मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
पद

ज्ञानप्रकाश - पद

संत बहेणाबाईचे अभंग

३५१.
भाव शुद्ध रे शुद्ध रे बरवा धरावा । ब्रह्मनिष्ठ रे निष्ठ रे गुरू तो करावा ॥ मायामळ रे मळ रे सांडोनिया द्यावा । स्वस्वरूपी रे स्वरूपी रे ध्यास असू द्यावा ॥१॥
ऐक ऐक रे तू मना माजिया जीवना । चुकवी चुकवी रे या जना चौर्‍यांयसी यातना ॥ अध ऊर्ध्व हा सौरसु सारी भववेदना । म्हणुनि करितसे जोडुनी दोन्ही कर प्रार्थना ॥२॥
सतसंग रे संग रे निःसंग असावा । अंतरंग रे रंग रे प्रेमा तो धरावा ॥ शांति क्षमेसी क्षमेसी ठाव देही द्यावा । विवेक विचार विचार या मनासी करावा ॥३॥
स्थूळ धरावे धरावे क्षेत्र की क्षेत्रज्ञ । भावे भजावे भजावे सगुण की निर्गुण ॥ निष्ठा रहावे रहावे एकी अनेकजण । डोळा पहावे पहावे ब्रह्म परिपूर्ण ॥४॥
ग्रंथ पहावे पहावे गीता की भागवत । मार्गधरावे धरावे कर्मब्रह्मनिष्ठायुक्त ॥ मने सांडावा सांडावा जाणिवेचा तंत । बहेणि म्हणे रे म्हणे बरवा रे ऐसा संतसंग ॥५॥
=======================
( नाच ) पद
३५२.
मनमोहना । कृष्णा कान्हा । यादवकुळभूषणा । गोकुळमंडणा । देवकीनंदना । मुनिमानसमोहना । त्रिभुवनसदना । आनंदवदना । गोपीमनरंजना । संकटभंजना । अरिकुळदहना । गुणांच्या निधाना ॥१॥
कृष्णा नाच रे वेल्हाळा । म्हणती गोपी बाळा । थै थै ताल या । तोडिती । मिळोनिया सकळा । छंदे नाचती । वाजविती । घागरिया घुळघुळा । नवल करीते यशोदा । म्हणती भला भला ॥धृ०॥
हरि जगजीवना । करूणाधना । यमुनाजलखंडणा । गोवर्धना । गोकुळरक्षणा । दावानळप्राशना । गोपीप्रियकान्हा । मधुसूदना । पूर्णकामनिधना । अकळनिर्गुणा । चैतन्यघना । स्तविती गोपांगना ॥२॥
आनंदवना । पूतना - शोषणा । रिठासूरमर्दना । भवमोचना । गुणागुणविहीना । योगीजनपाळणा । धर्मरक्षणा । पापछेदना । भक्तजनउज्जीवना । मदनमाहना । त्रिपुटीभेदना । न करवे वर्णना ॥३॥
हरि गोविंदा । परमानंदा । नरनारीवेधका । नित्यानंद बाळमुकुंदा । मोक्षपददायका । सच्चिदानंदा । आनंदकंदा । वैकुंठनायका । हरिगुणभरिता । देवकीसुता । पांडवप्रतिपाळका ॥४॥
कृष्णरामा । मेघःश्यामा । पुरूषी पुरूषी पुरूषोत्तमा । आत्मारामा पूर्णकामा । योगीजनविश्रामा । व्यापकव्योमा । नकळे महिमा । वर्णिता तू ब्रह्मा । हरिनिजधामा । जय परब्रह्मा । काय वर्णू तुझा महिमा ॥५॥
ऐशा गौळणीबाळा । मिळुनी सकळा । खेळविती गोपाळा । भक्तिजिव्हाळा । दाविती कळा । नाचविती सावळा । थै थै ताला । हरिगुण बाळा । करिती स्तुति वेल्हाळा । तो सुख - सोहळा । पाहती डोळा । बहेणि त्या गोवळा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP