भगवंत - डिसेंबर ३

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


बाळांनो ! ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जो कधी कुणापासून लाच घेत नाही, जो जात असताना कुणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल? पण ज्याने भगवंत घट्ट धरुन ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला, तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडला नाही.
यापुढे कुणी सांगणारा भेटो वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करील, हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरु नका, हाच माझा अट्टाहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण; आपल्या लक्ष्यावर अचूक रामाकडे नेणारे एकमेव साधन आहे. खरोखर, नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थलाचे आणि देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे, तोपर्यंत नाम घेता येते. पण दुसर्‍या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही, उपाधीमध्ये मन रमते. नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. यासाठी, नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो, आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सर्व ऐश्वर्ये तुच्छ वाटतील. हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा, आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या, हाच माझा सर्वांना आशीर्वाद.

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP