युद्धकान्ड - प्रसंग चवथा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


दशशीर सौमित्र युद्धा निघाले । समारंगणीं वीर सन्मूख जाले । महावीर संग्राम आवेश पोटीं । पुढें देखिलें एकमेकांसि दृष्टीं ॥१॥
बहूसाल धिक्कारिलें येरयेरां । बहू सोडिलीं बाणजाळें सरारां । दळीं टाकिती थोर शस्त्रें शरांचीं । बळें तोडिती एकमेकां विरांचीं ॥२॥
रणीं भीडतां हाणिती एकमेकां । म्हणे रावणू वीरा हा थोरु नीका । पुढें शक्ति काढूनियां ब्रह्मयाची । बळें सोडिली ओळि विद्युल्लतेची ॥३॥
शरें वारितां बैसली शक्ति अंगीं । रणीं वीर सौभित्र तो देह त्यागी । पुढें धांवला रावणू शीघ्र तेथें । बळें ताडिता जाहला मुष्टिघातें ॥४॥
तया देखतां मारुती कोप आला । अकस्मात तो व्योमपंथीं उडाला । कठोरें करें ताडिलें वज्रमुष्टी । वमूं लागला रावणू रक्तसृष्टी ॥५॥
रिपू रावणू मागुता शीघ्र गेला । पुढें लक्ष्मणू ऊठला स्वस्थ जाला । पुन्हां रावणू कोपला काळरूपी । विरां राक्षसांमाजिं चंडप्रतापी ॥६॥
दहा मस्तकीं त्या दहा दिव्य छत्रें । पताका बहू मत्स्य मार्तंडपत्रें । महावैभवेंशीं स्थारूढ जाला । तया मागुती थोर आवेश आला ॥७॥
बहू बाण जुंबाड वाहोनि पृष्ठीं । दहाही धनुष्यें करीं दृढ मुष्टी । करूं लागला मागुती बाणवृष्टी । रघूनायकें देखिलें त्यासि दृष्टीं ॥८॥
उभा राहिला राम वज्रांग ठाणें । करीं सज्जिलें चाप चंद्रार्धबाणें । दहा हममूगूट छत्रें धनुष्यें । बळें तोडिलीं पाडिलीं तीं निमेषें ॥९॥
पुढें रावणू तो भयातूर जाला । बहुतांपरी राघवें शीकवीला । म्हणे जाइं रे रक्षिलें आजि तूला । रिपू प्राण घेऊनि तैसा पळाला ॥१०॥
महा मेघनादू असे नाम ज्यासी । पले लंकनाथासवें तो त्वरेंशीं । तयासारिखीं मूढ मूढें मिळालीं । रणीं भ्रष्टलीं सर्व मागें पळालीं ॥११॥
न पाहात मागें पुरीमाजिं गेले । विरांमाजिं कोणी कुणासी न बोले । पुढें सर्वही मंडपामाजिं आले । समस्तांसि तो रावणू काय बोले ॥१२॥
भयातूर लंकापती दैन्यवाणा । म्हणे ऊठवा हो बळें कुंभकर्णा । तयावीण आणीक कोणी दिसेना । रिपू घोर हा थोर संहारवेना ॥१३॥
पुढें धाडिलें शीघ्र माहोदराला । महाघोर वाद्यें दळें सिद्ध जाला । किती एक ते धीट मोठे पळाले । कितीएक पोटीं भयातूर जाले ॥१४॥
निजेला दरीभीतरीं कुंभकर्णू । दिसे काळ विक्राळ तो मेघवर्णू । शरीरें भयासूर हा घोररूपी । विरां भासला मृत्यु येमस्वरूपी ॥१५॥
तया ऊठवीतां भयातूर जाले । महावीर ते कंप अंगीं उदेले । पुढें जाहले धीट ते नेटपाटें । उभीं पाहती सर्व नैरृत्यथाटें ॥१६॥
बहूसाल वाद्यें बहूतांपरींचीं । महा कर्कशें चंड घोरध्वनींचीं । तयांच्या पुढें जाहला एक वेळा । नभोमंडळीं नाद गेला भुगोळा ॥१७॥
गदा तोमरें हाणती वज्रघातें । महामार आरंभिला राक्षसांतें । कळा लविती टाकिती वृक्ष नाना । गळाले परी कुंभकर्णू उठेना ॥१८॥
शिळा टाकिती टोंचिती शूळ शस्रें । महाघोष संपूर्ण तो कर्णपात्रें । बळें लोटळें मस्त ते हस्ति वेगीं । शरीरावती चालती ते प्रसंगीं ॥१९॥
विरा ऊठवाया बहू यत्न केला । परी नूठतां सर्वही व्यर्थ गेला । तया मारितां हिंपुटे वीर जाले । उठेना महा वीर सर्वै गळाले ॥२०॥
नव्हे कार्य तेणें बहुसाल शंका । पुढें बोलती वीर ते एकमेकां । उठेना महा वीर कैसें करावें । तयीं अंतरीं जाहलें वर्म ठावें ॥२१॥
तया किन्नरीं रम्य गाती विशेषें । अलापें शिळा वीरती तोय जैसें । जयाचेनि नटवांग लावण्यवेषें । मनीं होय शक्रादिकां कामपीसें ॥२२॥
तयांलागीं बोलविले आदरेंशीं । पुढें आलिया गायकी स्वर्गवासी । करीं टाळ मृदंग यंत्रें उपांगें । बहू गीत संगीत तें रागरंगें ॥२३॥
सुखें भोगिती देव त्या गायनांचीं । मनें धांवती ऊर्ध्व शेषादिकांचीं । सुधा सेवितां त्यापुढें वीष वाटे । खरा सुस्वरें अमृतानंद लोटे ॥२४॥
तिथें गायनाची कळा रम्य जाली । तेणें कुंभकर्णासि जागृति आली । भुकेला दिसे बैसला काळ जैसा । बगू भक्षिलें शोणिता मेदमांसा ॥२५॥
रिपू सिद्ध होऊनि लंकेंत चाले । कपी देखतां ते भयातूर जाले । उभा राहतां शीर बाहेर आलें । रघूनायकें थोर आश्चर्य केलें ॥२६॥
पुसे आदरें राम बीभीषणाला । महावीर हा कोण हो सिद्ध जाला । कथी सर्व साकल्य तो मंत्र त्याचा । म्हणे राघवा बंधु हा रावणाचा ॥२७॥
बळें आगळा वीर हा कुंभकर्ण । महापर्वतासारिखा मेघवर्ण । समारंगणीं काळ भीडों शकेना । सखा बंधु हा रावणा होय साना ॥२८॥
पुसे कुंभकर्ण सभेमाजिं गेला । नमस्कारिलें भेटला रावणाला । म्हणे भोगणें लागलें कर्म केलें । सिता आणितां दु:ख हें प्राप्त जालें ॥२९॥
मनीं भंगला राव जाणोनि नेणें । पुन्हां तोषवीला विरें कुंभकर्णें । रिपू मारणें हेचि आज्ञा प्रतिज्ञा । उभा राहिला शीघ्र घेऊनि आज्ञा ॥३०॥
पुढें पावला तो रणीं शीघ्र काळें । दळेंशीं बळें चालिला एक वेळें । कपी ग्रासिले त्रासिले घोर मारें । समारंगणीं लागले घायवारे ॥३१॥
रिसां वानरां मांडिली थोर आटी । कपी गीळिले लक्ष कोटयानुकोटी । उठे सृष्टि भक्षावया काळ जैसा । रणीं वावरे तो महावीर तैसा ॥३२॥
रिपूभार तो भक्षिला भग्र केला । कपीनाथ काखें दुपाडें उडाला । पुरी पावतां पावतां सुग्रिवानें । त्वरेनें पणू सिद्ध केले विरानें ॥३३॥
तया सुग्रिवें कर्ण नाशीक नेलें । पुढें पाहतां दर्पणीं दु:ख केलें । म्हणे व्यर्थ आताम जिणें रूपहाणी । रणीं लोटला मागुती शूळपाणी ॥३४॥
बहू कोपला वीर राक्षेस कैसा । कडाडी बळीं थोर काळाग्रि जैसा । कपीवाहिनीची मनी सांडि केली । रणीं रामचंद्रा उच धांव घाली ॥३५॥
तया राक्षसें खर्डिल्या वज्र दाढा । रणीं राघवें वाहिला चंडमेढा । बळें लागतां मेरुमांदार फोडी । रघूनायकू क्रूर तो बाण सोडी ॥३६॥
रणामाजिं तें तीव्र संधान ऐसें । गिळूं लागला आदरें खाद्य जैसें । बहू सोडिले बाण कोटयानुकोटी । बळें राक्षसें घातलें सर्व पोटीं ॥३७॥
शुकासारिखे बाण पोटीं निघाले । असंभाव्य मध्येंच ते गुप्त जाले । महाघोर संधान या राघवाचें । गिळीतो रणीं कोण सामर्थ्य याचें ॥३८॥
महाघोर त्या मुद्रलाचेनि घातें । रणीं हाणतां जाहला राघवातें । रघूनायकें छेदिला वामबाहो । भुमीं चालिला शोणिताचा प्रवाहो ॥३९॥
रणीं जाहलें हस्त सव्यांग ऊणें । पुढें दैत्य तो कोपला कोटिगूणें । कळें ताळ उत्पाटिला वाम हस्तें । रघूनायकें तोडिलें बाणघातें ॥४०॥
बहू कोपला दैत्य सन्मूख आला । रणीं पाद छेदूनि चौरंग केला । पदेंवीण चाले महासर्प जैसा । बळें ऊपरे चालिला वीर तैसा ॥४१॥
पुढें राघवें शीर छेदूनि नेलें । बहूसाल तें व्योमपंथें उडालें । रणीं कोथळा फोडिला बाणघातें । महावीर तो चालिला मृत्युपंथें ॥४२॥
तया देखतां वीर मागें पळाले । भयें शीघ्र लंकापुरीमाजिं गेले । पुढें देखिला रावणू मेघवूर्ण । तया सांगती पाडिला कुंभकर्णू ॥४३॥
करूं लागला रावणू शोक भारी । पुढें त्रीशिरा त्यासि बोधें निवारी । म्हणे हो रणीं आजि युद्धासि जातों । रिपू थोर सामर्थ्य याचें पहातों ॥४४॥
महावीर तो त्रीशिरा प्राप्त जाला । सुतां आणिकां थोर आवंश आला । करूं लागले पुत्र मंत्री प्रतिज्ञा । निघाले बळें शीघ्र घेऊनि आज्ञा ॥४५॥
महामत्त माहोदरू सिद्ध केला । तुरंगीं नरा अंतकू स्वार जाला । बहूसाल तेजाळ तें खड्‍ग हातीं । बळें चालिले वीर ते राजपंथीं ॥४६॥
रणीं शूर देवांतकू त्रीशिरा हा । अतीकाय तो वीर पारश्व माहा । बळें चौघहि चौरथीं स्वार जाले । दळें लोटलीं विक्रमेंशीं निघाले ॥४७॥
निघाले बळें भार साहीजणाचें । महावीर ते गर्जती विक्रमाचे । रणामंडळीं पारखे वीर कैसे । दळेंशीं बळें धांवती काळ जैसे ॥४८॥
महामार दाहीं दळीं एक जाला । कपीवीर राक्षेस कीती निमाला । पुढें वानरीं घोर घातें निघातें । रणीं भग्र केलें तयां राक्षसातें ॥४९॥
तयां देखतां लोटला दिव्य घोडा । नरां अंतकू कोपला वीर गाढा । बळें हांणतां शस्र वाजे घडाडां । तुटों लागले पादपाणी थडाडां ॥५०॥
बहू वेग संहारिती सर्व सेना । कपी पाहती अश्व कोठें दिसेना । पुढें पाहतां पाहतां लागवेगीं । अकस्मात तें आदळें खड्‍ग अंगीं ॥५१॥
बहूसाल तेणें रिसां वानरांच्या । ग्रिवा कापिल्या थोर माहाविरांच्या । कपीवाहिनीचा रणीं आट जाला । भुमीं लेटिले शोणितें पूर आला ॥५२॥
कपीवीर ते खोंचले भग्र जाले । माहामार देखोनि वेगें पळाले । कितीएक ते सुग्रिवा आड गेले । पुढें अंगदें सर्वही स्वस्थ केले ॥५३॥
उणें देखिलें धांवला शीघ्र कोपें । बळें ताडिला अश्व तो वज्रथापें । नराअंतकाला रणीं अंत आला । बहू मेदमांसें भुमीं गाळ जाला ॥५४॥
नराअंतका मारिलें अंगदानें । पुढें वीर ऊठावले घोर त्राणें । रणामंडळामाजिं ते शीघ्र आले । तया अंगदाही कपी साह्य जाले ॥५५॥
करी नीळ तो युद्ध माहोदराशीं । महावीर देवांतकू मारुताशीं । भिडे त्रीशिरा पार्श्व तो ऋषभेशीं । बळें झुंजती चौघे तीघां जणांशीं ॥५६॥
पुढें मांडिला थोर संहार तेथें । रणीं माजलीं तैं बहूसाल प्रेतें । महावीर ते धीर संग्रामसैरें । बळें धांवती एकमेकां पुढारें ॥५७॥
विरश्रीबलें दूर टाकूनि शंका । रणीं हाणती घाय ते एकमेकां । महाथोर संग्राम साहीजणांचा । पुरीं पूरला अंत त्या राक्षसांचा ॥५८॥
गजारूढ माहोदरू त्या निळानें । रणामाजिं देवांतकू मारुतीनें । महावीर पारश्र्व त्या ऋषभानें । रणीं झुंजतां पाडिलें थोर मानें ॥५९॥
बळें कोपला तो अती चंडकाया । रथू लेटिला शत्रु तेणें जिताया । कपीवीर ते आडवे शीघ्र आले । पुढें चालतां सर्वही भग्र केले ॥६०॥
रथीं बैसला पर्वतासारिखा तो । म्हणे राम हा कोण युद्धासि येतो । वदे शीघ्र बीभीषणू रम्य वाचा । रघूनायका पुत्र का रावणाचा ॥६१॥
सख्या होय सौमित्र तुम्हासि जैसा । अतीकाय तो मेघनादासि तैसा । न लेखी कपीवाहिनीचा उठावा । तुम्हीं कीं सुभित्रासुतें हा वधावा ॥६२॥
म्हणे त्यासि पाहा बरें रावणारी । उभा राहिला शीघ्र कोदंडधारी । विरश्रीबळें बाणिली दिव्य शोभा । रणामंडळीं ठाण मांडूनि ऊभा ॥६३॥
पुढें राघवें ओढिला बाण जैसा । वदे आदरें वीर सौमित्र तैसा । पहावें घडी एक राजीवनंत्रें । वधीतों बळें दैत्य मूहूर्तमात्रें ॥६४॥
पुढें पावला तो अतीचंड काया । बहू बोलती एकमेकां छळाया । तयां एकमेकांस निर्माण जालें । शरां सोडिलें व्योम संपूर्ण केलें ॥६५॥
शरां तोडिती एकमेकां विरांचे । पुन्हां मागुती भार येती शरांचे । बळें भीडती बाण बाणांस कैसे । पडों लागती छेदिलें सर्प जैर्स ॥६६॥
शरीं राक्षसें व्योम संपूर्ण केलें । विरें लक्ष्मणें शीघ्र छेदूनिं नेलें । रिपू कोपला मागुते बाण सोडी । बळें वीर सौमित्र तात्काळ तोडी ॥६७॥
पुढें वीर रामानुजें तेचि काळीं । नभीं मंडपू घातला बाणजाळीं । किती चूकले भार येतां शरांचे । देहे खोंचले एकमेकां विरांचे ॥६८॥
विरश्रीबळें दु:ख नाहीं तयांचे । नभीं पाहती देव कौतूक त्यांचें । दळें थोकळीं युद्ध होतां खणाणां । तया मस्तकू डोलवी रामराणा ॥६९॥
भला रावणी वीर हा चंडदेही । दुजा मानवी वीर सौमित्र तोही । महावीर दोघे रणाभाजिं कैसे । बळें मातले भीडती काळ जैसे ॥७०॥
पुढें शीघ्र सौमित्र तो वज्रठाणें । बळें तोडिलें शीर चंद्रार्धबाणें । रणीं पाडिला तो अतीचंडकाया । बळें लागले दैत्य मागें पळाया ॥७१॥
बहूसाल ते मृत्युपंथेंचि गेले । परी अल्प घायाळ मागें पळाले । पुरीमाजिं जाऊन लंकापतीला । भयें सांगती सर्व संहार झाला ॥७२॥
बहू झुंजतां झुंजतां भग्र झाले । रणीं सर्वही पुत्रमंत्री निमाले । नरां वानरांला जयो प्राप्त झाला । क्षयो राक्षसां शीघ्र ठाकूनि आला ॥७३॥
पुढें रावणू तो भुमीं अंग घाली । तया ऐकतां मूर्च्छना शीघ्र आली । शरीरीं नसे शुद्धि सर्वै उडाली । बहू दैन्यवाणी दशा प्राप्त जाली ॥७४॥
करी रावनू शोक शंकारहीतू । सभामंडपीं धांवला इंद्रजीतू । पिता शीघ्र आलिंगिला मेघनादें । म्हणे काय जी शीणतां व्यर्थ खेदें ॥७५॥
बहूतांपरी तो पिता शीकवीला । म्हणे शीघ्र मारूनि येतों रिपूला । तेणें रावणू शोक सांडूनि ठेला ।बहूसाल सन्मानिलें त्या सुताला ॥७६॥
बहू दीस होती गळां रत्नमाळा । तमे पाहतां मोल थोडें भुगोळा । करीं घेतली माळिका आवडीनें । सुताच्या गळां घातली रावणानें ॥७७॥
रणा चालिला वीर संग्रामसैरा । दळेंशीं बळें लोटला भार सैरा । रथां घोडिमां कुंजरां मीति नाहीं । बहूसाल वाद्यें पुढें एक घाई ॥७८॥
महा वैभवेंशीं रणामाजिं आला । तया इंद्रजीतें रणीं होम केला । यथायोग्य पूर्णाहुतीचेनि तोषें । रथू दीधला अग्रिवर्णू हुताशें ॥७९॥
रथू तोमरू खड्‍गबाणीं विराजे । वरी रावणी तो महावीर साजे । उडाला रथेंशीं बळें अंतराळें । असंभाव्य सोडी तळीं बाणजाळें ॥८०॥
बळें सूटला बाण त्या राक्षसांचे । बहू खोंचले भार गोळांगुळांचे । फुटों लागले कोथळे पादपाणी । भयें बोलती वानरें दैन्यवाणीं ॥८१॥
कितीएक ते वीर भेणें पळाले । पुढें जातजातांचि चौरंग केले । कितीएक धाकें विरां आड जाती । अकस्मात तेथेंचि ते भेदिजेती ॥८२॥
कपीवाहिनीमाजिं आकांत जाला । रणीं तो विरें वीर सर्वै निमाला । सुमित्रासुतू बोलिला राघवाला । बहू आट जाला रिसां वानरांला ॥८३॥
पुढें बोलतां बोलतां तेचि काळीं । अकस्मात ते भेदिले बाणजाळीं । निचेष्टीत भूमीं धनुष्यें गळालीं । विरें इंद्रजीतें रणीं ख्याति केली ॥८४॥
बळी रावणी एकला वीर जेठी । कपी पाडिले लक्ष कोटयानुकोटी । महावीर ते धीर मेरूबळाचे । प्रतापें सुरांहूनि ते विक्रमाचे ॥८५॥
रिसां वानरां सर्व संहार केला । पुरीमाजिं तो येश घुऊनि गेला । नमस्कार केला तया रावणाला । दळेंशीं बळें रामशत्रू निमाला ॥८६॥
रणीं सर्वही पाडिलें प्रेतराशी । बहूसाल आनंद त्या रावणाशी । महा सूख लंकापुरीमाजिं ऐसें । पुढें वर्तलें वानरांमाजिं कैसें ॥८७॥
कपी रीस ते पर्वतातुल्य कैसे । निमाले रणीं पाडिले वृक्ष जैसे । तयांमाजिं कल्याण दोघांजणाला । कपी मारुती आणि बीभीषणाला ॥८८॥
रणू माजलें सर्वही प्रेतरूपी । तयामाजिं ते दोघे उद्विग्ररूपी । विचारूनियां वन्हिशीखाउजेडें । रणा शोधिलें सर्व तींही निवाडें ॥८९॥
रणा शोधितां सर्व सेनेसि अंत । तयामाजिं तों बोलिला जांबुवंत । पुढें वीर ते शीघ्र धांवोनि आले । तयां पाहतां बाण अंगीं बुडाले ॥९०॥
बहूसाल तो रीस घायाळ जाला । बळीं बाणजाळीं रणीं आकळीला । महावीर बीभीषणें उठवीला । बळें बाण ओढूनियां स्वस्थ केला ॥९१॥
पुढें ऋक्ष बीभीषणालगिं पूसे । महावीर ते मुख्य आहेत कैसे । म्हणे जांबुवंतासि नैरृत्यनाथू । विरा पूससी काय जाला अनर्थू ॥९२॥
महावीर दोघे निचेष्टीत जाले । कपी सुग्रिवादी सर्वै निमाले । रणामाजिं ते शोधिली सर्व सेना । समस्तांमधें एक तोही दिसेना ॥९३॥
प्रसंगीं निरूपी यथातथ्य मातू । मनामाजिं तो जांबुवंतू निवांतू । म्हणे वीर बीभीषणू जांबुवंता । समस्तांसि कल्याण तें सांग आतां ॥९४॥
महणे ऋक्ष तो मारुतीवीण कांहीं । विरां ऊठवाया दुजा प्रेत्न नाहीं । क्षिराब्धीतटीं योजनें चारि कोटी । गिरी द्रोण आणील हा वीर जेठी ॥९५॥
महा रम्य द्रोणाचळू भव्यरूपी । तया मस्तकीं औषधी दिव्यरूपी । बळें आणितां ऊठती सर्व सेना । कपी मारुतीवीण दूजा दिसेना ॥९६॥
म्हणे जांबुवंतासि नैरृत्यनाथू । असंभाव्य तूं सांगशीं दूर पंथू । गमे प्रेत्न हा सर्वथाहा घडेना । गिरी मारुतीचेनिही आणवेना ॥९७॥
म्हणे गा विरा काय तूं बोलिलासी । कपीसारखा मारुती भावितोसी । परी जाण हा ईश्वरू साक्षरूपी । कळेना जना रुद्र पूर्णप्रतापी ॥९८॥
बहू स्तूति केली तया मारुताची । तयें तोषली वृत्ति बीभीषणाची । म्हणे गा विरा संकटीं धांव घाली । बळें ऊठवीं सर्व सेना निमाली ॥९९॥
कपी मारुती उत्तरें सिद्ध जाला । मनीं चिंतिलें रामपादांबुजाला । महावीद आणील द्रोणाचळातें । पुढें वीनवी दास तो श्रोतयांतें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP