मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
दत्तदयोदय २

दत्तदयोदय २

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


म्हणुनि तुला कर जोडुनि देवा ! मीं दीन विनवितों भावें;
घन जेंवि चातकाला, करुणौदार्यव्रतीश्वरा ! पावें.     २६
सोडवितें भवपाशापासुनि निजदास्य सादरा जीवा,
म्हणउनि मुमुक्षु भावें विनविति तुझियाचि पादराजीवा.     २७
‘ बा ! गा ! मागा, देतों. ’ हे तों वाणी निघे तुझ्याचि मुखें,
अभयार्थिकृपणशरणागतकटकें त्वां न पाहिली विमुखें.     २८
त्वां भक्तांसि निजात्मा दिधला, आतां तुझी नसे सत्ता,
दत्ताख्याचि वदे हें, सत्यव्रत, सत्यसंध, तूं दत्ता !     २९
तम नाशी, ताप हरी, कळानिधी, अमृतकर, महेशमत,
श्रम तत्काळ निवारी, जर्‍हि जगदवना असे सदा भ्रमत,     ३०
तर्‍हि न बधे मन तुमच्या जगदाह्लादप्रदोदया भावा;
भावानें हें वदतों; भावाल मलाचि मोढ, तरि भावा.     ३१
मूढ कसा मीं ? स्वामी ! कांति तयाची असो निकाम हिमा,
भूतपति शिरिं धरूं द्या; तुमचा विधुला न ये निका महिमा.     ३२
न गुहागत तम नशे चंद्रकरांहीं, न तापही सर्व,
माथां पिशाचपतिनें धरिलें, म्हणऊनि कां वृथा गर्व ?     ३३
अमृतकर कळानिधि तो कैसा ? न हरी निजक्षयव्याधी,
वंद्य कसा तो ? ज्याची गुरुदारधर्षणी अभव्या धी.     ३४
स्वामी ! क्षमा करा; हा निंदक, पापी, असें न मानावें;
घेतों तुमची शुद्धें पुण्यश्लोकोत्तमोत्तमा ! नावें.     ३५
श्रीदुर्वासा भगवान् बंधु तुझा, सर्ववरदगुरु दक्ष,
त्रिभुवनवंद्यपदांबुज; वर देउनि दास सुखविले लक्ष.     ३६
हें विश्वाला ठावें, वेदपुराणप्रसिद्ध परि कोपी,
तो पीतपट प्रभुला वळला, तद्भक्ति न इतरा सोपी.     ३७
मुष्ठींत धरिल कोणी तरि, जरि दुर्धर असे, असो, पारा,
परि हा सुदुर्धर प्रभु, इंद्रप्रमुखांसही न सोपारा.     ३८
आराधाया त्याच्या अमरद्रुमगर्वहरपदास कसीं
सामर्थ्यें पुरती ? बा ! कैसा उतरेल दीन दास कसीं ?     ३९
सोसाया त्याचे छळ, बळ कैचें आज पामरा मातें ?
कांपे हृदय, पुराणीं आइकतां चरित रामरामा ! तें.     ४०
जोडुनि रथीं सदार प्रभुसि, पुरीं चालवि प्रतोदानें,
छळितो, परि बहु देतो इष्टार्थांचीं सुविप्र तो दानें.     ४१
तो श्रीमदंबरीष छळिला, तें व्यसन केव्हडें भारी !
करितां श्रवण, थरारां कांपे अद्यापि सत्सभा सारी.     ४२
वनवसव्यसनांत छळकाम धरी; परंतु पांचाळी
गेली शरण प्रभुला, तोचि अकाळक्षयासि त्या टाळी.     ४३
छळितो, परंतु सद्यश वाढवितो; ज्यासि चाटितो दहन,
तें पहिल्याहुनि पवे, पुष्कळ संपत्ति मालतीगहन.     ४४
छळ साहतां, गुरुकृपे पाप जळे, होय भद्र बहु मोटें,
हें मृदुयत्नें घडतां, चतुरें व्हावें जनांत कां खोटें ?     ४५
‘ छळ न करितां, नव्हे शिव दासांचें, ’ जरि म्हणाल जी ! स्वामी !
छळिला अलर्क केव्हां ? हें पुसतों तुज निजाश्रितस्वा मीं.     ४६
छळ न करितां कराल प्रभुजी ! जी, तीच मज दया मोटी,
अपमान, श्रम नसतां, जें जोडे स्वल्प, तेंचि धन कोटी.       ४७
असतां अघहर गंगाह्रद, शिखिकुंडीं शिरेल कोण कवी ?
आरोग्य शर्करा दे, तरि कटुकीची न घे रसज्ञ चवी.     ४८
तूं भक्तवत्सळ प्रभु, करुणालय, शुद्धसत्वमयकाय;
तुजलाचि आठवितां, मजला संसारदु:खभय काय ?     ४९
भगवंताला त्याला करितों दूरूनि भीरु मीं नमनें,
दुग्घाब्धिकीर्ति परिसो, परि सोडी मानसा न मीन मनें.     ५०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP