TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

युद्धकान्ड - प्रसंग बारावा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


प्रसंग बारावा
पुढें चालिली ते असंभाव्य सेना । रजें मातलें व्योम पूढें दिसेना । कितीएक ते भार सन्मूख आले । समर्थास तींहीं नमस्कार केले ॥१॥
दळें राहिलीं दूरि वेष्टीत पाळा । कपीचक्र एकीकडे चंड मेळा । तया मध्यमागीं ऋषी बंधु माता । महावीर ते मुख चत्वारि कांता ॥२॥
उभा राहिला राम तो राजभारें । गृहें निर्मिलीं अंबरांचीं अपारें । सभामंडपीं धर्मशाळा विशाळा । गृहें रम्य अंतर्गृहें चित्रशाळा ॥३॥
बहूसाल दिव्यांबरें थोरथोरें । सुचित्रें विचित्रें अमोल्यें अपारें । कितीएक त्या लविल्या स्तंभवोळी । प्रभा रत्नमंडीत तेजें झळाळी ॥४॥
बहू रत्नमाळा बहू मुक्तमाळा । बहू लागले घोंस नक्षत्रमाळा । कितीएक जाळीवरी अंतराळीं । कितीएक मुक्तें निराळीं निराळीं ॥५॥
सुढाळा किळा मंडपीं ढाळ देती । विशाळा थळामाजिं त्या दिव्य ज्योती । सुवर्णासनें दिव्य नानापरींचीं । कितीएक सिंहासनें कूसरीचीं ॥६॥
बहू ते फुलारे बहूतांपरींचे । वरी घोंस हेलावती माणकांचे । निळे पाच गोमेद इत्यादिकांचे बहू रंग नानापदी कांचनाचे ॥७॥
नभामाजिं त्या दिव्य नक्षत्रमाळा । तयाचे परी शोभती मुक्तमाळा । विराजे तया मंडपा मध्यभागीं । ऋषी राम माता सखे बंधुवर्गीं ॥८॥
असंभाव्य ते संपदा वैभवाची । मुखें सर्व बोलावया शक्ति कैंची । वरी पाहतां उंच आकाशपंथें । असंभाव्य तें भव्य लावण्य तेथें ॥९॥
समूदाय तो बैसला स्वस्थ जाला । वधूमेळ अंतर्गृहामाजिं गेला । ऋषी राम माता सखे बंधुवर्गीं । स्नेहें उत्तरें बोलिजे ते प्रसंगीं ॥१०॥
कितीएक तो काळ गेला वियोगें । असंभाव्य तें सौंख्य संयोगयोगें । सरेना मुखें बोलतां मोह माया । निवालीं मुखें पाहतां सर्व काया ॥११॥
कपीनाथ बीभीषणाला भुफळें । रहाया गृहें दीधलीं तीं विशाळें । तयांमाजिं ते सर्वही स्वस्थ जाले । समर्थें बहू सोहळे दाखवीले ॥१२॥
पुढें मंगलस्नान तेणेंचि काळें । बहूसाल ते चालिले एक वेळे । कितीएक ते हाटकाचे तटाकीं । जळें ठेविलां सेवकें ग्रामलोकीं ॥१३॥
असंभाव्य तीं सिद्ध केलीं फुलेलें । बहूतांपरींचीं सुगंधेल तेलें । किती चौकिया चौक गंगाळपात्रें । विशाळें पवित्रें सुचित्रें विचित्रें ॥१४॥
सुगंधें रसें चोखण्या कालवील्या । यथासांग सामग्रिया सिद्ध केल्या । बहू आंत पोटीं उभा भर्त बंधु । करी प्रार्थना राम कारुण्यसिंधु ॥१५॥
प्रभू बोलता जाहला शीघ्र काळें । किजे मंगळस्नान या लोकपाळें । अयोध्यापुरीमाजिं त्या सर्व लोकां । विरें सर्व संकेत केला अनेकां ॥१६॥
समस्तांसि तात्काळ अभ्यंग जालें । महा लोक ते सर्व सूखें निवाले । कितीएक सामग्रिया सिद्ध केल्या । कपीनाथ भीभीषणा पाठवील्या ॥१७॥
पुन्हां राम बोले वरिष्ठां वरिष्ठां । किजे मंगळस्नान हो सर्व श्रेष्ठां । पुढें जन्ननीलगिं देवाधिदेवें । म्हणे मंगळस्नान तुम्हीं करावें ॥१८॥
समस्तीं यथासांग अभ्यंग केलें । पुन्हां देव तो भ्रातयालगिं बोले । सखे बोलती स्वामि देवाधिदवा । तुम्हीं साग अभ्यंग आधीं करावा ॥१९॥
बहूतांपरी प्रार्थिलें बांधवासी । कितीएक ते सिद्ध जाले विलासी । उभी मंडळी कूशळां नापितांची । तिहीं मांडिली सांग सेवा प्रभूची ॥२०॥
समश्र क्रमें जाहली त्या प्रसंगीं । नखें काढिली नीळरंगी तरंगी । जटाजूट ते मोकळे केश केले । स्नेहे घालितां दिव्य चक्षू निवाले ॥२१॥
पुढें दर्पणीं पाहिलें रूप रामें । प्रसंगीं तये कोटिकंदर्पधामें । कळा बाणली भव्य लावण्य गात्रीं । असंभाव्य सौंदर्य राजीवनेत्रीं ॥२२॥
जळें पादप्रक्षालना सिद्ध जालीं । पदीं लागतां स्वर्गगंगा निवाली । पदांगुष्ट भागीरथी ओघ आला । जनें मज्जनें लोक निर्दोष केला ॥२३॥
पुढें तीर्थ वंदूनि बंधूजनानें । निवाले पवित्रोदकें तीर्थ पानें । बहू लविलें लोचना आवडीनें । मनीं मानिलें सौख्य या बांधवानें ॥२४॥
बहूसाल आयुष्य हो अल्पकोडी । घडावी सदा सर्वदा भक्तिजोडी । सुगंधें फुलेलें चबाबीत माथां । महामस्तकीं मर्दिती लोकनाथा ॥२५॥
बहू मर्दना सांग नानापरीची । लिळें काढिली ते मळी निर्मळाची । जळें निर्मळें घालिती उष्ण धारा । मुखें बोलती तोय आणीक सारा ॥२६॥
शिरीं घालिती तोय नेटें घळाळां । नद्या वाहती उष्ण बोधें खळाळां । सुगंधेंचि दोहीं तिरीं पंक जाला । असंभाव्य तो भृंग तेथें मिळाला ॥२७॥
यथासांग अभ्यंग केलें भुपाळें । पुढें रम्य दिव्यांबरें शीघ्र काळें । महा तेज पुंजाळ तें लागवेगीं । विरें वल्कलें त्यागिलीं ते प्रसंगीं ॥२८॥
प्रसंगीं तये रत्नमंडीत मानें । पुढें पादुका ठेविल्या बांधवानें । वसिष्ठासि रामें नमस्कार केला । महावीर तो बैसला स्वस्थ जाला ॥२९॥
बहू कस्तुरी केशरें तेचि काळीं । ऋषी राम वीलेपवी गंध भाळीं । बहू भूषणें रत्नमंडीत रामें । अमूल्यें सुखें घेतलीं पूर्णकामें ॥३०॥
उटी घेतली घातल्या पुष्पमाळा । बहूतांपरींच्या बहू रत्नमाळा । महामस्तकीं हेम मूगूट साजे । असंभाव्य तो तेजकल्लोळ माजे ॥३१॥
वरी कीरटी कुंडलें वैजयंती । अलंकार नानापरी ढाळ देती । चिरें सुंदरें घातला भव्य धाटा । कटीं किंकिणी नागरा क्षुद्र घंटा ॥३२॥
वरी कंकणें मुद्रिका चापपाणी । ब्रिदें घातलीं अंदु वांकी झणाणी । महीमंडळीं सर्वही एक जाले । रघूनायका भव्य लावण्य आलें ॥३३॥
पहातां नसे तूळणाही तुळायां । विराजे बहू भूषणें दिव्य काया । ऋषी राजबंधू सखे आणि माता । सुखें पाहती राम हा सौख्यदाता ॥३४॥
प्रितीनें मुखें बोलतां राम जाला । म्हणे स्नान कीजे तया बांधवाला । स्नेहें उत्तरें बोलतां शीघ्र तैसें । किजे मंगळस्नान नाना विलासें ॥३५॥
जटाजूट ते मोकळे सर्व केले । मळें त्यागिले भव्य सुस्नात जाले । सुगंधें उटी घेतली पुष्पमाळा । अलंकार दिव्यांबरें रत्नमाळा ॥३६॥
प्रसंगें समस्तांसि अभ्यंग जालें । सभोंतें सखे आप्त सर्वै मिळाले । अळंकार दिव्यांबरें दिव्य माता । सुखें राघवा पाहती त्या समस्तां ॥३७॥
फळें खाद्य नैवेद्य नानापरींचे । फळाहार ते आणिले कूसरीचे । बहूतांपरींचे बहू उंच मेवे । म्हणे राम सर्वांस ते पाठवावे ॥३८॥
समस्तांसि ऊदंड ते पाठवीले । फळें सेवितां लोक संतुष्ट जाले । स्वइच्छा स्वयें सोसिलें अल्प कांहीं । जनीं सेवितां तूळणा त्यांसि नाहीं ॥३९॥
जळें निर्मळें आच्मनें शुद्ध केलीं । समस्तांसि पानें बहू पाठवीलीं । विडे घेतले सर्वही स्वस्थ जाले । असंभाव्य ते पाकही सिद्ध जाले ॥४०॥
पुढें मंडळी सेवकांची मिळाली । विशाळें स्थळें सर्वही सिद्ध केलीं । बहू चित्रशाळा बहू होमशाळा । सडे शिंपिले घातल्या रंगमाळा ॥४१॥
बहू रत्नमंडीत मोठीं अचाटें । दुकांठीं बहू मांडिलीं दिव्य ताटें । कितीएक तीं बत्तिसा वाटियांचीं । कितीएक विस्तीर्ण नानापरींचीं ॥४२॥
असंभाव्य तीं रम्य चित्रें विचित्रें । बहूतांपरींचीं बहू तोयपात्रें । बहू आसनें दिव्य नानापरींचीं । असंभाव्य ती घातलीं कूसरीचीं ॥४३॥
बहूवर्ण दिव्यांबरें पटटकूळें । बहूरंग नानापरींचीं दुकूळें । असंभाव्य तीं सोंवळीं सिद्ध केलीं । कितीएक दिव्यांबरें आणवीलीं ॥४४॥
पुढें भोजना सर्वही सिद्ध जाले । कितीएक ते लक्षकोटी मिळाले । मिळाली ऋषीमंडळी ब्राह्मणांची । बहू दिव्य मार्तंड जैसे विरंची ॥४५॥
वयें धाकुटे थोर कोटयानुकोटी । स्थळें रुंधिलीं जाहली थोर दाटी । बहूसाल संतोषले थोर तोषें । असंभाव्य ते गर्जती नामघोषें ॥४६॥
बहूसाल गंधाक्षता पुष्पमाळा । बरीं धौतपात्रें दिल्या रत्नमाळा । चिरें सुंदरें रम्य यज्ञोपवीतें । धनें चंदनें दीधलीं ब्राह्मणांतें ॥४७॥
पुढें वाढिते जाहले शीघ्र काळीं । बहू दाटल्या त्या असंभाव्य ओळी । महा मंडपीं बैसला रामराजा । ऋषी मुख्य बंधू सखे आप्त वोजा ॥४८॥
पुढें रत्नझार्‍या बहूसाल चंबू । सुवासी तयांमाजिं संपूर्ण अबू । स्थळें सर्वही सिद्ध पूर्वींच केली । असंभाव्य अन्नें बहू आणवीलीं ॥४९॥
कपीनाथ सुग्रीव बीभीषणाला । बहू धाडिलीं दिव्य अन्नें तयांला । रसें पूर्ण त्या कावडी लक्ष कोटी । पथामाजिं नेतां असंभाव्य दाटी ॥५०॥
पुढें वाढिते जाहले पात्रधारी । असंभाव्य ते चालिले एकहारी । रुची रायतीं लोणचीम रम्य वोळीं । बहू स्वाद शाखावळी शीघ्र काळीं ॥५१॥
बहू वाढिला ओदनू तो सुवासें । वरानें क्षिरी शर्करा पंच भक्षें । कितीएक आणीक नानापरींची । बहू वाढिलीं भिन्नभिन्नां रुचींची ॥५२॥
सुगंधे तुपें वाढिती ते खळाळा । पयें घालिती थोर नेटें घळाळां । पुढें दिव्य नाना रसें पूर्ण पात्रें । सभा शोभली भव्य राजीवनेत्रें ॥५३॥
बहूसाल संतोष नाना सुवासें । ऋषीमंडळी गर्जती नामघोषें । पुढें सवे ओगारिती सावकाशें । सुखें जेविती सर्व नानाविलासें ॥५४॥
गिरीसारिखा ओदनू शुभ्र वर्णें । बहू भक्षिलीं भक्ष संपूर्ण पूर्णें । कथा मागुती सांगतो एकमेकां । अस्मभाव्य ते तृप्त जाली अनेकां ॥५५॥
कढी वर्पिती आवडीनें फरारां । ऋषी जेविती ढेंकरीती डरारां । पुरे हो पुरे अन्न ऊदंड झालें । बहू भोजनें कंठमर्याद आले ॥५६॥
पुढें शीघ्र दध्योदनें लागवेगीं । पुन्हां वाढिते जाहले ते प्रसंगीं । ऋषी राम बंधू सखे सर्व माता । मुखें बोलती सर्वही तृप्ति आतां ॥५७॥
सुवासें रुचीचीं असंभाव्य तक्रे । कदाही कधीं नेणिजे स्वाद शक्रें । सुखें सेविती जेविती लोक इच्छा । यथासांग संपूर्न जाले स्वइच्छा ॥५८॥
यथासांग तीं भोजनें सर्व जालीं । खळाळें बरीं आच्मनें शुद्ध केलीं । सुपारी विडे दीधले कर्पुराचे । बहू चूर्ण तें शुद्ध मुक्ताफळाचें ॥५९॥
सुवासी चतुर्भाग मागून घेती । सुखी जाहल्या सर्वही वेदमूर्ती । बहूसाल मंत्राक्षता मंत्रघोषें । मुखें बोलती सर्वही विप्र तोषें ॥६०॥
कपी रीस ते सर्वही तृप्त जाले । बहू भक्षिलें अन्न सूखें निवाले । गिरीसारिखीं राहिलीं सर्व अन्नें । विडे घ्यावया धाडिलीं त्यांसि पानें ॥६१॥
यथासांग सर्वस्व संतृप्ति जाली । सभामंडपीं मंडळी ते मिळाली । पुढें ब्राह्मणीं मांडिली धर्मचर्चा । मुखें बोलती धन्य दीनू सुवाचा ॥६२॥
पुढें दीन तो चालिला अस्तमाना । नभायासि आली असंभाव्य सेना । कितीएक तीं दीवटयांचीं अचाटें । सभामंडपीं चाललीं दाट थाटें ॥६३॥
प्रसंगी तये वादकल्लोळ याळा । दुरस्ता बहू लोक सूखें मिळाला । विराजे सभेमाजिं तो रामराजा । पुढें चालिल्या त्या बळावंत फौजा ॥६४॥
झणाणीत वीणे मनोरम्य नादें । दणाणीत मुंर्दुग गंभीर शब्दें । अलापें कळा दाविती रागमाळा । सुरें सुस्वरें माजली रंगवेळा ॥६५॥
बहू ताळ कल्लोळ वाजे खणाणा । विणे वाजती तंतुनादें झणाणा । बहू गीत संगीत तें कूसरीचीं । भले जाणती ते घडी अमृताची ॥६६॥
असंभाव्य तो नृत्यकल्लोळ जाला । सुखें पाहतां शुद्धि नाहीं जनांला । गुणीं रातले मातले गायनानें । तदाकार ते वस्ति केली मनानें ॥६७॥
अळंकार चीरें पुढें ढीग केले । बळावंत ते सर्व संतुष्ट जाले । विसर्जी सभा तो पुढें रामराजा । निरोपेंचि गेल्या बहु लोकफौजा ॥६८॥
समस्तीं घडी एक विश्रांति केली । अकस्मात प्राभात ते प्राप्त जाली । पुढें सारिते जाहले नित्य नेमें । महावीर ते आपुलाल्या स्वधर्में ॥६९॥
सभे बैसिजे स्वामि देवाधिदेवें । म्हणे आजि वेगीं अयोध्येसि जावें । पुरी सर्व शृंगारमंडीत केली । असंभाव्य ते सर्व सेना निघाली ॥७०॥
महीमंडळीं मुख्य आधीं पुराणीं । सुखें बोलिजे ते रवी वंशखाणी । अयोष्यापुरी धन्य ही पुण्यराशी । किती राहिले तापसी तीर्थवासी ॥७१॥
मनीं संत योगी सदा वीतरागी । उदासीन साधू पराचे विभागी । ऋषीमंडळी सात्विकाम सज्जनांची । महा योगि व्युत्पन्न विद्वज्जनांची ॥७२॥
कितीएक ते मंडळी प्रेमळांची । कितीएक ते ब्राह्मणां सूशिळांची । मनस्वी किती ते यती ब्रह्मचारी । बहुतांपरींचे बहु वेषधारी ॥७३॥
सदा सर्वदा योग ध्यानस्थ जाले । कितीएक ते काळ घेऊनि गेले । भुयारें मठया त्या बहुतांपरींच्या । नदीचे तिरीं पर्णशाळा मठाच्चा ॥७४॥
प्रभू देव हा सर्व ब्रह्मादिकांचा । जया वर्णितां शीणल्या वेदवाचा । स्वयें वास जेथें जगन्नायकाचा । महीमा वदे कोण त्या हो स्थळाचा ॥७५॥
कितीएक ते राहिले भक्त ज्ञानी । कृपाळू बहू मुख्य नामाभिधानी । बहू सुकृती सूर्य जैसे तपाचे । सदा धर्मचर्चा अखंडीत वाचे ॥७६॥
नदी चालिली भव्य ते पूर्णतोया । जनांलगिं आधार आली उपाया । शिवाल्यें बहू बांधिलीं थोरथोरें । ध्वजा दउळें शीखरें तीं अपारें ॥७७॥
तडागें जळें निर्मळें कूप बावी । सदा सर्वदा राहिजे मानुभावीं । स्थळें निर्मळें निर्मिलीं पावनानें । कितीएक कल्पतरूंचीं उद्यानें ॥७८॥
कितीएक त्या लागल्या वृक्षजाती । वनें वाटिका जीवनें पुष्पजाती । अयोध्यापुरी रम्य लावण्य नांवें । महारम्य विस्तीर्ण ते वीस गांवें ॥७९॥
गृहें बांधिलीं तीं असंभाव्य उंची । कितीएक तीं पंच सप्तां खणांचीं । सजे चौक दामोदरें थोरथोरें । विशाळें विचित्रें गवाक्षें अपारें ॥८०॥
बिदी हाट बाजार चौबार कुंचे । असंभाव्य ते भव्य नानापरीचे । कितीएक तीं सारखीं दीसताती । महा धूर्त तेही बळें भ्रांत होती ॥८१॥
गृहें गोपुरांचीं बहू दाट खेटा । हुदे माडिया ऊपरा त्या अचाटा । महद्भाग्य श्रीमंत ते लोक तेथें । सदा सर्वदा दाटणी थोर पंथें ॥८२॥
पुरीमाजिंचे लोक आरोग्य भारी । मुलें लेंकरें थोरले आणि नारी । करंटें तयांमाजिं कोणीच नाहीं । नसे द्वेष ना मत्सरू सर्व कांहीं ॥८३॥
सदानंद उद्वेग नाहीं जनांला । नव्हे वृद्ध ना मृत्यु नाहीं तयांला । कुरूपी महामूर्ख तेथें असेना । सुखाचें जिणें दैन्यवाणें दिसेना ॥८४॥
पुरीमाजिं ते सर्वही लोक कैसे । सुवर्णाचळीं नांदती देव जैसे । प्रतापी बळाचे सदा सत्य वाचे । पुरीमाजिं लावण्यदेहे जनांचे ॥८५॥
बहू नीतिन्यायें विवेकें उपायें । कदाही तया बाधिजे ना अपायें । बहूतां धनांचे उदारा मनांचे । विशेषा गुणांचे गुणी सज्जनांचे ॥८६॥
पुरीमाजिं त्या सर्व चातुर्य मोठें । कदाही मनीं नावडे त्यांसि खोटें । विलासे वसे राम आणीक विद्या । कळा सर्व साधारणा सर्व साध्या ॥८७॥
अळंकार दिव्यांबरें सर्व लोकां । सदा प्रीतिनें बोलती एकमेकां । महा वैभवाचे बहू सुकृताचे । पुरीमाजिं ते लोक नानागुणांचे ॥८८॥
पुरीमाजिं ते दाटणी मंदिरांची । रिकामी भुमी ते रहायासी कैंची । तया मध्यमागीं असंभाव्य तेथें । महा भूवनें उंच आकाशपंथें ॥८९॥
गृहें गोपुरें निर्मिलीं कांचनाचीं । बहूसाल विश्रांतिदातीं मनाचीं । महारत्नमंडीत तीं थोरथोरं । किती धाकटीं भव्य मोठीं अपारें ॥९०॥
भुमा बांधल्या पांचबंदी विशाळा । मनोरम्य त्या रेखिल्या चित्रशाळा । कितीएक दारे लघू थोरथोरें । स्थळें दिव्य ती पाहतां सौख्यकारें ॥९१॥
किती अन्नशाळा किती वस्रशाळा । कितीएक विस्तीर्ण त्या होमशाळा । किती नाटयशाळा बहू रत्नशाळा । कितीएक त्या धर्मशाळा विशाळा ॥९२॥
गृहें रम्य अंतर्गृहे हाटकाचीं । बहू हासल्या पूतळ्या नाटकांची ।भुयारें घरें वीवरें गुप्त द्वारें । स्थळें भव्य बैसावया थोरथोरें ॥९३॥
सभामंडपीं ते असंभाव्य शोभा । बहू शोभतो हेमकल्लोळ गाभा । फुलारे बहू लविले माणिकांचे । कितीएक ते घास मुक्ताफळांचे ॥९४॥
महीमंडळी तेज पुंजाळ जालें । असंभाव्य तें सर्व लावण्य आलें । विशाळा स्थळां निर्मिल्या भव्य भिंती । निळे पाच गोमेद ते ढाळ देती ॥९५॥
बहू रत्न पुंजाळलें ज्वाळ जैसे । असंभाव्य हारी उभे स्तंभ जैसे । विशाळें स्थळें निर्मिलीं जाड कैशीं । सुवर्णाचळामाजिं विस्तीर्ण जैशीं ॥९६॥
विचित्रा कळा कूसरी लेखनाच्या । बहूरत्नमंडीत त्या कांचनाच्या । सभामंडपीं फांकल्या रत्नकीळा । दिसे रंग तेथें निराळा निराळा ॥९७॥
कितीएक तीं फांकलीं दिव्य कीर्णें । बहूतांपरींचीं बहू रंग वर्णें। कितीएक हेलावती हेमपर्णें । कितीएक हेलावती हेमपर्णें । कितीएक घंटावळी त्या सुवर्णें ॥९८॥
स्थळें शोभती रम्य बैसावयाची । बहूसाल तीं भिन्नभिन्नां परींचीं । कितीएक तीं रत्नमंडीत यानें । कितीएक सिंहासनें तीं विमानें ॥९९॥
बहू बैसका दिव्य रभ्यांबरांच्या । विचित्रा बहूरंग नानापरींच्या । वरी लोंबती घोंस मुक्ताफळांचे । कितीएक मुक्तावळी जाळियाचे ॥१००॥
कितीएक रत्नावली रम्य कैशा । कितीएक मुक्तावळी शुक्र जैशा । प्रभेंचे बहू घोंस हेलावताती । बहूतांपरींच्या बहू रत्नजाती ॥१०१॥
स्थळें निर्मिली रम्य विस्तीर्ण नाना । कितीएक बैसावया सर्व सेना । कितीएक विस्तीर्ण राजांगणें ते । भुमी पाचबंदी महा रम्य तेथें ॥१०२॥
हुडे कोठ माडया सजे मोठमोठे । उभे राहिले भव्य ब्रह्मांड वाटे । असंभाव्य चर्या लघू पंथ हारी । नभा भासवी रूप नाना विकारी ॥१०३॥
झरोके कितीएक त्या गुप्त वाटा । किती ऊपर्‍या अंतराळीं अचाटा । कितीएक त्या भक्ति संखारसाच्या । कितीएक त्या उंच तेरा खणांच्या ॥१०४॥
वरी रत्नकळ् साचिया रम्य ओळी । रवीकीर्ण तैसा कळा अंतराळीं । वरी लागल्या सर्व नक्षत्रमाळा । मनीं भासती फांकती दिव्य कीळा ॥१०५॥
रवीवंशिंचे सर्वविख्यात राजे । तयांच्या प्रतापें विधीगोळ गाजे । करी कोण संख्या तया वैभवाची । उणी वर्णितां बुद्धि ब्रह्मादिकांची ॥१०६॥
किती कोण लेखा मला मानवाला । मतीमंद मी काय वंर्णू तयाला । म्हणे दास त्या अल्पशा भक्तिभावें । प्रभू बोबडया उत्तरीं तोषवावें ॥१०७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-12T06:18:33.2670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

helpful

  • उपयोगी,सहायक 
  • साहाय्यशील 
  • उपयोगी पडणारा 
RANDOM WORD

Did you know?

अंत्येष्टी म्हणजे काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site