युद्धकान्ड - प्रसंग पहिला

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


नमू विघ्रहर्ता मुळीं सैन्यभर्ता । मुढां धूर्तकर्ता विभांडी विवता । चतुर्भूज मताननू शोभताहे । तया चिंतितां भ्रांति कोठें न राहे ॥१॥
सदा भेदहंती महंती । सदा ज्ञानवंती नियंती नियंता । सुविद्याकळास्फूर्तिरूपा अमूपा । नमस्कारिली शारदा मोक्षरूपा ॥२॥
नये बोलतां चालतां रूप कांहीं । नये भावितां दावितां सर्वथाही । सदा संत आनंदरूपीं भरावें । पदीं लागतां सद्नुरूचे तरावें ॥३॥
नमस्कारिला राम कोदंडपाणी । पुढें गावया रामराभेति वाणी । भविष्योत्तरें बोलिलीं तीं पुराणीं । उमाकांत ध्यातो सदा शूळपाणी ॥४॥
कथा शंकराची कथा कार्तिकाची । कथा चंडिकेची कथा मोरयाची । कथा वेंकटाची कथा विठ्ठलाची । कथा मल्लयाची कथा भैरवाचीz॥५॥
कथा नृसिंह वामना भार्गवाची । कथा कौरव पांडवां माधवाची । कथा देव इंद्रादि ब्रह्मादिकांची । समस्तांमधें श्रेष्ठ या राघवाची ॥६॥
जिणें फेडिला पांग ब्रह्मादिकांचा । बळें तोडिला बंध त्या त्रीदशांचा । म्हणोनि कथा थोर या राघवाची । जनीं ऐकतां शांति होते भवाची ॥७॥
कथा थोर रामायणीं सार आहे । दुजी ऊपमा या कथेला न साहे । तिन्ही लोक गाती सदा आवडीनें । भविष्योत्तरें वानिली शंकरानें ॥८॥
ऋषीमाजिं श्रेष्ठू विचारें वरिष्ठू । सदा एकनिष्ठू सगूणीं प्रविष्ठू । चरित्रें विचित्रें वनामाजिं वस्तां । मुखें बोलिला राम नस्तां समस्तां ॥९॥
कथा राघवाची सदाशीव पाहे । तळीं ऐकतां शेष थक्कीत राहे । कथा श्रेष्ठ हे ऐकतां दोष जाती । महासुकृती ऐकती धन्य होती ॥१०॥
कथा संपली कांड सुंदर्य मागें । प्रवाहो पुढें चालिला लागवेगें । स्वयें श्रोतयांतें कवी प्रार्थिताहे । पुढें युद्धकांडीं कथा रम्य आहे ॥११॥
ऋषीपर्वतीं रामसौमित्र होते । अकस्मात आला हनूमंत तेथें । म्हणो जानकी देखिली रामचंद्रा । क्षमारूप लंकेसि आहे नरेंद्रा ॥१२॥
सिमा रावणें रक्षिली वाटिकेसीं । प्रभू पाहिली म्यां स्वयें निश्चयेंसीं । तयें घोर नीशाचरी रक्षणेसी । बळें ठेविल्या कर्कशा गर्वराशी ॥१३॥
पुढें राघवें सुग्रिवाचे निमित्तें । विचारूनियां सर्वही वानरांतें । दळेंशीं बळें दक्षिणे चालि केली । विरांचि असंभाव्य सेना मिळाली ॥१४॥
कपी सुग्रिवें सर्व भूमंडळीचें । बहू आणिले वीर मेरू बळाचे । विरापाठिशीं भार कोट्यानुकोटी । रिसां वानरांची असंभाव्य दाटी ॥१५॥
अती आदरें स्कंदभागीं विरानें । रघूनायका घेतलें मारुतीनें । सुमित्रासुतालगिं त्या अंगदानें । प्रभू चालिला ते बळी थोर मानें ॥१६॥
सिता शोधिली भीमराजें विशाळें । दळें लेटिलीं वानरांचीं ढिसाळें । गिरीतुल्य झेंपावती वायुवेगें । करापल्लवा झेलिती शैलशृंगें ॥१७॥
अपारें कुरें वानरें सैर मेळा । कठोरें करीं फोडिती चंडशीळा । रिसें कर्कशें भीम भिंगोळवाणीं । मधें सांवळा राम कोदंडपाणी ॥१८॥
पुढें चालतां भार गोलांगुलांचें । कडे लागले थोर विंध्याचळाचे । तया पर्वतामाजिं चंडें उदंडें । विशाळें बहू लागलीं झाडखंडें ॥१९॥
कपीभार विंध्याचळामाजिं आले । असंभाव्य ते झाडखंडीं निघाले । वरी वाड झाडें तळीं दाट छाया । कपी सर्वही सिद्ध जाले उडाया ॥२०॥
तळीं पोटळे उंच शाखा फुलांचे । वरी लोंबती घोस नाना फळांचे । बहूतांपरींच्या बहू पक्षियाती । बहू श्वापदें तीं फळें भक्षिताती ॥२१॥
तयांमाजिं ते भार कोटय़ानुकोटी । रिसां वानरांची असंभाव्य दाटी । झडा घालिती एकमेकां पुढारें । खडाडां बळें वृक्षवल्ली विदारें ॥२२॥
कितीएक ते बैसले वृक्षअग्रीं । वरी वाइलीं वक्र पुच्छें समग्रीं । कितीएक मध्येंच ते गुप्त जाले । कितीएक ते वृक्षमाथां मिळाले ॥२३॥
स्वइच्छा फळें भक्षिती आदरेंसीं । बहू वांटती एकमेकां  त्वरेंसीं । फळें तोडिती टाकिती ते अपारें । वनामाजिं ते क्रीडती भूभुकारें ॥२४॥
कितीएक हेलविती वृक्ष आंगें । कितीएक ऊफाळती लागवेगें । कितीएक ते झोंबती आंग व्यस्तें । कितीएक ते लोंबती एक हस्तें ॥२५॥
कितीएक पोटाळिती वाड झाडें । किती मोडिती आंगभारें कडाडें । बहू मांडिली झाडखंडी धुमाळी । कितीएक झेंपावती अंतराळीं ॥२६॥
वनें व्यापिली वानरें गर्जताती । दिशा लंघिती श्वापदें पक्षियाती । भुतें खेचरें थोर धाकें पळालीं । चळीं कांपती दैन्यवाणीं गळालीं ॥२७॥
कपींचीं पुढें चालिलीं दाट थाटें । वनें चालतां सर्व होती सपाटें । महा थोर विंध्याचळा लागवेगें । पुढें चालिले सर्व सोडूनि मागें ॥२८॥
तयां चालतां चालतां दक्षणेसी । बहूसाल आवेश माहा विरांसी । पुढें देखिलें शृंग मैळाचळाचें । तयामस्तकीं भार गोळांगुळांचे ॥२९॥
गिरीशृंगपाठार पाहोनि वेगीं । बळें चालिले भार ते दक्षिणांगीं । पुढें चालतां चालतां अस्तमाना । समुद्रातिरीं लोटली भीम सेना ॥३०॥
कपसैन्य सिंधूतिरामाजिं आलें । असंभाव्य देखोनि चक्कीत जालें । जळें मातला सिंधु लाटे धडाडी । करी गर्जना मेघ जैसा घडाडी ॥३१॥
दिसे पाहतां सर्व आकाश जैसें । कळेना सिमा दाटलें तोय तैसें । बहूपाणजंजाळ देखोनि डोळां । भयासूर त्यां कंप सूटे चळाळां ॥३२॥
समुद्रातिरीं राहिली चंडसेना । असंभाव्य तें सैन्य भूमी दिसेना । गिरांवृक्ष देखोनि येती फुराणें । बळें साधिती अंतराळीं किराणें ॥३३॥
कपीभार ते सर्वही स्वस्थ जाले । महापर्वतांचे परी ते मिळाले । समुद्रातिरीं राहिलें सैन्य जैसें । पुढें वर्तलें त्रीकुटामाजिं कैसें ॥३४॥
सिताशुद्धि घेऊनियां रुद्र गेला । तयीं आखयातें क्षयो प्राप्त जाला । बहू मानसीं दु:ख मंदोदरीला । तिनें शीघ्र पाचारिलें देवराला ॥३५॥
म्हणे देवरालगिं बीभीषणा हो । तुम्ही आणि वेगीं सभेमाजिं जा हो । मदोन्मत्त तो अंकुशें आवरावा । विवेकें बळें राव तैसा वळावा ॥३६॥
म्हणे धन्य हो धन्य तूं राजकांते । मनीं माझिया हीत ऐसेंचि होतें । बरी अंतरीं मात घेऊनि पूर्ती । निघाला स सभेमाजिं तो धर्ममूर्ती ॥३७॥
तया रावणाच्या गृहामाजिं गेला । बहूतांपरी रावणू शीकवीला । पुढें दोघेही ते सभंमाजिं आले । महावीर राक्षेस सर्वे मिळाळे ॥३८॥
सभे श्रेष्ठ तो रावणू कुंभकर्णू । सभेमाजिं बीभीषणू आग्रगण्यू । सभे सर्वही पुत्र मंत्री मिळाले । तयालगिं तो रावणू काय बोले ॥३९॥
तया रावणें सर्व सांदूनि शुद्धी । पुढें प्रेरिता जाहला पापबुद्धी । म्हणे ऐक गा बुद्धिवंता प्रहस्ता । करी रे मला वश्य ते रामकांता ॥४०॥
सितेकारणें म्यां बहू कष्ट केले । परी पाहतां सर्वही व्यर्थ गेले । मनीं चिंतिलें कोद कांहीं पुरेना । उरे शीण तो शोक पोटीं धरेना ॥४१॥
सिते सुंदरीलगिं संभोग द्यावा । समूळें बळें रामशत्रू वधावा । न हे ईतुकें सर्वही कृत्य जालें । सुखें सर्वदा चित्त माझें निवालें ॥४२॥
अहंकारला रावणू कोटिगूणें । मनीं मानिलें सर्व ब्रह्मांड ऊणें । समस्तांमधें आगळा मेघवर्णू । पुढें बोलता जाहला कुंभकर्णू ॥४३॥
वदे कुंभकर्णू तया रावणाला । मदें सर्वही नीतिधर्मू बुडाला । अकस्मात लंकापतीबुद्धि नासे । पुढें सर्वही सूख तेणें विनाशे ॥४४॥
जगें निंदिलें तेंचि टाकून येतां । पुढें वेळ नाहीं तया दु:ख होतां । विषें घोळिलें ठेवितां प्रीति तेथें । पुढें सत्वरा जाइजे मृत्युपंथें ॥४५॥
म्हणे कुंभकर्णू असें काय केलें । सिता आणितां सर्वही राज्य गेलें । पुढें भंगलें चित्त जाणूनि जीवें । मनासारिखें बोलिला तो स्वभावें ॥४६॥
शुभाशूभ जें मानलें तूजलगिं । घडो तेंचि आतां भलें या प्रसंगीं । बळें माझिया सर्व सूखें रहावें । पुढें काय होईल तैसें पहावें ॥४७॥
कपी मानवी सर्व कैसे मिळाले । क्षुधेकारणें माझिये प्राप्त जाले । रिपू घालितों ऊदरामाजिं सांठा । नरें वानरें घांस घेतों घटाटा ॥४८॥
उदल्या महाघोर माझेनि कोपें । पुढें देखतां तो चळीं काळ कांपे । रिसें मर्कटें बापुडीं दैन्यवाणीं । रिपू आमचे थोर वाटे शिराणी ॥४९॥
तया बोलतां रावणा सूख जालें । स्तुतीउतरें आदरें गौरवीलें । महावीर पारश्च ऊदीर वेगीं । पुढें बोलता जाहला ते प्रसंगीं ॥५०॥
अहो कासया मंत्र पूसा रिपूचा । जनीं कोण लेखा तया मर्कटांचा । समर्थापुढें दूसरा कोण कैंचा । करूं एकला सर्व संहार त्यांचा ॥५१॥
सितेची बहू प्रार्थना कां करावी । प्रभू सांगतों बुद्धि पोटीं धरावी । म्हणे वीर पारश्च त्या रावणाला । बळात्कार राया करावा सितेला ॥५२॥
म्हणे रावणू धन्य गा बुद्धिवंता । तुझें बोलणें मानलें दृढ चित्ता । परी शाप आहे मला ब्रह्मयाचा । करीना बळात्कार हे सत्य वाचा ॥५३॥
तयां बोलतां दु:ख बीभीषणाला । बहूसाल संतापला क्रोध आला । म्हणे रे रघूनाथ पूर्णप्रतापी । दुरात्मे तुम्ही नष्ट चांडाळ पापी ॥५४॥
तुम्ही राक्षसें निर्बळें बुद्धिहीनें । मती मंदली पातकाचेनि गूणें । सुराकारणें राम आला कळेना । मदें मातला रावणू ओळखेना ॥५५॥
कपी वीर ते दूरि टाकूनि शंका । मिळले करायास निर्मूळ लंका । त्रिकूटाचळू दृश्य नाहीं तयांला । तंव जानकी भेटवा राघवाला ॥५६॥
रुपें कर्कशें कोपला वीर गाढा । रणामंडळीं राम वाईल मेढा । तया देखतां काळ भीडूं शकेना । तुम्ही मश्यकें राक्षसें सर्व सेना ॥५७॥
रणीं तीव्र त्या राघवाचेनि बाणीं । तुटों लागले तूमचे पादपाणी । धडें मस्तकें मेदमांसें चिडाणी । न होतां सिता भेटवा चापपाणी ॥५८॥
तया बोलतां ते सभा तप्त जाली । सुतां मंत्रियाचे मुखीं तीव्र बोली । असंभाव्य तो रावणा कोप आला । कुशब्दें बहू त्रास बीभीषणाला ॥५९॥
सभेमाजिं धिक्कारिलें रावणानें । उठोनि पदें ताडिलें दुर्जनानें । बहूर्तामधें एकला धर्ममूर्ती । मनीं खोंचला तो उदासीन चितीं ॥६०॥
मनू भंगला हो तया धार्मिकाचा । पुढें त्याग तात्काळ केला सभेचा । उडाला नभोमंडळामाजिं वेगीं । पुरोहीत चत्वारि ते पृष्ठभागीं ॥६१॥
झळंबे मनीं लोभ त्या सांडि केली । अकस्मात ते वृत्ति भंगूनि गेली । पुढें वाक्य बोलेनियां रावणातें । उदासीन तो चालिला व्योमपंथें ॥६२॥
पुरोहति चत्वारि ते पृष्ठभागीं । त्वरें उत्तरें चालिले लागवेगीं । समुद्रासि लंघूनि पैलाड गेले । नभीं पारखे सुग्रिवें ओळखीले ॥६३॥
कपींद्रू म्हणे पैल पाहे विशाळू । नभीं येतसे कोण हा पंचमेळू । अकस्मात खालावला व्योमपंथें । भिडों पाहती वानरें त्या अनर्थें ॥६४॥
मिळाळे कपी बोलती त्यासि वाचा । अकस्मात आलास तूं कोण कचा । म्हणे बंधु मी होय लंकापतीचा । परी दास अंकीत या राघवाचा ॥६५॥
पुरी त्यागिली सर्व एका जिवेंशीं । करा हो तुम्ही भेटी या राघवाशीं । म्हणे सत्य बीभीषणू नाम माझें । नव्हे अन्यथा सर्वथा वाक्य दूजें ॥६६॥
कपी सर्वही जुत्पती धममूतीं । बहूतांपरी ऐकिली वाड कीर्ती । समस्तीं तुम्हीं हीत माझें करावें । कृपाळूपणें राघवा भेटवावें ॥६७॥
म्हणे वीर सुग्रीव नावेक बैसा । त्वरें मात हे जाणवीतों सुरेशा । कपीराज तो लागवेगें निघाला । अती आदरें भेटला राघवाला ॥६८॥
समाचार साकल्य तो सांगताहे । म्हणे भेटि नीशाचरू इच्छिताहे । परी अंतरीं कोण कैसा कळेना । तया ठेवितां राजनीती मिळेना ॥६९॥
समस्तांकडे पाहिलें राघवानें । बहूतांपरी बोलिलें तें सभेनें । मनीं पाहतां देखिला दैन्यवाणा । कृपाळूपणें आणवी रामराणा ॥७०॥
उभें राहिले भाग्य बीभीषणाचें । करी अंतरीं ध्यान पादांबुजाचें । भिजे दिव्य सर्वांग त्या अश्रुबिंदीं । मिठी घातली रामपादारविंदीं ॥७१॥
कृपासागरें ठेविला हस्त माथां । चिरंजीव लंकापती होय आतां । मधूरें गिरें राघवें ऊठवीला । पुढें तिष्ठतू हात जोडोनि ठेला ॥७२॥
बहू स्तूति केली रघूनायकाची । करी आदिनारायणाची विरिंची । तयाचेपरी । शब्दकारुण्य बोले । पुढें पाउलें लक्षितां अश्रु आले ॥७३॥
म्हणे राम बीभीषणा बैस आतां । पुरे स्तूति सांडी तुझी सर्व चिंता । सुमित्रासुतालगिं संकेत केला । दिजे मंगळस्नान बीभीषणाला ॥७४॥
त्वरें ऊठला बंधु त्या राघवाचा । घटू आणिला पूर्ण सिंधूदकाचा । पुरें शीघ्र बीभीषणालगिं शेषें । विशेषे दिलें सौख्य राज्याभिपेकें ॥७५॥
म्हणे राम बीभीषणा सत्य वाचा । प्रतापें वधू जालिया वैरियाचा । तुला दीधलें राज्य लंकापुरीचें । चळेना चिरंजीव जैसें ध्रुवाचें ॥७६॥
वरू दीधला रामचंद्रें दयाळें । कृपासागरें दासपाळें नृपाळें । प्रसंगीं तये थोर आनंद जाला । दिल्हें अक्षयी राज्य बीभीषणाला ॥७७॥
कषी सुग्रिवादीक मांदी मिळाली । समस्तीं विरीं आदरें स्तूति केली । जगीं धन्य हें भाग्य बीभीषणाचें । प्रितीपात्र जाला रघूनायकाचें ॥७८॥
रघूनायका देखतां सूख जालें । बहु दु:ख मागील सर्वै निमालें । जगीं धन्य गा धन्य बीभीषणा तूं । तुला जाहला प्रसन्न श्रीअनंतू ॥७९॥
समस्तांसि सन्मानिलें आदरेंसीं । नमस्कार केला रघूनायकासी । पुढें मंत्रियामांजिं तो बैसवोला । तेणें थोर आनंद बीभीषणाला ॥८०॥
म्हणे राम बीभीषणा बैस आप्ता । त्रिकूटाचळू सांग साकल्य वार्ता । वदे राज्य लंकापुरी सर्व सेना । मनामाजिं संतोषला रामराणा ॥८१॥
पुढें राम बीभीषणा मंत्र पूसे । कपीभार पैलीकडे जाति कैसे । विचारूनियां सुग्रिवाचेनि मतें । म्हणे हो क्षमा मागिजे मार्ग यातें ॥८२॥
समुद्रासि देऊनियां श्रेष्ठ मानू । करावा अती आदरें सुप्रसन्नू । मनीं बोलणें सत्य मानूनि देवें । समुद्रातिरीं बैसिजे शुद्ध भावें ॥८३॥
त्रिकूटाचळाहून तो हेर आला । पुढें सर्व पाहूनि शार्दूळ गेला । समाचार सांगे तया रावणाला । म्हणे वानरेसीं बळें राम आला ॥८४॥
मिळाले कपी रीस कोटयानुकोटी । समुद्रातिरीं जाहली थोर दाटी । बळें राहिली ते असंभाव्य सेना । विरांची असंख्यात संख्या असेना ॥८५॥
शिळाशीखरें झेलिती वृक्षपाणी । सदा सर्वदा गर्जती घोर वाणी । तयामाजिं ते मानवी वेषधारी । रुपें रम्य लावण्य कामावतारी ॥८६॥
असंख्यात मेळा रिसांवानरामचा । कपिश्रेष्ठ सुग्रीव राजा तयांचा । प्रभू सांगतों सिद्ध आतां असावें । पुरीमाजिं दुश्चीत कांहीं नसावें ॥८७॥
तयें सांगतां थोर उद्धेग जीवा । म्हणे मागुता कोण रे पाठवावा । पुढें शूक बोलविला आदरेंसीं । म्हणे जाय रे बोल त्या सुग्रिवासी ॥८८॥
म्हणावें कपी तूं सखा आमुचा रे । अनूचीत हें वाउगें कासया रे । बहूतांपरी शूक तो शीकवीला । अलंकारे देऊनियां तोषवीला ॥८९॥
नमस्कार केला तयें रावणासी । निघाला बळें हेर तैसा त्वरेंसीं । नभोमंडळीं शीघ्र उड्डाण केलें । देहें आपुलें सर्वही पालटीलें ॥९०॥
रुपें सुंदरू जाहला शुद्ध पक्षी । निराळा नभामाजि तो सैन्य लक्षी । म्हणे सुग्रिवा ऐक रे ऐक भावें । कपी व्यर्थ आलसि मागें फिरावें ॥९१॥
त्वरें आपुल्या भूवनामाजिं जावें । समारंगणीं वाउगें कां मरावें । त्रिकूटाचळा रामकांतेचि नेलें । कपी सांग पां रे तुझें काय गेलें ॥९२॥
तया मानवा साह्य जालसि कैसा । मनीं नेणतां चालिला मूर्ख जैसा । बळें हीन झुंजासि त्याच्या न जावें । कदा कृपणाचें वर्‍हाडी न व्हावें ॥९३॥
महा मूर्ख रे सख्य याचें नसावें । स्वयें हीत तें ज्ञान पोटीं बसावें । त्रिकूटाचळू लभ्य नाहीं सुरेशा । नरांवानरां प्राप्त होईल कैसा ॥९४॥
कपीपुंगवा व्यर्थ आलसि वांयां । समारंगणीं बाणघातें मराया । समस्तीं रणामाजिं जीवें मरावें । तये मैत्रिकीचें जनीं काय घ्यावें ॥९५॥
बहुतांपरी हेंचि आतां करावें । तुवां आपुल्या भूवनामाजिं जावें । शुकें निंदिलें सर्वहि वानरांतें । बहूसाल धिक्कारिलें हो तयांतें ॥९३॥
तिहीं पाडिला ताडिला कुस्त केला । पुन्हां सोडिला तो नभामाजिं गेला । म्हणे शूक ऐका रिसें वानरें हो । तुम्हां रावणें रक्षिलें निर्बळें हो ॥९७
अरे मूर्ख हो व्यर्थ आलांत येथें । समारंगणीं जावया मृत्युपंथें । अरे सुग्रिवा वानरा भूललाशीं । रिसांमर्कटांमाजिं तूं मूर्ख होती ॥९८॥
मुढा व्यर्थ घेऊनि आलसि सेना । तुला रावनू कोण कैसा कळेना । पुन्हां बोलता जाहला घोर वाणी । कपी मागुते क्षोभले वृक्षपाणी ॥९९॥
धरूनी बळें आणिलें पक्षियाला । तिहीं रक्षिलें पाशबंधीं तयाला । पुढें शीघ्र कोपेल हा रामचंद्रू । म्हणे दास भेटेल भावें समुद्रू ॥१००॥
प्रतापें बळें तारिती चंड शीळा । बळे सेतु बांधूनि घेती सुवेळा ॥१०१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP