मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
नारायण महाराज जालवणकर

दत्तभक्त - नारायण महाराज जालवणकर

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८०७-१८६७)

श्रीनारायणमहाराज जालवणकर यांचा जन्म झाशीनजीक जालवण म्हणून गाव आह तेथे झाला. यांचे वडील तात्या पुराणीक यांनी सत्पुत्रप्राप्तीच्या कामनेने श्रीमद्‌भागवताची शंभर पारायणे केली व त्या तपाच्या प्रभावानेच हया पुरुषाने त्यांच्या पोटी जन्म घेटला. हे ऋग्वेदी देशस्थ ब्राहमण. श्रीनारायणमहाराज एक वर्षाचे असतानाच त्यांची माता ब्रह्मरूप झाली व त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा प्रतिपाळ केला. वडिलांनी त्यांच्या वयाच्या ८ व्या वर्षी त्याची मौंज केली व १० व्या वर्षी लग्न करून दिले. परमार्थाची परमप्रीती हा यांचा उपजत धर्म होता. अनेक जन्मसंसिद्ध अशा महापुरुषांच्या उदयात भगवत्प्रीती स्वभावसिद्ध असते, ती त्यांना बाहेरून शिकावी लागत नाही.

पूर्वसंस्कारबलाने नारायणास बालपणापासून देवाचे वेड लागले. नारायण पाच वर्षांचा होताच तासचे तास फडताळात जाऊन डोळे मिटून बसे, व ‘येथे बसून काय करितोस?’ असे आजीने विचारले म्हणजे मी ‘देव पहात होतो’ असे उत्तर तो देत असे ! विवाहोत्तर वैराग्यलाभ होऊन हे घराबाहेर पडले. मथुरेस गोवर्धनबाबा नावाचे हठयोगी होते, त्यांच्यापाशी ते हठयोग शिकले, व त्यांनीच यांना ध्यानोपासनादी मार्ग दाखवून दिला. चार वर्षे तेथे राहिल्यावर व अभ्यास यथासांग केल्यावरही ‘समाधान झाले नाही’ असे त्यांनी गोवर्धनबाबांस निर्भयपणे सांगितले, तेव्हा ‘श्रीदत्त दर्शन होईल तेव्हाच तुझे समाधान होईल’ असे त्यांनी उत्तर केले.

यानंतर बापाच्या बोलण्यावरून हे दोन वर्षे पुन्हा घरी जालवणास गेले. तेथे त्यांस एक पुत्र झाला. पण पुत्र व त्याची माता दोघेही आठ दिवसांतच निवर्तल्यामुळे ते संसारपाशातून मोकळे. झाले. नारायणमहाराज यानंतर गिरनार पर्वतावर गेले व तेथे त्यांनी श्रीदत्ताची उपासना मनोभावे केली. त्यांचे कडक अनुष्ठान व तीव्र भक्ती पाहून श्रीदत्त प्रसन्न झाले. १४ दिवस अन्नपाणी वर्ज्य करून श्रीदत्तदर्शनासाठी ते धरणे धरून बसले, व धावे करून दत्तदर्शन होत नाही असे पाहून ते निराश झाले व १४ व्या दिवशी पर्वताच्या कडयावर उभे राहून देहत्यागाचा त्यांनी संकल्प केला; इतक्यात श्रीदत्त साक्षात प्रगट झाले. ‘मुला ! हे काय करितोस?’ या प्रश्नास ‘श्रीदत्तात्रेय भेटत नाहीत म्हणून देहत्याग करितो’ असे त्यांनी उत्तर केले. ‘नुसत्या स्थूल देहाच्या त्यागाने दत्त भेटतील काय? या प्रश्नास ‘मला हा देह नकोसा झाला आहे’ असे त्यांनी उत्तर केले. मग श्रीद्त्तांनीही हात धरून त्यास गुंफेत नेले व निजरूप दाखवून समाधान केले. चारी देहांचे निरसन होऊन नारायण नारायणरूप झाले. साक्षात्‌ श्रीदत्तांनी त्यांस ब्रह्मविद्येचा बोध केला; तेव्हा ते कृतकृत्य झाले. गिरनार पर्वतावर निरंजनस्वामी म्हणून एक दत्तभक्त होते. त्यांचाही त्यांस सहवास झाला. तेथे चार वर्षे राहून श्रदत्ताज्ञेने ते लोकोद्धारार्थ बाहेर पडले.

त्यांनी दक्षिणोत्तर सर्व तीर्थक्षेत्रांच्या यात्रा केल्या व जेथे जेथे संसारतप्त जीव शरण आले तेथे तेथे त्यांनी ब्रहमोपदेश करून त्यांचा उद्धार केला. काही संन्यासीही शरण आल्यामुळे त्यांच्यासाठी त्यांनी परमहंसदीक्षा घेतली. काही काळ ते ब्रहमावर्तास राहिले; हरिद्वार, ग्वाल्हेर, काशी येथेही राहिले. त्यांचे शिष्य धार, देवास, इंदोर, बडोदा, झांसी, काशी इकडेच अधिक होते.

महाराजांचे काही चमत्कारही प्रसिद्ध आहेत. ते ब्रहमावर्तास असताना तेथे शिष्यमंडळी पुष्कळ झाली. नित्य श्रवणास इतर लोकही जमत. तेथे महादेव आपटे नावाचा एक कुतर्की ब्राह्मण महाराजांची पाठीमागे खूप निंदा करीत असे. एके दिवशी तो महाराजांचा पोशाख अंगावर घालून आरशात तोंड पहात बसला होता, तोच महाराज तेथे आले. ते म्हणाले. ‘महादेवा!तू उन्मत्तपणाने निंदा करितोस, पण मुका होशील व तुझा हा देह निरुपयोगी होईल!’ सत्पुरुषांची वाचासिद्धी अमोघ असते; महादेव लगेच मुका झाला. पुढे तो शरण आला व पुनरपी कोणाचीच निंदा न करिता वाणी नामस्मरणाला वाहीन असे त्याने कबूल केले. तेव्हा त्याला पुन्हा वाचा आली. महाराज रात्री गंगातीरावर चौरंगावर बसून ध्यानस्थ होत. ते दर मार्गशीर्ष पौर्णिमेस श्रीदत्तजयंतीचा उत्सव करीत, त्यावेळी दहापाच हजार पान होत असे. महाराजांची सिष्यीण बाळाबाई एकनिष्ठ उपासक होती. तिला महाराजांनी हरिद्वारास जातेवेळी पादुका दिल्या. त्या ग्वाल्हेरीस त्यांच्या घरी (आप्पा कानडयाच्या बाजारात बक्षी यांचे शेजारी) आहेत. महाराज धौम्यारण्यात बारा वर्षे एकांतात राहिले. तेथे असताना ते जेवीत नसत. धारच्या राजाने महाराजांचा उपदेश घेतला. राजाची भक्ती पाहून त्यांनी त्यास बोधामृत पाजले. राजाने महाराजांची पूजा केली व त्यांवर मोहोरांचा अभिषेक केला व पुष्कळ जवाहीर अर्पण केले. महाराजांनी नंतर ते शिष्यमंडळीस देऊन टाकले. महाराजांस काशीस ‘चिमटेबोवा’ म्हणत. अंगावर भगवे वस्त्र, पायात पादुका, पायापर्यंत लोंबणारे रेशमी वस्त्र, हातात चिमटा, बोटात आंगठया, कपाळास केशरी गंध व मध्ये दोन लाल टिळे. लहानशी दाढी, असा त्यांचा थाट असे. त्यांच्या शिष्यांत रत्नागिरी येथील नारायणबाबा, कल्याण येथील सखारामबाबा, मुंबई येथील राधाकृष्ण तोरणे, इंदूर येथील लक्ष्मणबाबा, इ. मंडळी कृतकार्य झालेली होती. लक्ष्मण महाराजांचा मठ इंदूर येथे आहे. त्यांचे शिष्य बलभीमबोवा साडेकर हे पुढे प्रसिद्धीस आले.

यांचे ग्रंथ अलीकडेच त्यांच्या योग्यतेच्या मानाने प्रसिद्धीस आलेले आहेत. यांची वाणी अत्यंत प्रासादिक आहे हे काही सांगावयास नको. यांची अष्टके, पंचके व श्लोक बरेच प्रसिद्ध आहेत. यांची दहाबारा अस्सल पदे मुमुक्षुत प्रसिद्ध झाली आहेत. ‘विसरू कसा मी गुरुपादुकांना’ हे यांचे ‘गुरुपादुकाष्टक’व ‘सुविचारमाला’ यांची ओळख महाराष्टाला झालीच आहे.

१) संसारी असतां प्रवाहपतितद्वंद्वांसी त्रासूं नको ।
२) भूलोकांत महाप्रसंग पडतां तूं सत्त्व सोडूं नको ।

इ. सुविचारमालेतली. मौक्तिके अनमोल आहेत. अभंगांपैकी एक दोन देतो :---

१. संतचरणतीर्थी करीन आंघोळी ।
औसे वनमाळी करी मज ॥१॥
संतचरणजांमाजीं मी लोळेन ।
औसें नारायण करी मज ॥२॥
म्हणे नारायण गुरु निरंजन ।
दास म्हणवीन संतांचा मी ॥३॥

२. तुझे हातीं दिले हात ।
नको करूं माझा घात ॥१॥
तुझे पायीं माथा ।
ठेवियेला सद्‌गुरुनाथा ॥२॥
कैसा तरी तुझा । अंगीकार करी माझा ॥३॥
भेट देई नारायणा । दत्तदेवा निरंजना ॥४॥

‘बोघाष्टका’त महाराज उपदेश करितात :---

तूतें देह नसे शुभाशुभ कदा तत्कर्म तेंही नसे ।
ऐसें हे निजमानसीं समजतां प्रारब्धरेषा पुसे ॥
शुद्धात्मा विलसे सदा त्रिभुवनीं अद्वैत तें पाहणें ।
ब्रहमानंद अगाध चिन्मय सुधासाम्राज्य तें भोगणें ॥५॥

‘निर्वाणपंचका’त ते सांगतात :---

निर्वाणबोधरवि ह्रत्कमलीं औदेला
मायांधकार सविकार विकल्प गेला ।
दुद्वैत दु:खशिण अंतरिंचा निवाला
आरण्य घोर गृह थोर समान त्याला ॥१॥

सिद्धयोगाष्टकात ते म्हणतात :---

वैराग्य भाग्य तरि श्लाघ्य म्हणूं तयाला
भोक्ता न भोग्य गुरु योग्य वदे जयाला ।
जो का निरंजनपदींच अखंड राहे
आनंदमग्न सम चिन्मय डोलताहे ॥२॥


महाराजांची १६९ ओव्यांची ‘परमार्थदीपिका’ व ‘अभंगचाळिसी’ सुंदर आहेत.
यांचे मुख्य ग्रंथ सात आहेत व ते ‘सप्तसागर’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
१. ज्ञानसागर :--- यात मनुष्याचे चार वर्ग अधिकारपत्वे सांगून त्यांच्या कर्तव्याचा विचार केला आहे.
२. विज्ञानसागर :--- यात कर्म व ज्ञान ही साधने भगवत्प्राप्तीस अवघड आहेत व भक्ती हेच साधन सुलभ आहे.
३. बोधसागर :--- यात सद्‌गुरूने मुमुक्षूस केलेला बोध दिला आहे.
४. कैवल्यासागर :--- यात तोच बोध जास्त विस्ताराने व आधार दाखवून केला आहे. या ग्रंथासारखा आत्मस्वरूपबोध करून देणारा दुसरा सुलभ ग्रंथ मराठी भाषेत मिळणे कठीण आहे, असे मला वाटते.
५. आनंदसागर :--- यात स्वरूपानंदाचे वर्णन आहे.
६. शांतिसागर :--- यात अपरोक्षज्ञाननिष्ठ व शांत पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत.
७. करुणासागर :--- यात शेवटी भगवद्‌भक्ताने भगवंताची करुणा भाकली आहे. हा ग्रंथ मोठा चित्तवेधक आहे. याचे दोन खंड असून पूर्वार्धात १८९६ व उत्तरार्धात १५७७६ मिळून १७६७२ ओव्या आहेत. पूर्वाधाच्या शेवटी

निरंजनाचे चरण । भावें वंदी नारायण ।
पूर्वार्ध झाला संपूर्ण । भाविकांचा हितकर्ता ॥
जे कां भावें वाचिती ।
त्यांचे मनोरथ ऐसेचि पुरती ।
जैसे माझे श्रीपती ।
पुरविता झाला निजांगे ॥

अशा दोन ओव्या आहेत. या ग्रंथाची एकच प्रत बडोद्यास श्री. कृष्णराव रघुनाथ धारकर यांचे घरी आहे. यांचे तीर्थरूप श्री. रा. रघुनाथ बापूजी उर्फ भाऊसाहेब धारकर महाराजांचे थोर अधिकारी शिष्य होते. अलीकडे मुंबई येथील जोगेश्वरीच्या ट्रिनिटी पब्लिसिटी सोसायटीने श्रीनारायण महाराज जालवणकर उर्फ चिमटेबाबा यांचे समग्र ग्रंथ लोकांना उपलब्ध करून दिले आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP