसिका ॥२८॥

कालिंद्युकाच - अहं देवस्य सवितुर्दुहिता पतिमिच्छती । विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थिता ॥२०॥

कालिंदी म्हणे गा पुरुषवर्या । जाण तूं मातें भास्करतनया । पतिवांछेनें कवळिलें हृदया । करीं तपश्चर्या तत्कामें ॥२९॥
वर वांछीं तया जो वरेण्य । वरदा वरद जो कां विष्णु । तो वर वांछी अंतःकरण । तपआचरण तद्द्देशें ॥१३०॥
निरोधूनियां करणवृत्ति । तपश्चर्या आचरें भक्ति । इतुकें बोलूनि अर्जुनाप्रति । तर्की चित्तीं तें ऐका ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP