मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४५ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ४५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ४५ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर अथ शूरसुतो राजन्पुत्रयोः समकारयत् । पुरोधसा ब्राह्मणैश्च यथावद्द्विजसंस्कृतिम् ॥२६॥नंद बोळवूनियां व्रजपुरा । रामकृष्ण निजमंदिरा । आलिया नंतर मातापितरां । पुत्रसंस्कारा प्रवृत्ति ॥४॥शूरसेनापासूनि प्रभव । शूरासुत तो वसुदेव । मेळवोनि द्विजसमुदाव । करवी अपूर्व संस्कार ॥२०५॥गर्गाचार्य पुरोहित । आणि द्विजवर्य समस्त । विवरूनियां श्रुतिसंमत । स्वयें निजसुत संस्कारी ॥६॥सम्मानूनि यादवकुळें । सोयर्यांसि धाडिलीं मूळें । बिढागारासि योजिलीं स्थळें । उभविलीं अमळें वितानें ॥७॥पाचारूनि शिल्पकार । त्वाष्ट्रतुळणेचे परम चतुर । शृंगारिलें मथुरापुर । ध्वजा विचित्र उभविल्या ॥८॥वनें उपवनें काननें । शृंगारविलीं आज्ञावचनें । नगराभोंवतीं चित्रस्थानें । देवायतनें शोभविलीं ॥९॥परिखामंडित पुरें गोपुरें । पण्यवीथी हाट चौबारें । द्वारें देहळ्या दामोदरें । निर्जरपुरें लाजविती ॥२१०॥ब्राह्मणक्षत्रियवैश्यसदनें । वार्धुषिकांचीं विचित्रं भुवनें । अनेक यातींचीं अनेक वर्णें । विविध स्थानें शोभविलीं ॥११॥हर्म्यगोपुरीं धवळारीं । रत्नजडित कळशहारी । जैसे प्रकटले ध्वांतारि । नगरांवरी बहुरूपें ॥१२॥विचित्र वितानें पताका । श्रृंगारिल्या पुरभूमिका । सदनोसदनीं समस्त लोकां । उत्साह निका हरिप्रेमें ॥१३॥ठायीं ठायीं ऊर्ध्वजळें । उडती शिल्पकौशल्यबळें । अनेक वाद्यें वादकमळें । स्थळोस्थळीं प्रतिष्ठिलीं ॥१४॥मूळपत्रें सुहृद आले । बिढागारीं निवेशविले । उद्धवअक्रूरां निरूपिलें । पारपत्य तद्विषयीं ॥२१५॥मुक्तामंडित कनकपत्रीं । तोरणें बांधिलीं पुरगोपुरीं । सर्वनगरीं सदनद्वारीं । तोरणहारी विराजती ॥१६॥मखरें मंदप कदळीस्तंभ । उभयवीथी सजल कुंभ । पल्लवपट्टिका दधिकुसुमांभ । दीप स्वयंभ लखलखिती ॥१७॥सर्व पुरंध्री सालंकृत । देखोनि देवांगना लज्जित । निर्जरांची कायसी मात । स्वयें भगवंत जे ठायीं ॥१८॥नारायणाची उपमा नरां । लक्ष्मीसमान पुरसुंदरा । वैकुंठ तुळिजे मथुरापुरा । वसुदेवकुमरा संस्कारी ॥१९॥सभास्थानीं उग्रसेन । भवंता मंडित यादवगण । वरिष्ठ पाचारूनि ब्राह्मण । पत्रिकाशोधन करविलें ॥२२०॥सूर्य चंद्र बृहस्पति । एवं नवग्रहांची पंक्ति । बळिष्ठ बट्वाचार्यांप्रति । मुख्य गर्गोक्ति साधिली ॥२१॥ग्रहहोरा आणि द्रेष्काण । नवांश द्वादशांश त्र्यंशांश पूर्ण । निर्मळ इष्ट वर्गशोधन । पंचकोत्तीर्ण दिनशुद्धि ॥२२॥जगज्जनकाचा जनक हरि । त्याचिये विध्युक्त संस्कारीं । काळ अनुकूळ ग्रहनक्षत्रीं । होऊनि करी परिचर्या ॥२३॥जातकर्मादि संस्कार । अतिक्रांत बहुवासर । प्रायश्चित्त निष्कृतिपर । तदनुसार द्विजाज्ञा ॥२४॥हेमरत्नें वसनें रस । गो भू धान्यें पूर्णकलश । यथायोग्य ब्राह्मणांस । दिधलीं अशेष गर्गाज्ञा ॥२२५॥दशदिशांचीं विप्ररत्नें । आणिलीं सम्मानें प्रयत्नें । त्यांसि विध्युक्त गोदानें । केलीं अर्पणें तें ऐका ॥२६॥तेभ्योऽदाद्दक्षिणां गावो रुक्ममालाः स्वलंकृताः । स्वलंकृतेभ्यः संपूज्य सवत्साः क्षौममालिनीः ॥२७॥साधु सवत्सा सुशीळा तरुणी । शुभलक्षणा पयस्विनी । हेममाळाकंठाभरणी । स्वर्णश्रृंगी रौप्यखुरी ॥२७॥कांसादोहा क्षौमपृष्ठी । दिव्य नैवेद्य हेमताटीं । द्विजवर बैसवूनियां पाटीं । मंत्रपाठीं सुपूजित ॥२८॥अर्घ्य पाद्य शुद्धाचमन । वस्त्राभरणें समर्पून । आंगीं चर्चूनि सुचंदन । सुमनमाळा मघमघित ॥२९॥धूपदीपादि नैवेद्य । फळ तांबूळ दक्षिणा विविध । आरती पुष्पांजळि अभिवाद । सपर्याविध सारूनी ॥२३०॥ऐसीं पूजित विप्ररत्नें । त्यांसि अर्पिलीं तें गोदानें । पुच्छें करूनियां तर्पणें । त्यागवचनें निगमोक्ति ॥३१॥आत्मसत्तेचें निरसन । पात्रसत्ता उत्पादन । त्यागशब्दाचें व्याख्यान । श्रोते सज्ञान जाणती ॥३२॥एवं पूर्वसंकल्पसिद्धि । ब्राह्मण पूजूनि यथाविधि । वसुदेव धर्मज्ञ विशाळबुद्धि । करी त्रिशुद्धि गोदानें ॥३३॥पूर्वीं संकल्प कोणे काळीं । कोठें गोधनें संपादिलीं । ऐसी शंका श्रोतीं केली । तेही कथिली जातसे ॥३४॥याः कृष्णरामजन्मर्क्षे मनोदत्ता महामतिः । ताश्चाददादनुस्मृत्य कंसेनाधर्मतो हृताः ॥२८॥रामकृष्णांच्या जन्मसमयीं । असतां निरुद्ध कारागृहीं । अयुत धेनु पाहीं । स्मरोनि हृदयीं अर्पिल्या ॥२३५॥तितुक्या आजी महामति । केवळ वसुदेव धर्ममूर्ति । सालंकृता द्विजांप्रति । यथानिगुती समर्पी ॥३६॥कोठें संपादिल्या ऐसें । तर्किलें श्रोत्यांच्या मानसें । तरी ज्या अधर्में हरिल्या कंसें । त्या वृष्णीशें आणील्या ॥३७॥जितुकें कंसाचें खिल्लार । अनेक वस्तु रत्नभांडार । सर्व हरूनि वृष्णीश्वर । करी देकार ब्राह्मणां ॥३८॥त्यानंतरें पुण्याहपठन । नांदीश्राद्ध विधिविधात । देवकप्रतिष्ठापूर्वक जाण । चौलोपनयन सारिलें ॥३९॥ततश्च लब्धसंस्कारौ द्विजत्वं प्रपय सुव्रतौ । गर्गाद्यदुकुलाचार्याद्गायन्नं व्रतमास्थितौ ॥२९॥त्यानंतरें लब्धसंस्कार । रामकृष्ण उभय कुमर । मंत्रोपदेशीं अतिसादर । गर्गमुनिवर पुरोहित ॥२४०॥चतुर्विंशति शटकमान । रत्नखचित हेमभाजन । मुक्ताफळीं करूनि पूर्ण । दिधलें आणून गर्गा पैं ॥४१॥स्वर्णशलाका घेऊनि हातीं । क्षात्रगायत्री सव्याहृति । लिहिता झाला गर्गमूर्ति । यथानुगुती तत्पात्रीं ॥४२॥विध्युक्त करूनि पूजन । वर्णसंख्या निष्कार्पण । गर्ग वसुदेव राम कृष्ण । एक वसन पांघुरले ॥४३॥मंगळतुरांचा एक गजर । वैष्णवांचा जयजयकार । ब्राह्मणांचा संत्रस्वर । सुमनीं निर्जर वर्षती ॥४४॥प्रणवपूर्वक प्रथम स्तवन । पदशः करवी मंत्रबोधन । मध्यमसवनें अर्ध जाण । मंत्र संपूर्ण सवनोत्तमें ॥२४५॥एवं आचार्यापासून । द्विजत्व पावले रामकृष्ण । गायत्रव्रतस्थ जाले जाण । विधिविधान यथोचित ॥४६॥ब्राह्मणांसि वांटिलें धन । वस्त्राभरणीं गौरवून । विद्योपजीवी सर्वजन । त्यागें संपूर्ण तोषविले ॥४७॥सुहृदां अहेर पदस्परीं । मानें पूजिल्या पुरंध्री । कृष्णव्रतबंधें धरित्री । सुखसागरीं निमग्न ॥४८॥ऐसा संपला व्रतबन्धु । व्रतस्थ जाले दोघे बन्धु । त्यांचा स्वयंभ अगाध बोधु । शुक गोविद नृपा कथी ॥४९॥प्रभवौ सर्वविद्यानां सर्वज्ञ जगदीश्वरौ । नान्यसिद्धामलज्ञानं गूहमानौ नरेहितैः ॥३०॥सर्वविद्यांचा समुद्भव । प्रकर्षें करूनि ज्यांपासाव । ते बळरामवासुदेव । मनुष्यभाव पांघुरले ॥२५०॥यालागीं सर्वज्ञ जगदीश्वर । स्वयंभ विद्यांचें आगर । न होतांचि अभ्यासपर । विद्या स्वतंत्र प्रकाशिती ॥५१॥अभ्याससाधनीं साधिल्या विद्या । त्या बोलिजेती अन्यसिद्धा । यांपासूनियां स्वतःसिद्धा । ज्या अखिलाद्या प्रकाशती ॥५२॥ऐसें जयांचें अमळ ज्ञान । मनुष्यवेशें आच्छादून । मनुष्यचेष्टा आचरण । करिती वर्तन गूढत्वें ॥५३॥कृपण लपवी आपुलें धन । तैसें लपवूनि अमळज्ञान । मनुष्यासमान क्रियाचरण । करिती वर्तन शिशुवेषें ॥५४॥सकळ विद्यांचें जन्मस्थान । तेहीं घेऊनि मनुष्यपण । कैसें केलें गुरुसेवन । तें व्याख्यान अवधारीं ॥२५५॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP