मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
पंचतत्त्वांचा

पाळणा - पंचतत्त्वांचा

संत बहेणाबाईचे अभंग

५८७.
जो जो रे जो जो बाळा । प्रिये घाली वेल्हाळा । उन्मनी नीज लागो डोळा । हळू हळू घाली ज्ञानकळा ॥धृ०॥
प्रपंच नाशवंत याचा नाही रे भरंवसा । कन्यापुत्रगृहदारा हा तव भवबंधफासा । दृश्य हे मायाजाळ हा तव काळाचा वळसा । सावध होई बाळा परतोनी पाहे कैसा ॥१॥
========================
स्थूळदेह
प्रथम स्थूळ देह ऐक तुज सांगता । पृथ्वी आप तेज वायु नभ पांच तत्वता । पंचभूते हे स्थूळ पाचा गुणांची पाहता । पाहे हे तरी तू नव्हेसी, बा यावेगळा समस्ता ॥२॥
ऐसे हे स्थूळ देह पाचा भूतांचे जाण । एक भूत ठायी क्रमी पंचवीस गुण । मेळवुनी वाटियली गुणसाम्यता करून । ऐक आता वेगळाली सांगे भिन्न भिन्न ॥३॥
आकाशाचे गुण पाच काम क्रोध लोभ मोह । भय हे पाचवे रे, हे तू जाणसी निःसंदेह । हे तरी तू नव्हेसी तू तव अनामीक पाहे । सांडी हा भ्रांतिवेश सद्गुरूवचनी राहे ॥४॥
आकाशावाचून ( पोटी ) वायु जन्मला जाण । वायूचे पाच गुण ऐक तुज सांगेन । चलन वलन आकुंचन प्रसरण धावन । हे तरी तू नव्हेसी, तू यावेगळा जाण ॥५॥
वायूपोटी पाहे तेज जन्मले आपण । तेहि रे पाचा गुणी आथिले जाण । क्षुधा, तृषा, आळस, निद्रा, मैथुन पाचवा गुण । हे तरि तू नव्हेसी, तू यावेगळा जाण ॥६॥
तेजापोटी आप पाहे आपाचेही पाच गुण । शुर्क शोणित लाळ मूत्र स्वेद पाच जाण । ऐसे हे कळसूत्र देह - पंचक जाण । हे तरी तू नव्हेसी याचा साक्षी अनुभविसी ॥७॥
आपापोटी पृथ्वी जाली पाचा गुणी विस्तारली । अस्थीमांसत्वचानाडी रोम पाचवी केली । या गुणे तू आथिलाएसे घेवुनी मीपणाची खोली । हे तरी तू नव्हेसी ऐसी जाण ज्ञान - किल्ली ॥८॥
ऐसे हे पंचक जाण तू या पंचकावेगळा । नाही तुज नाम रूप, देह पंचकी लाधला । तू तव यासी साक्षीभूत तू तया अलक्ष सकळा । ऐस बा रूप तुझे निजी नीज लागो डोळा ॥९॥
ऐसे हे स्थूल देह आणिक तीन आहेत । लिंग कारण महाकारण ऐक यांचा वृत्तांत । सांगता तू सावधान दृढ देई बाळा चित्त । जेणे तुज नीज लागे हरे चौर्‍यांशीचा खेद ॥१०॥

लिंगदेह
आता लिंगदेहे जेणे संसती धरिले । अंतःकरण चतुष्ट चौदू वृत्तीसी वरिले । इंद्रिय - दशक जाण पंचप्राण आथिले । पाचही विषय जाण तुझे रूप यावेगळे ॥११॥
प्रथम निर्विकल्प कैसा विषय आठवे । ते तुझे अंतःकरण ध्यानआधारे उद्भवे । श्रोत्रद्वारे वाचा प्रवेशे स्वभावे । शब्दे गुणी आकाश यासी तो लिंगदेह स्वभावे ॥१२॥
संकल्प विकल्प मना व्यान वायोची जाण । ज्ञान त्वचा इंद्रियासी पुरूष विषय संघर्षण । पाणी हे इंद्रिय तेथे कर्म चाळितजे जाण । हे तरी तू नव्हेसी याही वेगळा सुजाण ॥१३॥
कल्पाकल्पित द्वैत मन या निश्चयासी येणे । ते तुझिया बुद्धि पाहे मन या निश्चयासी येणे । ते तुझिया बुद्धि पाहे उदान वायोची गुणे । इंद्रिय चक्षुद्वारे पाद इंद्रिया चलन । रूप विषयो तेजी मुरे याही वेगळा तू जाण ॥१४॥
निश्चयासी विसर नोव्हे तेचि जाण तव चित्त । प्राणवायोसंगे जिव्हा इंद्रियांचे सहित । शिस्त्र या इंद्रिय द्वारे रसगुण ओपी निर्मून । हेही बा तू नव्हेसी । तू या वेगळा निश्चित ॥१५॥
मीपण सृजवी जो तोचि तुझा अहंकार । अपान वायोचेनी योगे घ्राणेंद्रिये निर्धार । इंद्रिय गुद द्वारे गंध गुण क्षिति स्थिर । हा तू नव्हेसी तू या वेगळा निर्धार ॥१६॥
ऐसे हे लिंगदेह एका जीवात्मयाचे । सूक्ष पंचभूत पंचवीस कळांचे । भवसिंधु तारावया गुरू साध्य आमुचे । तुकाराम - कृपादाने तारियले साचे ॥१७॥
ऐसे हे देहद्वय तुझे तूच बा जाणसी । तरी तू आपणासी कोण मी ऐसा नेणसी ।

कारणदेह
ते तुझे तिसरे देह नाम “ कारण ” त्यासी । हेही बा तू नव्हेसी तू या वेगळा अससी ॥१८॥
अंतःकरणी स्फूर्ती राहे निवांत समान वायूसंगे । व्यापोनि नाभिस्थान श्रवणद्वारे तेणे भंगे । नायकती शब्द कान निःस्तब्धता होय वेगे । हा तुझा कारणदेह याचा साक्षी तू अनुरागे ॥१९॥
संकल्प विकल्प राहे होय निवांत मन । सर्वांगी हा व्यान वायो व्यापुनी होय तल्लीन । त्वचा हात निवांत होय स्पर्श विषयो ग्रासून । हे तरी तू नव्हेसी तू वेगळा जाण ॥२०॥
ते वेळी निश्चयासी बुद्धी तुझी न स्फुरे । कंठस्थानी उदान वायू गिळी उलटी वसरे । चक्षु पाद निवांत होती रूप विषय तेजी मुरे । याचा तू साक्षीभूत तू या सहज वेगळा रे ॥२१॥
जे वेळी अनुसंधान धरनी विसरे चित्त । प्राण वायू हृदयस्थानी मलमूत्रा कोंडित । जिव्हा शिस्न निवांत राहे । रसविषयो ग्रासित । हे तरी तू नव्हेसी तू यावेगळा निश्चित ॥२२॥
ते वेळी अहंकार देही मीपण सांडी । अपान वायो गुदस्थानी ॥ नाशिक ( नासिका ) आकाशी परवडी । घ्राणगुद निवांत राहे विसरे गंध - विषय गोडी । ऐसे हे तीन देह । तुझा तूंचि बा निवडी ॥२३॥
ऐसे हे अज्ञान जाण तुझा तिसरा देह । ‘ कारण ’ नाम याचे । हे तव भवदायक । जाणते, जाणते रे, याचे भोगिताती दुःख । तुकाराम खास आला, हरियले जन्मदुःख ॥२४॥

महाकारण देह
आता हा चौथा देह । महाकारण जाण । तेथिचि स्थिति कैसी ते तू बुझे आपण । ही खूण विरळा जाणे ब्रह्मास्मि होय स्फुरण । स्वानंदसोहळा जेथे गुरूखूणचि प्रमाण ॥२५॥
स्थूलदेह जागृती तेथे “ विश्व ” अभिमानी । रजोगुण नेत्रस्थानी । युक्त भोग ज्यालागुनी । षड्गुण आकार तव ते तुज दृश्य म्हणवूनी । प्रणवाचा पहिला चरण तू तव तेथीचा जाण ॥२६॥
लिंगदेह स्वप्नावस्था तेथे “ तेजस ” अभिमानी । सत्वगुण कंठस्थान प्रयुक्त भोग त्यागुनी । षड्गुण उकारवंत तू या वेगळा जाण । प्रणवाचा दुसरा चरण राहे ऐसा ओळखून ॥२७॥
आता हा कारण देह याची सुषुप्ति अवस्था । अभिमानी “ प्राज्ञ ” जाण तमोगुण हृदयस्थान । आनंद हा भोग जेथे षड्गुण विकार आपण । प्रणवाचा विसरा चरण तू तरी तियेचा जाण ॥२८॥
आता हा ( महा ) कारण देह याचा सांगता भाव । अनिर्वाच्य महिमा जेथे बोलायासी नाही ठाव । बोलता राग येती संतप्त मानुभाव ( महानुभाव ) । म्हणवुनी गुप्त केले येथे गुरूचा अनुभव ॥२९॥
प्रथम सरस स्वरूपी जे बा सन्मुख स्फुरे । तेचि रे जीवनकळा निजस्वरूप तुझे रे । निमाल्या पाचहीं अवस्था तेचि स्वरूप तू रे । हे स्थितीं लागो तुज । जेवी सरिता सागरी विरे ॥३०॥
ऐसा हा पाळणा रे । निज मायेच्या उपाये । हलवी सोऽहं दोरी । ‘ तत्त्वमसि ’ गीती गाये । निज रे निज बाळा सद्गुरूवचनी पाहे । तुकारामे निजविले बहिणी प्रेम डोलताहे ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP