मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
वासुदेवानंदसरस्वती

दत्तभक्त - वासुदेवानंदसरस्वती

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८५४-१९१४)

कोकण प्रांती पूर्वीच्या सावंतवाडी संस्थाननजीक माणगाव नावाच्या एका खेडेगावात गणेशभट्ट टेंबे नावाचे एक अग्निहोत्री कर्‍हाडे जातीचे ब्राह्मण गृहस्थ राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई होते. ई उभयता पतिपत्नी श्रीदत्तोपासक होती. गणेशभट्ट गाणगापुरी श्रीदत्ताची उपासना करीत असता वैराग्य उत्पन्न होऊन त्यांनी संन्यास घेण्याचा विचार केला. त्या वेळी त्यांना दृष्टांत होऊन प्रथम घरी जाऊन गृहस्थाश्रम पुरा करण्याबद्दल श्रीदत्तांची आज्ञा झाली. त्याप्रमाणे ते पुन्हा घरी आले. काही कालानंतर त्यांच्या उपासनेवर संतुष्ट होऊन स्वत: श्रीदत्तभगवान गर्भरूपाने रमाबाईंच्या पोटी अवतीर्ण झाले, असे म्हणतात. शके १७७६ आनंदनाम संवत्सरी श्रावण वद्य ५ या दिवशी सूर्योदयानंतर घटी २६ या वेळी रमाबाईंना पुत्ररत्न झाले; तेच या चरित्राचे नायक होत.

‘शुद्धबीजापोटीं । फळे रसाळ गोमटीं ॥’ या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे गणेशभट्ट व रमाबाई यांसाररव्या भाविक उपासकांच्या पोटी वासुदेवासाररवे रत्न निपजणे हे स्वाभाविक होय. हे पूर्वजन्मीचे सूर्योपासक होते, असे पुढे यांच्या बोलण्यावरून कळून आले.

श्रीवासुदेवानंदांचे बालपणचे नाव वासुदेव हेच होते. वासुदेव पाच पर्षांचा झाल्यावर त्याचे पितामह हरिभट्ट यांनी त्याच्या शिक्षणास आरंभ केला. त्यांची बुद्धी लहानपणापासून फार तीव्र होती. ते एकपाठी होते. आठव्या वर्षी व्रतबंधसंस्कार होऊन बाराव्या वर्षीच त्यांचे ऋग्वेदसंहितादिकांचे अध्ययन झाले. अध्ययनाच्या वेळी ते नेहमी सोवळ्यात राहात असत. त्यांनी रघूचे १/२ सर्ग म्हटले होते आणि पाचसहा महिने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यांचे शिक्षण म्हटल्यास एवढेच. एवढया लहान वयांतच ते मंत्रप्रयोगाचे चमत्कार करू लागले होते. परोपकारबुद्धी, अरिथींबद्दल पूज्यभाव इत्यादी सद्‌गुण त्यांच्या अंगी लहानपणापासून वसत होते. तसेच लहानपणापासूनच ते विरक्त ओह्ते. वयाच्या आठव्या वर्षापासून त्रिकाल स्नानसंध्या करावयाची, नेहमी पायाने प्रवास करावयाचा, छत्री, जोडा, खडावा वगैरे काही वापरावयाचे नाही; इत्यादी नियमांनुसार ते वागत असत. तसेच त्यांनी विधिपुर:सर चांद्रायणव्रत पाळून गायत्री पुरश्चरण केले.

शके १७९७ साली सर्थात्‌ त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचा विवाह सावंतवाडीचे बाबाजीपंत गोडे यांच्या कन्येबरोबर झाला. त्यांच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णाबाई होते. त्या स्वभावाने अत्यंत सुशील असून पतीची एकनिष्ठपणे सेवा करीत असत. पुढे एके समयी पत्नीच्या विनंतीवरुन त्यांनी तिला स्त्रीधर्माचा उपदेश केला आहे, तो सर्वांनी अवश्य वाचण्यासारखा आहे. स्त्रीधर्म सांगण्याच्या मिषाने त्यांनी सार्‍या नित्यनैमित्तिक आचारधर्मावर व्यारव्यान केले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. श्रीगांडाबुवा ब्रह्मचारी यांनी श्रीवासुदेवानंदसरस्वतींचे चरित्र लिहिले आहे, त्यात ते संग्रहित केले आहे. श्रीदत्तगुरुंनी आपल्या मातोश्रीस उपदेश केला, तसा वासुदेवशास्त्री यांनी आपली आई रमाबाई यांसही उपदेश केला. तसाच कांतोपदेश हाही एक नमुना आहे. अन्नपूर्णाबाई (शास्त्रीबोवांचे कुटुंब) यांचा अधिकारही फार मोठा होता. त्या जशा सुशील तशाच वैराग्यशील होत्या. त्यांचा अध्यात्मिक दर्जाही फार श्रेष्ठ दर्जाचा होता. कोणतेही शिक्षण नसता व पूर्वाभ्यास नसता त्यांची समाधी लागत असे. शास्त्रीबोवांस पुढे एक मुलगाही झाला. पण तो लवकरच कालवश झाला. या वेळीही त्यांच्या कुटुंबास झालेला पुत्रशोक दूर करण्याकरता वासुदेवशास्त्री यांनी आपल्या पत्नीस उपदेश केला, तोही गांडाबुवा विरचित चरित्रभाग वाचनीय आहे.

असो. मूळच्या वासुदेवाचे वासुदेवभटजी झाले. पुढे वासुदेवशास्त्री झाले व अखेर वासुदेवानंदसरस्वती या नावाने त्यांची अक्षय्य कीर्ती राहिली. ह्या स्थित्यंतराचे मूळ कारण त्यांच्या अंतरातील विरक्ती होय. त्यांना प्रथम तीव्र विरक्ती उत्पन्न होण्याचे कारण असे सांगतात की, त्यांच्या मातुश्रींचा स्वभाव थोडा रागीट होता. एकदा श्रीगणेशचतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी पूजेच्या साहित्यात निष्काळजीपणा आढळल्यामुळे ते आपल्या पत्नीस उद्देशून काही बोलले. त्यावरून त्यांच्या मातोश्रींना राग येऊन त्या अपशब्द बोलू लागल्या. त्यामुळे महाराजांचे चित्त अस्वस्थ होऊन पूजेकडे लक्ष लागेना. पाच दिवस गणपती ठेवण्याचा बेत रद्द करुन त्यांनी त्याच दिवशी त्याचे विसर्जन केले. ‘न मातु: परदैवतम्‌’ या धर्माज्ञेप्रमाणे योग्य ती काळजी घेऊन वागत असताही त्यांचा व्हावा तसा उपयोग होत नाही, तेव्हा प्रपंचात राहणे फार कठीण आहे, असे त्यांच्या मनाने घेतले. शुद्ध भावाने ईश्वर चिंतन करणे, हेच खर्‍या सुखाचे साधन आहे, असे त्यांना वाटू लागले. पूर्वपापाचे क्षालन होण्यासाठी त्या वेळी त्यांनी चांद्रायण प्रायश्चित्तही घेतले. एके रात्री स्वप्नात एका ब्राह्मणाकडून त्यांना नरसोबाच्या वाडीस येण्याबद्दल आदेश मिळाला. परंतु तेथे जाण्याला त्यांचेजवळ वाटखर्चापुरतेही पैसे नव्हते. पण इतक्यात त्यांनी एकाची जन्मपत्रिका करून दिली होती, त्याचे अडीच रुपये त्यांना मिळाले. ह्याप्रमाणे घरातून बाहेर पडल्याबरोबर मार्गातील सर्व अडचणी हळुहळू दूर होऊन ते वाडीस जाऊन पोहोचले. यावेळी त्यांचे वय २६।२७ वर्षांचे होते. या वयात संसाराविषयी विरक्त असणारा पुरुष विरळाच.

वाडीस यावेळी श्रीमंत गोविंदस्वामी नामक एक फार योग्यतेचे महात्मे होते. त्यांचेकडून वासुदेवशास्त्री यांची सर्व व्यवस्था झाली. एके दिवशी त्यांनी गोविंदस्वामींना मंत्रोपदेश देण्याबद्दल विनंती केली; पण तुम्हांला उपदेश करण्याचा माझा अधिकार नाही; ज्यांना जरूर असेल ते तुम्हांला मंत्र देतील. असे गोविंदस्वामींनी सांगितले. त्याच दिवशी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास कृष्णातीरी जाऊन हातपाय धुऊन थोडा जप करण्याचा विचार करून शास्त्रीबोवा तेथे आले. पण दार बंद असलेले पाहून देवानजिक बसणे चांगले नाही, असा विचार करुन प्रदक्षिणा घालण्यासाठी दक्षिणद्वारी जाताच भगवी वस्त्रे परिधान केलेली आहेत असा एक तेजस्वी पुरुष पाहून त्याला शास्त्रीबुवांनी नमस्कार केला. त्यांना पाहून त्या पुरुषाने विचारले, ‘तू कोण आहेस? ह्या वेळी तू का आलास? शयनारती झाल्यावर येथे कोणीही येऊ नये असा नियम आहे, हे तुला ठाऊक नाही काय?’ हे ऐकून शास्त्रीबुवा म्हणाले. ‘महाराज, मी या स्थळी प्रथमच आलो आहे. त्यामुळे मला येथील नियम माहीत नाहीत. अत:पर येणार नाही’ असे म्हणून नमस्कार केला, तोच ते स्वरूप नाहीसे झाले ! तेव्हा ते दत्तभगवानच असले पाहिजेत, असे वाटून त्यांना न ओळखल्याबद्दल शास्त्रीबुवा फार खिन्न झाले ! व त्यांच्या मनाला तळमळ लागून राहिली.

नंतर श्रीदत्ताला प्रर्थनापूर्वक नमस्कार करून ते परत मठात य़ेऊन निजावयास गेले. पहाटेच्या सुमारास त्यांच्या स्वप्नात दत्तभगवानंची मूर्ती खर्‍या स्वरूपात प्रगट झाली ! व त्यांनी शास्त्रीबुवांस पहिल्या भेटीची आठवण देऊन मंत्रोपदेश केला. मग दत्ताची पूजा व ध्यान करावे आणि उपनिषद्‌भाष्याचा विचार करावा, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. यानंतर महाराजांना वेळोवेळी श्रीदत्ताचे साक्षात्कार होत असत. एकदा श्रीदत्तांनी त्यांस आज्ञा केली की, योगावाचून सर्वज्ञता येत नाही. यासाठी आता योगाभ्यास करून आत्मज्ञानाची प्राप्ती करुन घे. त्याकरिता एका ब्राह्मणाजवळील योगाचे पुस्तक घे, असे सांगून या ब्राह्मणाचा पत्ताही सांगितला. वासुदेवशास्त्री यांनी ते पुस्तक आणविले. ते कबिराचे दोह्यांचे पुस्तक होते. मंत्रोपदेश झाल्यानंतर लवकरच महाराज माणगावास परत आले व तेथे श्रीदत्तमूर्तीची स्थापना करून देवालय बांधून तेथेच भजन-पूजन करीत कालक्रमणा करू लागले. ते शुष्क भिक्षेवर निर्वाह करीत; मीठ-मिरची, गूळ वगैरे कोणताही चविष्ट पदार्थ न घेता नुसत्या भाताचा ते देवाला नैवेद्य दाखवीत. स्वत:च स्वयंपाक करीत ! दीड वर्ष त्यांनी मौनव्रत धारण केले  होते. यानंतर सुमारे ७ वर्षे महाराज माणगावात होते. त्या काळात दर्शनासाठी लोकांची ये जा सुरू असे. येथे असताना त्यांनी एक दिवस श्रीदत्ताला डोळे झाकून नैवेद्य दाखविल. ते डोळे उघडतात तो वाटीत दूध नाही. तेव्हा त्यांनी नैवेद्य दाखविल्यावर घुमटीचे दार बंद करून ठेवण्याची पद्धत ठेवली. ते स्वत: जेवण्यास बसत तेव्हा ते एकटे असले तर कधी कधी उंदीर त्यांच्या पानाजवळ येऊन भात खात असत. अरण्यात योगाभ्यासाकरता जात, तेथे भयंकर व्याघ्र व सर्प त्यांस भेटत ! पण त्यांना कोणाकडून त्रास झाला नाही.

हळुहळू त्या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप येऊ लागले. तेथे लहानसा बाजार बसला. त्याठिकाणी असताना वासुदेवानंद यांनी आपल्या हाताने एक संहितेचा स्वाहाकार केला व रुद्रस्वाहाकारही दोन केले. येथे त्यांस ईश्वरी प्रेरणेने काव्यस्फूर्ती झाली व संस्कृत अध्ययन अगदीच बेताचे असताही श्रीदत्ताचे प्रेरणेने, हिंदुस्थानात चोहोकडे उपयोगी पडावे म्हणून, त्यांनी गुरुचरित्राचे संस्कृतात रूपांतर केले, शके १८११ मध्ये महाराज माणगाव सोडून कायमचे वरघांटी गेले. एके दिवशी सकाळी माणगाव सोडण्याबद्दल त्यांस श्रीदत्तांची आज्ञा झाली. त्याप्रमाणे महाराज आपल्या पत्नीसह बरोबर श्रीदत्तमूर्ती, एक तांब्या, एक धोतर व एक लुगडे एवढयाच वस्तू घेऊन तेथून निघाले.

यानंतर दोन वर्षांनी म्हणजे शके १८१३ या वर्षी गंगाखेड मुक्कामी सौ. अन्नपूर्णाबाईस देवाज्ञा झाली. देवाचे विमान त्यास नेण्यास येणार असा दृष्टांत चार दिवस अगोदरच झाला होता ! असे म्हणतात की, दोघेही त्याच वेळी जावयाची; पण मी चतुर्थाश्रम घेतल्याशिवाय येणार नाही, असा शास्त्रीबोवांनी आग्रह धरल्यामुळे एकटया अन्नपूर्णाबाईंनी सौभाग्यवती स्त्रियांना वायने देऊन पतिचरणांवर शांतपणे मस्तक ठेवून हरहर गुरुदेवदत्त असे म्हणून प्राण सोडला ! त्यानंतर तेराव्याच दिवशी महाराजांनी संन्यासदीक्षा घेतली. त्याच दिवशी रात्री गोविंदस्वामींच्या रूपाने येऊन श्रीदत्तांनी महाराजांना प्रेष्योच्चार दिला व सांगितले की, “आजपासून तुमचे नाव वादुदेवानंदसरस्वती ठेविले आहे. आजपासून तुम्ही नित्य मधुकरी मागत जावे.”

महाराज अनेक चमत्कार करून दाखवीत असत. त्यासंबंधी कित्येक गोष्टी प्रसिद्ध आहेत. वेळोवेळी महाराजांनी अमुक रीतीने वागावे अशाबद्दल श्रीदत्ताची आज्ञा होत असे, व त्याप्रमाणे वर्तन न घडल्यास त्यांनाही प्रायश्चित्त भोगावे लागत असे !

देहरक्षणाला ते फारसे महत्त्व देत नसत. ते आलीया भोगासी नेहमी सादर असत. क्षुल्लक संकटांनीच आपण डळमळू लागलो, तर शतवृश्चिकदंश झाल्याप्रमाणे वेदना होतात, अशा अंतकाळी परमेश्वराचे स्मरण आपल्या हातून कसे घडेल? असे ते म्हणत असत. पूर्वेस राजमहेंद्री, दक्षिणेस रामेश्वर, उत्तरेस काशी वगैरे पुष्कळ ठिकाणी त्यांचे जाणे झाले होते. सर्व प्रवास ते पायीच करीत. त्यांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायला वेळच लागत नसे, असे सांगतात. नवीन तर्‍हेने सुधारलेल्या मुंबई पुण्यासाररव्या शहरांत ते कधीच जात नसत.

उज्जयनी, ब्रह्मावर्त, हिमालयातील पहाडी मुलुख (बदरीकेदार, गंगोत्री), हरिद्वार, पेटलाद, तिलकवाडा, द्वारका, चिखलदरा, मेहतपूर, नरसी, वढवाणी, तंजावर, मुक्त्याला, पवनी, हावनूर, कुरुगड्डी, गरुडेश्वर अशा ठिकाणी त्यांचे चातुर्मास झालेले आहेत. यावरून त्यांच्या संचाराचे क्षेत्र लक्षात येईल. माणगाव. वाडी, ब्रह्मावर्त, गरुडेश्वर येथे त्यांचा मुक्काम जास्त दिवस होता. त्यांचा सर्व प्रवास २ छाटया, २ लंगोटया व एक कमंडलू एवढयाच साहित्याने होत असे. त्यांची वृत्ती नेहमी विरक्तीपूर्ण व शांत असे. अंतकालापूर्वी काही दिवस ते गरुडेश्वरी राहात असत. त्याच ठिकाणी शाके १८३६ आनंद नाम संवत्सरी ज्येष्ठ वद्य अमावास्येस रात्री श्रीदत्ताच्या समोर उत्तराभिमुरव बसून ते कैवल्यपदास गेले ! व नंतर देह नर्मदेच्या प्रवाहात सोडून दिला !

त्यांच्या अखेरच्या दुखण्याच्या वेळी त्यांनी प्रकृती सुधारण्यासाठी काही औषध घ्यावे असे इतरांनी त्यांना सुचविले. पण ते स्वामींनी मनावर घेतले नाही. ते म्हणाले-“या शरीराला उत्पन्न होऊन साठ वर्षे तर झाली. आता यास ठेवून तरी काय करायचे आहे ! श्रीशंकराचार्य भगवान स्वत: शंकराचे अवतार असूनही बत्तीस वर्षेच राहिले. श्रीकृष्ण परमात्मा वैकुंठासकट येऊन एकशे पस्तीस वर्षे राहिला. त्या मानाने हे शरीर फार राहिले. बाबांनो ! पूर्वी या शरीरास दोन वेळा सर्पदंश, तीन वेळा कॉलरा, एक वेळ सन्निपात, दोन वेळा महाव्याधी व एकदा कोड इतके रोग झाले ! त्या वेळी औषध देण्यास कोण आले होते? जन्मापासून ज्या वैद्याला मी शरण आलो आहे तोच पण ह्या वेळीही आहे.” असे म्हणून भीष्माचार्य शरपंजरी असताना शेवटी जे श्लोक बोलले होते, तेच श्लोक स्वामींनी बोलून दारवविले.

गरुडेश्वरी वासुदेवानंदांच्या पादुका स्थापून मोठे देवालय बांधले आहे व तेथे नित्यनैमित्तिक पूजाअर्चा व उत्सव होत असतात. त्याचप्रमाणे सावंतवाडी येथेही श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे प्रभृती सांप्रदायिकांच्या खटपटीने श्रीवासुदेवालयात पूजाअर्चा, उत्सव सुरू असतात.

श्रीवासुदेवानंदसरस्वतींच्या क्षेत्रमाहात्म्याचा सर्वांसच लाभ घेता येणार नाही, तरी त्यांचे संस्कृत गुरुचरित्र, दत्तपुराण, मराठी दत्तमाहात्म्य, त्रिशती गुरुचरित्रकाव्य, कुमारशिक्षा इत्यादी ग्रंथ, तसेच त्यांची कित्येक स्तोत्रे व पदे ही सर्वांस सुलभ व पावनकारक होतील यांत शंका नाही. त्यांचे दत्तपुराण हा तर एक आर्यसंस्कृतीचा कोशच आहे. योगीराज गुळवणी महाराजांनी त्यांचे सर्व वाङमय प्रकाशित केले आहे.
 
--- स. कृ. फडके

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP