मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४७० ते ४८०

करूणापर अभंग - ४७० ते ४८०

संत बहेणाबाईचे अभंग


४७०.
मोठेपण तुझे घेतले विकत । अजामिळे सुत पाचारिता ॥१॥
वर्म हे कळले अकस्मात तुझे । नामेच पाविजे तुझे पायी ॥२॥
गणिका ते शुकासी पाचारिता अंती । अहेतुक चित्ती पावलासी ॥३॥
बहेणि म्हणे तुझी किल्ली सापडली । आता व्यर्थ बोली करू नये ॥४॥

४७१.
तुज पावावया मार्ग असंख्यात । घाबरले चित्त होते माझे ॥१॥
नाम निःसंदेह सापडले वर्म । आता माझे प्रेम उच्चाटेना ॥२॥
कर्माचे कचाट वोसंतील कोण । पहा स्त्रीदेह जाण असे माझा ॥३॥
योगाच्या अभ्यासे आड येती सिद्धि । तयामाजी बुद्धि स्थिर नव्हे ॥४॥
ज्ञान तो अगम्य नयेचि समता । तेथे नव्हे चित्ता समाधान ॥५॥
बहेणि म्हणे आम्हा हे सांगती । याची माझी गति एक जाली ॥६॥

४७२.
नामरूप दोन्ही जावळी भावंडे । एकासवे घडे घात एका ॥१॥
पहा तो अनुभव जाणोनी अंतरी । दिसे अळंकारी सोने जैसे ॥२॥
आकारासी नाव जोडले निश्चित । निराकार तेथ दुजे काई ॥३॥
बहेण म्हणे नाम स्वरूप वेगळे । भावी त्या न कळे गुह्य गोष्टी ॥४॥

४७३.  
भीमानिकटदेशी । तू पुंडलिका वर देसी । जडजीवतारक, परियेसी । पांडुरंगा ॥१॥
कटी कर ठेवुनि, वचने । उद्धरसी जगरचने । साधुसंगती धावसी सुचने । तू पांडुरंगा ॥२॥
न दिसे योगतपे सहसा । मुक्तिपद हरि तू विरसा । बहेणि म्हणे दीनतारका जगदीशा । तूं पांडुरंगा ॥३॥

४७४.
संचिताचे पूरे वाहावले होते । नाम हे अवचिते सापडले ॥१॥
धरूनी आधार निघाले बाहेरी । जालासी कैवारी पांडुरंगा ॥२॥
अविद्येच्या डोही होते मी बुडाले । नाम तुझे जाले तारू मज ॥३॥
बहेणि म्हणे भ्रम - भवरीया आत । जात जीव तेथ नाम आले ॥४॥

४७५.
भ्रमाचिया सर्पे डंखियेले मज । धाव चतुर्भुज गारोडिया ॥१॥
पाहतोसी काय जीवहत्या शिरी । पडेल निर्धारी पांडुरंगा ॥२॥
विषयवाघुरे सापडले आत । कामाग्नीही तेथ साह्य जाला ॥३॥
बहेणि म्हणे व्याधे करूनि सिद्ध बाण । लाविला निर्वाण पाहू नको ॥४॥

४७६.
तुम्ही आम्ही सुखे होतो एके ठायी । कोणते अन्यायी सापडलो ॥१॥
तुझ्याचि हेताने वाढला संसार । आम्ही का रे दूर अंतरलो ॥२॥
महत्त्वाचे असे केले आम्हा भक्त । म्हणसी आम्ही मुक्त बद्ध तुम्ही ॥३॥
बहेणि म्हणे नको आम्हापुढे शब्द । सांगता हा वाद हारविसी ॥४॥

४७७.
तुजपासी फार असे चतुराई । आम्हापासी काइ उणी आहे ॥१॥
तुम्ही आम्ही एक एकाचि गावीचे । विसरलो त्याचे फळ मागे ॥२॥
तुझे ठायी ऐसे नसावे सर्वथा । थोरपण वृथा वागविसी ॥३॥
बहेणि म्हणे मूळ आम्हा तो न सांडे । नका होऊ वेडे पांडुरंगा ॥४॥

४७८.
फार दिवस आम्ही पाहियेली वाट । होईल बोभाट वियोगाचा ॥१॥
नाही तुम्हा आस आमुची हे जरी । आता आम्ही तरी वाटा घेऊ ॥२॥
उचित हे बापा तुझे नव्हें ऐसे । कळोनि मानसे आले येथे ॥३॥
बहेणि म्हणे देवा भेटलियाविण । होय माझा प्राण कासाविस ॥४॥

४७९.
पदरासी काही लागो नेदी ढका । भय काही नको धरू पोटी ॥१॥
असेल आमुचे तेचि मागो हरी । भेटी देई बह्री क्षणु एक ॥२॥
माझे चित्त मजसी पुरेल दिधले । परि न घे दिल्हे लक्ष कोटी ॥३॥
बहेणि म्हणे भेटी देई तू एकदा । कासयासी वादा प्रवर्तसी ॥४॥

४८०.
विचारावे मनी न देता जिरेल । कासयासी बोल बोलविता ॥१॥
तुम्ही बुडवाल आम्ही बुडो नेदू । भेटूनी वेवादू चुकवावा ॥२॥
वेदशास्त्र गाही दाखवूनी घेऊ । कासयासी जीवू कष्टविसी ॥३॥
बहेणि म्हणे भेट, पळो नको दूर । गावातील हेर सखे माझे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP