मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
चल , सख्या जिवा रे , पुन्...

राम गणेश गडकरी - चल , सख्या जिवा रे , पुन्...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


चल, सख्या जिवा रे, पुन्हां घरीं । कां उगाच फिरसी पिशापरी ? ॥धृ०॥

पाय लागुनी कांच तडकली । पुन्हा जोडणें कुणीं तरी,

ती कशी तरी कीं कधीं तरी ॥चल०॥१॥

कळस देवळावरला ढवळा । पुन्हां बसविणें कुणीं तरी,

तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥२॥

वेजीं उतरे मोतीदाणा । पुन्हां सांधणें कुणीं तरी,

तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥३॥

हार घेउनी घार पळाली । पुन्हां आणणें कुणीं तरी,

तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥४॥

लवून गेली बहार बिजली । पुन्हां पाहणें कुणी तरी,

ती कशी तरी कीं कधीं तरी ॥चल०॥५॥

लाटा जळांतरिं पळांत जिरली । पुन्हां चढविणें कुणीं तरी,

ती कशी तरी कीं कधीं तरी ॥चल०॥६॥

सूर विराला वार्‍यावरतीं । पुन्हां छेडणें कुणीं तरी,

तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥७॥

पळे सपाटीवरतीं पारा । पुन्हां बांधणें कुणीं तरी,

तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥८॥

घडूं नये तें घडून गेलें । पुन्हां घडविणें कुणीं तरी,

तें कसें तरी कीं कधीं तरी ॥चल०॥९॥

’गोविंदाग्रज’ बघे सदाही । या संसारीं नवलपरी,

कीं तरीमागुनी तीन तरी ॥चल०॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP