रूपक - कुळवाडी

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
चालती कुळवाडी नटके । उपकें घेतलीसें नाके ।
चार वर्षें पिकलें निकें । त्यांचे कण सांचले ॥१॥
पुढें एक विपाणीक पडिलें । त्या कणाचें द्रव्य सांचलें ।
कृपणाचें घर भरिलें । बंचल झाला भक्तांसी ॥२॥
स्त्रियांबाळां खाऊं नेदी । धर्म न करीच निशुद्धी ।
डोईस बांधलीसे चिंधी । खांदीं रकटें ठिगलांचें ॥३॥
त्या द्रव्याचें करी कळांतर लेखा । सजगाणीस देई रुका ।
रुक्यास घेई पैका । आठा दिवसांच्या बोला ॥४॥
सबाई दिडि दुणी । अकर्ताच घरीं आणी ।
तो न भजे चक्रपाणी । पाप धुणी होतसे ॥५॥
तंव एक अतीत घरासी आला । बाईलीनें त्यासी स्वैंपाक केला ।
तंव आपण उठून जागला । झडकरी आला द्वारासी ॥६॥
कोणें दाखविलें माझें घर । त्यावरी घेईन जहर ।
कोठें गेला सुना मोगर । अरगळा कोणें काढिली ॥७॥
ऐसा तो ब्राह्मण चड्फडत गेला । आपण परतोन माघारा आला ।
धांवोनी घाव हाणितला । डोई फोडिली बायलेची ॥८॥
कैसी केली बोहरी । बोज नाहीं तुझे घरीं ।
नागविलें इया पोरीं । तीनवेळां खाताती ॥९॥
ऐसी गजबज ऐकोन । शेजारी आला धांवोन ।
त्यासी हातीं धरोन । गृहाभितरीं हिंडविला ॥१०॥
त्यासी बैसावया दिला पिढा । तों स्वैपाक आणोनी ठेविला पुढां ।
पहा हो बायलेचा धाडस केवढा । ऐका तुम्ही दादोजी ॥११॥
ऐसीं पूर्ण अकरा वर्षें भरलीं । बारा वर्षांची साउली पडली ।
या रीतीनें गुजराण झाली । तंव अग्नि लागला गृहासी ॥१२॥
शेतांतून कुळवाडें केली चोरी । पाणी निघालें पेवा भीतरी ।
सुनेनें घालून घेतलें विहिरीं । ऐसेपरी नागवलो ॥१३॥
ऐसे जे नर असती । ते जन्मोजन्मीं नागवती ।
त्यांची न चुके यातायाती । विष्णुदास म्हणे नामा ॥१४॥
२.
आम्हीं कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी ॥१॥
वाचा पिकली पिकली । हरिनामाची वृष्टी झाली ॥२॥
दशमी एकादशीच्या दिवशीं । झाल्या कैवल्याच्या राशी ॥३॥
संत म्हणती नामा भला । हरिनामाचा सुकाळ झाला ॥४॥
३.
जन तुम्ही करारे उदीम । वाचे स्मरा नारायण । तो तुम्हां चुकवील जन्ममरण । मायाभ्रमण चुकवील ॥१॥
तारुं करुनी शरिराचें । केणें भरिलें हरिनामाचें । शिड उभविलें सत्त्वाचें । वल्हें पडती धर्माचें ॥२॥
आत्मयांची करुनी कुवे काठी । वारा लागतो जगजेठी । तारूं चाले थोरा नेटी । विठ्ठल भेटी पंढरीये ॥३॥
तारवा सांपडलें बंदर । राया विठोबाचें नगर । तें बा संताचें माहेर । विष्णुदास म्हणे नामा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP