भगवंत - डिसेंबर २९

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


भक्ती म्हणजे संलग्न होणे. विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी होईल? मीपणा आला की संकल्प उठतात, आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करुन, बैरागी होऊन मठ बांधला, पण मठाच्या बंधनात पडला ! देवाला दागिने घातले, का, तर त्याचे रुप आपल्याला चांगले दिसावे म्हणून ! चांगल्या कृत्यांतसुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा ! थोडक्यात म्हणजे, मीपणाचे विसर्जन केले पाहिजे. साधू कर्तेपण परमेश्वराला देतात. वास्तविक आपण कर्ते आहोत कुठे? आपण कर्ते म्हटले, परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे? पण नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे. ‘ हे सर्व ईश्वराचे आहे ’ हेच सार वेदश्रुती सांगतात; “ हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे ” असे संत सांगतात दोघांचेही सांगणे एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे, हीच खरी उपासना. मी काही नाही, कोणीतरी बाहुली आहे, असे समजावे. एक भगवंत तेवढा माझा, असे म्हणावे.
संताजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्समागमात राहावे. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल; ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करु, माळेने आपण काही कुणाला मारणार नाही. आपल्या पोशाखात, वागण्यात, बोलण्यात, सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते; म्हणून संताचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासरामागून येते, तसे संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणार्‍याला धुंडाळीत येतील, आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो, तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून, संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले, असे मानले पाहिजे. सत्संगतीने साधकाची वाढ होते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. संतांना भक्तीचे व्यसन असते; ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत; म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरुप बनले. भगवंताचे नाम सिद्ध करुन देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावावयाला संसारी संतच खरा उपयोगी पडतो.

N/A

References : N/A
Last Updated : February 15, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP