मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|
मनुकालापूर्वी स्वयंवरपद्धती बंद होती

मनुकालापूर्वी स्वयंवरपद्धती बंद होती

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथांत सीता, द्रौपदी इत्यादिकांची स्वयंवरे वर्णिली आहेत, त्यांची गणना मनूने सांगितलेल्या आठ विवाहांपैकी कोणत्या विवाहाच्या पोटी करावयाचा हा एक प्रश्नच आहे. याचे उत्तर देताना कदाचित कोणी हा गांधर्वविवाहच होय असे म्हणेल, परंतु ते कितपत योग्य मानिता येईल याबद्दल कंशा वाटाते. कारण, स्वयंवरात वर पसंत करणे हे केवळ वधूच्या इच्छेवर अवलंबून असते; यामुळे वधूच्या बाजूने फ़ार तर गांधर्वविवाह झाला असे म्हणता येईल; परंतु वर होण्याकरिता जमलेल्या नवरदेवांची योग्यता म्हटली म्हणजे एखाद्या नाटकप्रयोगातील प्रेक्षकसमाजापेक्षा फ़ारशी निराळी नसते. फ़ार फ़ार झाले तर जमलेल्या प्रेक्षकांतून एखाद्या व्यक्तीच्या नशिबाचा उदय व्हावयाचा, व प्रसंगी सर्वांची येथून तेथून सरसकट निराशा व्हावयाची, असा प्रकार होणेही शक्य असते.
स्त्री पुरुषास वरते ती तिला वर पसंत पडला व त्याविषयीचे प्रेम तिच्या मनात उद्भवले म्हणून वरते हे जसे म्हणता येईल, तसे प्रेक्षक वरसमाजापैकी एकाबद्दलही म्हणता येने नसते हे उघडच आहे. अशा स्थितीत होणार्‍या स्वयंवरास पाहिजे तर मारून मुटकून ‘ गांधर्व ’ ही संज्ञा द्यावी. परंतु खरा गांधर्वविवाह म्हटला म्हणजे त्याला ह्या समाजसंमेलनाच्या बाहेरच्या ढोंगाची जरूर नाही. तो होण्यास भवभूतीने वर्णिल्याप्रमाणे --
पुरश्चक्षूरागस्तदनु मनसोनन्यपरता ।
( मालतीमाधव अंक २ )
म्हणजे ‘ अगोदर नेत्राच्या ठायी उत्पन्न होणारी प्रीती, व त्यानंतर आपल्या प्रेमाच्या विषयाहून अन्य काही दिसत नाही अशी उभयतांही स्त्री - पुरुषांच्या मनाची स्थिती होणे ’ हेच काय ते गुण पाहिजेत.
परंतु या गुणांची परीक्षा होण्यास स्त्रीवर्गास अगोदरपासून थोडेबहुत तरी स्वातंत्र्य असले पाहिजे. उत्तरकालीन शास्त्रकार्त्यांनी अगर समाजनेत्यांनी तशी संधीच ठेविली नाही; स्त्रीजातीवर बालपणी पित्याची सत्ता असावयाची, व ती आहे तोपवेतो पित्याने कन्येचा विवाह लावून दिला पाहिजे, हा समजाचा सिद्धान्त ठरलेला. तेव्हा तसेच काही आपत्तीचे कारण असल्याशिवाय पित्याकडून त्याचे उल्लंघन व्हावयाचे नाही हे उघड आहे. त्यामुळे स्वयंवरपद्धतीचे विवाह स्मृतिकाळी प्राय: अशक्यच, म्हणजे आपत्प्रसंगाशिवाय न दिसणारे असेच झाले होते यात संशय नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP