मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर देवदेव जगन्नाथ पुण्यश्रवणकीर्तन । यदूत्तमोत्तमश्लोक नारायण नमोऽस्तु ते ॥१६॥देव म्हणिजे द्योतमान । दिविभुवन ज्यां वसतिस्थान । त्यांतें द्योतक चैतन्यघन । त्या तुज नमन देवदेवा ॥७५॥अखिलजगाची नयनशक्ती । सत्तायोगें धरिसी पुरती । जगन्नाथ तूं जगत्पति । विदित विनति तुज माझी ॥७६॥पुण्यरूप ज्याचें यश । जन्मकर्म लीलावेश । श्रवणें कीर्तनें निरसी दोष । निःश्रेयस निष्पादी ॥७७॥तया पुण्यश्रवणकीर्तना । नमो नमो जी श्रीजनार्दना । जाणसी माझी विज्ञापना । अभीष्टज्ञा पुण्ययशा ॥७८॥ययातिशापें समळ कुळ । स्वजन्में केलें त्रिजगीं धवळ । यालागीं कालत्रयीं मंगळ । नाम निर्मळ यदूत्तम ॥७९॥अमळकीर्ति निगमप्रणीत । तो हा उत्तमश्लोकसंकेत । स्मृतिपुराणीं महर्षि गात । नमो अद्भुतऐश्वर्या ॥८०॥नारायणा नरायतना । गुणभुतात्मक नारस्थाना । एवं नमन निर्गुणा सगुणा । संबोधूनि पृथक्त्वें ॥८१॥अक्रूरें मानूनि आपुले मनीं । नामस्मरणीं अभिवंदूनी । भगवत्प्राप्ति अमृतदानीं । साधन याहूनि आन नसे ॥८२॥म्हणोनि बहुधा संबोधनें । स्मरोनि करितां अभिवंदनें । कृपादृष्टीं जनार्दनें । पाहोनि वचनें बोलतसे ॥८३॥श्रीभगवानुवाच - आयास्ये भवतो गेहमहमार्यसमन्वितः । यदुचक्रद्रुहं हत्वा वितरिष्ये सुहृत्प्रियम् ॥१७॥श्रीकृष्ण म्हणे अक्रूरातें । मी येईन तव गृहातें । अग्रजें सहित येऊनि तेथें । अभीष्टातें पुरवीन ॥८४॥परंतु यदुकुलमंडलद्रोही । जंववरी कंस वधिला नाहीं । तंववरी कोठें न वचें पाहीं । तें रहस्य कांहीं अवधारीं ॥८५॥मी जाईन जयाच्या सदना । कंस तयाच्या करील कंदना । आणि विपरीत भेदभावना । तुझ्या ठायीं कल्पील ॥८६॥यालागीं वधूनि यदुकुळद्वेष्टा । सदना येईन सहित श्रेष्ठा । सुहृदां आप्तां कनिष्ठां ज्येष्ठां । प्रिय अभीष्टा वोपीन ॥८७॥ऐसी भगवन्मुखीं वाणी । अक्रूरें घेऊनि आपुले श्रवणीं । जैसा दुष्काळीं बुभुक्षु प्राणी । त्यागी जाणोनि विषान्न ॥८८॥श्रीशुक उवाच - एवमुक्तो भगवता सोऽक्रूरो विमना इव । पुरीं प्रविष्टः कंसाय कर्मावेद्य गृहं ययौ ॥१८॥शुक म्हणे गा कौरवराया । तैसा आग्रह सांडूनियां । अभिवंदूनि देवकीतनया । निघता झाला विमनस्क ॥८९॥विमनस्काचे परी म्लान । कीं अभीष्ट प्राप्तीचें व्यवधान । मग मथुरापुरीं प्रवेशोन । कंसा जाऊन भेटला ॥९०॥प्रभुत्वें जुहारूनियां कंस । समासें निवेदी कृतकर्मास । जे आज्ञेप्रमाणें उभयतास । घेऊन आलों भोजेंद्रा ॥९१॥आणि नंदादि सर्व पशुप । नानाद्रव्यें रस अमूप । उपवनीं उतरले समीप । कथिलें संक्षेप कृतकर्म ॥९२॥मग घेऊनि कंसाज्ञा । अक्रूर जाता झाला सदना । यानंतरें कुरुभूषणा । कृष्णाचरणा अवधारीं ॥९३॥अथापराह्णे भगवान्कृष्णः संकर्षणान्वितः । मथुरां प्राविशद्गोपैर्दिदृक्षुः परिवारितः ॥१९॥अक्रूरविसर्जनानंतर । अपराह्णकाळीं जगदीश्वर । साटोप साग्रज सानुचर । वयस्यभारवेष्टित ॥९४॥देखावया मथुरापुरी । आवडी धरूनि अभ्यंतरीं । प्रेवशला कोणेपरी । तें अवधारीं कुरुभूपा ॥९५॥जैसी कृष्णें देखिली पुरी । चौ श्लोकीं ते शुकवैखरी । वदली तैसें व्याख्यान चतुरीं । भाषाविवरीं परिसावें ॥९६॥ददर्श तां स्फाटिकतुंगगोपुरद्वारां बृहद्धेमकपाटतोरणाम् ।ताम्रारकोष्ठां परिखादुरासदामुद्यानरम्योपवनोपशोभिताम् ॥२०॥गगनचुंबित महाद्वारें । रम्य स्फटिकांचीं गोपुरें । वज्रगोमेदपाचप्रवरें । रत्नविचित्रें खेवणिलीं ॥९७॥गोपुरशिखरीं झळकती ध्वजा । सरत्नकलशा तेजःपुंजा । गमे पालविती अधोक्षजा । स्वधामवोजा पहावया ॥९८॥विशाळ स्फटिकाच्या चौकटी । गणपति रेखिले ऊर्ध्वपाटीं । उभय विशाखउंबरवटीं । शोभा गोमटी जडिताची ॥९९॥उभय विशाखमूळभागीं । क्षीरोदमथनोद्भवश्वेतांगी । स्फाटिकप्रतिमा दिग्गजलिंगीं । वज्रमणीचे चौदंती ॥१००॥तयासेजीं उंबरवटा । कमठाकृति नील निघोंटा । अल्प उच्चता मध्यकोष्ठा । कीर्तिमुखें ते विशाळें ॥१॥वल्ली कमळें शुक सारिका । जडित रत्नीं निर्मिल्या देखा । खणोखणीं चित्रपताका । पवनें लखलखा झळकती ॥२॥चंड कपाटें पुरवघटित । वज्रमणीचे शंकु वृत्त । कीलकीलनें उत्कीलित । जेंवि निशांत रविउदयीं ॥३॥रत्नजडित कनकपर्णें । मुक्तादामपाचकिरणें । खणोखणीं रम्य तोरणें । भासुर सदनें लाजविती ॥४॥भंवते परिख वरुणालया - । सारिखे सजळ भरले राया । नक्रां मकरां यादोनिचयां । क्रीडावया विस्तीर्ण ॥१०५॥उपपरिखांच्या परिधिवसें । दुर्गाग्रभाग अष्टांग दिसे । परप्रयत्ना असाध्य कैसे । दुर्गम जैसें मृत्युमुख ॥६॥मूळपाषाण लोहबंदी । उपरी अष्टलोहांची वेदी । वप्रप्रकोष्ठीं संधीं संधीं । यंत्रसमृद्धि परहननीं ॥७॥पाचपेरोजमरकतचर्या । शोभती दुर्गाग्रीं बरविया । काद्रव्यें फणा उभारलिया । जेंवि पहाया गरुडातें ॥८॥परिखाप्रदेशीं उपवनें । पुष्पवाटिका सुगंध सुमनें । क्रमुक कदळी द्राक्षाविपिनें । श्रीसंपन्नें शोभती ॥९॥जाई जुई मालती कुंद । बकुलसेवंतीचंपकवृंद । वायु सुगंध मंद मंद । झळके विशद निगूढत्वें ॥११०॥ऐशा अनेक पुष्पयाती । फळसमृद्ध तरुवर किती । नगराभोंवत्या उपवनपंक्ती । सुरस शोभती जलसौख्यें ॥११॥नगरापासूनि दुरी ना जवळी । रम्योद्यानें सुफळित फळीं । पनस अच्युत शाल शाल्मली । बदरी आंवळी अशोक ॥१२॥ताल तमाल तील तिंतिणी जंबु । वट अश्वत्थ उंबर निंब । कपित्थ चंदन बिल्व कदंब । बहुविध निंबे लकुचादि ॥१३॥मधु प्रियाळु श्लेष्मातकी । कुटज राजोदन केतकी । तूत तुरंज भल्लातकी । पार्यातकी वनशोभा ॥१४॥ऐसीं उद्यानें अनेक । नगराभोंवतीं पृथक् पृथक । रहाट मोठा कूप तटाक । संपथ वापी पुष्करणी ॥११५॥पक्षि विराव वनोपवनीं । भ्रमर गुंजारवती सुमनीं । किलकिलाती वानरश्रेणी । बहुविध प्राणी निवताती ॥१६॥वनोपवनाभोंवत्या भिंती । द्वारें देहल्या बैठका निगुती । जलयंत्रांच्या ऊर्ध्वगती । विचित्र शोभती शालाग्रीं ॥१७॥चौक रमणीय चैत्य वेदी । पाचस्फटिकमाणिक्यबंदी । वैदूर्यमणि जडिले संधीं । नुमजे कधीं दिनरजनी ॥१८॥असो ऐसे नृपाराम । नगराभोम्वते उत्तमोत्तम । पाहता झाला मेघश्याम । नगरी परम शोभाढ्य ॥१९॥ताम्र तार नारी पुरट । अष्टलोह आरकूट । तन्मयघटिता शाला निघोंट । वस्तुसंघाट साठविणें ॥१२०॥धेनुमहिषीकुञ्जरशाळा । शकटशाकटीस्यंदनशाळा । अजाअविकक्रमेळशाळा । अश्वशाळा विस्तीर्ण ॥२१॥देवागारें धर्मशाळा । मठ मठिका पर्णशाळा । वेदशास्त्राध्ययनशाळा । यज्ञशाळा प्रशस्ता ॥२२॥चित्रविचित्र रंगशाळा । अस्त्रें शस्त्रें वस्त्रशाळा । रुग्णोपचारी भेषजशाळा । यंत्रशाळा सद्रव्या ॥२३॥नाट्यशाळा नाटकशाळा । वाद्यशाळा वादकशाळा । नृत्यशाळा नर्तकशाळा । गायनशाळा गांधर्वी ॥२४॥पारधीच्या समृद्धिशाळा । दस्युदमनादिबंदिशाळा । कुरंगव्याघ्रशुनकशाळा । गोळांगुळश्येमादि ॥१२५॥अष्टादशधान्यसमृद्दि । धननिक्षेप महानिधि । ताम्रारकोष्ठा ये पदबोधीं । अर्थ ऐसा प्रकाशे ॥२६॥सौरभ्यशाळा परिमळद्रव्यें । रसांचे संग्रह विविधें गव्यें । भांडागारें राजसेव्यें । जैसीं दिव्यें सुरसदनें ॥२७॥बहुविध नेपथ्यमांदुसा । गगना न लगे सुवर्णकोशां । वैदूर्यरत्नांच्या अशेषा । संदोहशाळा भटगुप्ता ॥२८॥आणिक कोणे प्रकारें पुरी । देखता झाला कैटभारि । ते पुरगर्भींची संपदाकुसरी । परिसिजे चतुरीं विशेषीं ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP