मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
पांडुरंगदंडक ३

पांडुरंगदंडक ३

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


प्रभुनें पात्र करावा ज्ञानाच्या, भक्तिच्याहि, रंक रसा
आपण बहु मानावा वानावा सज्जनांत शंकरसा.     ६१
प्रभुसि जसी भक्ताची कोणाचीही तसी नसे भीड
भक्तप्रेम प्रभुला चालवि, जैसें तरंडका सीड.     ६२
भक्तावरि देवाची जैसी इतरीं नसे तसी माया;
दासीं प्रभुवात्सल्य प्राज्य, म्हणति जाणते, ‘ न सीमा या ’.     ६३
प्रभुची त्या मारुतिवरि किति किंवा प्रीति किति गुहावरि ती
जें भक्तांला, तें त्यां दुर्लभ जे अद्रिच्या गुहा वरिती.     ६४
भक्तासि ख्याति नको, परि आपण पांडुरंग वाढवितो.
प्रेसुनि भक्तयश जगीं, संसारांतूनि जीव काढवितो.     ६५
खळ निंदक जे कोणी त्यांचीं सुकृतें समग्रही हरितो.
त्यांमागें दुष्कर्में भक्तांची लावितो असें करितो.     ६६
द्वेषी, निजनिंदक जे, त्यांला दंडूनि तारितो स्पष्ट.
भोगवितो नरकांत स्वजनद्वेष्ट्यांसि बहु युगें कष्ट.     ६७
प्रभु म्हणविति परि या तों प्रभुचा कोणीहि करिल हा न पण,
थोरपण प्रणताला देतो घेवून हरि लहानपण.     ६८
विठ्ठल म्हणतो, ‘ माझ्या मद्भक्तांच्या यशास गा बाळा !
व्रततीर्थतप:प्रमुखा इतरा झटसी कशास गाबाळा ! ? ’     ६९
नाम न घे, अन्य करी, जो प्रभु पाहुनि तशास कळकळतो;
म्हणतो, ‘ वेड्या ! आत्मा गातां माझ्या यशा सकळ कळतो ’.     ७०
जो गहिंवरतो, निघतां प्रभुला वंदूनि, भेटतां काय;
‘ हाय ’ प्रभुहि म्हणे हो, कन्येला धाडितां जशी माय.     ७१
वीणा, ताल, मृदंग प्रेमें जन जे कथेंत वाजविती,
विठ्ठलदृष्टि, तयांतें आलिंगुनि, योगियांसि लाजविती.     ७२
विठ्ठल मनीं असावा, मजसम रत, नच कथेंत पेंगावा;
सर्व श्रोता योगें तीर्थमखमुखें पथें तपें गावा.     ७३
गायन, नर्तन, अभिनय करितां मद्भक्तजन न लाजावा;
काय अधिक वैकुंठीं ? प्रेमळ सोडूनि नच मला जावा.     ७४
हृदयांत पांडुरंग प्रभुचा हा दंडक लिहिला जावा;
खळ काय, साधुपासुनि पावुनियां दंड कलिहि लाजावा.     ७५
श्रीपांडुरंगदंडक आयकिला साधुजनमुखें कवि हो !
हा सर्वरसिकहरिजनहृदयसरोजांसि सर्वदा रवि हो.     ७६
स्मरणें, नमनें, स्वयश:श्रवणेम नि:शेष दोष वारावे;
हा पांडुरंगदंडक जीव जड, प्राज्ञ, सर्व तारावे.     ७७
हा श्रीविठ्थलदंडक थंड करी हृदय, हरुनि तापातें.
भक्तमयूर नमितसे विश्वाच्या याचि मायबापातें.     ७८
हा ग्रंथ पांडुरंगप्रभुच्या चरणींच अर्पिला भावें,
यांत प्रेम प्राज्य, क्षीररसीं जेंवि सर्पि लाभावें.     ७९
गातां प्रभुचा दंडक दंड करीनाचि काळ हा नियम.
कर जोडी गात्यातें जो करितो वृद्धबाळहानि यम.     ८०
श्रीपांडुरंगदंडक चंडकर स्वांतवर्ति तम हरितो;
हरि तोषे या ग्रंथें, जो भक्तशिव स्वमस्तकीं धरितो.     ८१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP