मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३० ते ४०

मनःपर अभंग - ३० ते ४०

संत बहेणाबाईचे अभंग

३०.
सद्गुरुचे पाय धरीन हृदयात । राहीन ध्यानस्थ सर्वकाळ ॥१॥
मग तुझे मना काय तेथे उरे । ध्यानाचे वाघुरे सापडसी ॥२॥
सद्गुरुवचनी धरीन विश्वास । प्रेम अविनाश होय तेथे ॥३॥
श्रीगुरुचा सर्व होईन मी दास । सर्वस्वे उदास होउनीया ॥४॥
देह वाचा मन समर्पीन पायी । सद्गुरु हृदयी साठवीन ॥५॥
बहेणि म्हणे मना सांडी रे मीपण । होय तू शरण सद्गुरुशी ॥६॥

३१.
सर्व साधनांच्या माथा गुरुसेवा । जे करी या जीवा ब्रह्मरूप ॥१॥
तयाचिया तयाचिया पायी जाउनी राहेन । तेथे मना कोण तुज पुसे ॥२॥
शास्त्रवंद नाना - दर्शना - वरिष्ठ । सद्गुरु हा श्रेष्ठ बहुता परी ॥३॥
बहेणि म्हणे स्वामी सद्गुरुची कृपा । दाखवील सोपा मार्ग मना ॥४॥

३२.
बचनागाचे झाडी विष कोण घाली । इंद्रावनातळी कडूपण ॥१॥
तैसे मना तुज विषय हे अंगीचे । तुझे तुज रुचे गुळापरी ॥२॥
दुर्गंधी घाली ते विष्ठेआत कोण । कावळ्यासी गुण विष्ठा भक्षी ॥३॥
बहेणि म्हणे मना विषय तुझे मूळ । तेथे तू अचल वृत्तिदास ॥४॥

३३.
तृण अरण्यात पेरावया जावे । ऐसे कोण्ही जीवे आदरीना ॥१॥
तैसे मना तुज विषय भोगकरी । सांगेन विचारी नलगे कोणा ॥२॥
नाना वृक्षयाती डोंगरी लागती । स्वभावता क्षिती वाढी तया ॥३॥
पशुपक्ष्याप्रती कोण सांगे काम । ज्याचे जे जे कर्म ते तो करी ॥४॥
बहेणि म्हणे मना तुज हे धारणा । विषयाची वासना कल्पकोटी ॥५॥

३४.
निंबा कडूपण देत असे कोण । युक्षा गोडपण कवण करी ॥१॥
बीज तैसे फळ गोडीचा निवाडा । हा अर्थ उघडा दिसतसे ॥२॥
इंद्रावनामुळी कोण घाली विष । अमृत आम्रास देत कवण ॥३॥
बचनागाआंगी विष कोण लावी । सुगंधता द्यावी नलगे पुष्पा ॥४॥
तीक्ष्ण करितसे कोण । खारीक निर्माण मधुर का हो ॥५॥
बहेणि म्हणे बीजाऐसे येत फळ । उत्तम वोंगळ परीक्षावे ॥६॥

३५.
शुकरा आणि श्वाना गर्दभासी जाणा । विष्ठेच्या भक्षणा कवण सागे ॥१॥
ज्याचा तो संसार घेउनिया उठे । लोका दुःख वाटे कासयासी ॥२॥
दंश करी ऐसे कोण सांगे सर्पा । विंचुवाच्या कोपा लोक कष्टी ॥३॥
व्याघ्र लांडग्यासी कोण सांगे कानी । राहोनिया अरण्यी जीव मारा ॥४॥
गोचीड ढेकूण हे रक्त भक्षिती । हे तया सांगती लोक कोई ॥५॥
बहेणि म्हणे पूर्वसंस्कार जीवाचा । प्रवर्तवी साचा न सांगता ॥६॥

३६.
केळी आणि तया नारेळी पोफळी । कोण घाली मुळी दुध तया ॥१॥
बीज तैसे फळ येत असे गोड । जाणती निवाड संत याचा ॥२॥
फणस आणि आंबा सिंताफळे नाना । मुळीचिया चिह्ना गोड होती ॥३॥
बहेणि म्हणे बीज गोड त्याचे फळ । उत्तम केवळ सेव्य सर्वा ॥४॥

३७.
मना तुझा संस्कार संग हा पूर्वील । विषयाचे बळ तुझे अंगी ॥१॥
म्हणोनी प्रार्थना करितसे तुझी । इंद्रियासी राजी केले असे ॥२॥
नाइकसी माझे सांगितले जरी । शरिराची उरी उरो नेदी ॥३॥
करीन उपवास कोंडोनिया श्वास । पंचाग्नीचा वास उष्णकाळी ॥४॥
धूर्मपाने देह पीडीन सर्वथा । हिंडवीन तीर्था सर्व पृथ्वी ॥५॥
साधुनिया योग बैसेन आसनी । राहीन निर्वाणी उपोषणे ॥६॥
घालीन कर्वती देह हा आपुला । पुरीन मग तुला प्राप्त काय ॥७॥
बहेणि म्हणे मना सांगतसे ऐक । नाही तरी भीक मागसील ॥८॥

३८.
विवेक वैराग्य सापडले मज । आता मना तुजा कोण पुसे ॥१॥
धरूनी आणीन करीन ध्यानस्थ । होईल तो अस्त इंद्रियांचा ॥२॥
तुझाच तुजला करीन पारखी । मना तू विलोकी आपणासी ॥३॥
बहेणि म्हणे मना यश घेता हित । आहे तू निवांत पाहे ऐसे ॥४॥

३९.
विवेकाचे बळे वैराग्य साधले । तरी तुझे केले काय चाले ॥१॥
म्हणोनी आपुल्या ठायी तू आपण । पाहे विचारून मनामाजी ॥२॥
काम क्रोध लोभ मद हा मत्सर । तुजसवे वैर चालविती ॥३॥
बहेणि म्हणे मंत्री विवेकासारिखा । जोडिला हा निका निश्चयाचा ॥४॥

४०.
म्हणसील मना इंद्र म्या ठकिला । ब्रह्मयाचा केला मानभंग ॥१॥
तुझा तेथे काय पाड असे मूढा । मनाचा पवाडा वेदशास्त्री ॥२॥
नारदाची केली नारदी आपण । माझे ठायी पण बोलो नये ॥३॥
शिवासी आपण हिंडविले रान । विष्णु करी ध्यान वृंदा वृंदा ॥४॥
व्यासासी ठकविले ऋषी नागविले । मज मनावेगळे काय असे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा मनाचा प्रतिशब्द । ऐकोनिया स्तब्ध चित्त जाले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP