अध्याय ४५ वा - श्लोक ११ ते १६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सिंचंतावश्रुधाराभिः स्नेहपाशेन चावृतो । न किंचिदूचतू राजन्बाष्पकंठौ विमोहितौ ॥११॥

अश्रुधारा स्रवती नयन । तेणें शिंपिती निजनंदन । स्नेहपाशांचें आवरण । पडतां ज्ञान विसरलीं ॥२॥
कंसहननादिप्रतापवंत । ईश्वरभावें भाविले सुत । भगवद्वचनें मोहग्रस्त । तो वृत्तांत विसरलीं ॥३॥
पुत्रमोहें झळंबलीं । ईश्वरभावना विसरलीं । शब्द न फुटे स्तब्ध झालीं । स्फुंदों लागलीं ममतेनें ॥४॥
कंठ दाटला स्नेहभरें । नयनीं बाष्पांबु पाझरे । वदनीं न निघती अक्षरें । मोहें यदुवरें भुलविलीं ॥१०५॥

एवमाश्वास्य पितरौ भगवान्देवकीसुतः । मातामहं तोग्रसेनं यदूनामकरोन्नृपम् ॥१२॥

कुशळा मनुष्यांचिये परी । पितरां आश्वासूनियां हरि । जो जन्मला देवकीउदरीं । ऐश्वर्यधारी अचिंत्य ॥६॥
तंव अक्रूरोद्धवादिक । अंतरंगकृतविवेक । म्हणती नगर अराजक । सहसा क्षणैक न टकावें ॥७॥
नृपावांचूनी नृपासन । राष्ट्र नगर पडलें शून्य । प्रजा पीडिती दस्युगण । नसतां शासन नृपाचें ॥८॥
ऐसें अकोनि चक्रपाणि । उग्रसेनाप्रति येऊनी । कंसदुःखा परिहरूनी । राज्यासनीं बैसविला ॥९॥
देवकीचा तातभ्राता । उग्रसेन कंसपिता । तयासि बोले मन्मथजनिता । तें तूं कुरुनाथा अवधारीं ॥११०॥

आह चास्मान्महाराज प्रजाश्चाज्ञप्तुमर्हसि । ययातिशापाद्यदुभिर्नासितव्यं नृपासने ॥१३॥

हरि म्हणे गा महाराजा । आम्ही समस्त तुझिया प्रजा । आज्ञानियम वाहूं तुझा । शासनीं सहजा तूं अर्ह ॥११॥
जरी तूं आम्हांसि सिंहासनीं । बैसा म्हणोनि प्रार्थिसी वचनीं । तरी ययातिशाप यदुसंतानीं । पूर्वींहूनी अनुल्लंघ्य ॥१२॥
जरा घेऊनि तारुण्य देणें । म्हणतां ययाति यदुकारणें । निर्भर्त्सूनि निष्ठुर वचनें । विमुख तेणें दवडिला ॥१३॥
तेणें शापिला स्वसुत यदु । वयसा नेदुनी निष्ठुर वादु । करिसी तरी हा शापशब्दु । ऐकें विदुषु पैं माझा ॥१४॥
तुझिये वंशीं साम्राज्यचिह्न । नसो कोणासि सिंहासन । अनुल्लंघ्य माझें हें शापवचन । लंघितां संतान क्षय पावे ॥११५॥
ऐशिया ययातिशापास्तव । आम्हांसि सिंहासन अनर्ह । तूं जरी म्हणसी मी यादव । तरी शापभेव तूं न धरीं ॥१६॥
राया माझिये आज्ञेवरून । अंगीकारीं तूं सिंहासन । तुज न बाधी शापवचन । करीं शासन यदुचक्रा ॥१७॥
जरी तूं म्हणसी जराजराट । मजला अयोग्य राज्यपट । सामंत भूपति बळिष्ठ । देती कष्ट प्रजांसी ॥१८॥
ऐशी शंका न धरीं मनीं । सेवक असतां मी चक्रपाणि । तुझें शासन त्रिभुवनीं । यदुमेदिनी ते किती ॥१९॥

मयि भृत्य उपासीने भवतो विबुधादयः । बलिं हरंत्यवनताः किमुतान्ये नराधिपाः ॥१४॥

तुझा भृत्य मी आज्ञाधर । असतां वरुणेंद्र इंद्रयमकुबेर । पूजा अर्पूनि सादर । होवोनि किंकर वोलगती ॥१२०॥
तेथ माण्डलिक नरपति । अथवा होतु कां चक्रवर्ती । त्यांची येथ गणना किती । लावीन ख्याति कृतांता ॥२१॥
मज सेवितां तुझे चरन । सुरवर येती तुजला शरण । अन्य भूपांचा केवा कोण । प्रजापीडन करावया ॥२२॥
इत्यादिवचनीं मातासह । कृष्णें करूनि निःसंदेह । सिंहासन देऊनि पहा हो । छत्र धरिलें स्वहस्तें ॥२३॥
पटहघोषें आज्ञानिदेश । जाणविला माण्डलिकांस । ते वोळगती होवोनि दास । प्रजा विशेष सुखावल्या ॥२४॥
देशोदेशीं अभयपत्रें । प्रजा आणूनि पाहिल्या नेत्रें । तद्वृत्त ऐकोनियां त्यांचेनि वक्त्रें । सुखासि पात्रें त्या केल्या ॥१२५॥
त्यानंतरें विषयपति । आपले गोत्रज बन्धुज्ञाती । क्म्सभयास्तव दिगंतीं । प्रजांप्रति पुसोनि ते ॥२६॥

सर्वान्स्वज्ञातिसंबंधान्दिग्भ्यः कंसभयाद्गतान् । यदुवृष्ण्यंधकमधुदाशार्हकुकुरार्यकान् ॥१५॥
सभाजितान्समाश्वास्य विदेशावासकर्शितान् । न्यवासयत्स्क्गेहेषु वित्तैः संतर्प्य विश्वकृत् ॥१६॥

कंसहननादि समस्त । पत्रींण लिहून अभीष्टवृत्त । सम्मानूनि यथायुक्त । कुटुंबें सहित आणिले ॥२७॥
आपुले स्वजन सुहृद आप्त । बन्धु सोयरे दिगंतीं गुप्त । कंसप्रतापानळें दीप्त । भयसंतप्त सर्वदा ॥२८॥
यादव वृष्णि अंधक मधु । दाशार्ह कुकुर आर्यक विविधु । भोज सात्वत समस्त बंधु । आणिले प्रसिद्ध सम्मानें ॥२९॥
सभास्थानीं ज्यांसि मान । ते ते पदीं त्यां स्थापून । कंसभयें जो पावले शीण । तो संपूर्ण विसरविला ॥१३०॥
नष्टचर्य प्रवासें शिणलें । धनीं रत्नीं ते सुखी केले । स्वस्वगेहीं संस्थापिले । आश्वासिले जगदीशें ॥३१॥
कृष्णहस्तें पावोनि मान । पूर्णानंदें निवाले स्वजन । गौण मानूनि शक्रासन । ते निजसदन सेविती ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP