प्रसंग सोळावा - सर्वांस गुरुकृपेनेंच उद्धार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


भावें घेतां साधूची भेटी । तरी जोडती पुण्याच्या कोटी । साधू न्याहाळितां समदृष्‍टि । पापें दहन होतीं ॥४१॥
सहज साधु जाय जे दिशे । श्रीहरि त्‍यासवें तेथें असे । हे जनास सत्‍य ना भासे । पाखांड बुद्धीनें ॥४२॥
देवता पुजिल्‍या तरता संसार । तरी कां कष्‍टत योगेश्र्वर । रामकृष्‍णांसारिखे अवतार । सद्‌गुरुचे दास्‍यत्‍व करिती ॥४३॥
तैसेच नव्याण्णव कोटी राजे । त्‍यांनीं गुरुदास्‍यत्‍व केले वोजे । हे उन्मत अज्ञान जन न लाजे । निःशंक पाषाण पूजी ॥४४॥
ऐका रामत्रंद्रे सेविले गुरु । वसिष्‍ठ योगी सिद्ध दिगंबरू । वोळखा गुरुत्‍व पारंपारू । खरें चालिलें असें ॥४५॥
तैसेच वोळखा कृष्‍णदेव । त्‍या गर्गासी धरिला भाव । प्रेमें निज गुजाचा उपाव । पुसिला त्‍यांनीं ॥४६॥
तैसाचि पहा शिव शंकरु । जाला असे पार्वतीचा गुरु । प्रसिद्ध असोनि तिचा भ्रतारु । शिष्‍यिणी केली ॥४७॥
ऐसी सद्‌गुरुकृपेची गोडी । स्त्री भ्रताराची कन्या होय आवडी । ही वोळखावी श्रोतीं परवडी । निजात्‍मसुखाची ॥४८॥
ऐका एका आत्‍मसुखापुढें । हें त्रिभुवनीचें सुख दिसें वेडें । म्‍हणोनि सिद्ध साधु निवाडें । वेडी धरितील अवधारा ॥४९॥
नित्‍य परमात्‍म्‍याची गोडी । सांगतां न ये वाचा असे बोबडी । म्‍हणवूनि साधक देशधडी । विजन क्रमतील ॥५०॥
तैसीच मदालसा सुंदरी । पुत्रास निज उपदेश करी । यालागीं सद्‌गुरुकृपेची थोरी । तीर्थां व्रतां नागवे ॥५१॥
व्यास वाल्‍मिक नारदमुनी । लागले गुरुकृपेचे ध्यानीं । आणीक उद्धव अर्जुन दोन्हीं । निजबोधी बोधले ॥५२॥
मैनावती राणी ऐका । गोपीचंदास उपदेश करी निका । शुकदेव प्रवर्तले आहिक्‍या । जनक विदेही संगें ॥५३॥
तैसेंच गोरक्ष अवधूत । तेणें मछिंद्रास वाहिले चित्त । त्‍यांचे शीघ्र जालें आत्‍महित । सार्थक जन्मांतरीचें ॥५४॥
सद्‌गुरुकृपेवेगळे कोणी । उद्धरले नाहींत पुराणी । भूतें पुजोनियां अज्ञानी । जिवित्‍वा हानि केली ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP