युद्धकान्ड - प्रसंग अकरावा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


प्रतापें दिनेशू तपाचा हुताशू । विरांमाजिं ईशू सुरांचा सुरेशू । मुनींचा महेशू महादेव धीशू । सदांचा उदासू वनारण्यवासू ॥१॥
पिनाकी शुळी बोलिजे रुद्रवाणी । जटाभार पंचाननू शूळपाणी । हरू शैलजावल्लभू भक्तपाळू । धराधार मृत्युंजयो तो कृपाळू ॥२॥
महादेव शंभू गिरीजाविलासी । सुवर्णाचळामाजिं कैलासवासी । विराजे रुपें गौर कर्पूर जैसा । दिसे धाम ढौळा सदाशीव तैसा ॥३॥
विषें कंठ काळा दिसे चंद्रमौळीं । फणीधारकू वन्हि साजे कपाळीं । असंभाव्य भोळा गळां रुंडमाळा । पहा मस्तकीं ओघ जाती खळाळा ॥४॥
वसे भस्म अंगीं प्रभू वीतरागी । उदासीन तो सर्व सामर्थ्य त्यागी । विधी शक्र हे सर्व ध्याती जयाला । महादेव तो वर्णितो राघवाला ॥५॥
म्हणे धन्य रामा विरा पूर्णकामा । असंभाव्य सीमा कळेना महीमा । महा थोर अद्‍भूत सामर्थ्य केलें । प्रतापेंचि ब्रह्मादिकां सोडवीलें ॥६॥
प्रसन्न तया रावणालगिं आम्ही । विरंचीवरें मातला पापकर्मीं । ऋषी देव माझे बहू कष्टवीले । समर्था तुवां सर्वही सोडवीले ॥७॥
अखंडीत घेतों तुझें नाम वाणीं । पुजा अंतरामाजिं कोदंडपाणी । बहू काळ होतें बहू आर्त पोटीं । प्रसंगेंचि ये जाहली थोर भेटी ॥८॥
अकस्मात हा भेटिचा लाभ जाला । मनामाजिं अद्‍भूत आनंद जाला । सुराकारणें संकटीं पावलासी । मनोभावना राहिली तूजपाशीं ॥९॥
भविष्योत्तरें बोलिलीं वाल्मिकानें । पहातों चरित्रें तुझीं आवडीनें । विषे पोळला प्राण माझा निवाला । निजध्यास तो लागला पार्वतीला ॥१०॥
समस्तां मनीं लागला ध्यास राम । तुझें रूप ध्यातों सदा योगधामा । बहूसाल हें बोलणें काय देवा । अखंडीत हा लोभ आतां असावा ॥११॥
प्रतीउत्तरें राम बोले महेशा । उदाराधिशा सुंदरा देवधीशा । समर्था प्रभू लोकपाळा नृपाळा । लिळें जाळिशी पाळिशी या भुगोळा ॥१२॥
तुझा योग होतामचि आनंद जाला । पुढें देखता प्राण माझा निवाला । दयासागरा सर्व सांभाळ केला । सुखानंद हेलावला तृप्त जाला ॥१३॥
पुढें बोलता जाहला तो विरंची । म्हणे आजि हे धन्य वेळा सुखाची । तुझा योग होतां घडी अमृताची । बहू स्तूति केली रघूनायकाची ॥१४॥
किती बंधनें पावलों पूर्व पापें । बहू दीस ओसंडिलें मायबापें । बहू कष्ट केलेसि देवाधिदेवा । कृपाळूपणें शीघ्र केला कुडावा ॥१५॥
तुम्हां वेगळे सर्वही दीन झाले । त्रिकूटाचळीं बंदिशाळे मिळाले । दिनासारिखे जाहले दैन्यवाणे । प्रभू आमुचें दु:ख तें कोंण जाणे ॥१६॥
बहू कष्टवीलें तया रावणानें । घडीनें घडी त्रासिलें दुर्जनानें । उमे हानि येतां मनामाजिं चिंता । समस्तांस कोणी नसे सोडवीता ॥१७॥
बहू ओखटी वेळ येऊन गेली । कृपासागरा धांवणी शीघ्र केली । सुतालगिं झेंपावला व्याघ्र तैसा । जगज्जनका तूं समस्तांस तैसा ॥१८॥
स्तुती उत्तरें बाळकू काय जाणे । बरें ओखटें सर्व कांहींच नेणे । मुलें खेळतां मायबापांस चिंता । तयाचेपरी बोलताहे विधाता ॥१९॥
बहू स्तूति केली तया ब्रह्मयानें । कृपाळूपणें वारिलें राघवानें । प्रसंगें विधीचें समाधान केलें । मनीं दु:ख मागील तें सर्व गेलें ॥२०॥
पुढें बोलता जाहला वज्रपाणी । सदा सर्वदा गाइजे जो पुराणीं । तया सुकृताचा बरा काळ आला । प्रभू रामचंद्रा तुझा योग झाला ॥२१॥
बहूतांपरी राघवा ऐकलासी । पुरी पूरली लोचनांची असोसी । पुढें पाहतां देखतां रूप तूझें । जगन्नायका धन्य हें भाग्य माझें ॥२२॥
उणे कोटि कंदर्प हें रूप साजे । सदा सर्वदा योगिध्यानीं विराजे । मुनी शोधिती भक्त कोटयानुकोटी । बहू साधनेंही नव्हे शीघ्र भेटी ॥२३॥
कितीएक योगी उदासीन जाले । गिरीकंदरीं तूज शोधीत गेले । तयां अंतरीं भेटसी अल्प कांहीं । जनीं आमुच्या सुकृता पार नाहीं ॥२४॥
म्हणे इंद्र तो स्वामि देवाधिदेवा । जनीं सेवका आपुलासा म्हणावा । घडेना मला भक्तिभावार्थ नाहीं । प्रभू सांगिजे जी मुखें कार्य कांही ॥२५॥
म्हणे राम गा वज्रपाणी प्रसंगें । रथू मातली धाडिला लागवेगें । तुवां कार्य तें सर्व पूर्वींच केलें | रथारूढ होऊनियां येश आलें ॥२६॥
पुन्हां मागुतें एक आतां करावेम । निमाले कपी ऋक्ष त्यां ऊठवावें । सुधामेघ पाडूनियां लागवेगीं । महावीर ते ऊठवी ये प्रसंगीं  ॥२७॥
मुखें बोलतां जाहला चक्रपाणी । तयें थोर संतोषला वज्रपाणी । प्रसंगीं तये थोर आनंद जाला । नमस्कार केला रघूनायकाला ॥२८॥
जळेशास आज्ञापिलें तेचि काळीं । महा मेघ ते चालिले अंतराळीं । असंभाव्य ते जाहली मेघवृष्टी । तिणें भीजली सर्व ते प्रेतसृष्टी ॥२९॥
कपी रीस ते सर्व आले निमाले । नमस्कारिला राम सैन्यीं मिळाले । कळेना कळा कोण या राघवाची । मनीं कल्पितां हांव पूरे मनाची ॥३०॥
निमाले कपी पावले दिव्य देही । मिळाला रिसां वानरांचा समूहो । सुवेळाचळामाजिं ते भार आले । क्षमारूप तैसेचि सवैं मिळाले ॥३१॥
मिळाले बहू देव कोटयानुकोटी । असंभाव्य दोहीं दळांमाजिं दाटी । मुखें बोलती देव त्या राघवाला । स्तुतीउत्तरीं तोषवीती दयाळा ॥३२॥
प्रसंगोंचि आज्ञा समस्तांस द्यावी । पुन्हां मागुती सर्व चिंता असावी । तुम्ही हो अयोध्यापुरीमाजिं जावें । विलासें बहू राज्य सूखें करावें ॥३३॥
प्रतीउत्तरीं राम बोले समस्तां । म्हणे हो बरें जाइजे शीघ्र आतां । समस्तीं तुम्हीं भूवनामाजिं जावें । विलासें बहू राज्य सूखें करावें ॥३४॥
मुखें बोलतां राम ते देव तोषे । करीं पीटिती टाळिका नामघोषें । नमस्कार केला रघूनायकाला । समस्तां मनीं थोर आनंद जाला ॥३५॥
रवी पावकें काल नैरृत्यनाथें । जळाढयें धनाढयें रघूनायकातें । गुरू अंगिरा देव गंधर्व तेहि । बहू बोलते जाहले सर्व कांहीं ॥३६॥
ऋषी देव गंधर्व सर्वै मिळाले । स्तुतीउत्तरें बोलती शीघ्र जाले । समस्तांसि सन्मानिलें राघवानें । गुणां किन्नरादीक गाती पुराणें ॥३७॥
निरोपेचि त्या चालिल्या देवकोडी । पुढें शीघ्र बीभीषणू हात जोडी । समर्था मला थोर आतां करावें । घडी एक लंकापुरीमाजिं जावेम ॥३८॥
धरावें मनामाजिं देवाधिदेवें । जनीं सेवकालगिं कांहीं घडावें । करावें समर्थें जिणें श्लाघ्य माझें । घडावें महाद्भाग्य हें दास्य तूझें ॥३९॥
प्रतीउत्तरीं राम बोले तयासी । म्हणे धन्य बीभीषणा गूणराशी । प्रसंगें सखा बंधु तूं जोडलासी । पुरेना तुझ संगतीची असोसी ॥४०॥
प्रितीच्या सुखालगिं कैसें वदावें । गुणाच्या गुणाला किती आठवावें । बहूसाल तूं राखिला स्नेहवादू । जनांमाजिं तूं धन्य साधू अगाधू ॥४१॥
स्नेहाळा तुवां आजि ऐसें करावें । पुरीमाजिं त्वां सुग्रिवालगिं न्यावें । विलासें बहूतांपरी सूख द्यावें । कपी ऋक्ष घेऊनि वेगें उठावें ॥४२॥
सखा सुग्रिवासारिखा कोण आहे । मनामाजिं बीभीषणा तूंच पाहे । जिवेंशीं सखा आमुचा साह्य झाला । असंभाव्य हा वीरमेळा मिळाला ॥४३॥
जनीं मैत्रिकी राखिली सुग्रिवानें । बहूसाल हा कष्टला जीव प्राणें । स्वयें देखिलें सांगणें काय तुम्हां । कपी पूजितां पावलें सर्व आम्हां ॥४४॥
पुढें शीघ्र बीभीषणें तेचि काळीं । अती आदरें ठेविलें वाक्य भाळीं । करीं घेतलें प्रीतिनें सुग्रिवाला । म्हणे आजिचा काळ हा धन्य जाला ॥४५॥
समर्था गुणें तूं सखा जोडलासी । तुझा योग हा पार नाहीं सुखासी । कपी ऋक्ष घेऊनि तैसा निघाला । पुढें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला ॥४६॥
जळें निर्भळें सर्व अभ्यंग केलें । अळंकार चीरें कपी तोषवीले । बहूतांपरींचीं सुगंधें फुलेलें । समस्तांसि नाना रसें तृप्त केलें ॥४७॥
रिसां वानरांला पुजा सांग जाली । बहूसाल बीभीषणें स्तूति केली । महावीर विश्रांति पावून तेथें । निघालें पुढें सर्वही राम जेंथें ॥४८॥
सुगंधीं बहू घातल्या पुष्पमाळा । अनीळें सुखें वास नेला भुगोळा । प्रभूला नमस्कार साष्टांग केले । मिळाले कपी ऋक्ष सूखें निवाले ॥४९॥
सभेमाजिं आली बहूसाल शोभा । पुढें राहिला हात जोडोनि ऊभा । प्रसंगी तये राम बीभीषणाला । सुधाउत्तरीं बोलतां शीघ्र जाला ॥५०॥
म्हणे गा विरा त्वां पुरीमाजिं जावें । ध्रुवाचे परी राज्य तेथें करावें । शशी सूर्य तारागणें अंतराळीं । असावें सुखें भोगिजे सर्व काळीं ॥५१॥
पुढें बोलिलें शीघ्र नैरृत्यनाथें । म्हणे वासना पूरवावी समर्थें । प्रभू बोलतां चित्त माझें न राहे । पहावी अयोध्यापुरी वासना हे ॥५२॥
पुरीमाजिं भद्रासनीं तूं नृपाळा । महोत्साह उत्साह पाहेन डोळां । उदारा प्रभू सौख्य पाहेन संगें । निरोपेंचि मी शीघ्र येईन मागें ॥५३॥
सवे घेतलें वीर बीभीषणाला । रघूराज तो वानरेंशीं निघाला । असंभाव्य तो वाद्यकल्लोळ जाला । पुढें सिद्ध केलें महा पुष्पकाल ॥५४॥
नसे तूळणा रत्नमंडीत याना । महीतुल्य त्या आणवीलें विमाना । तयारूढ तो जाहला राम वेगीं । कपी वीर ते आपुल्याला  विभागीं ॥५५॥
विमानावरी रामराजा विराजे । वरी बैसले ते कपी रीस राजे । सुमित्रासूत बैसला सव्यभागीं । जगन्मात सीता तया वामभागीं ॥५६॥
विमानावरी वाजती घंट माळा । खडे घोष हेलावती मुक्तमाळा । समुद्रोदकीं पूर्ण तारूंच जैसें । नभामाजिं तें चालिलें भव्य तैसें ॥५७॥
पुढें चालतां चालतां लागवेगीं । सितेलगिं ते राम सांगे प्रसंगीं । रणामंडळीं आट राक्षेसकूळा । त्रिकूटाचळू दाखवीली सुवेळा ॥५८॥
असंभाव्य पालणिला सेतु जेथें । स्वयें वास दर्भासनीं योग तेथें । स्त्रिया रत्नमंडीत नानाविलासी । समुदातिरीं भटेला तोयराशी ॥५९॥
बळें आगळा वीर वाळी निमाला । दिलें राज्य तेथें कपी सुग्रिवाला । अकस्मात जाली हनूमंत भेटी । तटाकें नद्या दाखवी वीरजेठी ॥६०॥
जटायू पुढें पावला स्वर्गलोकीं । जनस्थान हें रम्य गोदातटाकीं । पुढें चालतां राम राजाधिराजें । तया राहवीलें ऋषी भारद्वाजें ॥६१॥
कपींचीं दळें भूतळीं दाटि जाली । तया भारद्बाजें बहू स्तूति केली । पुढें धाडिले मारुतीलगिं देवें । म्हणे गा विरा भ्रातया भेटवावें ॥६२॥
प्रभू बोलतां वीर तैसा निघाला । तया गूहकानें नमस्कार केला । स्तुती बोलतां तो सभाचार सांगे । नंदीग्राम तो पावला लागवेगें ॥६३॥
कपी देखिला भव्य रामानुजानें । नमस्कार केला तया बांधवानें । कपी भेटला बैसला स्वस्थ जाला । समाचार साकल्य सांगे तयाला ॥६४॥
म्हणे मारुती बांधवाच्या वियोगें ।  पळें भासती तीं किती काळयूगें । महद्भाग्य आलसि येणें प्रसंगीं । रघूनाथ तो भेटवी लागवेगीं ॥६५॥
उदासीन तो बंधु त्या राघवाचा । वदे मारुतीलगिं कारुण्यवाचा । बहू कष्टलों काळ गेला दुखाचा । कधीं राम भेटेल सिंधू सुखाचा ॥६६॥
वृक्षा संपदा राज्य हें काय कीजे । उदासीन या राघवाला नमींजे । पदें भोगिजे तें भदें बाधिजेतें । दिसेंदीस आयुष्य हें व्यर्थ जातें ॥६७॥
कितीएक ते भाग्य भोगून गेले । पुन्हां भागुती मृत्युपंथें निमाले । कितीएक साधू उदासीन जाले । महीमंडळीं लोक सूखें निवाले ॥६८॥
भले जाणती संपदा दु:ख दाती । स्वहीतापरी त्रास होतो नियंती । हरादीक ते तापसी याच लागीं । सदासर्वदा फीरती वीतरागी ॥६९॥
म्हणोनी मला राघवेंवीण कांहीं । सदा सर्वदा वैभवें चाड नाहीं । मला भेटवीं राम आत्मा जगाचा । वदे मारुतीलगिं तो दीन वाचा ॥७०॥
म्हणे मारुती धन्य गा धन्य साधू । महाशक्ति वीरक्ति बोधें अगाधू । नव्हे साधनें भेटि ब्रह्मादिकांला । तुम्हांलगिं भेटीस तो राम आला ॥७१॥
नमस्कार केला तया मारुतीनेम । रजें डौरलें भाळ माहाविरानें । प्रिती लागली अंतरीं ते ढळेना । म्हणे धन्य गा धन्य लीला कळेना ॥७२॥
तया देखतां चित्त सूखें निवालें । मनामाजिं तें थोर आश्चर्य केलें । म्हणे वीर सद्‍भूत वैराग्य कैसें । महाभाग्य हें मानिलें तृण जैसें ॥७३॥
पुढें वीर रामानुजें काय केलें । पुरीमाजिं शत्रूघना पाठवीलें । समस्तां वसिष्टांदिकां जाणवीलें । असंभाव्य तें सैन्य पालाणवीलें ॥७४॥
म्हणे वीर तो राम येईल आतां । सुखी जाहली मुख्य माता समस्तां । प्रसंगें तये थोर आनंद जाला । पुरीमाजिं तो लोक सर्वे मिळाला ॥७५॥
पुढें शीघ्र पालणिले दिव्य घोडे । महीमंडळीं त्यांस नाहींत जोडे । असंभाव्य तीं हिंसती दिव्य घोडीं । उफाळे तयां धांवतां भूमि थोडी ॥७६॥
मुठाळी झुली पाखरा मुक्तमाळा । बहू रत्नमंडीत भासे उफाळा । अळंकार भांगार भंडीत केले । बहूभार शृंगारिले सिद्ध जाले ॥७७॥
गिरीसारिखी चंड वाडें अपारें । बहू मातलीं कुंजरें थोरथोरें । पताका मुली रम्य दिव्यांबरांच्या । बहू रंग लावण्य नानापरींच्या ॥७८॥
महामस्त ते हस्ति भारें निघाले । त्वरे चालतां भव्य सर्वांग डोले । भुमी हाणतां अंदु वाजे खणाणा । बळें वाजती चंड घंटा घणाणा ॥७९॥
हयारूढ ते वीर कीतीक जाले । धडाडीत सेना असंभाव्य चाले । शिबीका बहूसाल सूखासनातें । पताका निशाणें फडाडीत वातें ॥८०॥
महावीर शत्रूघनू लागवेगीं । सुमंतू प्रधानू तया पृष्टभागीं । बहू वाद्य तो घोष गेला दिगंता । ऋषीराज वासिष्ठ त्या मुख्य माता ॥८१॥
पदीं चालिला मुख्य तो योगिबंधु । सवें घेतला मारुती वीर्यसिंधु । महावीर दोघे पुढें शीघ्र आले । असंभाव्य ते भार मागें उदेले ॥८२॥
पुढें राम तेथूनि वेगीं निघाला । महापुष्पकारूढ होऊनि आला । त्वरें पावतां पावतां नंदिग्रामा । कपी वीर तो दाखवी शीघ्र व्योमा ॥८३॥
असंभाव्य तें तेज हेलावताहे । म्हणे गा कपी काय हें येत आहे । तया सांगतो मारुती राम आला । नभामाजिं तो पुष्पकारूड जाला ॥८४॥
पुढें रामभ्राता नमस्कार घाली । सुखाची असंभाव्य ते वेळ आली । तया देखतां सौख्य अद्‍भूत जालें । वरी पाहतां यान सन्नीध आलें ॥८५॥
पुढें देखिला भव्य तो रामयोगी । असंभाव्य सेना तया पृष्ठभागीं । त्वरें चालतां धांवतो रामभ्राता । नव्हे धीर त्या भेटिचा काळ येतां ॥८६॥
बहू रम्य लावण्य कामावतारी । महा वीर दोघे रुपें योगधारी । तया देखतां रोम अंगीं थरारी । मुखें पाहतां सर्व सेना थरारी ॥८७॥
रुपें सारिखे वीर दोघे मिळाले । सुखाचे बहू कंप रोमांच आले । पदीं ठेविला मस्तकू बांधवानें । तया ऊठवीलें त्वरें राघवानें ॥८८॥
स्फुरद्रूप आलिंगनीं वीर गात्रीं । जळें लोटलीं रम्य राजीवनेत्रीं । तया रामरामानुजां भेटि जाली । प्रसंगीं तये सृष्टि सूखें निवाली ॥८९॥
सुमित्रासुता भेटला वीतरागी । नमस्कारिली जानकी ते प्रसंगीं । खुणा दावितां रामराजाधिराजें । कपीनाथ आलिंगिला योगिराजें ॥९०॥
पुढें भेटिचा लाभ नैरृत्यनाथा । पदीं ठेविला शीघ्र येऊनि माथा । तयालगिं रामानुजें ऊठवीलें । समस्तां विरां राघवें भेटवीलें ॥९१॥
प्रितीं भेटला अंगदा जांबुवंता । प्रसंगें कपी थोर थोरां समस्तां । स्तुतीउत्तरीं बोलती एकमेकां । स्नेहे लागला सौख्य जालें अनेकां ॥९२॥
प्रितीनें तया गूहका भक्तराजा । कृपाळूपणें भेटला रामराजा । नमस्कार केला समस्तां विराला । तयां अंतरीं थोर आनंद जाला ॥९३॥
पुढें सर्वही पुष्पकारूढ जाले । दळेंशी महावीर तैसे निघाले । अयोध्यापुरी देखतां सौख्य जालें । प्रसंगें रघूनायकें दाखवीलें ॥९४॥
रुढाच्या मनासारिखें वर्तताहे । महीमंडळीं यान येऊनि राहे । भुमीं ऊतरे रामबंधू सितेशी । कपीनाथ सुग्रीव बीभीषणेंशी ॥९५॥
कपी रीस ते भार कोतयानुकोटी । दिसेना भुमी जाहली थोर दाटी । समर्थें विमानासि त्या पाठवीलें । कुबेरासि भेटावया शीघ्र गेएल ॥९६॥
असंभाव्य तो वाद्यकल्लोळ जाला । कपी पाहतां भार अद्‍भूत आला । रजें व्योम आच्छादिलें सर्व कांहीं । विरां कुंजरां घोडियां मीति नाहीं ॥९७॥
कपी सर्व चाकाटले पाहताती । गिरीचे परी भार अद्‍भूत येती । कपीभार ते देखिल राजभारें । पहाया दळें लोटलीं तीं अपारें ॥९८॥
खुणा दाविती एकमेकांस तेथें । मुखें बोलती राहिला राम येथें । महा वीर ते मुख्य धांवोनि गेले । कपीभार त्यांमाजिं वेगीं मिळाले ॥९९॥
रघूनायकालगिं शत्रूघनामें । नमस्कार केला तया मंत्रियानें । उभा वर्ग ते भेटले राघवाला । तया मानसीं थोर आनंद जाला ॥१००॥
सुमित्रासुता आणि त्या जानकीला । महावीर तींहीं नमस्कार केला । प्रसंगीं समस्तां सिते भेटि जाली । सुखाची नदी अंतरामाजिं आली ॥१०१॥
सुमंतू समर्था म्हणे पैल पाहे । ऋषी जन्ननी मंडळी येत आहे । तयें सांगतां राम तो सिद्ध जाला । पदीं चालतां तो पुढें शीघ्र गेला ॥१०२॥
पुढें देखिला तो ऋषी ब्रह्मनिष्ठ । कुळा रक्षिता तो कुळामाजिं श्रेष्ठ । रघूनाथ तेथें नमस्कार घाली । स्तुतीउत्तरें आदरें भेटि जाली ॥१०३॥
प्रसंगें नमस्कारली मुख्य माता । बहू सौख्य जालें तयां भेटि होतां । समस्तां जणींला नमस्कार केले । तया देखतां प्राण त्यांचे निवाले ॥१०४॥
समस्तांस तो भेटला राम जैसा । यथासांग तो वीर सौमित्र तैसा । नमस्कार घाली बहू स्तूति केली । तया देखतां मंडळी ते निवाली ॥१०५॥
सितासुंदरीनें नमस्कार केले । असंभाव्य ते लोक तेथें मिळाले । स्तुतीउत्तरें एकमेकांस जालीं । प्रसंगीं तये अंतरें तीं निवालीं ॥१०६॥
समस्तां समस्तां जणां भेटि जाली । पहाया सुखें लोकमांदी मिळाली पुरीमाजिं तो थोर आनंद जाला । सुखें बोलती हो सुखें राम आला ॥१०७॥
सुखें पाहतां मुख्य माता मिळाल्या । सवें सुंदरा त्या असंभाव्य आल्या । वधूंची बहू दाटणी थोर जाली । सिता सुंदरी शीघ्र तेथें मिळाली ॥१०८॥
नमस्कारिलें नम्र होऊनि श्रेष्ठां । प्रसंगेचि भेटी वरिष्ठां वरिष्ठां । धडाडां नभीं वाजती चंड भेरी । बहू वारितां जाहली दाटि थोरी ॥१०९॥
महा वैभवाची कथा राघवाची । जुनी सौख्यदातीच ब्रह्मादिकांची । पुढें रामऊपासकें रामदासें । पुरी वर्णिली रम्य नाना विलासें ॥११०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP