प्रसंग सोळावा - अष्‍टधा प्रकृति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


इमारतीचें गवंडी कारागीर । कुशळता रचिती प्रकार । तैसेंच पंडित कवीश्र्वर । शब्‍दविवंचना कथिती ॥८०॥
निश्र्चळ असे ईश्र्वराचें अवतरणें । एका संव्हारणें एका उद्धरणें । अवतारी अढळ स्‍वयंभपणें । स्‍फटिकशिळेन्यायें ॥८१॥
स्‍फटिकाशिळेस जों जों लाविती रंग । तों तों पलीकडें फुटोन दिसे भिंग । अंगीं न धरीच रंगाचा संग । म्‍हणोनि मागते दृष्‍टांत घेतले ॥८२॥
सद्‌गुरुकृपा जालिया अपार । मग सकळ भासे एकंकार । लोपला द्वैताचा विस्‍तार । पूर्व संचितगुणें ॥८३॥
पांकुळका अष्‍टधा प्रकृति । ह्याच देवता माराव्या निगुती । तरीच लाधेल आत्‍मस्‍थिती । तत्त्व अनुभवाची ॥८४॥
अष्‍टधा प्रकृतीचीं नांवें । ते पुढिले प्रसंगी सांगेन स्‍वभावें । समस्‍त कुळी सावध व्हावें व्याकरणालागी ॥८५॥
परोपरी सांगेन गुज भेद । ऐकतांच खंडेल अनुवाद । लागेल ब्रह्मसुखाचा भेद । भोळा भाव धरिलिया ॥८६॥
प्रबंध प्रकृतीची चिथावणी । सद्भाव धरूं नेदती मनीं । अवगुण संचरे तत्‍क्षणीं । अहं विकाराचे ॥८७॥
अनंत तेतीस कोटि देवता । देहामध्ये ओळखे गुणवंता । त्‍या घात करितील स्‍वहिता । नरा नारी समस्‍तांच्या ॥८८॥
त्रिगुण भूतावळीचें शरीर । शुच करूं नेदीत कर्म आचार । ईश्र्वरभजनासहि अंतर । त्‍याच्यानि गुणें ॥८९॥
एक त्‍यजूनियां गृहस्‍थाश्रम । करूं पहाती योगधर्म । चंचळ प्रकृतिचेनि श्रम । शीघ्र मांडियेलें ॥९०॥
अंगसंगें अवगुण देवता । बाहेर निखंदती वाघाभूता । त्‍यांनीं घात केला स्‍वहिता । पढतमूर्ख बुद्धिहीन ॥९१॥
शरीर औट हात देव्हारा । तेथें देवता मातल्‍या अविचारा । ब्रह्मा विष्‍णु रुद्र साधकेश्र्वरा । नाडियेले त्‍यांनीं ॥९२॥
आधीं सेवूनियां सद्‌गुरूराजा । देहामाजी क्षेत्र करावें वोजा । तें पुढें सांगेन भक्तिकाजा । शूरत्‍व श्रोत्‍यांप्रती ॥९३॥
देवी देवता अष्‍टधा प्रकृती । त्‍या पुढिले प्रसंगीं मारिजेती । श्रोती सावध करूनियां मति । विवंचना करावी ॥९४॥
आहिक्‍यीं श्रोते वक्ते नमस्‍कारिले । प्रसंग सोळा संपूर्ण केले । सत्राव्यात संग्राम आरंभिले । आधारीं गण नेमूनियां ॥९५॥
शेख महंमद बोलिले निर्मळ । मी तो असे सद्‌गुरुचा लडिवाळ । तुम्‍ही अष्‍टहि अंगें होऊनियां निश्र्चळ । स्‍वहित करावें ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP