भगवंत - डिसेंबर ४

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


ज्याप्रमाणे एखादा बाप बॅंकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो, त्याचप्रमाणे, ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना, निदान अंतकाळी तरी, सदबुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे. मनुष्य कितीही भ्रष्ट बुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे. निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगला होऊन मरेल. अभिमान म्हणून नव्हे, परंतु गोंदवल्याचे महत्त्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे. राम किती दयाळू आहे ! त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला. पहिल्याने वाटले, आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक ! पण रामाने मोठी कृपा केली, आणि पुष्कळ लोक नामाला लागले. आपण पाहतो, प्रत्येक गावाला निरनिराळे नाव असते. तसे पाहिले तर सर्व गावे सारखीच; घरेदारे, भिंती, शाळा, धर्मशाळा, चावड्या, या प्रत्येक गावात असतात. परंतु प्रत्येक गावाचे महत्त्व काही वेगळेच असते. गोंदवल्यास पैशाचे उत्पन्न नाही, परंतु तिथे नामाचे पीक भरघोस आहे. मी नेहमी हेच सांगतो की, ‘ जिथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा. ’ इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला, तरी त्याच्या वागण्यावरुन कळून आले पाहिजे की, हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे. त्याचे तोंड सारखे हलते आहे, तोंडाने रामाचा जप चालू आहे, त्याअर्थी हा अमक्या गुरुचा शिष्य असला पाहिजे, असे कळून यायला हवे. म्हणतात ना, की आपल्या वडिलांचे महत्त्व सांगू नये, ते मुलाच्या कृतीवरुन कळले पाहिजे. म्हणून आता एकच करा, रामाला हात जोडून मनापासून सांगा, “ रामा ! तुझे प्रेम दे, आम्ही अखंड नामात राहू. प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू, आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू. तुझे गोड नाम आम्ही ह्रदयात सतत जतन करुन ठेवू. ” राम खात्रीने कृपा केल्यावाचून राहणार नाही. खरोखर, या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल !
लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने, ‘ तू माझे स्मरण ठेवून लढाई कर, ’ असे भगवंतांनी सांगितले, आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहे; तेच आपण भगवंताच्या स्मरणात करु. नीतिधर्माचे आचरण, आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणात करणे, हेच सर्व धर्माचे, शास्त्रांचे सार आहे. आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते, त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात. आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या, तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही? आपण भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात करु या. तेच नाम भगवंताची प्राप्ती करुन द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP