मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
मोतीबाबा जामदार

दत्तभक्त - मोतीबाबा जामदार

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८४४-१९२५)

विदर्भमहाकोशलकडे एक महान विभूती मोतीबाबा जामदार या नावाची होऊन गेली. त्याकाळी इंग्रजी राजवट सुरू झाली होती. संरजामशाहीतील एका संपन्न कुटुंबात मोतीबाबांचा जन्म झाला. त्यांचे संस्कृत शिक्षण एका शास्त्र्यांच्या देखरेखीखाली झाले. त्यांनी फारशी भाषेचाही अभ्यास केला. हिस्लॉप नावाच्या धर्मोपदेशकाने स्थापन केलेल्या इंग्रजी शाळेत त्यांचे अध्ययन झाले. कलकत्ता विश्वविद्यालयातून त्यांनी मँट्रिकची परीक्षा दिली.

नंतर त्यांची नेमणूक तहसीलदार म्हणून झाली. वर्‍हाड, मध्यप्रदेश येथे त्यांनी काम केले. याच काळात गुरुचरित्राचे अनुष्ठान त्यांनी केले. अनेकदा ते समाधीसारख्या अवस्थेत असत. अशाच एका समयी श्रीनरसिंहसरस्वतींनी त्यांना उपदेश केला. पुढेही मोतीबाबांनी आपली साधना वाढविली. त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा प्रभाव लोकांच्या ध्यानात आला. ते मोतीबाबांकडे येऊ लागले. ज्ञानेश्वरी. योगवासिष्ठ, पंचदशी, अद्वैतसिद्धि इत्यादी ग्रंथांचा त्यांचा अभ्यास सखोल होता.

मधून मधून मोतीबाबा गाणगापूर येथे जात असत. लोकांच्या विविध प्रकारच्या पीडा त्यांनी दूर केल्या. अनेक प्रकारचे चमत्कारिक अनुभव त्यांना व त्यांच्या भक्तांना येत गेले. इंग्रज अधिकार्‍यांनाही त्यांचे महत्त्व पटले. गुरुपौर्णिमा व दत्तजयंती ते मोठया भक्तिभावाने साजरी करीत. पुण्यात रँडचा वध करणार्‍या दामोदर चाफेकर यांनाही मोतीबाबांनी आश्रय दिला होता. त्यांना दोन पुत्र झाल्यावर त्यांची पत्नी निधन पावली. तरी मोतीबाबांनी आपला प्रपंच निष्कलंक अवस्थेत सांभाळीला.

मोतीबाबा १८९९ साली सेवानिवृत्त झाले. आणि नागपूरला  स्थायिक झाले. साधना आणि स्वाध्याय त्यांनी चालूच ठेविला. घरीच त्यांची प्रवचने होत असत. केशवराव ताम्हन, भटजीशास्त्री घाटे इत्यादी लोक त्यांच्या प्रवचनास येत असत. १९२२ मध्ये त्यांच्या दत्तजयंतीच्या उत्सवास अलोट गर्दी झाली. मोतीबाबा लवकरच समाधी घेणारही वार्ता त्यांना कळली होती. मोतीबाबा दत्तजन्माच्या वेळी ध्यानमग्न अवस्थेत होते. १९२४ साली ‘अहंब्रह्मास्मि’ या महावाक्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. गाणगापूरला आपण देह सोडावा, या हेतून त्यांनी ऐंशीव्या वर्षी गाणगापूरचा प्रवास केला. त्यावेळी नागपुरास परत जा असा संदेश त्यांना मिळाला. तो त्यांनी मानला. आणि १८ फेबुवारीस १९२५ मध्ये त्यांनी दत्तचरणांचा आश्रय घेतला.

ब्रह्मीभूत मोतीबाबा यांचा चरित्रग्रंथ बाबासाहेब जामदार व काकाजी जामदार यांनी लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथात मोतीबाबांच्या कवितांचा संग्रह आहे. कालियामर्दन, नरसिंहरस्वती-प्रार्थना, श्रीपांडुरंगस्तुती, श्रीकृष्णतारक, ज्ञानदेव दशक, सदुरुप्रार्थना, श्रीगुरुवंदना, कुट पदे इत्यादींचा त्यात समावेश आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP