मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
हृदयशारदे ! या कवनाने बो...

राम गणेश गडकरी - हृदयशारदे ! या कवनाने बो...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


हृदयशारदे ! या कवनाने बोल ऐक माझे !

सरस्वती शब्दाची माझी तुजला जरि लाजे.

तुझ्या मनाचा, तुझ्या जिवाचा एक एक बोल,

मम कवितेच्या जादूलागीं ठरवीलच फोल !

नवशब्दांचे घुंगुर बांधुनि रसवंती माझी,

नाचत डोलत करि शिणलेलीं मनें पुन्हां ताजीं.

तिच्या गुणांवर कुणा कुणाचे जीव गुंग कांहीं,

तरि जादूनें जादूगारच काय फसुनि जाई ?

जरी शिरावर कुणीं बांधिला असोल शिरपेंच,

दिसतो का तो ज्याचा त्याला ? स्तुतिचेंही हेंच !

शब्दांचा बाजार बदलतां जीवाची वेठ;

नको नको हें; उघड आपुल्या प्रेमाची पेठ !

प्रेमाच्या जिवलगे ! जिव्हाळा करितां रसभरती

भिन्नरंगिं हृत्तरंग रंगति उचंबळुनि निघती !

शब्दचित्र परि काढूं जातां त्यांचें उल्हासें,

रंग तयांचे उडुनी जाती निःश्वासासरसे.

जनिं जें दिसतें, मनिं जें बसतें, हृदयीं जें सलतें,

तें बोलावें---तंव हें वठतें भलत्याचें सलतें !

रस तारांचा नभीं पाझरे, भूवर नच येई;

शुष्क होउनी खालीं येतां शीतलता राही.

मूर्तरसाच्या कैक अप्सरा गगनगीत गाती;

नाद विरे परि नभींच; उतरे वारा भूवरतीं

हा मोत्यांचा सडा घातला वरतीं आकाशीं,

चमक तेवढी येते त्याची या भूमीपाशीं !

आशीर्वचनीं शब्द तेवढे धांवुनि येतात;

स्फूर्तिदायिनी इच्छा उरते तशीच हृदयांत.

तीच दशा मम होते तुजला जावें जों गाया,

हृदयभावना मूर्तिमती तूं ! कविता तव छाया !

सुकला चुकला जीव आजवर तुजवांचुनि फिरतां

हृदयशारदे ! शब्द-शारदा नको मला आतां !

धरी सांवरुनि कविता पडत्या हृदयाचा तोल !

मरत्या जीवा परी वांचवी तुझा प्रणयगोल !

प्रीतीचीं पाउलें उमटलीं जीं या हृदयांत,

जीवस्वामिनि ! किती दिवस वद बसूं तींच गात ?

प्रणयतटिनि ! तूं दूर न राहीं - करपलाच जीव;

हृदयसाक्षिणी ! प्राणरक्षिणी ! न कां येत कींव ?

तव वसतीच्या दिशेवरी जी तारा लखलखते,

नेत्रयुग्म हें तीवर खिळतें; नच कधिंही हलतें !

तव हास्याचा नाद नाचला ज्या वार्‍यावरतीं,

जीव कोंडला वांचविण्याचें बळ त्याच्या हातीं.

अनंत तारा, अखंड वारा, नच माझ्या कामीं !

माझी तारा, माझा वारा, तुझ्या प्रेमधामीं !

वस्तुवस्तुवर नेत्र वठविती तव मूर्तिच एक !

जग ताराया जणूं प्रीतिचा त्वन्मय अभिषेक !

नामाचा जप तुझ्या सारखा; अश्रूंची स्मरणी---

प्रतिक्षणीं प्रतिनामें वाढे तिच्यांत एक मणी !

ध्यास मांडिला तुझा असा हा असह्य विरहानें,

कधिं येशिल, कधिं घेशिल मजला हृदयीं प्रेमानें ?

प्रीतीनें रंगलीं पावलें हृत्पटिं नाचीव;

प्रेमामृत पाजुनी, देवते ! भक्ता वांचीव !

प्रेमदृष्टिनें, प्रिये ! मिळविताम डोळ्याला डोळा,

पंचप्राणहि होतिल माझे नयनीं क्षणिं गोळा !

हृदयीं जडवीं; चरणीं तुडवीं, मग त्यां ओढुनियां,

सोक्षमोक्ष करि, तार मार वा, प्रेमाची दुनिया !

हृदयशारदे ! दर्शन परि दे, हृदयीं दे स्थान,

वक्षःस्थलिं तव पडतां पडतां येऊं दे मरण !

या प्रेमाचीं, तुझ्या यशाचीं गाणीं या नादीं

गाइन; जाइन गात गात तीं तुजसह ईशपदीं.

प्रीतिदेविच्या पायांमधला कवि घुंगुरवाळा !

प्रीतिदेवता जर हालतां कवि करि गानाला !

त्या प्रीतीला कविनें पुसतां, "गाऊं काय गडे ?"

प्रीति म्हणे, "जा तिलाच गाई जी तव हृदयिं जडे !"

हृदया, नयनां, ध्याना, गाना, जिनें जिंकिलेंस,

’गोविंदाग्रज’ गाइल त्या तुज हृदयशारदेस !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP