मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
१८१ ते १९४

निर्याणाचे अभंग - १८१ ते १९४

संत बहेणाबाईचे अभंग

१८१.
घट फुटलियावरी । नभ नभाचे भीतरी ॥१॥
ऐसा देह गेलियाने । उरे स्वरूप चिद्धन ॥२॥
जळ आटलिया जाण । प्रतिबिंब म्हणे कोण ॥३॥
लागली कपुरासी । अग्निरूप नाही म्हैसी ॥४॥
बहेनि ऐसे नाम माया । गेले ध्याऊनी अद्वया ॥५॥

१८२.
शेवटी ते आता सांगतसे लोका । मनी धरा निका सत्य भाव ॥१॥
घरोघरी संत जाले कलीमाजी । केज्यावरी भाजी तैशापरी ॥२॥
बहेणि म्हणे येथे आपुला सद्भाव । तारील सर्वा सर्व हेचि जाणा ॥३॥

१८३.
सांगसि सकळा मृत्यु पाचा दिवसाचां । प्रायश्चित्तविधि सारूनि द्विज पुजिले हरि वाचा ॥ सकळा आशीर्वचने देउनि, गीतेचा ( च्या ) । स्मरणी तत्पर होउनि अष्टादश वाचा ॥१॥
जयदेवी जयदेवी जय बहेणाबाई । अंती आरति उजळुनि मानस तव पायी ॥धृ०॥
ज्ञानेश्वरिचे करिसी पारायण अंती । दिननिशी सावध करणे लावुनि निजपंथी । रामस्मरणी तत्पर वाचा रूपवंती । न कळे तव रूपमहिमा जाणितला संतीं ॥२॥
दशनादाचे ध्वनी तू सांगसी सकळा । वैष्णव जयजयकारे तुळसीच्या माळा । आले हरिहरब्रह्मादिक जन ऋषिमेळा । न कळे पामर जन या भगवत्पथलीळा ॥३॥
धन्य शतषोडशवरि द्वाविंशतकाळी । धन्य अश्विन शुद्ध प्रतिपदा बुधमेळी ॥ सद्गुरूभजनी सावध राहुनी ते काळी । त्यागुनि देहा निजपद पावसि वनमाळी ॥४॥
धन्य घटिका धन्य पळ लव ते जाणा । धन्य धन्य जन ते देखति तव निधना ॥ धन्य प्रणितातीर्थ शिवपुर निजस्थाना । तेथे तू स्थिर राहुनी करिसी गुरूध्याना ॥५॥
आरती याचि थाटे गायन जन करिती । रामस्मरणे सर्वहि आनंदे वदती ॥ नणो स्वर्गीहुन त्या देवांच्या पंगती । आल्या मज्जनवेळे त्या प्रणितातीर्थी ॥६॥
मृदंग वाद्य नानापरीच्या गजराने । तुलसी बुक्का उधळुनि मिरवत नगराने । गर्जत हरिनामाच्या श्रेणी अधराने । प्रणितातीर्थी मज्जन केले मग ध्याने ॥७॥
पूर्वे हनुमंत शोभे सहित - अश्वत्थे । पश्चिमभागी सुस्थळ रामेश्वर जेथे ॥ उत्तरभागी सन्निध हे प्रणितातीर्थ । दक्षिणभागी भगवती दुर्गा माता ते ॥८॥
ऐसे स्थळ अति उत्तम शिवपुर ते स्थानी । समाधि घेउनि राहसि तू देह अवसानी ॥ त्रिकाळ आरती - पुजने इच्छित फळदानी । पावती तव कर वरदे सुत विठ्ठल चरणी ॥९॥
==============================
तुलसीमाहात्म्य
१८४.
जेथे नाही वृंदावन । तेचि जाणावे स्मशान ॥१॥
राहू नये तये ठायी । एक घडी पळ पाही ॥२॥
जेथे असे तुळसीपान । तेथे असे नारायण ॥३॥
बहेणि म्हणे विष्णु नांदे । तुळसीचे ठायी मोदे ॥४॥

१८५.
ब्रह्मा विष्णु वृंदावनी । शिव राहे तये स्थानी ॥१॥
धन्य तेचि जीव जाणा । करिती जे प्रदक्षिणा ॥२॥
सर्व सिद्धी वृंदावनी । येती तुळसी दर्शनी ॥३॥
बहेणि म्हणे वृंदावन । कलियुगी मुक्तिस्थान ॥४॥

१८६.
गंगा आणि भागीरथी । तुळसीचे ठायी येती ॥१॥
होय दर्शन जयासी । तोचि देह पुण्यरासी ॥२॥
सर्व तीर्थांचे महेर । आहे तुलसी साचार ॥३॥
बहेणि म्हणे तुळसी जेथ । तेथ तीर्थांचा संघात ॥४॥

१८७.
तुलसीचे पत्र । असे देवासी एकत्र ॥१॥
नाही दोघा भिन्नभेद । दोघांचे ते एक पद ॥२॥
तुळसीचे पानी । वसे राधाकृष्ण दोन्ही ॥३॥
बहेणि म्हणे धन्य देवा । जया तुळसीची सेवा ॥४॥

१८८.
सर्व तीर्थीं जया चाड । पुण्य सर्वांहूनी वाड ॥१॥
ते एक वृंदावनी आहे । तुळसीचे ठाई पाहे ॥२॥
देव तेहतीस कोटी । येती तुळसीचे भेटी ॥३॥
बहेणि म्हणे वृंदावन । आहे वैकुंठा - समान ॥४॥

१८९.
देव न सापडे मना । तरी जावे वृंदावना ॥१॥
तेथे होय समाधान । स्वये भेटे नारायण ॥२॥
देव हारपला ज्याचा । वृंदावनी भेटे साचा ॥३॥
बहेणि म्हणे भाव खरा । पाहिजे तो गाठी बरा ॥४॥

१९०.
वृंदावनी केला धावा । म्हणे धाव रे केशवा ॥१॥
द्रौपदीसी पावे हरी । वृंदावनी निर्धारी ॥२॥
वारी सकळ संकट । धन्य तुळसी सर्वा श्रेष्ठ ॥३॥
बहेणि म्हणे सर्व गुण । वृंदावनापासी जाण ॥४॥

१९१.
चहू वर्णांमाजी जाण । दारी करा वृंदावन ॥१॥
भजा तुळसीस भावे । कदा नुपेक्षिजे देवे ॥२॥
भाळी लावी तुळसी माती । तया होय सद्या मुक्ती ॥३॥
बहेणि म्हणे लागे वारा । होय वेगळा संसारा ॥४॥

१९२.
देव, तीर्थ, वृंदावन । अग्निहोत्र यांचे स्थान ॥१॥
धन्य स्थळे ते पवित्र । संतसाधूंचे जे क्षेत्र ॥२॥
होते वेदांचे पठण । जेथे गायींचे गोठण ॥३॥
बहेणि म्हणे भाव धरा । देव वसे तेथे खरा ॥४॥

१९३.
ऐसे देवाचे बोलणे । बहुता ग्रंथी असे जाणे ॥१॥
करी माता - पितयांची सेवा । तेथे वास सदा देवा ॥२॥
भजनापासी धाव । वराडिया ऐसा देव ॥३॥
बहेणि म्हणे स्थान तरी । पाहोनिया वास करी ॥४॥

१९४.
तुळसी - वृंदावनी गायींचे गोठणी । बैसता भजनी देव जोडे ॥१॥
नाही या संशय पाहिजे विश्वास । साक्ष अंतरास येत असे ॥२॥
वृंदेसी वचन दिल्हे नारायणे । तुजला टाकोन न वजे कोठे ॥३॥
मग ते तुळसी जाली अंगे वृंदा । म्हणोनी गोविंदा प्रीति तिची ॥४॥
बहेणि म्हणे करा तुळसी - स्मरण । केलिया पावन तिन्ही लोक ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP