अभंग - मन लागलें लागलें

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


मन लागलें लागलें । तुझ्या स्वरुपीं रंगलें ।
अंबे, तुझें चंद्रबिंब । दिसे चांगलें चांगलें ॥ध्रु०॥
सुरत सुंदर सांवळी । साडी शोभते पिवळी ।
रत्नदीप प्रभावळी । मोती - माणीक - पोंवळीं ।
तुझे गातां रुपगुण । वेद भागले भागले ॥ मन० ॥१॥
माय, तुझ्या भेटीसाठीं । आशा लागलीसे मोठी ।
माझे अगणीत कोटी । अपराध घाली पोटीं ।
नको आठवूं अवगुण । आतां मागले मागले ॥ मन० ॥२॥
आनंदीचा परमानंद । सुगंधाचा सुखसुगंध ।
दंडीं वांकी, बाजूबंद । लोलो लागलासे छंद ।
रात्रंदिन ध्यानीं सिद्ध । योगी जागले जागले ॥ मन० ॥३॥
अनाथांची तूं माउली । करि कृपेची साउली ।
कृपावंते, कल्पवेली । पाहिजे ना वायां गेली ।
विष्णुदास म्हणे मोतीं । जोडी भंगलें भंगलें ॥ मन० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP