कटिबंध शिवाचा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पार्वतिला शिवसांबानें । लेवविलें चिन्मय लेणें ॥धृ॥
कोणीएके समयांतरि श्रीशंभुपार्वति नंदीरुढ होउनिया आपण कैलासाहुनि विष्णुभुवन बहुरम्य सुलक्षण वैकुंठाप्रति जाते झाले । तया स्थळीं बहुदेव मिळाले । अळंकारभूषणें चांगले । अंगावरि घालुनिया वहिले । इंद्रचंद्र ब्रह्मादिक आले । श्रीधरवर वेष्टुनीया ठेले । तशाच त्यांच्या पन्त्यांनीं निज । अंगावरुते अळंकार बहु नानापरिचे । लेवुनिया वस्त्रें भरजरिचे । वेभव जें अपुलाल्या घरिंचे । होते ते अंगावरि घालुनि । परस्परेसी थाट दाविति । घाट परोपरि अचाट नग बहु । दाट हेम चकचकाट जडितें । रत्यखचित मोत्याचे सुंदर घोष लोंबति । तेणेंशी बहु कांति शोभती । असो ययापरि सभा दाटली इतुक्यामधि पार्वतिस घेउनिया आपण श्रीगंगाधर येते जाले । सर्वांनीं ते नयनिं पाहिले । भाग्य उदेलें म्हणूनिया सुर उभे राहिले । जयजयाकारे वदते जाले । सर्वांनिं प्रणिपात घातले । उंचस्थानीं पूजन केले । ययापरीचे अंबीकेसी । निज राणिवसामधि नेउनिया हळु नम्रपणानें बहुत मान सन्मान करुनिया बोलत लक्ष्मी अहो माय ममभाग्य उदेले काय म्हणुनि तव पाय अजी हा ठाय स्पर्शिति ऐसें बोलुनि सर्व स्त्रीया मग नमिती अधोवदने ॥१॥
पाहुनि लक्षूमीचें वैभव । वस्त्रेंभूषणें घवघव । सुंदर शोभतसे माधव । तैसे ब्रम्हादिकहि देव । दाविति संपत्तीचा गौरव । पाहुनि तल्लिन जाला जीव । गौरिअंतरी उठली हाव । मनांत बोलुनिया शिवशिव । म्हणे माझें कैसें दैव । धिग्धिग प्रारब्धा कटकटा । कैसा म्यां उचलीला वांटा । नाहीं नाकीं पुरता काटा । उगाचि थोरपणाचा ताठा । भर्ता माझा फार करंटा । काळ्या माळावरी लंगोटा । जैसा पिंपळ उघडा थोटा । आपले ठायीम म्हणतो मोठा । पुरतें अन्न मिळेना पोटा । पीतो भांगीचा बहु घोटा । याला वस्त्राचाही तोटा । वितभर नेसतसे लंगोटा । नाही मुगुट बरा गोमटा । म्हणवूनि वाढविल्या जटा । वाइट दिसताति पिंगटा । केशर नमिळेचि मळवटा । ह्मणवुनि लावी धुळिचा पट्टा । त्याला अलंकार वोखटा । कंठी सर्प करिती चटचटा । रुंड वाजताती खटखटा । ऐसा पती माझा भिकारी । बरवा न दिसेचि घरींदारीं । ऐशाचीया कफल्लकाची ॥ कांता मीहि कफल्लकाकी । एसी आपुल्या मनांत घोकी ॥ तया काळिं मग अकस्मात ती । सभा विसर्जन होऊनीया ॥ सुर उठोनि गेले । गौरीशंकर घरासि आले । सदाशिव गौरीतें पुसती म्लानवदन तव दीसतसे मज कोण तुला निष्ठुर बोलले सांगे वो मृगनयने ॥२॥
गौरी बोले धरुनि फुगारा अहो शंकरा । पूर्ण उदारा । दया सागरा । तुमची दारा असतांना मज कोण उणें बोलेल हो वचनें परि अंतरिम एक वसतसे अळंकार बहु सोनें ल्यावे । अखंडित घरिं भाग्य असावें । जगामधि बहु मान्य दिसावें । ऐसें ऐकुनि सदाशिवानीं जटेंतुनिया केश काढिला । अंबेच्या हस्तावरि दिधला म्हणे सत्वरि जाउनिया हा केश देवोनि ययाबरोबरि सोनें घेउनि अळंका xxxx फार करावें ऐसें ऐकुनि साशंकित होउनिया अंबा निघती जाली विरंचीच्या सदनाप्रती गेली सरस्वतीतें बोलतसे हा केश घेउनि याजभार मज सोनें देणें । ऐसे ऐकुनि तयासि तीनें होती जाली ते ऊदार । अंतरिं सेवुनि अहंकार । सोनें देते भारोभार । म्हणवुनि तुळितां अलंकार । जाला केशाचा बहुभार । शेवटिं रत्नाचें भांडार । वजनीं घातला संसार । परि तो केशचि जाला फार । होउनि गर्वाचा परिहार । जाला वीरंची बेजार । शेवटिं केला नमस्कार । अंबे दारिद्री मी फार । माझा केतुला बडीवार । आपण सुरपती सदना जाणें ॥
पाहुनि इंद्रभुवन परिकर । जाती जाली ते सुंदर । आडवा पातला शचिवर । विनवि जोडुनिया दोनी कर । जैसा द्वारीचा किंकर । विनवुनि बोले वारंवार । ह्मणे माय तुज काय अपेक्षित ऐसें ऐकुनि बोलत अंबा केशभार मज सोनें देणें असो तयानें ब्रह्मदेवसम सर्व संपति तुळिलि परंतु सदाशिवाच्या केशभार तें नाहीं भरली । सवेंचि तेथुनि गिरजा फिरली । वैकुंठाप्रति जाती जाली । लक्षुमिनें पाहुनिया वहिली । बहुप्रकारें पूजा केली । आगतस्वागत पुसूं लागली । तंव अंबेनें वृत्तांत आपुला । सांगतांचि मग तुळा करुनिया लक्ष्मी आपुले अलंकार घालिती ऐसें ऐकुनिया भगवंत पातले ह्मणती गे तूं काय करिसि हे ऐक तुला मी स्पष्ट सांगतों पार्वतीश जगदीश केश नव्हे हा वेषधारि मज होष गमत जो सर्व क्षितिदश देश मस्तकिं लेश मानितां द्वेषरहित तव मेषगर्वमद क्लेश हारितां गौरिआश्रय करुनिया सामर्थ्य दावितो वजन कराया तया बरोबरि आणी सर्वहि सोनें ॥४॥
जडाव लक्ष्मीचे पुष्कळ । वजनी घालितां सकळ । केशहि न उचले एकहि तिळ । झाडुनि घर केलें सोज्वळ । भांडे सोन्याचे तुंबळ । वस्त्रें भरजरीचे केवळ । घालुनि उचलूं बोलें बळ तव तो जाग्याहूनि नढळ । पाहुनि रमा करि हळहळ । चिंता लागली तळमळ । हरला गर्व तिचा तात्काळ । नयनीं पाहुनिया भगवंत । त्याप्रति बोले सेवुनि खंत । आतां कैचा पाहतां अंत । कुबेर भांडारी धनवंत । त्याजप्रती बोलावुनि आतां । पुर्ती करावी ऐसें ऐकूनि कुबेरधन मग नवानिधीचा भार घातला । परंतु त्या शिवशंभुजटेचा केश हलेना ऐसें पाहुनि सर्वांनीं मग पार्वतीस प्रणिपात घातले । स्तुतिस्तवन बहु करिते जाले । धन्य तुझा भर्तार सदाशिव पुण्यशीळ सर्वांत आगळा ॥ कीर्ती तयाची काय वदावी ॥ अखंड वैराग्य ते सेवी ॥ संपति त्याला कशास व्हावी । माया हे मृगजलवत भावी । आत्मसुखी मन अक्षयिं ठेवि । त्याची किल्ली मजला ठावी । जाय माय धरि पाय तयाचे । काय तुझ्या मनिं हायहाय ॥ हे सुवर्न इच्छा व्यर्थ उदेली । ऐसें ऐकुनि गौरी मग कैलासा गेली । सदाशिवातें शरण रिघाली । अधोयदन पाहुनिया खालीं । नम्रपणें मग वदति जालि । आजि समशा माझी पुरली । क्षमा करावि शरणागत मी जाणुनिया शिव निर्भवर मज देणें ॥५॥
दीनवदन गौरीतें पाहुनि । बोलतसे शिव हास्य करुनिया विलंब होउनि येणें जालें । कीतीक वजनी सोनें आणिलें । बरे बरे पार्वति तुवां तरि वस्ता घडल्या दारिद्री बहु असा भिकारी पडलोंसे मी तुझ्या पदरीं । भाग्यवान पित्याची कुमरी । असतांना त्वा काय म्हणुनि मजलागीं वरिलें । तुझें मनोरथ नाहीं पुरलें । ऐसें ह्मणतां भय भित होउनिया गौरी । विनवितसे स्वामि त्रिपुरारि । अज्ञानी मी अनाधिकारि । तुमच्या स्वरुपा नेणुनिया मी उगिच भ्रमले । सर्वपरि जाउनिया श्रमले । ऐसें ऐकुनि सदाशीव मग प्रसन्न जाले । निजगुज अपुलें समूळ वदले । ऐक पार्वति चिदाकाश स्वप्रकाश जे अविनाश अखंडित तेचि स्वये तू पूर्णपणे चित्सूवर्ण होउनि जगनग पाहि आपुले ठाइ तूचि तूचि तूं होंउनि राही । शोकमोह मग तुजला नाहीं । तरिसि या भवसागर डोहिं । असो ययापरि पूर्णबोध ऐकुनिया श्रवणे । मनन करुनिया शुद्धबुद्धीने । आत्मा लक्षुनि चरमवृत्तिनें । निदिध्यास करतांना ऐसा आत्मस्वरुप निजअंगे होउनि । निरंजनाच्या ठायीम राहूनि । डोले ब्रम्हसुखानें ॥६॥
॥ श्रीदिगंबरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP