मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|
राक्षसविवाहाबद्दलचा विचार

राक्षसविवाहाबद्दलचा विचार

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


आता राक्षसविवाहाबद्दलचा विचार काय तो करावयाचा राहिला. हा विवाह नुसत्या क्षत्रियांपुरता उक्त असून त्याच्या खर्‍या स्वरूपाचे वर्णन मागे क. १५६ येथे आलेच आहे. इतर विवाह क्षत्रियांस करिता येतात, त्याप्रमाणे हाही करिता येतो असे स्मृतिकारांचे म्हणणे असते, तर त्याबद्दल विशेष पंचाईत करण्याची जरूर न पडती; परंतु इतर विवाह विशेष प्रशस्त असे स्मृतीत स्पष्ट लिहिले आहे, त्यावरून पाहू जाता स्मृतिकाळीदेखील हा विवाह शक्य होता अगर कसे यावियी संशय वाटतो.
याचे पहिले कारण असे की, स्मृतिकाली समाजाची स्थिती सुधारणेच्या मार्गांतली होती, व राजसत्ता प्रबळ झाली असून प्रजेवर होणार्‍या जुलुमाचे परिमार्जन राजा करीत असावा, असे मानण्यास जागा आहे. दुसरे कारण, स्त्रीवर्गाच्या स्थितीत पूर्वकाळच्या स्थितीच्या मानाने फ़रक पडला होता हे स्मृतिग्रंथांतील अंत:प्रमाणांवरून व्यक्त होते हे होय.
ही प्रमाणे पाहू जाता, यद्यपि स्मृतिकाली स्त्रीवर्गाचा मान फ़ारसा राहात नसे, व स्त्रियांना जन्मभर कोणाच्या ना कोणाच्या तरी ताब्यात राहावे लागे ही गोष्ट खरी. तथापि त्यांची स्थिती प्रत्यक्ष गुलामगिरीची असेल असे वाटत नाही. रानटी स्थितीत पातिव्रत्याची कल्पना नसते; व ही कल्पना सुधारणाकाळाची दर्शक होय हे वर नुकतेच सांगण्यात आले आहे. स्मृतिग्रंथ कोणताही घ्या, त्यात व्यभिचाराचा व स्त्रियांच्या स्वच्छंदी वर्तनाचा निषेधच केला असून स्त्रियांनी पातिव्रत्यापासून ढळू नये या गोष्टींवर स्मृतिकारांचा मोठा कटाक्ष दिसून येतो.
विशील: कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जित: ।
उपचर्य: स्त्रिया साध्व्या सततं देववत्पति: ॥
हे वचन मनुस्मृती अ. ५ श्लोक १५४ येथे आले असून त्यात नवरा कितीही वाईट स्वभावाचा, स्वेच्छाचारी व दुर्गुणी असला, तरी पतिव्रता स्त्रीने त्यास देव मानून त्याची नित्य सेवा करीत असावे, असे सांगितले आहे. याच अध्यायातील श्लोक १४९ व १५० पुढीलप्रमाणे आहेत :
पिता भर्त्रा सुतैर्वापि नेच्छोद्विरहमात्मन: ।
एषां हि विरहेण स्त्री गर्ह्ये कुर्यादुभे कुले ॥
सदा प्रहृष्टया भाव्यं गृहकार्येषु दक्षया ।
सुसंस्कृतोपस्करया व्यये चामुक्तहस्तया ॥
अर्थ : ‘ पिता, पती किंवा पुत्र यांस सोडून निराळे राहण्याची इच्छा स्त्रीने करू नये. कारण अशी इच्छा केल्यापासून माहेर व सासर या दोन्ही कुलांस दूषण लागते. स्त्रीने गृहकार्यात दक्ष राहून नेहमी आनंदी वृत्तीने असावे. घरातील सामानसुमानाची व्यवस्था तिने ठेवावी, व खर्चात उधळपट्टी होऊ देऊ नये. ’ अशी वचने आणखीही पुष्कळ आहेत, परंतु ती येथे देण्याची जरूर नाही.
प्रस्तुत स्थळी सांगण्याचे इतकेच की, स्मृतिकाळी कुटुंबातील स्त्रियांस वागविण्याची पद्धती गुलामगिरीची नव्हती; व जर ती तशी असती, तर त्यांना घरसंसारातील दक्षता, पातिव्रत्य वगैरे सांगण्याचे मुळीच प्रयोजन नव्हते. राक्षसविवाहाच्या पद्धतीने ज्या स्त्रीवर बलात्कार झाला, त्या स्त्रीला पतिप्रेम इत्यादी गोष्टी सांगणे फ़ुकट आहे हे सांगणे नकोच.
तिच्या इच्छेविरुद्ध तिजवर धडधडीत बलात्कार झालेला, तिला जुलमातून सोडविण्यास बाप किंवा भाऊ कोणी धावून आले नाही, इत्यादी कारणांनी तिची स्थिती नाइलाजाची होऊन ती पतीच्या ताब्यात वागण्यास कबूल होईल यात नवल नाही. परंतु कसेही झाले तरी तिला झालेल्या जुलुमाची आठवण कायमची होत राहील, व संधी सापडली नाही तोपर्यंत कायती तई पतिव्रता, एरवी मनाने तर ती खास तशी राहणे अशक्यच आहे. अर्थात जर वास्तविक प्रेम आणि पातिव्रत्य या गोष्टींची स्त्रियांना आवश्यकता मानावयाची असेल, तर त्या गोष्टी राक्षसविवाहापासून साधणे अशक्य आहे. स्मृतिग्रंथांवरून ही आवश्यकता मानिली गेली होती हे स्पष्ट दिसते; व यावरून विचार करिता हा विवाह स्मृतिकाळी होत नव्हता, तरी तो पूर्वीच्या रानटी स्थितीत असलेला विवाहाचा प्रकार म्हणून सांगण्यात आला, एवढेच फ़ार तर म्हणावे लागेल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP