मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
विरे जळिं गार । झडपिला घा...

राम गणेश गडकरी - विरे जळिं गार । झडपिला घा...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


विरे जळिं गार । झडपिला घारिनें हार ?

गेल्या रात्रीं खेळत होती,
गालीं नयनीं हृदयावरती<
नाचत रोमारोमाभंवती,
सखे, ती लाज ! कुणिकडे पळाली आज ?

तुटुनी ज्याचें बंधन बाई,
लेश न बालपणाचा राही,
पडलें थोरपणाच्या डोहीं,
लज्जाजाल । हरपलें कालच्या काल !

लाजवि स्मृति ही ज्या रात्रीची,
नुसत्या कल्पनेंत चित्रींची,
हरुनी लज्जा माझ्या मनिंची,
रात्र ती मेली । हें काय करोनी गेली ?

डोळा भिडतां त्या डोळ्याला,
रंगवि बघतां बघतां गाला,
रोमांचाच्या कांटयावरला,
सदाचा ताजा । कुणि गुलाब नेला माझा ?

थरथर नाचत हृदयाभंवतीं,
लावी नजरहि पायावरती,
खिळवी जागिंच भारुनि मज ती,
कुठें ग आज । चोरटया मनाची लाज ?

रात्रीं होतें अजाण पोर,
एका रात्रींत झालें थोर,
माझ्या बाळपणाचे चोर,
बाई फार, नवलाचे जादूगार !

हांसत हांसत मंदिरिं आले,
बाई मी तर फत्तर झालें,
हृदयावांचुन कांहिं न हाले,
चाले श्वास । हालवी फार हृदयास !

गालिं, नयनीं ओठांवरतीं,
नाचे मुक्या प्रीतिची भरती,
चमकति घर्मबिंदु तनुभंवतीं
नव लाखाची । लाज ती नव्या नवसाची !

लबाड हासूं फसवें तसलें,
माझ्या ओंठावरतीं बसलें,
बाई तयानेंच मी फसलें,
कसें हें झालें । मी बाळपणाला मुकलें ।

नयनीं किरणांचे जे भालें.
मृदु परि तेही निर्दय झालें,
लागुनि जखमा गालहि न्हाले,
झाले लाल । लज्जेचा प्रातःकाल !

अघटित जादू केली बाई,
त्यांचे त्यासहि भान न राही,
बघतां बघतां होउनि जाई,
कांहींच्या कांही । मज माझें कळलें नाहीं !

ओठा ओठ लागल्या काळीं,
मिटल्या नयनीं रात्र पसरली,
फुलत्या वदनीं सकाळ आली,
रंगली फार । गालावर ऐन दुपार !

[स्वर्गीय सुखाच्या पहिल्या रात्रीनंतर दुसर्‍या दिवशीं सकाळीं नववधू आपल्या मौत्रिणीशीं असेंच हितगुज करीत असेल काय ?]

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP