हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
संवत्सर

संवत्सर

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.


संवत्सरांचीं नांवें
प्रभवो विभवः शुक्लः प्रमोदोऽथ प्रजापतिः ।
अडिरा श्रीमुखो भावो युवा धाता तथैव च ॥२०॥
ईश्र्वरो बहुधान्यश्च प्रमाथी विक्रमो वृषः ।
चित्रभानुः सुभानुश्च तारणः पार्थिवो व्ययः ॥२१॥
सर्वजित्सर्वधारी च विरोधी विकृतिः खरः ।
नन्दनो विजयश्चैव जयो मन्मथदुर्मुखौ ॥२२॥
हेमलम्बी विलम्बी च विकारी शार्वरी प्लवः ।
शुभकृच्छोभनः क्रोधी विश्वावसुपराभवौ ॥२३॥
प्लवडः कीलकः सौम्यः साधारणविरोधकृत् ।
परिधावी प्रमादी स्यादानन्दो राक्षसोऽनलः ॥२४॥
पिड्लः कालयुक्तश्च सिद्धार्थी रौद्रदुर्मती ।
दुन्दुभी रुधिरोद्गारी रक्ताक्षी क्रोधनः क्षयः ॥२५॥
षष्टिसंवत्सरा ह्येते क्रमेण परिकीर्तिताः ।
स्वाभिधानसमं ज्ञेयं फलमेषां मनीषिभिः ॥२६॥

सम् + वसंति + ऋतवः म्हणजे चांगले ऋतु ज्यांत आहेत असें जें कालगणनेचें प्रमाण त्यास संवत्सर असें म्हणतात. ऐकिवांत दुसरी एक संवत्सर शब्दाची व्युत्पत्ति अशी आहे कीं, वत्स म्हणजे वांसरुं आणि तत्संबंधीं काळ तो वत्सर. गाईम्हशींना सुमारें १२ महिन्यांनीं एक वेत किंवा वांसरुं होतें त्यावरुन वत्सर या शब्दाची कल्पना कदाचित् निघाली असावी. तसेंच पृथ्वीची सूर्यासभोंवतीं एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास सुमारें एक वर्ष लागतें, त्यावरुन पुढें वत्सर हा शब्द वर्षाचा वाचक समजला गेला. असो. आपल्या ज्योतिःशास्त्रांत साठ वर्षाचें एक मंडळ कल्पून प्रत्येक संवत्सरास एकेक नांव अशीं साठ संवत्सरांस निरनिराळीं साठ नांवें दिलेलीं आहेत. हींच नांवें संवत्सरांस पर्यायेंकरुन साठ वर्षांनीं पुनः पुनः येतात. त्यांचीं फलें त्यांच्या नांवांप्रमाणें जाणावीं. तीं नांवें येणेंप्रमाणें: -
१ - प्रभव
२ - विभव
३ - शुक्ल
४ - प्रमोद
५ - प्रजापति
६ - अंगिरा
७ - श्रीमुख
८ - भाव
९ - युव
१० - धाता
११ - ईश्वर
१२ - बहुधान्य
१३ - प्रमाथि
१४ - विक्रम
१५ - वृष
१६ - चित्रभानु
१७ - सुभानु
१८ - तारण
१९ - पार्थिंव
२० - व्यय
२१ - सर्वजित्
२२ - सर्वधारी
२३ - विरोधी
२४ - विकृति
२५ - खर
२६ - नंदन
२७ - विजय
२८ - जय
२९ - मन्मथ
३० - दुर्मुख
३१ - हेमलंबी
३२ - विलंबी
३३ - विकारी
३४ - शार्बरी
३५ - प्लव
३६ - शुभकृत्
३७ - शोभन
३८ - क्रोधी
३९ - विश्वावसु
४० - पराभव
४१ - प्लवंग
४२ - कीलक
४३ - सौम्य
४४ - साधारण
४५ - विरोधकृत्
४६ - परिधावी
४७ - प्रमादी
४८ - आनंद
४९ - राक्षस
५० - अनल
५१ - पिंगल
५२ - कालयुक्त
५३ - सिद्धार्थी
५४ - रौद्र
५५ - दुर्भति
५६ - दुंदुभी
५७ - रुधिरोद्गारी
५८ - रक्ताक्षी
५९ - क्रोधन
६० - क्षय

संवत्सराचें नांव काढण्याची रीति.
शाको द्वादशभिर्युकः षष्टिह्रुद्वत्सरो भवेत् ।
रेवाया दक्षिणे भागे मानवाख्यः स्मृतो बुधैः ॥२७॥
स एव नवभिर्युक्तो नर्मदायास्तथोत्तरे ।
यो वै वाचस्पतेर्मध्यराशिभागेन कथ्यते ॥२८॥

शालिवाहनशकांतील ज्या संवत्सराचें नांव पाहिजे असेल त्या शकांत बारा मिळवावे, आणि त्या बेरजेस साठांनीं भागावें; जी बाकी राहील तो अंक त्या संवत्सराचें नांव समजावें. तसेंच, विक्रमसंवतांत नऊ मिळवून त्या बेरजेस साठांनीं भागावें आणि जो अंक बाकी राहील तें विक्रमसंवत्सराचें नांव होय.

उदाहरण--- शके १८५६ या संवत्सराचें नांव पाहिजे आहे. वर लिहिलेल्या रीतीप्रमाणें त्यांत १२ मिळविले म्हणजे १८६८ झाले. ह्या बेरजेस साठांनीं भागिलें म्हणजे बाकी ८ राहिली. वर संवत्सराच्या नांवांचें जें कोष्टक दिलें आहे, त्यांत ८ अंकासमोर ‘ भाव ’ असें नांव आहे, म्हणून शके १८५६ ह्या वर्षास ‘ भावनामसंवत्सरे ’ असें म्हणावें. ह्याप्रमाणें पाहिजे त्या वर्षाचें नांव काढतां येतें. तसेंच, विक्रमसंवत् १९९० यांत नऊ मिळविले म्हणजे १९९९ झाले. ह्या बेरजेंस साठांनीं भागून बाकी १९ राहते. वरील कोष्टकांत एकोणिसाव्या संवत्सराचें नांव ‘ पार्थिव ’ असें आहे. म्हणून तेंच १९९० या सालाचें विक्रमसंवत्सराचें नांव होय. ह्याचा वर्षारंभ कार्तिक शुल्क प्रतिपदेस होतो.

संवत्सरांचीं फलें.
प्रभवाद द्विगुणं कृत्वा त्रिभिर्न्यूनं च कारयेत् ।
सप्तभिस्तु हरेद्भागं शेषं ज्ञेयं शुभाशुभम ॥२९॥
एकं चत्वारि दुर्भिक्षं पञ्चद्वाभ्यां सुभिक्षकम्॥
त्रिषष्ठे तु समं ज्ञेयं शून्यं पीडा न संशयः ॥३०॥

अर्थ--- प्रभवापासून म्हणजे पहिल्या संवत्सरापासून चालू संवत्सरापर्यंत मोजून जितके अंक होतील त्यांची दुप्पट करुन त्यांत तीन वजा करावे, बाकी राहील त्या संख्येत सातांनीं भागावें, शेष १ किंवा ४ असतां त्या वर्षी महागाई होईल; २ किंवा ५ असतां स्वस्ताई होईल, ३ किंवा ६ असतां साधारण सम राहील आणि बाकी शून्य राहिली तर रोग उत्पन्न होतील.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP