युद्धकान्ड - प्रसंग नववा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


म्हणे वीर सौमित्र स्वामी समर्था । बळें तोडिजे थोर चत्वारि चिंता । सुरेशासि ह्या मुक्त आधीं करावें । अरिभ्रातया राज्य हें शीघ्र द्यावें ॥१॥
कपीराज हा राज्य त्यागोनि आला । कपींशीं पुन्हां पाहिजे शीघ्र गेला । प्रभो नीजबंधूस त्या भेट द्यावी । अयोध्यापुरी सर्व सूखी करावी ॥२॥
पुढें शीघ्र त्या रावणाच्या वधांतीं । समाधान तें पाविजेतें समस्तीं । म्हणोनी त्वरें हेंचि आतां करावें । बळें सर्व लोकत्रया सूख द्यावें ॥३॥
वदे रावणानूज वाक्य प्रमाणें । प्रभो कल्पवृक्षातळीं काय ऊणें । परी होम आरंभिला रावणानें । पुरा जालिया भीडिजे त्यासि कोणें ॥४॥
कपीवीर ते पाठवावे भुपाळें । महा होम विध्वंसिजे शीघ्र काळें । अरी रावणू तो रणामाजिं येतां । पुढें पाठवावें तया मोक्षपंथा ॥५॥
प्रभूहेर ते गुप्त लंकेसि गेले । समाचार साकल्य घेऊनि आले । कपींद्राकडे पाहिलें राघवानें । विरां जाणवीलें तया सुग्रिवानें ॥६॥
पुढें ग्रंथसंख्या कपी सिद्ध जाले । सहस्रें दहा वीर मागें मिळाले । हनूमंत तारासुतू जांबुवंतू । गवाक्षू सुषेणू बळी वीर्यवंतू ॥७॥
सुगंधू कपी नीळ तो शर्म नामें । महा मैंद तो द्वीविदू वीरधर्में । सहस्रें दहांशीं बळें सिद्ध झाले । महावीर ते व्योमपंथें निघाले ॥८॥
कितीएक राक्षसे ते रक्षणेशीं । कपींनीं बळें युद्ध केलें तयांशीं । मुखें हांकिती हांकिती थोर नेटें । तयां पूसती रे दशग्रीव कोठें ॥९॥
गुहेचे सुखीं लविली चंड शीळा । तये भोंवतें जाहले वीर गोळा । शिळेनें शिळा फोडिली थोर घातें । कपी चालिले ते गुहेचेनि पंथें ॥१०॥
पुढें मारुती चालिला लागवेगें । कपी चालिले सर्वही मागमागें । महा योगियाचे परी बैसला तो । नभीं पावकू तो भडाडीत जातो ॥११॥
तया हाणिते जाहले द्रूमपाणी । मुखीं हांकिती टाकिती घोर वाणी । शिळा शीखरें हाणिती तो उठेना । कपी लोटती ध्यान त्याचें सुटेना ॥१
कितीएक ते गर्जती कर्णबीळीं । मुखामाजिं ते टाकिती एक धूळी । विरीं वानरीं मांडिलीसे धुमाळी । बहूतांपरी ताडिला होमकाळीं ॥१३॥
बहूतांपरी मांडिले प्रेत्न नाना । परी रावणू कांहिं केल्या उठेना । विरे अंगदें थोर वोचार केला । बळें शीघ्र अंत: पुरामाजिं गेला ॥१४॥
बहूसाल अंत:पुरीं त्या सुनारी । तयांमाजिं मंदोदरी मुख्य नारी । तियेलगिं घेऊनि वेगें उडाला । महावीर तेथें अकस्मात आला ॥१५॥
अलंकार चीरें करें चूर्ण जालीं । बहू कंकणें भूषणें भग्र केलीं । कपी कंचुकी केश ओढूनि घेती । विटंबूनि लोटूनियां शीघ्र देती ॥१६॥
अरे रावणा घे तुझी नीज कांता । जगज्जननी आणिली व्यर्थ सीता । तिचें ऊसणें काढिती द्रूमपाणी । वदे मुख्य मंदोदरी दैन्यवाणी ॥१७॥
अहो प्राणनाथा असें काय केलें । तुम्हादेखतां कीं मला कष्टवीलें । महा रम्य नेत्रीं महाओघ जाती । विलापें करूं लागली ते रुदंती ॥१८॥
करूणास्वरें रावणालगिं बाहे । प्रभू धांव रे वानरू नेत आहे । प्रसंगीं तये थोर आकांत जाला । भुमीकंप होतांचि पाहों निघाला ॥१९॥
पुढें अंगदा लात हाणोनि पाडी । तया जांबुवंतासि वेगें लथाडी । कितीएक ते ताडिले मुष्टिघातें । किती ओढिले पाडिले व्योमपंथें ॥२०॥
नभीं ऊर्ध्व पाहोनि वेगीं उडाला । बळें झोडिलें पाडिलें मारुतीला । धरी हदयीं शीघ्र मंदोदरीला । विवेकेंचि संबोखिलें त्या वधूला ॥२१॥
अहल्या सती ते शिळारूप होती । विचारूनि पाहें नळाची दमंती । बहू कष्टली मुख्य वृंदा पुलोमा । सिता सुदंरी सांगणें काय तुम्हां ॥२२॥
बहुतापरी ते सती तोषवीली । पती धाडितां भूवनांमाजिं गेली । दळें सिद्ध केलीं रथारूढ जाला । रणीं शूर संग्राम सैरा निघाला ॥२३॥
प्रतापें बळें वाहिनी घोर चाले । कपीवीर ते सर्व पूर्वींच गेले । पुढें सोडिता जाहला बाणजाळें । बळें धांवती प्रेरिले दूत काळें ॥२४॥
कपीभार ऊठावले लागवेगें । करीं घेतलीं वृक्ष पाषाण शृंगें । बळें टाकिते जाहले द्रूमपाणी । रणीं रावणें भेदिले सर्व बाणीं ॥२५॥
गळाले महावीर धाकें पळाले । चळीं कांपती राघवा आड गेले । उभा राहिला राम तो वीरा गाढा । करीं घेतला चंड वाढूनि मेढा ॥२६॥
बहू बाण सोडी महावीर कैसा । रणीं क्षोभला काळ कृतांत जैसा । महा वीर ते दोघ सन्मूख आले । बळें सोडिती बाण बाणीं मिळाले ॥२७॥
रणामाजिं ते तोडिती बाण बाणीं । बहू मातली ते विरश्री फुराणीं । पुन्हां रावणें सोडिल्या बाणकोडी । लिलविग्रही राम तात्काळ तोडी ॥२८॥
बहू क्षोभले व्योम संपूर्ण केलें । शरीं दाटलेंसें नभीं थाट जालें । बळें तोडिती एकमेकां विरांचे । पुन्हां मागुती भार येती शरांचे ॥२९॥
रणीं झुंजती ते महा वीरबाहो । मोहो पावले ते भयें केतु राहो । बुधा मंगळा थोर आकांत आला । शनी सोम तो आपधाकें पळाला ॥३०॥
ग्रहानें ग्रहो भूतळालगिं आले । विमानाहुनी देव धाकें पळाले । दिशा दिग्गजां व्यापिल अंतकाळें । चळी द्वीचळी कांपती ते चळाळें ॥३१॥
महावीर ते मातले घोर मारें । दिशा दाटल्या व्यापिलें अंधकारें पुढें पाहतां एकमेकां दिसेना । ध्वनी मातली ऊठले घोष नाना ॥३२॥
महावीर दोघे रणीं स्तब्ध जाले । पुढें पाहतां बाण बाणीं गळाले । पुन्हां मागुती हाणिती एकमेकां । भरें नीकुरें टाकुनी थोर शंका ॥३३॥
पुढें रावणू पन्नगास्रास सोडी । तयें चालिल्या त्या नभीं सर्पकोडी । उभ्या वानरांमाजिं आकांत जाले । मुखें बोलती सर्प रे सर्प आले ॥३४॥
गरूडास्त्र तें राम सोडी भडाडां । नभीं चालिलीं पक्षिकूळें झडाडां । तिहीं तोडिलीं सर्पकूळें तडाडां । कपी गर्जती नामघोषें घडाडां ॥३५॥
पुढें रावणें सोडिलीं तीं अचाटें । नभीं चाललीं थोर गंधर्वथाटें । भुमीं पाय आकाशपंथीं शिसाळें । बहू भार ते धांवले एकवेळे ॥३६॥
निवारावया राम तो तेंचि सोडी । नभामाजिं तें अस्त्र अस्त्रासि तोडी । रणीं रावणू थोर क्रोधाग्रिज्वाळा । रुपें जाहला थोर कर्कोट काळा ॥३७॥
शरा अस्त्र तें सोडिलें लंकनाथें । बहूसाल वर्षाव केला अनर्थें । महासिंह नानापरी सर्प जैसे । महामत्त व्याघ्रापरी बाण तैसे ॥३८॥
अशन्यस्त्र सोडूनि राजीवनेत्रें । असंभाव्य तीं चालिलीं वज्रअस्त्रें । तिहीं सर्वही बाण छेदन नेले । कपीवीर ते थोर आनंदवीले ॥३९॥
तया रावणा कोप पोटी भडाडी । कडाडीत कोपें रणीं बाण सोडी । अकस्मात तो त्यावरी स्पर्श जाला । गडाडीत मेघापरी शब्द केला ॥४०॥
रथारूढ जाला रणीं लंकनाथू । पदीं चालतो रामराजा समर्थू । नभीं देव ते देखवेना तयांला । रथू मातली शीघ्र तो पाठवीला ॥४१॥
बहू अस्त्रमंडीत रत्नीं विराजे । परी अंतकातुल्य तो राम साजे । नभीं दुंदुभीघोष आकाश गाजे । तया रावणा अंतरीं क्रोध माजे ॥४२॥
पुढें बोलतां जाहला घोर वाणी । तुला साह्य जाला रणीं वज्रपाणी । उभा रे रिपू खीळितों आजि बाणीं । तुशीं झुंजतां थोर वाटे शिराणी ॥४३॥
तुझा बंधु म्यां पाडिला एकवेळा । रणामाजिं त्या देखिलें त्वांचि डोळां । तयासारिखें तूज मारीन आतां । पतंगापरी जाळितों जात जातां ॥४४॥
पुढें ऐकतां राम बोले तयासी । म्हणे ऐक रे रावणा गर्वराशी । असंभाव्य रे वैभवें मातलासी । मराया रणीं आजि तूं पातलासी ॥४५॥
म्हणे राम रे रावणा वीरधर्में । रणामाजिं मी तूज मारीन नेमें । पळालसि कोठें तरी हें सुटेना । तुझी मृत्युवेळा कदा पालटेना ॥४६॥
रिपू जाण रे तूजला मृत्यु आला । दिल्हे अक्षयीं राज्य बीभीषणाला । सितेकारणें थोर कापटय केलें । अभाग्या तुझें सर्वही राज्य गेलें ॥४७॥
तयें बोलतां कोपला वीर गाढा । रणामाजिं त्या घडिल्या वज्रदाढा । पुढें शूळपाणी करी सज्ज मेढा । बळें ओढितां चूकला रामवोढा ॥४८॥
कडाडीत घोषें रणीं तेचि काळीं । रघूनायका बैसला बाणभाळीं । असंभाव्य तो कोपला चापपाणी । दशग्रीव तो छेदिला शीघ्र बाणीं ॥४९॥
बळें मारिती वारिती बानजाळें । पुन्हां क्षोभळे धांवती ते उफाळे । रिपू कोपला थोर काळाग्रि जाला । तया रावणा थोर आवेश आला ॥५०॥
प्रतापें रणीं राघवें एकवेळे । बळें फोडिलीं बाणघातें कपाळें । रथी सारथी पाडिलें अश्व जे कां । विरें नीकुरें भेदिलें एकमेकां ॥५१॥
बळें छेदिता जाहला ओष्ट्र दंतीं । बहू बान ते सोडिले व्योमपंथीं । कितीएक ते राघवें चूर्ण केले । कितीएक ते बाण अंगीं बुडाले ॥५२॥
तया देखतां रावणू हांक फोडी । असंभाव्य ते मागुते बाण सोडी । बळें अश्व ते मातली भग्र केला । ध्वजस्तंभ तो शीघ्र छेदून नेला ॥५३॥
भयातूर ते भार गोळांगुळांचे । ऋषी देव गंधर्व इत्यादिकांचे । रणीं आगळें दाखवी लंकनाथू । भयें बोलती मांडिला कीं अनर्थू ॥५४॥
पडे मातली अश्र्व तेही पळाले । ऋषी देव गंधर्व साशंक जाले । कपी बोलती मांडलें विघ्न हें कीं । रणामाजिं त्या रावणें जिंकिलें की ॥५५॥
अगस्ती ऋषी तो रणामाजिं आला । रणीं मंत्र सांगे तया राघवाला । जपे आदरें राम तो मूळमंत्रें । रवी शीघ्र येऊनि दे सारशस्त्रें ॥५६॥
म्हणे राघवा जिंकिशी रावणाला । अती काळ हा वेळ नाहीं तयाला । पुढें राघवें विंघिलें पंच बाणीं । तुरंगू रणीं पाडिले दैन्यवाणी ॥५७॥
रणीं राघवें चूर्ण केलें रथाचें । बळें ऊसनें घेतलें मातलीचें । विरें सारथी धाडिला मृत्युपंथें । ध्वजस्तंभ तो पाडिला बाणघातें ॥५८॥
पुन्हां राघवें मागुती तेचि काळीं । रिपू भेदिला बाणजाळीं कपाळीं । सुरां देखतां थोर आनंद जाला । महाद्‍भूत तो वानरीं घोष केला ॥५९॥
असंभाव्य त्या राक्षसा कोप आला । बळें टाकिलें शीघ्र तेणें शुळाला । रणीं फोडिली हांक नैरृत्यनाथें । म्हणे शूळ आला प्रभो व्योमपंथें ॥६०॥
बहू बाणसंहार जातां जळाला । पुढें शूळ पाशूपतें भग्र केला । पुन्हां राघवें थोर संधान केलें । असंभाव्य ते पोकळीमाजिं नेले ॥६१॥
सुरेशें गिरी फोडिला वज्रघातें । तयाचे परी भेदिलें रावणातें । देहे खीळिला बाण पैलाड गेला । महीमंडळामाजिं जातां निवाला ॥६२॥
पुन्हां सोडिलीं राघवें बाणजाळें । बहूसाल सूसाटती अंतराळें । रथीं खीळिला प्राण व्याकूळ जाला । बहू मूर्छना सांवरेना तयाला ॥६३॥
रिपू भेदिला थोर लक्षून वर्में । उभा राहिला राम तो वीरधर्में । रथू सारथी शीघ्र घेऊनि गेला । पुढें शुद्धि जाली तया रावणाला ॥६४॥
बहू कोप आला तया रावणासी । म्हणे सारथ्या तूं भयातूर होसी । रथू काढिला कां तुवां लागवेगीं । न येतां उणें दीसतें या प्रसंगीं ॥६५॥
म्हणे सारथी स्वामिया हो उदारा । रिपू पेटला तो रणीं घोर मारा । रथारूढ राया तुम्ही वीकळांगें । म्हणोनी रथू काढिला लागवेगें ॥६६॥
तये बोलतां राव संतुष्ट जाला । समर्पीतसे हातिंच्या कंकणाला । बहू वेग केला तया लंकनाथें । रथू फीरविला रणाचेनि पंथें ॥६७॥
रणीं माजल्या त्या बहू प्रेतराशी । पुढें जावया वाट नाहीं रथासी । भुमी दाटली मेदमांसें अचाटें । रथांगें बळें वाजती चर्चराटें ॥६८॥
समारंगणीं रावणू शीघ्र आला । वदे घोरवाणीं तया राघवाला । उलंघी सिमा शीघ्र मृत्यू जयाळा । रणीं कोण लेखा तुला मानवाला ॥६९॥
असंभाव्य तो रावणू बाण सोडी । नभीं वावडीचे परी ते झडाडी । उफाळें बलें धांवती दिव्य घोडे । रथामाजिं संघट्टणीं घोष गाढें ॥७०॥
धुरा ऊलथों पाहती शीघ्र मागें । विरीं ओडिले बाण ते लागवेगें । रथामाजिं तो पैसा ऊदंड जाला । विरां मागुतां थोर आवेश आला ॥७१॥
रणीं राघवा रावणा युद्धकाळू । रिपूभारसंहार भूतां सुकाळू । करीं चंड कोदंड मंडीत बाणीं । उभे राहिले वीर ते वज्रठाणी ॥७२॥
रणीं एकमेकांसि ते घोर शब्दें । बहू भाषणें त्रासती वीर द्वंद्वें । बळें धांवती क्षोभले वीर क्रोधें । पुढें मारिती शस्त्र क्रोधें विरोधें ॥७३॥
रणीं लोटला राम हा सूर्यवंशीं । महायुद्ध आरंभिलें रावणाशीं । उभे राहिले काळकृत्तांत जैसे । महावीर त्या घोर आकांत भासे ॥७४॥
बळें सोडितां शक्ति नेटें सरारी । महावात प्रख्यात पिच्छीं भरासी । मही सप्तपाताळ घोषें गरारी । पळालीं भुतें काळ पोटीं थरारी ॥७५॥
फणी कूर्म वाराहू चक्कीत जाले । विमानांहुनी देव ऋषी पळाले । ग्रहो सोम सूर्यादि पोटीं गळाले । कपी खेचरां दिग्गजां कंप जाले ॥७६॥
प्रसंगें तयें थोर उत्पात जाला । नभीं शोणिताचा बळें पूर आला । धुमारा बहू दाटलासे दिगंतीं । असंभाव्य ते ऊलकापात होती ॥७७॥
बळें कोपले रुद्र कालग्रि जैसे । अरीराय ते मातले भीम तैसे । तया झुंजतां कोण कोणा निवारी । रणीं भीडती काळ कोदंडधारी ॥७८॥
रिपू सांडिती वोर शस्त्रें झणाणा । बळें वाजती बाणभाळी खणाणा । बहूसाल स्फुलिंग जाती फणाणा । महीमंडळीं घोष ऊठे दणाणा ॥७९॥
महाशक्ति ते काळरूपें कडाडीं । असंभाव्य ते ज्वाळवन्ही भडाडी । मही मेरु मंदार घोषें गडाडी । बळें शोषला सिंधु पोटीं तडाडी ॥८०॥
पुढें राघवें लक्षिलें रावणातें । बळें मस्तकें तोडिलीं बाणघातें । गिरीशीखरांचे परी तीं विशाळें । पुन्हां नीघती कंठनाळें ढिसाळें ॥८१॥
शिरें देखतां राम चक्कीत जाला । म्हणे मृत्यु नाहीं गमे रावणाला । वदे मातली स्वामि देवाधिदेवा । सुधा वक्ष भेदून शत्रू वधावा ॥८२॥
कुपी फोडिली बाणघातें निघातें । तयें रावणू चालिला मृत्युपंथें । ऋषी देव गंधर्व ते सर्व तोषें । विमानीं सुखें गर्जती नामघोघें ॥८३॥
नभीं दुंदुभीं वाजती एकनादें । बहुतांपरींचीं बहूसाल वाद्यें । ध्वनी दाटले पूर्ण ब्रह्मांड घोषें । कपी गर्जती नामघोषें विशेषें ॥८४॥
सुखानंद आनंदली सर्व सृष्टी । विमानाहुनी जाहली पुष्पवृष्टी । ऋषी देव गंधर्व सर्वै मिळाले । विणे लाउनी नारदादीक आले ॥८५॥
मिळाल्या सुखें नायिका अष्ट भावें । करी ताळ मुंर्दग वीणे स्वभावें । कळा कौतुकें दाविती ते प्रसंगीं । गुणी नाचणी नाचती रागरंगीं ॥८६॥
बहू गायनें थोर गंधर्व गाती । कळा ऐकतां देव थक्कीत होती । जयाच्या अलापें देहेभाव जाती । मृगें श्वापदें लाभल्या त्या द्विजाती ॥८७॥
रुपें सुंदरीं किन्नरी दिव्य यंत्रें । बहूसाल विद्याधरी गूणपात्रें । उठे रागकल्लोळ सप्त स्वरांचा । गमे ओळला मेघ हा अमृताचा ॥८८॥
तुरें वाजती अंबरीं शंख भेरी । जयो पावला राम लीलावतारी । सुरांमानसीं थोर आनंद जाला । महा घातकी रावणू तो निमाला ॥८९॥
समस्तां सुरांमानसीं सौख्य जालें । परी दु:ख बीभीषणा प्राप्त जालें । रणीं रावणू श्रेष्ठ बंधू निमाला । झळंबे मनीं शोक उत्पन्न जाला ॥९०॥
रुदंती प्रसंगीं ध्वनी घोष जाला । झळंबे मनीं दु:ख बीभीषणाला । अहा हो अहा हो मुखीं बोलताहे । विलापेंचि तो श्वास टाकीत आहे ॥९१॥
बहू लोटले ओघ नेत्रोद्काचे । दिनासारिखे शब्द कारुण्यवाचे । घडीनें घडी तो भुमीं अंग घाली । अरे भ्रातया शुद्धि सर्वै उडाली ॥९२॥
देहेभाव सांडून तो रूदताहे । मोहोजाळ होतांचि आक्रंदताहे । बहुतांपरींचे बहू सौख्य दीलें । मनामाजिं तें सर्वही आठवीलें ॥९३॥
मुखें श्वास सोडोनि पाणी चुरीतो । भुमीं मस्तकू आपटीतो पिटीतो । म्हणे वीर तो ओखटा काळ आला । त्रिकूटाचळाचा अलंकार गेला ॥९४॥
नव्हे रावणासारिखा संपतीचा । नव्हे रावणासारिखा वित्पतीचा । बहू सांगतां वैभवालगिं कांही । प्रतापी तयासारिखा वीर नाहीं ॥९५॥
मनाचा उदारू धनाचा कुबेरू । बहूसा विचारू जनीं दानशूरू । गळाला बहू धीर त्या राक्षसांचा । महीमंडळीं धाक गेला सुरांचा ॥९६॥
बहूतां जनांचें बहू भाग्य गेलें । गमे सर्व ब्रह्मांड हें ओस जालें । जयाकारणें देव लीलावतारी । तयाच्या गुणा तूळणा कोण सारी ॥९७॥
उदासीन वाटे जनीं पाहवेना । मनीं स्वस्थ नाहीं तया राहवेना । गताचे गुणें वीर तो भग्र जाला । तयालगिं वारावया राम आला ॥९८॥
उभा चाप्रपाणी वदे रम्य वाणी । सदा सर्वदा गाइजे जो पुराणीं । म्हणे गा विरा थोर आश्चर्य जालें । मोहोसागरीं ज्ञानतारूं बुडालें ॥९९॥
तयासारिखें आजि हेम दीसताहे । प्रभू बोलतां वीर तात्काळ राहे । करीं घेतलें शीघ्र बीभीषणाला । कृपाळू दिनाचा दळामाजिं आला ॥१००॥
म्हणे राम बीभीषणा बुद्धिवंता । रणीं रावणालगिं देहांतवेथा । तुम्हीं शीघ्र आतां पुरामाजिं जावें । संमस्तांसि पाहावया आणवावें ॥१०१॥
समर्थामनीं लागली सर्व चिंता । परी अंतरीं जाणतो सौख्यदाता । तयाची कथा ऐकतां दु:ख नासे । चरित्रें बरीं अंतरीं दास तोषे ॥१०२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP