मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
वि. ग. जोशी (दिगंबरदास)

दत्तभक्त - वि. ग. जोशी (दिगंबरदास)

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १९१२-१९८९)

हे एक मोठे कर्तबगार व क्रियावान सत्पुरुष अलिकडच्या काळात होऊन गेले. अक्कलकोटचे स्वामी, बीडकर महाराज, स्वामी सहस्रबुद्धे यांच्या परंपरेतील दिगंबरदास यांचा जन्म १९१२ साली कोकणात पोमेंडी या नावाच्या गावी झाला. हे प्रथमपासूनच विरक्त वृत्तीचे होते. शिक्षण अर्धवट सोडून सदुरूच्या शोधात हे लहानपणीच निघाले. बीडकर महाराज आणि बाबा सहस्रबुद्धे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. राष्ट्रप्रेम आणि धर्मश्रद्धा यांची यांना आवड होती. शिवाजीमहाराजांवर यांचे फार प्रेम होते. सहस्रबुद्धे यांच्या मठात यांनी मोठी उपासना केली व लोकांना मार्गदर्शन केले. पुणे येथील समाधिमंदिराचा यांनी कायापालट केला. यांनी खूप द्रव्यांचे दान दान धार्मिक कार्यासाठी केले. कोकणात डेरवण येथे यांनी एक नवीन सुष्टी उभारली. यांचे आचरण मोठे कर्मनिष्ठ होते. स्वामींच्या उत्सवाला यांनीज एक प्रकारचे शिस्तबद्ध वळण लावले. डेरवण येथील वालावलकर यांच्या सहाय्याने एक प्रतिसृष्टी यांनी निर्माण केली. सीतारामबुवा वालावलकर ट्रस्ट स्थापन करून यांनी कार्याला गती दिली. सीतारामबुवांचे समाधिमंदिर यांनी बांधले. गोरगरिबांना खूप मदत केली.

डेरवण येथे पोस्ट ऑफिस, तलाठीचे ऑफिस, दवाखाना, डॉक्टरांचा निवास इत्यादी सोयी यांनी केल्या. विहिरी तयार केल्या. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली. त्यांना वह्या-पुस्तके. दप्तरे, रेनकोट, गणवेश इत्यादी वस्तू पुरविल्या. एक आंगणवाडी तयार केली.

दिगंबरदासांचे हे कार्य फार मोठे आहे. ईश्वरनिष्ठा आणि लोकसेवा यांचे मोठे आकर्षक मिश्रण डेरवण येथे पहावयास मिळते. अनेक जनावरे खरेदी करून यांनी शेती व्यवसायास मार्गदर्शन केले. नळाने पाणी पुरविले. यांची काही स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. शिवप्रभूंचे एक स्मारक उभे करण्याचा त्यांनी डेरवण येथे प्रयत्न केला. अशा रीतीने दीनदुबळ्यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची पूजा त्यांनी मांडली. सन १९८९ मध्ये यांनी समाधी घेतली. त्यांची समाधी पुण्यात बाबामहाराज सहस्रबुद्धे यांच्या समाधीशेजारी आहे.

दिगंबरदास यांची काही स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. विशेषत: त्यांची ‘श्रीरामह्रदय’ या नावाची रचना सांप्रदायिकांत प्रसिद्ध आहे. दिगंबरदासांना आणखीही काही कविता लिहिण्याची स्फूर्ती झाली. सद्‌गुरू मानसपूजा, मनोबोध, ज्योतिर्वद तुळजाभवानी, बाबामहाराज सहस्रबुद्धे यांच्या आरत्या यांनी केलेल्या प्रसिद्ध आहेत. परंतु ‘श्रीरामह्रदय’ हे ९४५ श्लोकांचे प्रकरण फार महत्त्वाचे मानावे लागेल. दिगंबरदासांना अनेक पक्ष्यांचे व प्राणिमात्रांचे प्रेम होते. याची साक्ष डेरवणच्या निसर्गात मिळते.

दिगंबरदास यांचे उत्तराधिकारी म्हणून श्री. काकामहाराज (अशोकराव जोशी) हे काम पहातात. दिगंबरदासांची परंपरा समग्र अशा स्वरूपात ‘तूंचि बाप, धनी’ या एका ग्रंथात नुकतीच आली आहे. यात दिगंबरदासांचे सर्व चरित्र, त्यांचा पत्रव्यवहार, त्यांची वाङमय व त्यांचे अनेक पत्रे इत्यादी सामग्री आली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP