मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२६१ ते २७०

ज्ञानपर अभंग - २६१ ते २७०

संत बहेणाबाईचे अभंग

२६१.
शास्त्राचे प्रमाण आपुलाले कर्म । वर्णाचा स्वधर्म आचरती ॥१॥
तयासी ब्राह्मण कैसेनि बोलिजे । विचार हा कीजे मनामाजी ॥२॥
कोणे वर्णी कर्म शास्त्र न बोलेचि । आज्ञा समर्थाची सर्वांवरी ॥३॥
बहेणि म्हणे वेदाप्रमाणे चालती । सर्व त्या बोलती ब्राह्मण केवी ॥४॥

२६२.
आता धर्म यासी म्हणावे ब्राह्मण । तरी हे अप्रमाण दिसतसे ॥१॥
ब्राह्मण ते भिन्न जाणते जाणती । ज्ञानी वोळखती आत्मदृष्टी ॥२॥
ब्राह्मण - क्षेत्री वैश्य - शूद्रादिका जाण । धर्म हा प्रमाण सांगितला ॥३॥
अन्नदान द्रव्य गोदानादि सर्व । चहूवर्णा भाव सारिखाचि ॥४॥
बहेणि म्हणे धर्म नव्हे तो ब्राह्मण । ब्रह्म - परीक्षण वेगळेची ॥५॥

२६३.
स्वर्गलोकप्राप्ती होय जया धर्मे । ब्राह्मण उत्तम तेही नव्हती ॥१॥
‘ ब्रह्म ’ जाणे तोचि ब्राह्मण बोलिजे । येर ते सहजे ब्रह्मबीज ॥२॥
नाना यज्ञ दान अनुष्ठान तप । ब्राह्मणाचे रूप तेही नव्हे ॥३॥
बहेणि म्हणे किती सांगावे मनासी । वोळखी हे कैसी ब्राह्मणाची ॥४॥

२६४.
ब्राह्मण तो एक सांगेन इत्यर्थ । जेणे हा वेदार्थ साठविला ॥१॥
वेदीही प्रमाण तोच असे केला । वरिष्ठ तो भला गुरू सर्वां ॥२॥
थोर नाही दुजे ब्राह्मणावाचोनी । कैवल्य ज्याचेनी प्राप्त होय ॥३॥
मोक्षासी अधिकार जयाचेनि शब्दे । जळती प्रारब्धे दृष्टिमात्रे ॥४॥
ब्रह्म - ब्राह्मणासी नसे अणु - भेद । साधा हे निर्द्वद्व तयापाशी ॥५॥
बहेणि म्हणे चिह्न कोण त्याचे जाणे । विवेके शहाणे वोळखती ॥६॥

२६५.
गुणात असोनी गुणांसी नातळे । क्रियेसी नाकळे अणुमात्र ॥१॥
तोचि रे ब्राह्मण वोळखावा जनी । द्वैत जया स्वप्नी आडळेना ॥२॥
षडूर्मीरहित षड्भावा नातळे । दोषांचेनि मेळे सापडेना ॥३॥
बहेणि म्हणे सत्य न संडी सर्वथा । ब्राह्मण तत्त्वता तोचि एक ॥४॥

२६६.
निर्विकल्प जया समाधी जोडली । चित्तासी अमोली परब्रह्मी ॥१॥
तोचि एक खरा ब्राह्मण वेदार्थे । आणिक ती मते पाखंडाची ॥२॥
सर्वाभूती एक आत्मा देखियेला । शांतीचा वोतिला मूर्तिमंत ॥३॥
बहेणि म्हणे जैसे आकाश सर्वत्र । तैसा तो एकत्र जगामाजी ॥४॥

२६७.
अंतर्बाह्य एक अखंड अद्वय । प्रत्यक्ष अप्रमेय अनुभवे ॥१॥
तयासीच जाण म्हणावे ब्राह्मण । जयाचे निर्वाण परब्रह्मी ॥२॥
अनपेक्षा जयाचे आंदण हे जाण । करतळ विज्ञान होत - वसे ॥३॥
बहेणि म्हणे काम क्रोध सर्व गेले । तेथेचि राहिले ब्राह्मणत्व ॥४॥

२६८.
शमदम सर्व साधिले नवगुण । संतोषे संपन्न सर्वदा जो ॥१॥
ब्राह्मण वरिष्ठ श्रेष्ठाचाहि श्रेष्ठ । जयाचेनि भ्रष्ट मोक्ष पावे ॥२॥
तृष्णा मोह दंभ गेला अहंकार । वृत्ति निर्विकार सर्व कर्मी ॥३॥
बहेणि म्हणे ज्याची निरसली वासना । ब्राह्मण तो जाणा ब्रह्मनिष्ठ ॥४॥

२६९.
ब्रह्मभाव देही सदासर्वकाळ । ब्राह्मण केवळ तोचि एक ॥१॥
श्रृति स्मृति साक्ष करोनी बोलिले । नाही म्या ठेविले गुज काही ॥२॥
ब्रह्मीच सर्वदा वर्तती इंद्रिये । ब्राह्मण तो होय याचि अर्थे ॥३॥
बहेणि म्हणे ब्रह्म नांदे तो ब्राह्मण । यातीही प्रमाण नसे तेथे ॥४॥

२७०.
हरिकथा करी म्हणोनि हरिदास । संतवृत्ति त्यास संत म्हणती ॥१॥
क्रियेपाशी नाम आपण ठसावे । नलगे सांगावे सकळ लोका ॥२॥
सोन्याचे घडणार सोनार त्या म्हणती । वैद्य तो म्हणती वैद्यकाने ॥३॥
बहेणि म्हणे तैसे ब्रह्म जेथे नांदे । ब्राह्मण तो वेदे प्रतिष्ठिला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP