मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
श्रीचक्रधर

दत्तभक्त - श्रीचक्रधर

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन ११९४-१२७४)

दत्तात्रेयांना आदिकारणाचे स्थान देणार्‍या महानुभाव पंथाचे हे संस्थापक. विशालदेव नावाचा भरवसचा, भरूचचा हा एक प्रधान. त्याच्या पत्नीचे नाव माल्हाइसा. दत्ताच्या कृपेने या दांपत्यास एक मुलगा झाला. त्याचे नाव हरिपाळदेव. याचे लग्न कमळाइसा नावाच्या स्त्रीशी झाले. याला द्यूत खेळण्याचे मनस्वी वेड होते. एकदा एकाएकी याची प्रकृती बिघडून याला मृत्य़ू आला. स्मशानात चमत्कार असा झाला की, परमेश्वराने हरिपाळदेवाच्या ह्रदयात प्रवेश केला. चांगदेव. राऊळांचा हा नवा अवतार म्हणून हरिपाळदेव जिवंत झाला.

या नव्या स्पर्शाने त्याच्या मनात वैराग्य दाटून आले. एकदा द्यूतात तो हरला. कमळाइसेने दागिने देण्यास नकार दिला. त्याच्या मनात खिन्नता पसरली. राजविलासात व वैभवात त्याचे चित्त रमेना, त्याने एके दिवशी घर सोडले व तो नागपूरकडील रामटेकच्या यात्रेस निघाला. रितपूर अथवा ऋद्धिपूर येथे त्याची व गोविंदप्रभू यांची गाठ पडली. प्रभूंनी त्याच्या अंगावर स्वत:च्या मुखालील ‘सेंगुळे बुडडे’ फेकून त्याला आपणांकडे वेधून घेतले. हरिपाळाने गोविंदप्रभूंचे शिष्यत्व स्वीकारण्याची त्यांच्याकडून शक्तीची दीक्षा घेतली. गोंविंदप्रभूंनीच त्याचे नाव चक्रधर असे ठेविले.

यानंतर चक्रधरांनी सालबर्डीच्या डोंगरावर बारा वर्षे तप केले. सत्य, अहिंसा, समता या तीन तत्त्वांनीच मानवजातीचे कल्याण होईल हे पटल्यावरून त्यांनी या तत्त्वांच्या प्रसारासाठी प्रयत्न करायचे ठरविले. फिरता फिरता हे नागपूरकडील काटोल या गावी आले. तेथील उधळीनाथ नावाच्या एका सिद्धाकडून त्यांनी वयस्तंभनी म्हणजे चिरतारुण्याची विद्या मिळविली. पुढे त्यांनी आंध्र, वरंगळ येथे प्रयाण केले. तेथील एका घोडयांच्या व्यापार्‍याच्या सुंदर मुलीशी त्यांनी लग्न केले. चक्रधरांच्या या पत्नीचे नाव हंसांबा होय. थोडे दिवस त्यांनी संसार केला, पण मूळ वृत्ती जागी झाल्याने पुन: त्यांनी गृहत्याग केला. भंडारा येथे त्यांना नीलभट भांडारकर नावाचा पहिला शिष्य मिळाला. त्यांचा दुसरा शिष्य अळजपूरचा रामदरणा होय. रामदरण्याच्या उमादेवी नावाच्या कन्येशी चक्रधरांनी तिसरा विवाह केला. वडनेर येथे त्यांना विद्यावंत रामदेव नावाचा शिष्य मिळाला. मेहेकर येथे त्यांना बोणाबाई नावाची एक विरक्त स्त्री भेटली. पैठणला नागुबाई नावाची एक स्त्री त्यांची शिष्या बनली. हीच पुढे नागांबिका अथवा बाइसा म्हणून नावारूपास आली.

पैठण येथे त्यांनी संन्यास स्वीकारून लोकोद्धाराच्या कार्यास आरंभ केला. सर्वत्र संचार करून त्यांनी अनेकांना प्रेमशक्तीचे दान दिले. क्षुद्र देवतांच्या नादी लागलेल्या अडाणी जीवांना सावध केले. चक्रधरांच्या पंथात जातिभेदास स्थान नाही. त्यांनी स्वत: मांगाच्या घरी अन्न खाऊन समत्वाची दृष्टी सिद्ध केली होती. सोवळेओवळे. उपासतापास, व्रतवैकल्ये यांच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. अहिंसक वृत्तीने सर्वांशी समत्वाने व ममतेने वागावे हा त्यांच्या धर्माचा मुख्य गाभा आहे. स्त्रीशद्रांना स्वत:च्या उद्धारास अवसर त्यांच्या पंथात मोठ्या प्रमाणावर मिळत राहिला. संस्कृतऐवजी मराठी भाषेचा स्वीकार करून त्यांनी लोकांच्या उद्धारास आणखी चालना दिली. श्रीचक्रधरांच्या या वागण्यामुळे व धर्मदृष्टीमुळे सनातन धर्माचे व वर्णाश्रमाचे पुरस्कर्ते त्यांच्या विरुद्ध उठले. अनेकदा त्यांच्यावर विषप्रयोग होत राहिले. परंतु चक्रधरांचा प्रभाव जनमानसावर जास्तच उमटत गेला. रामदेवराव दादोस. नागदेवाचार्य, आबाइसा, उमाइसा, महदाइसा, म्हाइंभट, छर्दोबा, सारंगपंडित, डांगरेश इत्यादींचा परिवार त्याच्याभोवती असे. देवळामठात, गुंफेत राहून त्यांनी आपल्या प्रसाराचे कार्य केले.

श्रीचक्रधरस्वामी हे ईश्वराचेच अवतार होत आशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे; त्यामुळे त्यांच्या कृपेने वा स्पर्शाने अनेक लोकांना स्थित्यानंदाचा अनुभव येत असे. त्यांनी अनेक प्रकारचे चमत्कार करूज्न दाखविले. अनेकांच्या रोगांचा परिहार केला. चक्रधरांच्या  शिष्यांनी त्यांच्या दिनचर्येचे टिपण बारकाईने केले आहे. पहाटे उठणे, प्रातर्विधी, चिंतन, दंतधावन, स्नान, सकाळचा पूजावसर, भक्तजनांबरोबर विहार, निरूपण, आरोगणा व दुपारचा पूजावसर, पहुड, दुपारचे निरोपण, सायंकाळचा पूजावसर, रात्रीचे निरूपण; इत्यादींच्या नोंदी तपशीलवार मिळतात. भूतमात्र, पशूपक्षी यांच्याबद्दल त्यांच्या मनात अतिशय प्रेम असे. गुजराथी, मराठी व संस्कृत या भाषा त्यांना चांगल्या येत. स्वत: चक्रधरांनी स्वहस्ते एकही ग्रंथ लिहिला नसला तरी त्यांच्या तोंडच्या वचनांचा संग्रह ग्रंथासारखाच आहे. लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टान्तपाठ, हे ‘श्रीमुखींचे शब्द’ सांप्रदायिकांना मोलाचे वाटतात.

श्रीचक्रधर व त्यांचा महानुभाव पंथ यांचे तत्त्वज्ञान हे पूर्णपणे द्वैती आहे. त्यांनी जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर हे चार पदार्थ नित्य, स्वतंत्र व अनाद्यनंत मानले आहेत. या चार पदार्थांचे ज्ञान माणसास करून देण्यासाठी त्यांनी तीन प्रकारचे अवतार मानले (१) गर्भावतार-इतर जीवांप्रमाणेच मातेच्या उदरातून जन्म घेणे. (२) पतितावतार-एखाद्या मृत शरीरात प्रवेश करणे. (३) दवडण्याचा अवतार-मातेच्या उदरातील जीवाला तेथून घालवून आपण ते स्थान पकडणे, अवतारी परमेश्वराचे शरीर मायेने व्याप्त असल्याने शरीराला मायापूर असे ते म्हणतात. देवता नावाच्या पदार्थात त्यांनी ८१ कोटी १ । लक्ष १० देवता मानल्या आहेत. कर्मभूमी, अष्टदेवयोनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकैलास-वैकुंठ, क्षीराब्धी, अष्टभैरव, विश्व, माया अशा नऊ थोव्यांतून वा समूहांतून त्यांची वाटणी झालेली आहे. ईश्वरी आनंदाचा अनुभव घेणे हे या तत्त्वज्ञानाचे ध्येय आहे. त्यांच्या दृष्टीने ज्ञानमार्ग हा बहिर्याग व भक्तिमार्ग हा अंतर्यागमार्ग होय. ज्ञानमार्गाने जीव ब्रह्मस्वरूप होईल तर भक्तिमार्गाने तो ईश्वरस्वरूप होईल असे त्यांचा पंथ मानतो. श्रीचक्रधरांचा आचारमार्गही अतिशय कडक व वैराग्यपूर्ण असा आहे.

श्रीचक्रधरांनी प्रस्थापित अशा चातुर्वर्ण्याला विरोध केला, रूढ तत्त्वज्ञानास सोडून द्वैती तत्त्वज्ञान निर्माण केले: यांमुळे त्यांना प्रथमपासूनच विरोध झाला. रामदेवराय यादवाचा प्रधान हेमाद्रिपांडिताने तर त्यांना पकडून त्यांच्यावर काही आरोपही केले. शेवटी त्यांनी उत्तरेस हिमालयाकडे प्रयाण केले. श्रीचक्रधर व त्यांचा पंथ महानुभाव यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. मराठी गद्याच्या आरंभीच्या सुंदर शैलीचा बोध त्यांच्याच मुखातून निघालेल्या वाक्यांवरून आज आपणांस समजतो. सांप्रदायिकांच्या मताने ते एक श्रेष्ठ अवतारी पुरुष होते. श्रीचक्रधरांच्या गुरुपरंपरेचा उगम दत्तात्रेय आहेत हे महत्त्वाचे आहे. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभु आदिकारण’ असे स्वामींनीच म्हटले आहे. श्रीदत्तप्रभू. श्रीचांगदेवराऊळ, श्रीगोविंदप्रभू, श्रीचक्रधर; अशी ही परंपरा असल्याचे आपणांस माहीत आहेच. महानुभावांचा दत्तात्रेय हा ‘चतुर्युगी अवतार’ असल्याचे श्रीचक्रधरच सांगतात. सर्व युगांत श्रीदत्तात्रेय वावरत असतात. असाच याचा अर्थ होय. त्यांच्या मते दत्तप्रभूंची वाणी अमृताचा व सुखाचा वर्षाव करणारी आहे. श्रीचक्रधरांना पांचाळेश्वर या दत्तात्रेयांच्या स्थानाचे विशेष महत्त्व वाटे. ‘तुमाचिया गावापासी आत्मतीर्थ असे की: होजी: तुम्ही तेथ जा: तेथ जाइजे जो: ते आणिका स्थावरासारखे नव्हे: तेथ श्रीदत्तात्रेयप्रभूची प्रतिष्ठा हो शोधु: पंचाळेश्वरा गेला होतासि: पूसीले: हे ते स्थानीं होते तेथ जाईजे हो’ अशा शब्दांत जानोपाध्यांना दत्तप्रभूंच्या या स्थानास जाण्यासाठी सांगतात. आपल्या शिष्यांजवळ ते अनेकदा दत्तप्रभूंच्या लीलांचे निरूपण करीत बसत.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP