मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

महिपतीबुवा यांच्या स्मृतीत चोखामेळा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीकंसांतकाय नम: ॥
॥ आजि दैवदशा धांवोनि सत्वर ॥ पातली श्रोतयांच्या घरा ॥ जे भक्तकथा ऐकतां चतुरा ॥ अनुभव अंतरा आला कीं ॥१॥
जेवीं निजांगे शर्करा खातां देख ॥ गोडी लागे अधिकाधिक ॥ तेवीं भक्तकथा ऐकतां सुख ॥ अंतरी विवेक ठसावे ॥२॥
कीं सुधारस सेवितां लवदसवडी ॥ सकळ व्याधी पळती तांतडी ॥ तेवीं भक्तकथेची लागतां गोडी ॥ अविद्या धडफुडी बाधेना ॥३॥
उदंड कथा आहेत सकळ ॥ परी हें शांतिवृक्षाचें अमृतफळ ॥ सेवूं जाणाती भक्त प्रेमळ ॥ विकल्पजाळ टाकूनि ॥४॥
भक्ताकथा ऐकूं जे म्हणती ॥ ते कळिकाळासी वश न होती ॥ म्हणोनी सादर होऊनि श्रोतीं ॥ अवधान प्रींती मज द्यावें ॥५॥
मागिले अध्यायीं कथा सुरस ॥ चांगदेवासी जाहला उपदेश ॥ मग एकदां सकळ संत एकादशीस ॥ पंढरपुरास चालिले ॥६॥
तंव अंत्यजयातींत आगळा ॥ वैष्णवभक्त चोखामेळा ॥ तयासी र्पसन्न घानसांवळा ॥ अंतरीं कळवळा देखोनि ॥७॥
मग जमभूमि पंढरींत ॥ कुटुंबसह राहिला तेथ ॥ ह्रदयीं आठवोनि रूक्मिणीकांत ॥ नामस्मरण करीतसे ॥८॥
स्नान करूनि भीमातीरीं ॥ प्रदक्षिणा घाली सर्व पंढरीं ॥ मग येवोनियां महाद्वारीं ॥ लोटांगण घालीतसे ॥९॥
आंत जाऊनि घ्यावें दर्शन ॥ हा अधिकार नाहीं त्याकारण ॥ म्हणोनि ध्यानीं आणोनि जगज्जीवन ॥ दुरूनि नमन करीतसे ॥१०॥
तंव कोणेएके अवसरीं ॥ बैसला होता महाद्वारीं ॥ तयासी देखोनि दुराचारी ॥ काय बोलती तें ऐका ॥११॥
विठोबासी तुझी असती प्रीती ॥ तरी राऊळांत नेता तुजप्रती ॥ दृष्टीसी न देखतां रुक्मिणीपती ॥ करिसी व्यर्थ भक्ति कासया ॥१२॥
विप्रांघरीं निपजलें पव्कान्न ॥ त्या अनसुटपात्रीं न बैसे श्वान ॥ तेवीं पांडुरंग भक्तीसी अधिकारी जाण ॥ अंत्यजयाति नसे कीं ॥१३॥
कीं नृपवराचे भोगमंदिरीं ॥ भणंग प्रवेशेल कैशियापरी ॥ तेवीं चोखामेळ्यासी राऊळांतरी ॥ जातां न येचि सर्वथा ॥१४॥
नातरी निर्दैवी फिरतां रानोरानी ॥ तयासी कल्पतरू न दिसे नयनीं ॥ तेवीं चोखामेळ्यासी चक्रपाणी ॥ न दिसे नयनीं सर्वथा ॥१५॥
कीं अमृतकुंड पाहावया दृष्टीं ॥ आयुष्यहीन व्यर्थचि लाळ घोंटी ॥ तेवीं राउळी असोनि जगजेठी ॥ तुज नव्हेचि भेटी सर्वथा ॥१६॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ तयासी केलें साष्टांग नमन ॥ म्हणे मायाबापा मज येवढें भूषण ॥ व्यर्थ कासया पाहिजे ॥१७॥
उंच लक्ष गांवे वासरमणी ॥ दुरूनि सांभाळी जैसा कमळिणी ॥ तेवीं राउळीं असोनि चक्रपाणी ॥ माझा सांभाळ करीतसे ॥१८॥
कीं दोन लक्ष गांवे निशापती ॥ परी त्याची चकोरावरी अत्यंत प्रीती ॥ तेवीं अनाथनाथ कृपामूर्ती ॥ माझें रक्षण करीतसे ॥१९॥
नातरी कांसवी आपुलिया पिलियांसी ॥ दुरूनि सांभाळ करी जैसी ॥ तेवीं आपुले दासांसी ह्रषीकेशी ॥ कृपादृष्टी पाहातसे ॥२०॥
अखंड असतां सन्निध पाहीं ॥ जरी प्रीती नसली त्याचे ठायीं ॥ तरी निकट वास करूनि कांही ॥ सार्थक नाही सर्वथा ॥२१॥
ऐसें बोलोनि त्या अवसरा । सत्वर गेला निजमंदिरा ॥ ह्रदयीं आठवोनि रुक्मिणीवरा ॥ भजन करी सप्रेम ॥२२॥
तंव रात्रीं येऊनि पंढरीनाथ ॥ चोखामेळ्यासी काय बोलत ॥ आज मी आपुले राउळांत ॥ नेतों त्वरित तुजलागीं ॥२३॥
ऐसें बोलोनि रुक्मिणीपती ॥ तयासी सत्वर धरिलें हातीं ॥ अंतरगाभारां निजप्रीतीं ॥ घेऊनि गेला तेधवां ॥२४॥
आपले जीवींचें निजगुज ॥ चोख्यासी सांगे गरुडध्वज ॥ म्हणे तुजवांचोनि क्षणैक मज ॥ न कंठेचि सर्वथा ॥२५॥
नामयासवें करितां भोजन ॥ कीं आवडी सेवितां अमृतपान ॥ ते वेळीं तुझी आठवण ॥ माझिया मनांत होतसे ॥२६॥
ऐसें बोलतां ह्रषीकेशी ॥ चोखा लागला चरणासी ॥ म्हणे तूं अनाथनाथ म्हणविसी ॥ लळे पाळिसी दासांचे ॥२७॥
ऐसा संवाद ते अवसरीं ॥ पूजारी ऐके निजोनि द्वारीं ॥ मग विस्मित होऊनि अंतरी ॥ उठिला झडकरी तेधवां ॥२८॥
मग आणिकासी साक्ष बोलावूनी ॥ वृत्तांत सांगे तयालागोनी ॥ म्हणे चोख्याऐसा दुसरा कोणी ॥ चक्रपाणीसीं बोलतो ॥२९॥
साक्षात् परब्रम्हा वैकुंठवासी अंत्यज जाऊनि शिवला त्यासी ॥ द्वारासी कुलुपें असोनि तैसीं ॥ गेला तो कैसा कळेना ॥३०॥
वस्त्रें भूषणें देवावर ॥ तयासी शिवला अंत्यज नर ॥ बुडाला ब्राम्हाआचार ॥ कैसा विचार करावा ॥३१॥
जैसा पौर्णिमेचा निशापती ॥ अति सोज्जळ त्याची कांती ॥ मग राहू येऊनि सत्वरगती ॥ आलिंगन प्रीतीं देतसे ॥३२॥
नातरी अमावास्येचा वासरमणी ॥ सत्वर चालतां देखोनि गगनीं ॥ त्यासी अकस्मात केतु येऊनी ॥ कलंक लावी निजतेजा ॥३३॥
तेवीं षड्ड्णैश्वर्य रुक्मिणीपती ॥ श्रुतिशास्त्रें जयासी वर्णिती ॥ त्यासी अंत्यत येऊनि रात्रीं ॥ भेटतो प्रीतीं निजप्रेमें ॥३४॥
ऐसिया उपाय कवण ॥ कैश रीतीं निवारे निघ्न ॥ एक म्हणती बोलावून ॥ तयासी पुसावें सत्वर ॥३५॥
मग कुलूप काढोनि सत्वरगती ॥ चोख्यासी वृत्तांत अवघे पुसती ॥ म्हणती राउळीं आलासी कैशा रीतीं ॥ तें सांग निश्चितीं आम्हांसी ॥३६॥
ऐकोनि बोले चोखामेळा ॥ म्हणे मी तुमचा लेंकवळा ॥ मज हातीं धरूनि घनसांवळा ॥ आणी राउळा बळेंचि ॥३७॥
आतां अन्याय घालोनि पोटीं ॥ मजवरी करा कृपादृष्टी ॥ ऐसें म्हणूनि उठाउठी । निघता जाहला तेधवां ॥३८॥
मग पूजारी तयासी वचन बोलत ॥ तुवां न राहावें पंढरींत ॥ येथे असतां पंढरीनाथ ॥ आणितो राउळांत तुजलागीं ॥३९॥
म्हणोनि चार पाउलें दूरी ॥ राहावें चंद्रभागेचे पैलतीरीं ॥ नाहीं तरी शिक्षा झडकरी ॥ तुज निर्धारी करुं आम्ही ॥४०॥
तुवां थोर केला अन्याय ॥ बाटवूनि टाकिला देवाधिदेव ॥ या दुरितेंकरूनि रौराव ॥ भोगणें लागे तुजलागीं ॥४१॥
ऐसें बोलतां द्विजवर ॥ मग चोखा देतसे प्रत्युत्तर ॥ म्यां वाटविला रुक्मिणीवर ॥ हा मिथ्या विचार बोलतसां ॥४२॥
तरी अंत्यज आणि ब्राम्हाण ॥ दोघीं गंगेत केलें स्नान ॥ हें देखतां गंगेसी दूषण ॥ ठेवूं नये सर्वथा ॥४३॥
कीं चोखाळ वाटे जी क्षिती ॥ तिजवरी चालती सकळ याती ॥ तीस विटाळ जाहला कैशा रीतीं ॥ कवणे शास्त्रीं लिहिलें ॥४४॥
किं दुर्जनासी स्पर्शतां पवन ॥ त्यासी न लागे त्याचा अवगुण ॥ मग वायांचि विकल्प धरूनि मन ॥ वायूसी दूषण ठेवणें ॥४५॥
कां सौंदणीं आणि रांजणांत ॥ आकाश बिंबलें असेचि त्वरित ॥ तरी त्या दोहींत असोनि अलिप्त ॥ गुंतोनि निश्चित न राहे ॥४६॥
तेवीं देवाधिदेव रुक्मिणीपती ॥ त्यासी सारिख्या सकळ याती ॥ तयासी विटाळ कैशा रीतीं ॥ तुमचे चित्तीं भासतो ॥४७॥
अनंत ब्रम्हांडें भरूनि जाणा ॥ अलिप्त असे वैकुंठराणा ॥ तरी वायां विकल्प धरूनि मना ॥ होतसां दूषणा अधिकारी ॥४८॥
ऐसें ऐकतां दृष्टांतवचन ॥ क्रोधयुक्त बोलती ब्राम्हाण ॥ सकळ यातींत नीच मलिन ॥ आम्हां ज्ञान सांगतसे ॥४९॥
शलभ आपुल्या शहाणपणेंकरून ॥ गरुडासी शिकवितो उड्डाण ॥ कीं अजापालक येऊन ॥ बृहस्पतीसी ज्ञान सांगे ॥५०॥
कीं सुवर्णापुढें बेगड सवेग ॥ दाखवी आपुली झगमग ॥ कीं शेषापुढें इतर नाग ॥ मणिभूषण दाखविती ॥५१॥
कीं ऐरावतापुढें इतर वारण ॥ करूनि दाखविती स्थिर गमन ॥ कीं शंकरापुढे इतर गण ॥ तांडव करून दाखविती ॥५२॥
कीं वासरमणी देखोनि सहज ॥ त्यापुढे खद्योत मिरवी तेज ॥ कीं अगस्ति देखोनि सहज ॥ पयोब्धि गर्जना करीतसे ॥५३॥
तेवीं आम्ही ब्राम्हाण उंच वर्ण ॥ सर्व शास्त्रीं असतां निपुण ॥ तूं नीचजाती अंत्यज होऊन ॥ आम्हांसी ज्ञान सांगसी ॥५४॥
आतां भीमरथीचे पैलतीरीं ॥ जाऊनि राहावें त्वां सत्वरी ॥ उदयीक दृष्टीं देखिला जरी ॥ मग शिक्षा बरी पावसील ॥५५॥
शब्द ऐकोनि द्विजांचा ॥ चोखामेळा बोले वाचा ॥ म्हणे मायबाप सेवक मी तुमचा ॥ झाडवान साचा म्हणवितों ॥५६॥
बहुत दिवस सांभाळ केला ॥ आतां भवंडोनि देतां मजला ॥ ऐसें म्हणोनियां डोळां ॥ अश्रुपात लोटाले ॥५७॥
म्हणे कृपावंत विठ्ठलमाये ॥ आजपासूनि अंतरले पाये ॥ माझें प्राक्तन बलवंत आहे ॥ करावें काय तयासी ॥५८॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ घरासी गेला अति सत्वरीं ॥ हरिरूप आठवूनि अंतरी ॥ स्मरण करी निजप्रेमें ॥५९॥
कांतेसी सांगूनि वृत्तांत ॥ म्हणे आम्हांसी उबगला पंढरीनाथ ॥ आतां पैलतीरा जाऊनि त्वरित ॥ तेथेंचि राहूं उभयतां ॥६०॥
मग सन्मुख लक्षूनि देउळा ॥ पैलतीरीं बांधिली दीपमाळा ॥ तेथें राहूनि चोखामेळा ॥ ह्रदयीं घननीळा चिंतीतसे ॥६१॥
अद्यापि यात्रेसी जाती कोणी ॥ ते दीपमाळा देखती नयनीं ॥ ते स्थळीं भक्तशिरोमणी ॥ उदास होऊनि राहिला ॥६२॥
ध्यानांत आणूनि रुक्मिणीपती ॥ भजन करी सप्रेमयुक्ती ॥ म्हणे देवें मोकलोनि मजप्रती ॥ टाकिली प्रीती दिसताहे ॥६३॥
तंव एके दिवशीं भक्त प्रेमळ ॥ भोजन करी चोखामेळ ॥ तों अकस्मात येऊनि घननीळ ॥ बैसले तत्काळ सांगातें ॥६४॥
निंबाचिया वृक्षाखालीं । पडली होती दाट साऊली ॥ त्या छायेसी बैसोनि वनमाळी ॥ चोख्यासंगे जेविती ॥६५॥
तों कांही कार्यासी ते अवसरीं ॥ तेथें अकस्मात आला पूजारी ॥ उभा ठाकोनि निमिषभरी ॥ दुरूनि कौतुक पाहातसे ॥६६॥
तों दहीं उसळोनि अकस्मात ॥ वाढितां खाली पडलें त्वरित ॥ कांतेसी म्हणे अन्याय बहुत ॥ घडला तूतें जाण पां ॥६७॥
सवें जेवितो रूक्मिणीवर ॥ तयाचा भरलासे पीतांबर ॥ ऐसें ऐकूनियां द्विजवर ॥ अंतरीं विस्मित जाहला ॥६८॥
मग कावळ्यासी म्हणे ते वेळीं ॥ निंबोळ्या चाखूनि ताकिसी खालीं ॥ येथें बैसले वनमाळी ॥ त्यांच्या अंगासी लागती ॥६९॥
तरी येथोनि उठोनि त्वरित ॥ आणिके शाखेवरी बैसें निश्चित ॥ ऐसें बोलतां वैष्णवभक्त ॥ पूजारी मनांत संतापला ॥७०॥
म्हणे आम्हांसी देखोनि दृष्टी ॥ मिथ्या बोलतो अचाट गोष्टी ॥ अंत्यजासवें जगजेठी ॥ कासयासाठीं जेविला ॥७१॥
मग चोख्याजवळी विप्र त्वरित ॥ धांवूनि आला अकस्मात ॥ एक चफराक मारूनि मुखांत ॥ गेला त्वरित झडकरी ॥७२॥
स्नान करूनि भीमातीरीं ॥ ब्रम्हाण गेला देउळाभीतरीं ॥ कौतुक देखोनि ते अवसरी ॥ आश्चर्य करी मनांत ॥७३॥
विटेवरी उभा शार्ङ्गधर ॥ त्याचा दह्यानेम भरला पीतांबर ॥ ऐसें देखोनि द्विजवर ॥ श्रीमुख सत्वर विलोकी ॥७४॥
तों देवाचा गाल सुजला जाण ॥ दोन्ही निडारले असती नयन ॥ ब्राम्हाण मनीं विस्मित होऊन ॥ अंतरीं खूण पावला ॥७५॥
म्हणे म्यां गांजिले चोख्यासी ॥ ते देवें साक्ष दाविली मजसी ॥ जेवीं दुर्जनें गांजितां बाळकासी ॥ तें दु:ख मातेसी झोबत ॥७६॥
तेवीं भक्ताचें करितां छळण ॥ दु:खी होतसे जगज्जीवन ॥ मग अभक्तासी शिक्षा करून ॥ वाढवी महिमान दासांचे ॥७७॥
ऐसा विवेक करूनि अंतरीं ॥ पूजारी पातला भीमातीरीं ॥ चोख्यासी म्हणे ते अवसरीं ॥ राउळांतरी चाल आतां ॥७८॥
नेणतां भक्तीचें महिमान ॥ म्यां व्यर्थचि केलें तुझें छळण ॥ जेवीं अमूल्य हिर्‍यासी मारूनि घण ॥ आणिला शीण आपणासी ॥७९॥
तुज मीं शिक्षा केली येथ ॥ तों राऊळीं शिणले पंढरीनाथ ॥ गाल सुजला देखोनि मनांत ॥ भयभीत मी जाहलों ॥८०॥
तरी आतां निजभक्तराया ॥ सत्वर चलावें तया ठाया ॥ काही उपकार करूनियां ॥ पंढरीराया तोषवावें ॥८१॥
मग चोख्यासी धरूनियां हातीं ॥ पूजारी आला राउळाप्रती ॥ दृष्टीं देखतां रूक्मिणीपती ॥ संतोष चित्ती जाहला ॥८२॥
देवासी देतां आलिंगन ॥ चित्तासी वाटलें समाधान ॥ सुजलें होतें हरीचें वदन ॥ गेले ओहटून तत्काळ ॥८३॥
निजभक्ताच्या वियोदु:खे ॥ शिणले होते वैकुंठनायक ॥ भेट होतांचि तात्कालिक ॥ अपार सुख पावले ॥८४॥
तैपासोनि चोखामेळा ॥ सदा राउळीं येऊ लागला ॥ जेवीं गंगेनें अंगिकारिला ॥ तो पवित्र नाला जाहला कीं ॥८५॥
संत साधु वैष्णवजन ॥ आनंदे निर्भर जाहलें मन ॥ म्हणती निजभक्तांचा अभिमान ॥ जगज्जीवनें धरियेला ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP