मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर अक्रूर उवाच :- नाहं भवद्भ्यां रहितः प्रवेक्ष्ये मथुरां प्रभो । त्यक्तुं नार्हसि मां नाथ भक्तं ते भक्तवत्सल ॥११॥म्हणे तुम्हांवीण मी सहसा । योग्य नव्हें मथुराप्रवेशा । जळावेगळा तळमळी मासा । व्याकुळ तैसा मम प्राण ॥४७॥प्रभु समर्थ तूं ऐश्वर्यनिधि । गोपशैशव हे उपाधि । स्वभक्त टाकणें ऐसी बुद्धि । कोणें विधि आदरिली ॥४८॥भक्तवत्सल तूं आमुचा नाथ । प्रभुत्वें ऐश्वर्यें समर्थ । असतां वियोगणें हा अर्थ । मज यथार्थ तर्केना ॥४९॥सांडूनि सुहृद गोपगण । जातां संकोच मानी मन । समस्तीं यावें तरी तूं दीन । म्हणोनि अनुमान तर्किसी ॥५०॥तरी तूं नाथ आमुचे शिरीं । तेणें सर्व समृद्धि घरीं । कोणेविसीं संकोच न करीं । सहपरिवारीं चालावें ॥५१॥आगच्छ याम गेहान्नः सनाथान्कुर्वधोक्षज । सहाग्रजः सगोपालैः सुहृद्भिश्च सुहृत्तम ॥१२॥साग्रज सुहृद सबल्लव । सहित यानें शकट सर्व । आश्रम सनाथ करूनि दैव । हें अपूर्व मज दावीं ॥५२॥अपूर्व दैव म्हणसी कैसें । तरी सुहृत्तमें पुराणपुरुषें । मज गौरवावें विशेषें । श्रीजगदीशें अधोक्षजें ॥५३॥बाह्य शरीराचे जे आप्त । सुहृद म्हणिजेती ते समस्त । तूं सर्वात्मक सर्वगत । परमपुरुषार्थ सुहृत्तम ॥५४॥म्हणोनि सनाथ मजला करीं । आश्रमा येईं सहपरिवारीं । तेणें लाहीन ऐश्वर्यथोरी । कोणेपरी तें ऐक ॥५५॥पुनीहि पादरजस गृहान्नो गृहमेधिनाम् । यच्छौचेनानुतृप्यंति पितरः साग्नयः सुराः ॥१३॥गृहस्थधर्माचे अधिकारी । आम्ही गृहमेधी संसारी । आमुचे आश्रम पवित्र करीं । पदरजबारिकर्दमें ॥५६॥सरज श्रीपदशौचोदक । पडतां ममांगणीं सम्यक । नांदीमुख अश्रुमुख । अर्यमाप्रमुख दिव्यपितर ॥५७॥सोमप उश्मप बर्हिष्वद । मौनप सूक्तप अग्निष्वद । कव्यवाहनादि पितर विषद । अक्षय आनंद पावती ॥५८॥गार्हपत्यादि समस्त अग्नि । तव पादाब्ज आवनेजनी । तृप्त होतां सर्वांयज्ञीं । अवभृथस्नानीं कृतपूत ॥५९॥श्रीपदशौचोदकें करून । इंद्रप्रमुख सुरवरगण । अक्षय तृप्ति पावती पूर्ण । तैं तप कोण नाचरलों ॥६०॥एवं त्रिलोकीतर्पण । घडलें तच्छ्रेयःसंपादन । ऐसे आश्रम करी पावन । पदरज क्षाळून आंगणीं ॥६१॥आश्रममात्र पवित्र नव्हे । श्रीपदप्रक्षालनगौरवें । दुर्लभ ऐश्वर्य जोडे दैवें । तें आघवें अवधारीं ॥६२॥अवनिज्यांघ्रियुगलमासीच्छ्लोक्यो बलिर्महान् । ऐश्वर्यमतुलं लेभे गति चैकांतिनां तु या ॥१४॥अंघ्रियुगळ प्रक्षाळून । परम कीर्त्यर्ह होईन । अतुळ ऐश्वर्य लाहीन । आणि निर्वाणमोक्षश्री ॥६३॥पूर्वीं अवनेजनें कोणासी । ऐश्वर्य जोडलें ऐसें म्हणसी । तरी तूं ऐकें हृषीकेशी । इयेविषीं निरोपितों ॥६४॥वैरोचनि जो कां बळी । त्रिपादभूमिप्रदानकाळीं । तवांघ्रियुगळाच्या पाखाळीं । स्वकीर्ति धवळी जगत्त्रयीं ॥६५॥आणि तूंतें काठीकार । करूनि अजस्र राखवी द्वार । विषम नमनी तव अंतर । जेंवि पिता पुत्रैश्वर्यें ॥६६॥पिता पुत्राची सेवा करी । विषम न वटे उभयांतरीं । हेचि अतुलैश्वर्यथोरी । जे सत्ता तुजवरी ज्या विभवें ॥६७॥ब्रह्मादिकांचेही माथां । अगाधैश्वर्यें जोडे सत्ता । परी तूंतें राबती अक्षोभता । हें ऐश्वर्यं तत्त्वता बळीचें ॥६८॥आणि भोगूनि शक्रासन । सर्वथा बळीसी नाहीं पतन । एकांतीं कीं गति संपूर्ण । भक्तासमान नित्यमुक्त ॥६९॥क्षीणपुण्यें इतर शक्र । पतन पावती अधोवक्त्र । बळी ते गतीसी नोहे पात्र । परम पवित्र सुश्लोक्य ॥७०॥आपस्तेंऽघ्र्यवनेजन्यस्त्रील्लोंकाञ्शुचयोऽपुनन् । शिरसाधत्त याः शर्वः स्वर्याताः सगरात्मजाः ॥१५॥तुझीं पादावनेजनजळें । त्रिलोकी पावन करिती अमळें । शिरीं धरिलीं जाश्वनीळें । आणि उद्धरिलें सगरात्मजां ॥७१॥ऐसा तव पादप्रक्षालनें । श्लाघ्य संपन बहुकल्याणें । पावेन ऐसें कृपाळुपणें । कीजे म्हणोनि प्रार्थिलें ॥७२॥मग विचारी अंतःकरणीं । जेथ कुंठित निगमवाणी । अनंतवदनीं शिणला फणी । तो कैं स्तवनीं स्तविजेल ॥७३॥आतां नमनमात्रचि करणें । अभीष्ट जाणिजेल सर्वज्ञें । ऐसें विवरोनि अंतःकरणें । करी वंदनें तें ऐका ॥७४॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP