हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
ग्रहण

ग्रहण

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


ग्रहण .

भूच्छायां स्वग्रहणे भास्करमर्कग्रहे प्रविशतीन्दुः ।

प्रग्रहणमतः पश्चान्नेन्दोर्भानोश्च पूर्वार्धात् ॥१५१॥

एवमुपरागकारणमुक्तमिदं दिव्यदृग्भिराचार्यैं : ।

राहुरकारणमस्मिन्नित्युक्तः शास्त्रसद्भावः ॥१५२॥

ग्रहणें दोन प्रकारचीं आहेत . सूर्यग्रहण व चंद्रग्रहण . सूर्यग्रहण फक्त अमावास्येस व चंद्रग्रहण फक्त पूर्णिमेस येतें . सूर्य स्वयंप्रकाशी असल्यामुळें वस्तुतः त्यास ग्रहण कधींच नाहीं ; पण अमावास्येला सूर्याच्या आड चंद्र येऊन चंद्राची छाया पृथ्वीवर पडते व त्यामुळें चंद्राच्या पलीकडील सूर्य दिसेनासा होऊन त्याचा प्रकाश अगदीं अंधुक होतो , तेव्हां सूर्यास ग्रहण लागलें असें आपण समजतों . यावरुन सूर्यग्रहण होण्यास सूर्यचंद्र समरासमोर वरखालीं असले पाहिजेत . ते अमावास्येस मात्र तसे येतात , म्हणून अमावास्येखेरीज इतर तिथींत सूर्यग्रहण होत नाहीं . चंद्रग्रहण होण्याचें कारण असें आहे कीं सूर्यकिरण पृथ्वीवर ज्या बाजूस पडतात , त्याच्या विरुद्ध दिशेला पृथ्वीची छाया असते . अशा प्रकारची पृथ्वीची छाया चन्द्रावर पडून चंद्र आपणांस दिसेनासा होतो . असें झालें म्हणजे चंद्रास चंद्रास ग्रहण लागलें असें आपण समजतों . तेव्हां चंद्रग्रहण होण्यास म्हणजे चंद्रावर पृथ्वीची छाया पडण्यास चंद्र व सूर्य या दोहोंच्या मध्यें सहा राशींचें अंतर असलें पाहिजे . इतकें अंतर पूर्णिमेस मात्र असतें म्हणून चंद्रग्रहण पूर्णिमेस मात्र होतें . यावरुन दर अमावास्येस किंवा दर पूर्णिमेस ग्रहण कां होत नाहीं अशी शंका कदाचित कोणी घेईल तर , त्याचें उत्तर असें आहे कीं , ग्रहण होण्यास चंद्र व सूर्य यांच्या कक्षा एकाच पातळींत असल्या पाहिजेत ; परंतु असा योग दर अमावास्येस किंवा पौर्णिमेस संभवत नाहीं , म्हणून दर पंधरवडयास ग्रहणें होत नाहींत . राहु चंद्रास ग्रासतो , आणि केतु सूर्यास ग्रासतो , व त्यामुळें ग्रहणें होतात , अशी जी कल्पना आहे ती कविनिर्मित आहे . अलीकडील ज्योतिष्यांची व फार प्राचीनकाळीं आमच्या विद्वान् ‍ ऋषीनीं वेदांत लिहून ठेविलेली ग्रहणांविषयींची कल्पना एकच आहे . राहु - केतु हे चंद्र - सूर्यांना ग्रासतात अशी कल्पना बरोबर नाहीं हें वरील श्लोकांत दिलेल्या वराहमिहिराच्या वचनांत स्पष्ट आहे .

राहूनें चंद्रास व केतूनें सूर्यास ग्रासिलें म्हणजे अनुक्रमें चंद्र व सूर्यग्रहण होतें , ह्या कल्पनेचा पुराणाशीं संबंध असावा असें दिसतें . देवदैत्यांनीं समुद्रमंथन करुन ज्या वेळीं चौदा रत्नें काढिलीं त्या वेळीं त्या रत्नांपैकीं मद्य कोणीं घ्यावें व अमृत कोणीं घ्यावें , ह्या विषयीं देवदैत्यांत भयंकर वाद उत्पन्न झाला . तेव्हां विष्णूनें मोहिनीचें कपटरुप धारण करुन देवदैत्यांपाशीं येऊन सारखी वांटणी करण्याचें कबूल केलें . नंतर , मोहिनी एका हातांत अमृत व दुसर्‍या हातांत मद्य घेऊन देवांकडे अमृत व दैत्यांकडे मद्य वाढूं लागली . राहूनें व केतूनें हें कपट पाहून , आपल्याला अमृताचा लाभ व्हावा म्हणून , ते दैत्यांच्या पंक्तींतून उठून देवांच्या पंक्तींत चंद्रसूर्याच्या मागें अलक्षित येऊन बसले . मोहिनी अमृत वाढण्याकरितां देवांकडे आली , तेव्हां दोघांनींही आपाआपले हात पुढें केले . मोहिनीनें चुकून राहूच्याही हातावर अमृत घातल्याबरोबर चंद्रानें नेत्रसंकेतानें ही गोष्ट मोहिनीस कळविली . त्याबरोबर मोहिनीनें आपल्या सुदर्शनानें राहूचा शिरच्छेद केला . परंतु अमृत कंठांतून खालीं गेलें असल्यामुळें त्याचें धड व शिर जिवंत राहिलीं . केतु सूर्यामागें बसला होता , त्यासही अर्थात अमृतलाभ झाला नाहीं . असें होण्यास कारण चंद्र - सूर्य झाले म्हणून राहु - केतु आणि चंद्र - सूर्य यांच्यांत वैमनस्य पडलें ! व त्यावरुन राहु चंद्रास व केतु सूर्यास ग्रासितो अशी ग्रहणासंबंधीं कल्पना निघाली असावी असें वाटतें . तसेंच , पृथ्वीवर पाप फार होऊं लागलें म्हणून अलीकडे ग्रहणें फार होतात असें कित्येक लोक म्हणतात , परंतु त्यांतही कांहीं अर्थ नाहीं . ग्रहणाचें प्रमाण पहिल्यापासून आहे तेंच आहे , असें अनेक ज्योतिष्यांनीं सिद्ध केलें आहे ; आणि पृथ्वीवरील लोकांच्या बर्‍यावाईट आचरणाचा व आकाशांतील ग्रहणांचा परस्परांशीं कांहींएक संबंध नाहीं .

ग्रहणाचा वेध व स्पर्श .

सूर्यग्रहे तु नाश्नीयात्पूर्वें यामचतुष्टयम् ।

चंद्रग्रहे तु यामांस्त्रीन् बालवृद्धातुरैर्विना ॥ १५३॥

बालवृद्धातुराणां तु याममेकं न भोजनम् ।

चंद्रसूर्यग्रहे भुक्त्वा प्राजापत्येन शुद्धयति ।

ग्रस्तोदये विधोः पूर्वे नाहर्भोंजनमाचरेत् ॥१५४॥

ग्रहण लागण्यापूर्वीं ग्रहणाचा वेध लागतो , असें धर्मशास्त्रकारांनीं मानिलें आहे . याचें एक व्यावहारिक कारण असें दिसतें कीं , ग्रहण लागलें म्हणजे पृथ्वीवर सूर्याचा पुरेसा प्रकाश न पडल्यामुळें हवा दूषित होऊन त्या योगानें पचनादि क्रिया बरोबर घडत नाहींत आणि त्यामुळें प्रायः रोग उप्तन्न होण्याचा संभव असतो . म्हणून शास्त्रकारांनीं ग्रहणापूर्वी कांहीं काळपर्यंत भोजनाचा निषेध सांगितला आहे . तसेंच , ज्या प्रमाणानें चंद्रसूर्याच्या प्रकाशाचे पृथ्वीवर कमीअधिक परिणाम होतात , तदनुरोधाने भोजनाच्या निषेधाचा कालही कमीअधिक ठरविलेला आहे . तो असा कीं चंद्रग्रहणाचा वेध ग्रहणप्रहराच्या पूर्वीचे तीन प्रहर मानावा व सूर्यग्रहणाचा वेध ग्रहण प्रहराच्या पूर्वींचे चार प्रहर मानावा . उदाहरणार्थ , दिवसाच्या पहिल्या प्रहरांत सूर्यग्रहणस्पर्श असेल तर आदल्या दिवशीं रात्रीं पहिल्या प्रहरापासून वेध लागतो . तसेंच , रात्रीच्या पहिल्या प्रहरीं चंद्रग्रहणस्पर्श असेल तर दिवसाच्या दुसर्‍या प्रहरापासून वेध लागतो . दिवसाचे प्रहर मोजणें ते सूर्योदयापासून मोजावे व रत्रीचे प्रहर मोजणें ते सूर्यास्तापासून मोजावे . वेध लागल्यापासून ग्रहण सुटेपर्यंत भोजन वगैरे करुं नये . केलें असतां एक दिवस उपोषण करावें असें सांगितलें आहे . लहान मुलें , म्हातारीं माणसें आणि रोगी माणसें यांनीं ग्रहण लागण्यापूर्वी यथाशक्ति दीड प्रहर किंवा निदान सहा घटिका मात्र वेध पाळावा . कित्येक धर्मशास्त्रकारांच्या मतें हा चार प्रहरांच्या वेधाचा भोजनाविषयींच्या नियम केवळ खग्रास ग्रहणालाच लागू आहे . म्हणजे पूर्ण मंडलग्रास असेल तरच चार प्रहर वेध समजावा . यावरुन ३ / ४ ग्रास असेल तर ३ प्रहर वेध अर्धग्रास असेल तर अर्ध म्हणजे २ प्रहर वेध , व १ / ४ ग्रास असेल तर १ प्रहर वेध समजून वेधामध्यें भोजन करुं नये . चंद्रग्रहणाचे दिवशीं ग्रहण लागल्यानंतर ग्रहणयुक्त स्थितींत चंद्रोदय होणार असेल तर त्या दिवशीं दिवसा भोजन करुं नये . आणि सूर्यग्रहणादिवशीं ग्रहणयुक्त स्थितींत सूर्य उगवणार असेल तर त्याच्या आदल्या दिवशीं सूर्यास्तापूर्वीच्या दिवसाच्या चौथ्या प्रहरापासून वेध मानावा .

ग्रस्तावेवास्तमानं तु रवींदू प्रान्पुतो यदि ।

परेद्युरुदये स्न्नात्वा शुद्धोऽभ्यवहरेन्नरः ॥१५५॥

तसेंच ग्रहण लागलें असून तशा स्थितींत चंद्रसूर्य अस्तास जातील तर दुसर्‍या दिवशीं ते ग्रह उदयास आल्यानंतर स्नान करुन भोजन करावें .

ग्रहण लागूं लागलें म्हणजे ग्रहणाचा ‘ स्पर्श ’ झाला असें म्हणतात ; खग्रास ग्रहण असल्यास बिम्बाचा पूर्ण ग्रास होतो त्याला ‘ संमीलन ’ म्हणतात . पूर्ण ग्रासांतून बिंब सुटून प्रकाशित होण्यास प्रारंभ झाला म्हणजे त्याला ‘ उन्मीलन ’ म्हणतात . ग्रहण पूर्णपणें सुटलें म्हणजे ग्रहणाचा ‘ मोक्ष ’ झाला असें म्हणतात . ग्रहणाचा स्पर्श झाल्यापासून मोक्ष होईपर्यंत जो मधला काळ , त्यास पर्वकाळ म्हणतात . ग्रहणसमयीं बिंबाचा जितका भाग आच्छादित होतो , तितका ग्रास झाला असें समजतात . ग्रहण केव्हां दिसेल आणि तें केवढ्या ग्रासाचें असेल हें पंचांगांत दिलेलें असतें .

शुभाशुभ ग्रहण .

ग्रहणं जन्मभात् श्रेष्ठं दशैकादशषटत्रिकम् ।

मध्यमं पंचसप्ताश्विनवस्थानसंस्थितम् ।

नेष्टमंत्याष्टतुर्यस्थं जपाच्छांतिर्भविष्यति ॥१५६॥

ग्रहणसमयीं ज्या राशींत चंद्र ( किंवा सूर्य ) असेल त्या राशीस ग्रहण आहे असें समजावें . आपल्या जन्मराशीपासून तिसर्‍या , सहाव्या , दहाव्या किंवा अकराव्या राशीस जर ग्रहण असेल तर शुभ आहे असें समजावें . दुसर्‍या , पांचव्या , सातव्या किंवा नवव्या राशीस असेल तर मध्यम , आणि आपल्या राशीस किंवा राशीपासून चवथ्या , आठव्या किंवा बाराव्या राशीस किंवा जन्मनक्षत्रीं असेल तर अनिष्ट आहे असें जाणावें . ग्रहण आपल्या राशीस अनिष्ट असेल आणि सामर्थ्य असेल तर सुवर्णाचें बिंब करुन तें , कांस्यपात्रांत तूप घालून तिल , वस्त्र आणि दक्षिणा यांसह सत्पात्रीं दान द्यावें , असें धर्मशास्त्रकार म्हणतात . परंतु जपानेंही क्लेश दूर होतात असें मानिलें आहे . ज्यांच्या राशीस ग्रहण अनिष्ट असेल त्यांनीं किंवा गर्भवती स्त्रियांनीं प्रत्यक्ष ग्रहण मुळींच पाहूं नये . इतरांस पाहणेंच असेल तर वस्त्र , उदक किंवा कांच यांतून पहावें . दृष्टीनें ग्रहण पाहिलें नाहीं , म्हणजे स्वराशीस अनिष्ट असतांही ग्रहणाचा दोष लागत नाहीं .

ग्रहणांतील कृत्यें .

रविग्रहः सूर्यवारे सोमे सोमग्रहस्तथा ।

चूडामणिरिति ख्यातस्तत्र दत्तमनन्तकम्‍न ॥१५७॥

सूर्यैंदुग्रहणं यावत्तावत्कुर्याज्जपादिकम् ।

न स्वपेन्न च भुंजीत स्नात्वा भुंजीत मुक्तयोः ॥१५८॥

चंद्रसूर्यग्रहे यस्तु श्राद्धं विधिवदाचरेत् ।

तेनैव सकला पृथ्वी दत्ता विप्रस्य वै करे ॥१५९॥

चंद्रग्रहण असो अथवा सूर्यग्रहण असो , जोंपर्यंत तें आपल्या दृश्य आकाशांत असेल तोंपर्यंत त्याचा पुण्यकाळ असतो . रविवारीं आलेलें सूर्यग्रहण व सोमवारीं आलेलें चंद्रग्रहण यांस ‘ चूडामणि ग्रहण ’ अशी संज्ञा आहे . चूडामणिग्रहणांत सत्पात्रीं म्हणजे विद्वान् ‍ व धार्मिक ब्राह्मणांना व अंध , पंगु , थोटे इत्यादिकांना दान केलें असतां अनंतफलप्राप्ति होते . ग्रहण लागल्याबरोबर स्नान , मध्यें जप , देवपूजा वगैरे , व सुटण्यास आरंभ झाला म्हणजे दान व सुटलें म्हणजे पुनः स्नान , याप्रमाणें करावें असें धर्मशास्त्रकार म्हणतात . ग्रहणांत समुद्रस्नान फार पुण्यकारक मानिलें आहे . समुद्रस्नान घडणें अशक्य असेल , तर तीर्थाच्या ठिकाणीं स्नान करावें . तीर्थस्नान घडणें शक्य नसेल तर एकाद्या नदीचें स्नान करावें . तेंही न घडेल तर निदान शीतोदकानें स्नान करावें , असा शास्त्राचा आधार आहे . तथापि शिष्टांच्या स्त्रिया ग्रहणांत डोकीवरुनच स्नान करितात , असें प्रायः सर्वत्र आढळतें . सुवेरांत किंवा सूतकांत ग्रहणसंबंधीं स्नान , दान वगैरे अवश्य केलेंच पाहिजे . चंद्र - सूर्यग्रहणांमध्यें श्राद्ध केलें असतां पृथ्वीदानाचें फळ आहे . निदान आमश्राद्ध किंवा हेमश्राद्ध करावें . रजस्वला स्त्रियांनीं पात्रांत पाणी घेऊन स्नान करावें .

अन्नादि वस्तूंचा ग्रहणांत दोष .

आरनालं पयस्तक्रं दधिस्नेहाज्यपाचितम् ।

मणिकस्थोदकं चैव न दुष्येद्राहुसूतके ॥१६०॥

ग्रहणापूर्वी तयार केलेले भक्षणाचे पदार्थ ग्रहणानंतर दूषित होतात असें मानिलेलें आहे . परंतु कांजी , दूध , ताक , दहीं , घृतपाचित फराळाचे सर्व पदार्थ , मोठमोठया माठांतील पाणी इत्यादि वस्तु ग्रहणानें अपवित्र होत नाहींत . अर्थात् , " अन्नं पक्कमिदं त्याज्यम् ‍ " या वचनाच्या आधारें ग्रहणापूर्वी शिजविलेलें अन्न मात्र ग्रहणानंतर सेवन करुं नये . इतर पदार्थावर ग्रहणांत तुलसीपत्र , दर्भ किंवा तीळ ठेवण्याचा परिपाठ आहे . त्यास " तिलदर्भैर्न दुष्यंति " असें निर्णयसिंधूंत दिलेलें अन्य ग्रंथांतील वचन आधारभूत आहे .

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP