मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४५ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ४५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ४५ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर पितर्युवाभ्यां स्निग्धाभ्यां पोषितौ पालितौ भृशम् । पित्रोरभ्यधिका प्रीतिरात्मजेष्वात्मनोऽपि हि ॥२१॥यशोदा माउली स्नेहाळ । ताता तुम्ही पुत्रवत्सल । केला आमुचा प्रतिपाळ । यावत्काळपर्यंत ॥४८॥तुमच्या स्नेहाची कळामात्र । कथनीं समर्थ नोहे वक्त्र । स्वये श्रमोनि अहोरात्र । पाळिले पुत्र कृपेनें ॥४९॥आपुलें करूनि तनुशोषण । केलें आमुचें संरक्षण । ब्राह्मी माया हे विचित्र जाण । नव्हे कारण आश्चर्या ॥१५०॥पशुपक्ष्यादि समस्त योनि । आपणाहूनि सुतपाळणीं । झळंबती बहुतां गुणीं । ईश्वरकरणी विचित्र हे ॥५१॥समस्तांसी आत्मप्रीति । पुत्र आत्मा हे प्रतीति । म्हणोनि पडे ममताभ्रांति । सुखविस्मृति स्वतनूची ॥५२॥यालागीं आपुल्या देहाहून । करिती आत्मजतनुपोषण । विशेष तुमचें स्नेहाळपण । वदतां मौन वाचेसी ॥५३॥इतरां पितरांहूनि वरिष्ठ । आम्हांनिमित्त सोसिले कष्ट । विघ्नें उदेलीं गरिष्ठ । साहिलें अनिष्ट तज्जनित ॥५४॥व्रजा येऊनि पूतना । पाजिती झाली उल्बणपान्हा । जैं ते मुकली आपुल्या प्राणा । तैं व्रजभुवना महाविघ्न ॥१५५॥राक्षसीतनु दीड योजन । पडतां पीडिले व्रजींचे जन । तिचें करूनि तनुखंडन । केलें दहन समस्तीं ॥५६॥तेव्हां आमुच्या संरक्षणीं । ब्राह्मण घालूनि शांतिपठनीं । वेंचिल्या धनधान्यांच्या श्रेणी । इतरांलागूनि हें नाहीं ॥५७॥जन्मनक्षत्र उत्साहदिवसीं । शकटभंगें भय मानसीं । मानूनि धनधान्यें द्विजांसी । धेनुवस्त्रांसी वांटिलें ॥५८॥तृणावर्त्त महादुष्ट । तेणें व्रजजनां दिधले कष्ट । मेला स्वपापें पापिष्ठ । तुम्ही मन्निष्ठ भयभीत ॥५९॥कांटा खडा विंचू किडा । झणें आम्हांसि करील पीडा । म्हणोनि खेळतां चहूंकडां । मागा पुढां संरक्षां ॥१६०॥यमलार्जुनांचिये पतनीं । विचार करूनि पशुपजनीं । आम्हांचिसाठीं कळवळूनी । वृंदावनीं प्रवेशलां ॥६१॥तेथ अघ बक वत्सासुर । धेनुक कालिय विखार । इत्यादि विघ्नें लहान थोर । पावलां घोर आम्हांसाठीं ॥६२॥आम्हांनिमित्त आखंडळ । वर्षोनियां करकाजळ । क्षोभें बुडवितां गोकुळ । तुम्हीं तें सकळ साहिलें ॥६३॥ऐसे अनेक दैत्य दुष्ट । प्रलंब केशी वोम अरिष्ट । विचित्र माया करिती कपट । तुम्हीं ते कष्ट सोसिले ॥६४॥अक्रूरें आणितां मथुरापुरीं । आमुचा कळवळा तुमचे जठरीं । आम्हां निमित्त सभेमाझारी । कंस तुम्हांवरी कोपला ॥१६५॥यालागीं इतरां पितरांहूनी । तुम्ही आमुच प्रतिपाळणीं । श्रमला परम स्नेहाळपणीं । दिवस रजनी न म्हणतां ॥६६॥स्तन्यपाने करलालनें । अभ्यंगादि संस्तोभनें । दधिदुग्धाज अन्नाशनें । वसनें भूषणें वाढविलें ॥६७॥तें तें काय आठवूं किती । तुमच्या स्नेहाची अभिव्यक्ति । वर्णितां मौनावे भारती । म्हणे श्रीपति नंदातें ॥६८॥झणें तूं ताता म्हणसी मुखें । वसुदेवदेवकी तुमचीं जनकें । येचिविषीं वचन निकें । सादर ऐकें पशुपेंद्रा ॥६९॥स पिता सा च जननी यौ पुष्णीतां स्वपुत्रवत् । शिशून्बंधुभिरुत्सृष्टानकल्पैः पोषरक्षणे ॥२२॥वीर्यदानें जन्मविता । तो बोलिजे प्रथम जनिता । उपनयनादि संस्कार करिता । द्वितीय पिता तो होय ॥१७०॥औरस पुत्राचि समान । परमार्थबुद्धी विद्याभ्यसन । करवी सांडूनि भेदभान । जनक जाण तृतीय तो ॥७१॥चतुर्थ जनक तो आपत्काळीं । अन्न देऊनिया प्रतिपाळी । पांचवा दुर्मरण जो टाळी । अभयशाली सर्वस्वें ॥७२॥हा पंचजनकविचार । बोलती मन्वादि स्मृतिकार । यांही माजी मम निर्धार । ऐक साचार भो ताता ॥७३॥तोचि पिता तेचि माता । स्वपुत्रासमान पोषण करितां । अंतरीं न स्पर्शे भिन्नता । आह्लाद चित्ता समसाम्य ॥७४॥पोषणीं असमर्थ जनकजननी । अथवा बंधुवर्गही कोणी । सर्वीं टाकिलें उपेक्षूनी । जे त्यां लागूनि पाळिती ॥१७५॥तेचि ययार्थ मातापितरें । उपेक्षा करितां पूर्वील इतरें । ऐसीं ताता धर्मोत्तरें । मम निर्धारें जाणावीं ॥७६॥वसुदेवदेवकी जनकजननी । होती कंसाचिये बंधनीं । तिहीं जठरीं जन्मदूनी । उपेक्षूनी टाकिलों ॥७७॥तुम्हीं पाळिलें निस्सीम प्रेमें । स्नेहाळपणें अवाप्तकामें । आतां माझ्या प्रार्थनानियमें । व्रजा संभ्रमें जाइजे ॥७८॥यात यूयं व्रजं तात वयं च स्नेहदुःखितान् । ज्ञातीन्वो द्रशःटुमेष्यामो विधाय सुहृदां सुखम् ॥२३॥आतां माझिया संवगड्यांसहित । घेऊनि बल्लगगण समस्त । तुम्हीं व्रजपुरा जावें त्वरित । माझा संकेत अवधारा ॥७९॥सुहृदा यादवगणां । आम्ही भेटोनि थोरां लहानां । सुखसंपन्न करूनि जाणा । तुमच्या दर्शना मग येऊं ॥१८०॥सुहृद ज्ञाति स्नेहाळपणें । आमुच्या दुःखें शिणती शिनें । त्यांसि दुखाचें पारणें । लागे करणें नावेक ॥८१॥यालागीं समस्तांचिया भेटीं । परस्परें संवादगोठी । झालिया सुटतील हृदयगांठी । स्नेहदृष्टीं न्याहाळितां ॥८२॥यालागीं व्रजा जाइजे तुम्हीं । सुहृद तोषवूनि येऊं आम्ही । ऐशिया मधुरोक्तीच्या नियमीं । स्नेहसंभ्रमीं सांतवन ॥८३॥एवं सांत्वय्य भगवान्नंदं स्रव्रजमच्युतः । वासोऽलंकारकुप्याद्यैरर्हयामास सादरम् ॥२४॥ज्याचें ऐश्वर्य अव्याहत । मनुष्यनाट्यें नव्हे च्युत । यालागीं नांवें जो अच्युत । श्रीभगवंत जगदात्मा ॥८४॥तेणें समस्त बल्लवगणां । आणि व्रजस्थां अवघ्या जनां । नंदापासीं वस्त्राभरणां । करूनि स्मरणा अर्पिलें ॥१८५॥नंद यशोदा रोहिणी । आणि समस्ता बल्लवपत्नी । स्मरणपूर्वक अनुक्रमणीं । वस्त्राभरणीं गौरविलीं ॥८६॥सुवर्णरजतवर्जित पात्रें । गोरसव्यवहारीं पवित्रें । पानवचनादि विचित्रें । इच्छामात्रें समर्पिलीं ॥८७॥यांही वेगळीं वस्तुजातें । रत्नें माणिक्यें मुक्तें बहुतें । समर्पिलीं समस्तांतें । श्रीभगवंतें स्नेहाळें ॥८८॥सदर म्हणिजे स्नेहभरें । अचिंत्यैश्वर्यसत्ताधरें । नंदादिकांचीं स्निग्धांतरें । पदार्थमात्रें प्रलोभिलीं ॥८९॥इत्युक्तस्तौ परिष्वज्य नंदः प्रणयविह्वलः । पूरयन्नश्रुभिर्नेत्रे सह गोपैर्व्रजं ययौ ॥२५॥यदुकुळाचें समाधान । करूनि व्रजपुरा येईन । ऐसें नंदें ऐकतां वचन । मोहें मन झळंबलें ॥१९०॥ऐसा नंद बोधिला असतां । स्वपुत्रभावना विपरीत होतां । वियोगदुःखें कवळिलें चित्ता । तेणें वक्तृता निरोधिली ॥९१॥रामकृष्ण दोघे जन । हृदयीं धरिलें आलिंगून । न करीच मस्तकावघ्राण । वर्णविवर्ण उमजोनी ॥९२॥परंतु स्नेहाचा कळवळा । तेणें सद्गदित झाला गळा । टपटपां अश्रु स्रवती डोळां । वदनकमळा न्याहाळी ॥९३॥अधोमुख पुसी नेत्रां । मोहें कंप दाटला गात्रां । हृदयीं कवळूनि उभय पुत्रां । पाहे वक्त्रा पुनः पुनः ॥९४॥तंव तंव वियोगदुःखलहरी । विचित्र उठती अभ्यंतरीं । कैसा प्रवेशों व्रजपुरीं । कोण्या उत्तरीं व्रज बोधूं ॥१९५॥यशोदाप्रमुख गौळणी वृद्धा । पुत्रस्नेहें परमस्निग्धा । त्यांसी न सोसे वियोगबाधा । म्हणती मुकुंदा कां त्यजिलें ॥९६॥तेव्हां त्यांसि सांगूं काय । पुत्रस्नेहें जाकळे हृदय । पूर्वक्रीडेचा आठव होय । नुचले पाय प्रयाणीं ॥९७॥परंतु स्वपुत्र झाले पर । तेही होवोनिया निष्ठुर । ताता ठाकिजे व्रजपुर । निरोप उत्तर हें दिधलें ॥९८॥आतां किमर्थ राहिजे येथें । ऐसें विवरूनिया चित्तें । गोपां आज्ञापी संकेतें । वृषशकटांतें जुंतवी ॥९९॥कृष्णें दिधली जे सामग्री । अवघी भरूनि शकटांवरी । सज्ज होवोनि पशुपभारीं । नंद व्रजपुरी पावला ॥२००॥पुढें पातले व्रजींचे लोक । व्यवस्था ऐकोनिया सम्यक । त्यांसि झाला हर्ष शोक । तो नावेक वर्णावा ॥१॥परंतु कठिन नोहे हृदय । त्याहूनि अवस्था कथितां होय । यालागीं न वदे व्यासतनय । हें कुरुवर्य समजला ॥२॥म्हणोनि न करितां ते गोठी । पुढील कथा लक्षूनि दिठीं । केली वसुदेवें राहटी । ते वाक्पुटीं शुक वर्णी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP