मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
अक्कलकोटचे स्वामी

दत्तभक्त - अक्कलकोटचे स्वामी

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(समाधी, सन १८७८)

श्रीअक्कलकोटच्या स्वामींचे भक्त त्यांस श्रीदत्ताचा चवथा अवतार असे मानतात. पण स्वामींचा जन्म केव्हा, कोठे झाला? त्यांचे आईबाप कोण? त्यांचे पूर्वाश्रमीचे वृत्त काय? त्यांनी साधन कोणते केले? त्यांचे गुरू कोण? दीक्षा कधी व कोणापासून घेतली? त्यांस इतके वैराग्य कशाने प्राप्त झाले? वगैरेसंबंधी काहीच पत्ता कोणासही लागला नाही. ते जेव्हा प्रकट झाले. तेव्हा त्यांचे वय किती असावे, याबद्‍दलही विलक्षण समजुती होत्या. त्यांचे वय चारशे किंवा पाचशे वर्षांचे आहे. असे लोक म्हणत. ते बाराव्या शतकाचे आरंभी जन्मले असा एका भक्ताला दृष्टांत झाल्याचे ऐकिवात आहे.

एकदा कलकलत्त्याचे एक इंग्रज बँरिस्टर व एक पारशी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले असता “आपण येथे कोठून आलात?” असा साहेबांनी भीत भीत त्यांस प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असे :--- “प्रथम आम्ही कर्दलीवनातून (हिमालय) निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बंगाल देश हिंडुन कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगातटाकाने फिरत फिरत हरिदवार व केदारेश्वर पाहिले. (पुढे स्वामींनी गावांची व तीर्थक्षेत्रांची शेकडो नावे घेतली.) पुढे गोदातटाक हिंडत हिंडत दक्षिण हैद्राबादेस गेले. तेथून मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ. सोलापूर अशा गावी रहात रहात अक्कलकोटास आलो.”

“अक्कलसे खुदा पछानना” हया बोधवचनाची लोकांना स्मृती रहावी म्हणून की काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले. असा कोटीक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात. एकदा कोणी एक मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन “क्यों जी, ये अक्कलकोटके स्वामीं कहॉ है?” असे विचारले. तेव्हा त्यास स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर केले ‘स्वामी बैठे. पर, स्वामी तो अक्कलकोटमें है, हया क्या देखता है?” या स्वामींच्या उत्तराने तो सैय्यद समजावयाचे ते समजून एकदम तटस्थ झाला ! घटकाभर त्याची उभ्या उभ्याच समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले. त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व आजपर्यंत अनेक साधने केली; पण हा आनंदानुभव मिळाला नाही. अनेक अवलियांस यापूर्वीही पाहिले. पण आज साक्षात्‌ खुदाचेच दर्शन झाले. “आरे उसी लिये अक्कलके अंदर हरदेमें साहेबकू सच्चा देख लिया, सब जनमका सार्थक हुआ, पलखमें दरया माफक हो गया. किस्मतकी बात है मैं आपका बंदा हूँ,” इत्यादी धन्योद्‌गार काधले. यावरून श्रीगुरूंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा प्रज्ञापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले.

अक्कलकोटास राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी रहात असत. तेथे येणार्‍या एका गुराख्याच्या पोराला तुझ्या गावात येऊ का? असे स्वामी विचारीत. दोन दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही. तिसरे दिवशी तो या म्हणाला. तसे स्वामी गावात गेले. याप्रमाणे अक्कलकोटात श्रीगुरूंची ओळख प्रथम गुराख्याच्या मुलाशी झाली. अक्कलकोटास आल्यानंतरचेच स्वामींचे चरित्र उपलब्ध आहे. त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही. एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्य भक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी असता वसंतऋतूतील एका मध्यरात्री आगंणात पहुडलेले होते. तेव्हा स्वामींना गाण्याची लहर लागली. व “गोरे रूप तुझें तुजला पाहिलें सात ताल माडीवर ॥” ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली. ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले, “महाराज, आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते. आपली जात कोण, आईबाप कोण?” स्वामींनी चटकन्‌ उत्तर केले की, “आमची जात चांभार, आई महारीण व बाप महार आहे.” असे म्हणून महाराज पोट धरधरून मोठयाने हसू लागले.

अक्कलकोटास एक म्हातारी सोनारीण वेडसर दिसे. पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे. एकदा तिच्या देखत महाराजांस एका कलापाने प्रश्न विचारला, “स्वामिन्‌. आपण कोण आहा?” त्यावेळी श्रीसमर्थ म्हणाले ‘मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर.’ हे ऐकून ती म्हातारी म्हणाली-“वटपत्र शयानी मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत.” नंतर कोणी एक कर्वे यांनी विचारले. “हे महाराजांचे सत्यार्थरूपवचन आहे काय? परंतु आपली ज्ञाती कोण?” समर्थ म्हणाले- “आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र, आमची मीन राशी;पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस ! पण काय रे, तुझी फक्कड मुलगी पुण्यास रात्रंदिवस फिरते तिची ज्ञाती कोण?” हे ऐकून प्रश्न विचारणारा गृहस्थ ढेकळासारखा विरघळला !

रावसाहेव मुळेकर यांनी लिहिलेल्या चरित्रात पुढील हकीकत दिली आहे :--- उत्तर हिंदुस्थानात श्रीभागीरथीचे उत्तरेस मोठे अरण्य आहे; तेथे योगी लोक तपश्चर्या करितात. त्या वनातील एका वारूळात स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता एक लाकूडतोडया लाकडे तोडीत तोडीत महाराजांच्या वारूळाजवळ आला. त्याने लाकूड तोडण्याच्या हेतूने कुर्‍हाडीचे घाव वारूळावर घातले. ते महाराजांच्या मांडीस लागले. ते वण पुढे स्वामींच्या मांडीवर दिसत व ते श्रीवत्सलांछनाप्रमाणे महाराजांस शोभा देत. लाकूडतोडयाने एका अर्थी जगावर उपकारच केला. कारण श्रीस्वामीमहाराजांसारखे अमोल रत्न त्याने जगास दृग्गोचर करून दिले. असो. तेथून महाराज निघाले, ते श्रीकाशीक्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रगट झाले. पुढे महाराज गंगोत्रीस जाऊन काही दिवस राहिले. नंतर यतिराज देवलग्रामास जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. ब्रह्महत्यादी पापे पादुकांच्या दर्शनाने नाहींशी होतात, असा त्या स्थानाचा महिमा आहे. तदनंतर महाराज हे मोगलाईत जाऊन राहिले. तेथे राजूरगावी मठ स्थापन करून त्यास आठ गावची जहागीर सरकारातून मिळवून शिष्यांकडे मठ सोपवून देऊन महाराज पुढे चालते झाले. त्यावेळी महाराज चंचलभारती नावाने प्रसिद्ध होते. महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी (लालभारती) महाराजांजवळ आले होते. ते जहागिरीसंबंधी काही लढा पडल्यामुळे मूळ संपादक जे स्वामीमहाराज ‘चंचलभारती’ त्यांची आज्ञा घेण्यास आले होते. सरकारातून असा हुकूम झाला झाला होता की, मूळ संपादकाच्या सहीचा लेख बैराग्यांनी आणावा; म्हणजे त्याप्रमाणे तक्रारीचा निकाल होईल. महाराजांनी त्यास आपल्या सहीचा लेख दिला नाही. स्वामी लालभारतीस म्हणाले-‘कोणी गुरु नसे आणि चेला । अहंब्रह्मात्मा सनातन संपूर्ण एकला ॥’ (गुरुलीला) पुढे महाराज रामेश्वरास गेले. तेथून उडुपी क्षेत्रास जाऊन त्यांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. पुढे ते पंढरपुरास आले व श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन दामाजीच्या मंगळवेढयास प्रसिद्ध झाले. ‘श्रीविठ्ठल आपला सखा आहे, असे स्वामी अक्कलकोटास आल्यावर हमेशा म्हणत असत. “पंढरीचे लोकां । किती मारूं हाका । तेथें माझा सखा पांडुरंग ॥” याप्रमाणे अभंग स्वामी हमेशा म्हणत असत.

स्वामींचे परम नि:सीम भक्त मुंबईचे हरिभाऊ ऊर्फ स्वामीसुत यांचे म्हणणे स्वामींचा जन्म हस्तिनापुरानजीक छेलीखेडी ग्रामी चैत्र शुद्ध द्वितीयेस झाला; त्याप्रमाणे सदर मितीस मुंबईच्या मठात महाराजांचा उत्सव होतो.

दुसरे एक स्वामिभक्त माधवशास्त्री हे अपल्या संस्कृत चरित्रात असे म्हणतात की, मच्छ कच्छ आदिकरून अवतारांचे जन्मनिर्याण आपणांस ठाऊक आहेत. पण श्रीगुरू कोठून आले, कोठे जन्मले, हे काहीच कळत नाही, तथापि स्वामिभक्तांचा एकंदर अभिप्राय असा दिसतो की, गुरुचरित्राच्या एकावन्नाव्या अध्यायात श्रीनृसिंहसरस्वती हे गाणगापुराहून निघून कर्दलीवनात जाऊन गुप्त झाले, तेच पुढे अक्कलकोटास येऊन प्रगट झाले. ‘द्दत्तात्रेय श्रीगुरु गिरिनारीं ॥ जगतासि भरंवसा सर्वदा भारी ॥ ते परमात्मा ध्वजाधारी ॥ प्रज्ञापुरीं वसताती ॥३५॥’
असे ब्रह्मनिष्ठ वामनबोवा-स्वामींचे एक पट्टशिष्ट म्हणतात. स्वामी अक्कलकोटास शके १७७९ आश्विन शु. ५ बुधवार रोजी आले. ते प्रथम आले ते बुधवार पेठेत खंडेरायाच्या देवळाच्या ओटयावर येऊन बसले. पुढे अक्कलकोटचे मालोजी राजे दर्शनास आले, तेव्हा आपल्या भगव्या वस्त्रांचा बोळा करून स्वामींनी त्यांच्या अंगावर फेकला. हा कोण वेडा आला? म्हणून त्यांची चेष्टा करण्याच्या हेतूने अहमदअल्ली नामक एका रिसालदाराने त्यांना न पेटवलेलीच चिलीम ओढण्यास दिली. स्वामींनी पहिल्या दमछाटीत चिलीम पेटविली ! अशा रीतीने लोकांचे लक्ष त्यांचेकडे वेधत गेले. पुढे चोळाप्पा नामक एका गरीब कुटुंबवत्सल गृहस्थाच्या घरी ते गेले. बहुत काळची ओळख असावी, अशा रीतीने त्यांनी त्यास आलिंगन दिले. धर्मसंस्थापनेसाठी व तुझे ऋण फेडण्यासाठी आलो आहे, असे ते त्यास म्हणाले, व पुढे अखेरपर्यंत त्याच्या येथेच राहिले.

स्वामी अक्कलकोटास प्रगट होण्यापूर्वी त्यांस अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलेले असल्याचे आढळून आले. ते अक्कलकोटास येऊन राहिल्यावरही त्यांचा संचार एकाच वेळी अनेक ठिकाणी होत असे.

स्वामींची वृत्ती पाहिली तर ती श्रीनृसिंहसरस्वतींच्या वृत्तीपेक्षा पूर्वीच्या क्रमांकांत वर्णिलेल्या कित्येक दत्तावतारांशी अधिक जुळतेशी दिसते. चरित्रकार भागवत लिहितात, ‘महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे, त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाचवृत्ती म्हणत. प्रात:काळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यासधर्मास योग्य असा प्रात:स्नानादिक जप, तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काहीएक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसर्‍याच्या हाताने सर्व कारभार होत असे, महाराजांस स्नान दुसर्‍याने घालावे, परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास. महाराजांस जेवण दुसर्‍यांनीच घालावे. परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास. महाराजांच्या अंगावर पांघरूण दुसर्‍यांनीच घालावे. परंतु ते अंगावर असावे असे त्यांस वाटल्यास. महाराजांनी चाहील त्या ठिकाणी जावे, ती जागा मग राजाचा रंगमहाल असो, अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा कोणी नसे. महाराज चारील त्याच्या हातचे अन्न खात असत. परंतु महाराज  अधर्मी होते, अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराज कधी कधी दिवसातून दोन दोनदा स्नाने करीत. केशराच्या व चंदनाच्या उटया अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी आठ आठ दिवस स्नानच करीत नसत. कोणास न कळत एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन रहात. महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाच्यानेही चालवत नसे. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत. हुक्का ओढू लागले, म्हणजे एकसारखा हुक्काच ओढीत बसत. लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा. एखादे वेळी स्वारी रागावली, म्हणजे सात सात दिवस त्यांचा रागच हालू नये. आनंदात स्वारी असली, म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे. अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खर्‍या पारख्यावाचून कोणालाच झाली नाही.’

सिद्धपुरुष वर्णाश्रमधर्मातीत असतात, त्यांची वृत्ती बालोन्मत्तपिशाचवत्‌ असते, असे म्हणतात. ती स्वामींच्या ठिकाणी हरघडी दिसून येई. स्वामींस खेळण्याकरता गहू, हरभरे, राळ, लाख, वाटाणे, मसूर वगैरे सर्व प्रकारची धान्ये लागत. तसेच अक्रोड. बदाम,  खारका हेही पदार्थ ठेवावे लागत. बिनबुडाची मापटी किंवा देवांच्या पितळी पोकळ मूर्ती घेऊन त्यांत धान्य भरावे व ओतावे असे त्यांचे काहीतरी चाळे चालत. तसेच एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांस त्यांची एक सेवेकरीण सुंदराबाई हिने भरवावे, न्हाऊ घालावे, नेसवावे, इतकेच काय पण बहिर्दिशेसही न्यावे, अशी त्यांची बालवृत्ती असे.

त्यांच्या ठिकाणी लोह आणि कांचन, राख आणि पाक, मंगल आणि अमंगल, सोवळे आणि ओवळे, जात आणि पात, विटाळ आणि चांडाळ हा जरी भेद नव्हता, तरी ते काही एखाद्या अघोरी पंथातील किळस उत्पन्न करणारे अशुची असे पुरुष नव्हते. त्यांचे नित्य कर्म दुसर्‍यांना दिसण्यासारखे नव्हते. ते दोनच आचमने काय ती घेत. पण काहीच करीत नसत म्हणावे तर ते रात्रीही फारसे निजत नसत. रात्रीचे भजनही करीत. सर्व कर्मांत स्नानाची एखाद्या गजराजाप्रमाणे त्यास विशेष आवड दिसे. त्यांची कांती अत्यंत तेज:पुंज असे. भागवत लिहितात की, “चर्मचक्षूंना सहन न होण्यासारखे जरी महाराजांचे तेज होते, तरी भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याकरता ते सौम्य तेज प्रगट करीत असत. अशी सौम्य व तेज:पुंज मूर्ती पहाण्य़ाबरोबर कोणाचेही मन हया मूर्तीला सोडून जाण्याविषयी प्रवृत्त होत नसे. चेहरा मोठा भव्य, आकर्ण नेत्र, सरळ नाक, विशाल कपाळ, आजानुबाहू व कांती लिंबासारखी सतेज असून फारच नाजुक असे. हे शरीरावयव व त्यांचा तो नाजूक आणि भव्यपणा पहाण्याबरोबरच समाधान वाटण्यासारखे होते. अशी अवयवरचना व तेज:पुंज कांती अन्य ठिकाणी दृष्टीस पडत नाही.” वामनबोवा स्वामींच्या ध्यानाचे वर्णन करतात-‘रक्तशामलांग प्रसन्नवदन । वक्ष विशाल कंबुग्रीवासम शोभायमान ॥ चंपकवत्‌, नासा कमलदलनयय ॥ आजानुबाहू सरल शोभती ॥७४॥
सुकुमार जन्म जरारहित ॥ सुपाद स्वंगुली सुजंघ निराजित ॥ सुनाभी शुभ ऊरू शुभलिंग सहित ॥ आच्छादित कौपीन वस्त्रें ॥७५॥
सुपार्श्व जघनोत्तम विशाल ॥ महास्कंद शोभती कोमल ॥ दीर्घ पृष्ठोत्थ सर्वदां निश्चल ॥ सुहस्तरेखा लक्ष्मीवान्‌ साजती ॥७६॥
बिंबोष्ठ स्वच्छ शुभदंत झळखती ॥ विद्युज्जिव्ह सुतालक शोभती ॥ दीर्घ चंपक नासा सतेज ती ॥ प्रकाशती सुकपोल सुकर्ण ते ॥७७॥
मीलितोन्मीलित नेत्र शुभ्र विशाल । सुभ्रुमध्य कोमल ॥ सुंदर दिव्य प्रकाशित भाल ॥ भस्म सुगंधयुक्त तें ॥७८॥
कंठीं रुद्राक्ष तुलसी माला स्फटिक ॥ विलसतसे हेमयुक्त मुक्त प्रवाळक ॥ कर्णी चार चार कुंडलरूप अमोलिक ॥ ऐसें अलौकिक ध्यान पाहुनि ॥७९॥’

तात्पर्य, महाराजांच्या ठिकाणी सारी द्वंद्वे सामावलेली दिसत. ते कधी मसणवटीत, तर कधी खासबागेत, कधी म्हारवाडयात तर कधी राजवाडयाते, कधी निवडुंगाच्या काटयांवर, तर कधी पलंगावर, कधी मंदिरात, तर कधी मठात, यांप्रमाणे सारख्याच भावनेने वावरत असत.

“सहज स्वारी बाहेर निघाली की, सर्व राजचिन्हांनी मंडित दिसावी. छत्रचामरे, पालख्या, म्याने, घोडे, गाडया, गाई, म्हशी इत्यादी खिल्लारे, तंबू, कनाती, नगारखाने, वाजंत्री, रणवाद्ये व सेवेकरी व यात्रेकरी लोकांच्या फलटणी, त्याचप्रमाणे पुराणिक, हरिदास, गवय्ये, कलावंतिणी, तमासगीर, नाटकवाले त्याप्रमाणे फुलवाले, फुलारी, मिठाईवाले व सर्व प्रकारचे दुकानदार बरोबर आहेतच. मग महाराज एखादे वेळी जंगलात का वस्तीला जात ना, बरोबर हा इतका सरंजाम असावयाचाच.”

अशा या लोकोत्तर पुरुषाची खरी योग्यता जाणण्यास अंगी तशीच पात्रता पाहिजे, एरव्ही लक्षावधी लोक स्वामींच्या दर्शनास येत असत. हिंदुस्थानाच्या चारी टोकांकडील व सार्‍या धर्मांतील लोक स्वामींच्या दर्शनास येत असत. शिंद, होळकर, गायकवाड, भोसले असे संस्थानिक त्यांच्या भजनी होते. युरोपियन बंडगार्डन, पारशी नवरोजी शेट, मुसलमान सय्यद आणि अहमदअल्ली रिसालदार,  त्याचप्रमाणे जैन, लिंगायत, वैष्णव, वारकरी, संन्यासी सुधारक, सनातनी, शास्त्री, हरिदास अशा अनेकांनी त्यांच्या पायी आपले मस्तक नमविले. वारंवार होणार्‍या चमत्कारांनी महाराज सर्वज्ञ आहेत व ते सर्वशक्तिमान आहेत, अशीही आर्त जीवांची खात्री झाली. आपद‌ग्रस्त लोकांनी तर त्यांची पाठ पुरविली व आपआपली संकटे निवारण करून घेतली. पण हे जरी सारी घडले तरी त्यांची खरी पारख फारच थोडयांना झाली असेल असेच त्यांचे चरित्रकार म्हणतात.

एकीकडे त्यांच्या सेवेत तत्पर असलेले चोळाप्पा आणि बाळाप्पा, सुंदराबाई आणि काकुबाई, मालोजी आणि दादाजी भोसले, सबनीसबाबा आणि मराठेबाबा, बाळकृष्ण आणि कृष्णाप्पा, टोळ आणि कानफाटे, तसेच एकीकडे स्वामींच्या सर्वज्ञतेची अंतरी चुणूक मिळाल्यामुळे हतगर्व झालेले माटेबुवा आणि विष्णुबुवा (ब्रह्मचारी), रामशास्त्री आणि माधवशास्त्री. त्यांनी स्वामींचे अनेक चमत्कार पाहिल्यामुळे त्यांना सर्वज्ञ दत्तावतार असेही त्यांनी मानले असेल. पण त्यांची खरी योग्यता ज्यांनी जाणली ते आळंदीचे नृसिंहसरस्वती व यशवंतराव भोसेकर देवमामलेदार, मंगळवेढयाचे बाळकृष्णबोवा आणि हुमनाबादचे माणिकप्रभू, असे संतच खरे होते.

त्यांच्या दर्शनास येणारे लोकांत अंत्यज आणि मुसलमान, साळी आणि कोळी, वेश्या आणि जारिणी, मुके आणि शब्दपंडित, अडाणी आणि षडशास्त्री असे सर्व दर्जांचे लोक येत असत. तथापि कोणी मनुष्य कोणत्याही विषयात किती निष्णात असला तरी आपणांपेक्षा स्वामी किती तरी श्रेष्ठ आहेत, अशी छाप त्यांच्या मनावर प्रथमच बसून जाई मग स्वामींनी किती कठोर भाषण केले, चारचौघांत आपले भलतेच बिंग फोडून छी: थू केली, तरी ती छाप दूर होत नसे आणि अशा त्यांच्या जाळ्यात सापडलेल्या माणसांत कोणी कितीही पापी असला, तरी तो पश्चात्तापपूर्वक शरण आल्यास, त्यावर दय करून ते सुधारणेच्या मार्गास लावीत. कोणामध्ये कितीही अवगुण असेना, त्याच्यामध्ये जर एखादा गुणही असेल, तर तोही स्वामींच्या कृपेस पात्र होई.

स्वामींनी चोळाप्पाचे दारिद्रय दूर करून त्यास परमार्थास लावले. तसेच त्यांनी गुरुभक्तांची नौबत अक्कलकोटासच काय पण मुंबई, पुणे अशा मोठमोठया शहरी वाजती केली. मुंबईच्या ठाकूरद्वारचे हरिभाऊ ऊर्फ स्वामीसुत, पुण्याचे काळेबोवा व बडोद्याचे वामनबोवा या त्यांच्या सच्छिंष्यांनी त्यांची परंपरा चालू ठेवली. ब्रह्मनिष्ठ वामनबोवा एकदा प्रकृतीच्या अस्वास्थ्याने वैतागून बडोद्याचे सुरसागरात प्राणत्याग करण्यास तयार झाले होते. पण ते उडी टाकणार इतक्यात सर्वसाक्षी श्रीस्वामीमहाराजांनी तेथे प्रगट होऊन त्यांचा हात धरला व त्यांच्या श्रीमुखात लगावून सांगितले, की, देहारब्ध कर्माचा क्षय होईपर्यंत जातोस कोठे? “मूर्खा सहजसमाधि सोडून । जलसमाधि घेतोसि त्रासून ॥ हेंच कळलें काय ब्रह्मज्ञान । प्राणत्याग करावा क्लेशानें ।”

शके १७७९ आश्विन श. ५ बुधवारी स्वामी प्रथम अक्कलकोटात आले. त्यांच्या विक्षिप्त वृत्तीमुळे ते साधू आहेत असे प्रथम फारसे कोणाच्या लक्षात आले नाही. चिंतोपंत टोळ यास मात्र माणिकप्रभूंनी तसे स्पष्ट सांगितले होते. माणिकप्रभूंच्या पश्चात्‌ स्वामी अधिक उघड रीतीने प्रसिद्धीस आले. त्यांच्या आयुष्याचे माप कोणी कसे करावे? पण लौकिकदृष्टया सुमारे वीस वर्षे अक्कलकोटास प्रसिद्धपणे राहून त्यांनी अखिल महाराष्ट्रात गुरुसंप्रदाय दृढमूल केला. अखेर कालगतीप्रमाणे दुर्निवार असा त्यांचाही निर्याणाचा समय प्राप्त झाला ! महाराजांच्या अंतकाली त्यांच्या सांप्रदायिकांनी शास्त्रीमंडळीस बोलावून संकल्पपूर्वक त्यांच्याकडून प्रायश्चित्ते करविली. त्याचवेळी महाराजांनी मोठया उत्साहाने प्रत्येक संकल्प स्वमुखाने उच्चारून दानधर्म केला. आणि वेदोक्त मंत्र म्हणण्याविषयी शास्त्रीमंडळीस महाराजांनी आज्ञा केली. नंतर त्यांनी आपल्या अंगावरील बहुमोल जरीची शाल तिचा एक पदर भिजवून संकल्पूर्वक रामाचार्य यास दिली. शके १८०० चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी दुपारी महाराजांचे आश्रमातील सर्व गुरे व घोडी महाराजांनी आपल्या पुढे आणविली व त्यांस त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य खावयास दिले ! आपली सर्व वस्त्रे जनावरांच्या अंगावर घालण्यास सांगितली. त्यांचा आवाज खोल जात चालला असे पाहून एका सच्छिष्याने आम्हांस आता आज्ञा काय म्हणून विचारता, स्वामींनी ‘अनन्याश्चिंतयंतो मां ये जना: पर्युपासते ॥ तेषां नित्याभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यहमं‌ ॥’ असे म्हणून दाखविले. ते डाव्या कुशीवर कलंडले  होते, ते उजव्या कुशीवर वळले व आपल्याला बसवा अशी त्यांनी सूचना केली. सेवकांनी त्यांस बसते केले. महाराज बसले आणि निजानंदी निमग्न झाले. ह्याप्रमाणे स्वामींनी कर्जाळकरांच्या वाडयात वडाखाली ज्या स्थळी देह ठेवला, तेथे लहानसे देऊळ बांधून त्यात महाराजांच्या नेहमीच्या पायांतील पादुकांची स्थापना केली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP