मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
वेंकटेशप्रार्थना १

वेंकटेशप्रार्थना १

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीशेषाद्रिनिवासा ! वेंकटनाथा ! तुला असो नमन.
बहु भक्तांचें झालें मुदित, तव पदांबुजीं वसोन, मन.     १
नमितों त्वच्चरण, सदा दासांच्या पावतात नवसा जे.
श्रीगोविंदा ! यांचा महिमा विश्वांत नित्य नव साजे.     २
भक्त चतुर्विधहि तुझे सुकृती श्रीवेंकटेश्वरा ! धन्य.
संसारांत श्रमति, भ्रमति, प्राणी अभक्त जे अन्य.     ३
प्रभु ! तूं करिसी, मानुनि नत शूद्रहि विप्रसा, दया त्रात्या !
श्रीशा ! न घडेचि तुझी, जो कोणी विप्रसाद, यात्रा त्या.     ४
मात्रा भवरोगाची घडली ज्या माधवा ! तुझी यात्रा
पात्रा पुण्ययशाच्या तीर्थें सत्तीर्थ म्हणति त्या गात्रा.     ५
यश संपादिति, तुज जे भक्त वहाताति कानगी, ते तें,
जें मेळविति ज्ञानें अर्पुनि मुख, चित्त, कान, गीतेतें.     ६
धर्मार्थकाममोक्षप्रद होय तव प्रसाद जगदाद्या !
सत्य, मनोहर ‘ अन्या मात्रा ’ म्हणती सुबुद्धि ‘ न गदा द्या. ’     ७
तो धन्य, अन्य न तसा प्राणी, श्रीपादरेणु जो पावे;
जेणें विधिनें लिहिले भाळीं दुर्वर्ण सर्व लोपावे.     ८
चिंतिति चित्तीं तुझिया जे भावें नित्य पादराजीवां,
वरिती, स्वयंवरवधू तेंवि, तयां मुक्ति सादरा जीवां.     ९
तापत्रयार्त होवुनि, गेला तुज शरण भक्त जो भावें,
श्रीशा ! स्वसमचि केला तो; यश विश्वीं तुझेंचि शोभावें.     १०
तूं जागरूक असतां, संसारभयें कशास कांपावें ?
नारायणा म्हणावें, इतरा वर्णुनि यशास कां, पावें ?     ११
साधु म्हणति, ‘ रे ! जन हो ! मागें, न करूनि पाठ वाद, सरा.     
जा कीं शेषनगींचा श्रीपतिभक्तांत आठवा दसरा. ’     १२
‘ अजि ’ म्हणति, म्हणत होते जन ज्या देवा ! रमानिवासा ! रे !     
हें किति ? सुर वदति ‘ अजितदासा सेवा, रमा, निवा सारे. ’     १३
पाहे तुझा रथोत्सव जो, सादर रथगुणासि आकर्षी,
नाकीं तद्यश गातो त्याच्या पूर्वजसभेंत नाकर्षी.     १४
वानरहि तव रथोत्सव सादर अवलोकितात; बहुधा, तो
वेष तसा घेउनि, सुरपति येतो; या सुखेंचि बहु धातो.     १५
तुज निर्निमेष होवुनि, सादर जोडूनि हस्त, जो पाहे,
त्वद्रूपचि तो होतो, फ़ळ कोणा दर्शनीं असें आहे ?     १६
देवा ! तव प्रसादांतिल मार्गप्राप्त सीत जो खातो,
कवि म्हणति, ‘ ज्वलनासीं स्पष्ट, न होवूनि भीत, जोखा तो. ’     १७
त्वच्चरण त्यजुनि, मन श्रीशा ! विषयीं कधीं न रातो बा !
यमशक्रपूज्य तो, ज्या द्वारीं तुझिया बसे नरा तोबा.     १८
अर्पिति नैवेद्य तुज प्रेमभरें चिंच, तिखट, तेलगट;
सत्तेनें वैकुंठीं शिरति, द्वारीं करूनि ते लगट.     १९
अवगाहिली जनें ज्या जगदीशा ! स्वामि ! पूर्वपुष्करिणी,
श्री त्यासि वश सदाही, जेंवि महामात्रपतिस दुष्करिणी.     २०
क्षिति उद्धरूनि, धरिली करुणा बरवि प्रजासमुद्धारा.
पुण्य यश तुझें, पावति, गावुनि वरविप्र ज्यास, मुद्धारा.     २१
आज्ञापुनि गरुडातें, वैकुंठींचा गिरींद्र हा देवा !
क्रीडाया आणविला, म्हणसी, ‘ या साधुहो ! निवा सेवा. ’     २२
शेषाद्रि तीन गांवें उंच, बहु विचित्र, लांब हा तीस;
जेथें सज्जन म्हणती, ‘ गे मुक्ते ! थांब, कां बहातीस ? ’     २३
होतोसि वेंकटेशा ! पत्रें, पुष्पें, फ़ळें, जळें तुष्ट.
त्वद्भक्त जसा होतो, नच तैसा वत्स सुरभिचा, पुष्ट.     २४
बसलासि विधिप्रार्थित जीवोद्धाराथ शेषनगराजीं.
अमृतेंचि त्वन्नामें, बाधों देती हरासि न गरा जीं.     २५
कोणी जन वेंकोवा, कोणी तिमया, असेंहि जे म्हणती,
गंगाप्रमुखें तीर्थें करिति तयांकारणें बहु प्रणती.     २६
कोणी कान्हकन्हय्या, कोणी रनछोडराय या नावें
आळवुनि, भक्त तरती, श्रीविष्णो ! तुज कसेंहि वानावें.     २७
वससी प्रकट प्रभु तूं श्रीभूयुक्त स्वयें जया स्थानीं
ज्ञानीं ‘ वैकुंठचि तें ’ म्हणती, धरिती सदैवहि ध्यानीं.    २८
तारिसि भवांत त्यांतें, लागति जे जीव काय कासेला.
पांघुरविसी दयेचा दीनांला अभयदायका ! सेला.     २९
म्हणतो प्राकृतहि पिता ‘ दुर्बळ बाळ न रडो, न भेंको, बा ! ’
द्रवसिल न कसा दीनीं तूं विश्वजनक दयालु वेंकोबा ?     ३०
म्हणसी तूं वेंकोबा ! ‘टेंको बाळक तसा मला जीव . ’
यापरिच दीनबंधो ! बंधुहि, करिते न साम, लाजीव.     ३१
नि:शंक चतुर्वर्गप्राप्त्यर्थ जनें तुलाचि नवसावें.
त्यजुनि त्वच्चरणाश्रय, वा ! कल्पद्रुमवनींहि न वसावें.     ३२
तव यात्रानामाहीं भव्य असें कलियुगीं, न यज्ञाहीं.
जीं अन्य साधनें तें नमुनि बसविलीं य्गीं नयज्ञाहीं.     ३३
त्वां कृतयुगचि यशांच्या केलें हें पापयुग वितानाहीं.
तूं साहुकार, दुसरा पटु, देता, वित्त उगविता, नाहीं.     ३४
शरणागतांसि म्हणती निववुनि तुझियाचि पादुका, ‘ नाचा ’.
सर्वत्र तुझींच तदपि महिमा नि:सीम या दुकानाचा.     ३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP