मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२३१ ते २४०

ज्ञानपर अभंग - २३१ ते २४०

संत बहेणाबाईचे अभंग

२३१.
अहंकारे देह धरी जीवदशा । मग तो पडे सोसा संसारिका ॥१॥
तेणेचि अंतर पडिले मुळाशी । मग भोग सोसी नाना योनी ॥२॥
अहंकारे वाधे स्त्री धनाचा लाभ । माया ते स्वयंभ वाटली त्या ॥३॥
बहेणि म्हणे याचा करावा विचार । आत्मज्ञान - सार सापडेल ॥४॥

२३२.
स्त्रियांचेनि रूपे माया जाली सत्य । धन्य मानी येथे चित्त वाटे ॥१॥
येईल वैराग्य मानसासी जेव्हा । आत्मज्ञान तेव्हा होय तुज ॥२॥
हाव - भाव इच्या कटाक्षाचे बाण । साहे ऐसा कोण भूमंडळी ॥३॥
बहेणि म्हणे मूळ नाशासी कारण । स्त्रिया आणि धन मोक्षमार्गी ॥४॥

२३३.
मद्य उतरेल एका दो दिवसात । सागर निवांत होईल तो ॥१॥
परि जाण हे या स्त्रियांसी भुलला । तो मद उतरला नाही कैसा ॥२॥
तपराज्यमद जाईल तो क्षणे । आणिक ते जाण नाना मद ॥३॥
बहेणि म्हणे नरक स्त्रीकामे वाढती । या मद्या निवृत्ति नोहे मना ॥४॥

२३४.
वत्सामाजी जेवी ते धावे ते गाउली । किंवा ते माउली बाळकी हो ॥१॥
तैसे भक्तिपाशी ज्ञान सहज स्थिती । सापडे प्रतीती आली मज ॥२॥
पुष्पापाशी जेवी भ्रमर गुंतत । गुळासी टाकीत मक्षिका ये ? ॥३॥
बहेणि म्हणे तैसे भक्तिपाशी ज्ञान । अनायासे खूण सापडली ॥४॥

२३५.
नामसंकीर्तन सदा सर्वकाळ । अखंड प्रेमळ देह ज्याचे ॥१॥
तयासीच भक्ति म्हणावी निर्धार । जाणती उत्तर ज्ञानवंत ॥२॥
क्षण एक काळ जाऊ नेदी रिता । आवडी हे चित्ता पांडुरंगी ॥३॥
बहेणि म्हणे जीउ जाईल सर्वथा । काळ जाऊ नेदी रिता नामेविण ॥४॥

२३६.
उदकेवीण मीना होय प्राण - साटी । तैसे नाम पोटी आवडे ज्या ॥१॥
भक्ति हे जयासी सज्ञान बोलती । येर ते जल्पती वाउगेची ॥२॥
तृषाक्रांता जेवी उदकाची आवडी । तैसी जया ओढी संकीर्तनी ॥३॥
बहेणि म्हणे वांझ इच्छी ते बाळक । तैसे नामसुख आवडे त्या ॥४॥

२३७.
नामेविण क्षण जाऊ नेदी घडी । चित्तासी आवडी सर्वकाळ ॥१॥
भजन हे जया बोलिजे देवाचे । मने कायावाचे समर्पिले ॥२॥
संतसमागमी श्रवणाची आर्त । चित्ती अखंडित भाव असे ॥३॥
बहेणि म्हणे मन नेणे विषयसुख । नित्य ज्या हरिख नामपाठी ॥४॥

२३८.
भक्ति नाही हाटी घेईजे विकत । हिंडता वनात न सापडे ॥१॥
चित्ताचिये साठी भक्ति हे साधेल । आणिक ते बोल वायाविण ॥२॥
भक्ति नाही पाही जाणिवेची घरी । धनाढ्यमंदिरी न संपडे ॥३॥
भक्ति नाही राजा - प्रधानाच्या घरी । भक्ति नाही पारी चौधरीच्या ॥४॥
बहेणि म्हणे भक्ति साधावया एक । पाहिजे विवेक पूर्ण देही ॥५॥

२३९.
भाव तेथे भ्जक्ति, भक्ति तेथे ज्ञान । ज्ञाने समाधान होय चित्ता ॥१॥
मग तू सहज समाधी पावसी । चित्त नामापाशी लीन होय ॥२॥
संतसमागमी असोनी श्रवण । सदा सावधान अनुक्रमी ॥३॥
बहेणि म्हणे भक्ति पाहिजे कारण । मग त्या निर्वाणपदप्राप्ती ॥४॥

२४०.
भाव शुद्ध तरी मोक्ष तया शुद्ध । यासी ग्वाही वेद पाहा तुम्ही ॥१॥
अशुद्ध भावर्थ करी घात सर्व । अंगी वसे गर्व तयाचिया ॥२॥
भक्ति तेचि मोक्ष भक्ति तेचि मुक्ति । मुक्ति ते विरक्ति सत्य खरी ॥३॥
बहेणि म्हणे भक्ति पाहिजे सुदृढ । मग तया गूढ कासयाचे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP