उपदेश - अभंग २१ ते २५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२१.
भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघे देव एक पाहीं । तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥
शिवा रामा नाहीं भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणे आत्मा एक । सर्व घटीं तो व्यापक ॥४॥
२२.
पतंग सुखावला भारी । उडी घाली दीपावरी ॥१॥
परि तो देहांतीं मुकला । दोहीं पदार्थीं नाडिला ॥२॥
विषयांचे संगती । बहु गेले अधोगती ॥३॥
ऐसे विषयानें भुलविले । जनी म्हणे वांयां गेले ॥४॥
२३.
येऊनियां जन्मा एक । करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक जन्माचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा । शेष वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम शास्त्रीं त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
२४.
विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥१॥
तेथें नाहीं कांहीं धोका । उठाउठी भेटे सखा ॥२॥
मरोनियां जावें । शरण विठोबासी व्हावें ॥३॥
म्हणे नामयाची जनी । देव करा ऐसा ऋणी ॥४॥
२५
शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें । म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥
आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला । पुढें तेणें उभविला दुजा एकू ॥२॥
समूळ साल माया सांडुनियां दिजे । परि अहंबीज जतन करा ॥३॥
तें बीज भाजोनि करा ओंवाळणी । संतांचे चरणीं समूळ देह ॥४॥
पुढें त्या बीजांची न करावी दुराशा । न धरावी आशा पुढिलंची ॥५॥
आहे नाहीं देह धरीं ऐसा भाव । म्हणे जनी देव सहज होसी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP